भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि मुसलमानांचे धर्म हे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात का? ‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता’, आणि प्रतीक व साधन यांच्या निवडीत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या तीन गोष्टी त्यांनी स्वीकारल्या तर त्यांचे त्यांचे धर्म ही सनातन धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे,
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
त्यामुळे ‘आम्ही कोणताच धर्म मानत नाही, आम्ही आमच्या बुद्धीलाच प्रमाण मानतो. आधुनिक विज्ञान आणि तर्कशास्त्र सांगेल, त्याचप्रमाणे आम्ही वागणार’ असे म्हणणारे ही हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. कारण बुद्धी देखील सर्व विश्वाच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचेच एक रूप आहे. आम्ही हिंदू धर्माचा भाग नाही, असे म्हणायचे स्वातंत्र्य त्यांना आहेच. तसेच ते मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारसी यांनाही आहे. ते स्वतःला हिंदू धर्माचे म्हणवून घ्यायला तयार नसतील तर आपण आपले म्हणणे त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगत राहिले पाहिजे. स्वतःच्या धर्ममताचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांनाही आहेच. पण कोणालाच सक्तीने किंवा प्रलोभन दाखवून इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. असे धर्मांतर रोखणे किंवा असे धर्मांतर झालेल्यांची ‘घर वापसी’ करणे हे सर्वसमावेशक अध्यात्मात येते. म्हणूनच ते व्यवहार्य अध्यात्म आहे.
हिंदू राष्ट्र हे मुळात आध्यात्मिक आहे. याचा अर्थ अध्यात्म हा या राष्ट्राचा आदर्श आहे. हिंदू राष्ट्राचे रूप सांस्कृतिक आहे. याचा अर्थ स्वतःच्या जीवनदृष्टी व जीवनपद्धती बाबतीत ठाम आणि इतरांच्या बाबतीत स्वीकारशील अशी इथली संस्कृती आहे. हिंदू राष्ट्राची ओळख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशी प्रथम होते. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण हा हिंदू राष्ट्राचा पोशाख आहे. प्रत्येक पिढी आपल्या आवडीनुसार हा पोषाख बदलत जाईल.