समाजाभिमुख उपासना

प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनी प्रणीत उपासना हा केवळ एक व्यक्तिगत साधनेचा प्रकार नसून व्यक्तीच्च्या आध्यात्मिक उन्नतीला दिलेली ती एक सामाजिक जोड आहे. संघटित समाजजीवन कुटुंब, गाव, देश व संपूर्ण विश्व असे विस्तारत नेण्यासाठी व्यक्तीने असा “संयुक्त” स्वधर्म आचरला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान संचालक वाचस्पती गिरीशराब बापट यांनी ही भूमिका आपल्या ‘प्रकट चिंतन’ या मासिक लेखमालेतून विविध प्रकारे स्पष्ट केली आहे. सौर शके १९२७ (सन २००५-०६) मधील त्यांचे असे निवडक ७ लेख पुस्तिका स्वरुपात प्रकाशित होत आहेत.

संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ चे साधर्म्य प्रबोधिनीच्या उपासनेतील ‘परब्रह्मशक्ती स्फुरो’ या आवाहनाशी ते दाखवितात. स्वधर्माचा आजच्या काळातील उलगडाही पहिल्या लेखात करण्यात आला आहे.

आत्मसंवादाकडून देशपरिस्थितीकडे वळताना देशाचे अखंड, अजिंक्य व महासत्तेचे स्वरुप नेमके कसे असावे, याचे अध्यात्मनिष्ठ भान त्यांनी दुसऱ्या लेखात वाचकांना आणून दिले आहे. चारित्र्याच्या बळावरच भारताला विश्वविजय करायचा आहे, असे ते स्वामी विवेकानंदांचा हवाला देऊन सांगतात. स्वामीजींच्या चरित्र वर्णनाच्या पद्याच्या ओळी क्रमशः निवडून खरे परिस्थितीज्ञान कसकसे करून घ्यावे, याचा निर्देश तिसऱ्या लेखात आहे.

अशा उत्कट जीवनात करुणेला तर स्थान आहेच, पण तथाकथित उत्तमतेच्या व्यावहारिक पायऱ्या ओलांडून सर्वांभूती परमेश्वर पाहात जगणे, ही भारतीय परंपरा आहे. तीच खरी श्रेष्ठतम उत्तमता कशी होईल, याचे दिग्दर्शन त्यांनी चौथ्या लेखात केले आहे. त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी स्वतःचे सुखदुःख समाजाशी म्हणजेच निर्मत्सर होऊन समाजनिष्ठ बनणे याची आवश्यकता त्यांनी पाचव्या लेखात मांडली आहे.

त्यासाठी आवश्यक असा कुटुंबातील जीवन-व्यवहार सहाव्या लेखात ‘प्रबोध कुटुंब’ या कल्पनेद्वारे सांगितला आहे. विकासाचे चिंतन करताना ग्रामीण भागात मंदिर या पारंपारिक अधिष्ठानाचा आधार घ्यावा, असे आवाहनही ते सातव्या लेखात करतात.

व्यक्तिगत श्रेष्ठ जीवन आणि विकसित समूहजीवन म्हणजेच विश्वविजयी देशजीवन. अशी सांगड नित्य स्मरणात राहण्यासाठी ‘समाजाभिमुख उपासना’ ही पुस्तिका कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक अनमोल शिदोरी आहे.

——–वि.शं./सुभाष देशपांडे, कार्यवाह.