१. उपासनेतील पसायदान

मी पसायदान म्हणायला सुरू केल्यावर बहुतेक जण माझ्याबरोबर ओव्या पुटपुटू लागायचे. मग मी सांगायचो -‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजे ‘परब्रह्मशक्ती स्फुरो विश्वामध्ये’.

उपासनेतील पसायदान

पाच सहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रबोधिनीतील उपासनेचा अर्थ सांगायचा होता. हे विद्यार्थी प्रबोधिनीत नियमितपणे काही महिनेच येतात. त्यांचे सर्व लक्ष परीक्षेच्या तयारीकडे असते. त्यामुळे त्यांना नव्याने प्रबोधिनीची प्रार्थना शिकवण्याऐवजी त्यांच्या रोजच्या तासांचा शेवट सर्वांच्या परिचयाच्या पसायदानाने होतो. उपासनेचा अर्थ सांगताना या परिचित पसायदानापासून सुरुवात करता येईल का, असा विचार करत होतो. अशी एक ओवी तेव्हा सापडली.

गेल्या महिन्यात निगडीला कर्मचारी सदस्यांच्या उपासनेनंतर, पुण्यात युवक विभागातल्या मार्गदर्शकांशी, आणि काही जणांशी व्यक्तिशः उपासनेसंबंधी बोलायचे होते. तिथेही पसायदानातल्या ओव्या सांगत बोललो. मी पसायदान म्हणायला सुरू केल्यावर बहुतेक जण माझ्याबरोबर ओव्या पुटपुटू लागायचे. ‘आता विश्वात्मके…’ पासून सुरुवात करून ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ पाशी येईपर्यंत बहुतेक सर्व जणांना या ओव्यांची आठवण झालेली असायची. मग मी सांगायचो ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजे ‘परब्रह्मशक्ती स्फुरो विश्वामध्ये’.

मोठ्याकडून लहानाकडे

पसायदान हे मागणे आहे विश्वात्मक देवाला. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ होण्यासाठी ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे झाले पाहिजे. हाच विश्वात्मक देव आपल्या मातृभूमीच्या रूपात देखील आहे. ‘सारा भारतीय समाज स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘हिंदुत्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’. जो परमेश्वर विश्वात आहे, तोच राष्ट्रातही आहे. आणि तोच प्रबोधिनीमध्ये आहे. ‘प्रत्येक प्रबोधक स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘प्रबोधिनी स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’. प्रबोधिनीच्या उपासनेतील विरजा मंत्रांमध्ये ‘ज्योतिरहं’ म्हणतो तेव्हा विश्वात्मक देव जसा हिंदुत्वात व प्रबोधिनीत आहे तसाच तो माझ्यातही आहे याचाच उच्चार आपण करतो. ‘विरजा विपाप्मा भूयासं’ म्हणतो, त्याचाही अर्थ माझ्या स्वधर्मसूर्याआड येणारे सगळे ढग मी दूर करीन असा आहे. ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ ही व्यापक प्रार्थना क्रमशः आपल्या मापाची करणे हा शक्ति-मंत्रांचा आणि विरजा मंत्रांचा हेतू आहे. ‘मी स्वधर्मसूर्य पाहीन’ हाच विरजामंत्रांचा तात्पर्य अर्थ आहे.

‘सारा भारतीय समाज स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘हिंदुत्व स्वधर्मसूर्ये पाहो’ म्हणजेच ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’.

स्वधर्म म्हणजे काय ?

प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेच्या पोथीत परब्रह्मशक्ती म्हणजे काय आणि परब्रह्मशक्तीचे स्फुरण झाल्यावर हिंदुस्थानात आणि प्रबोधिनीत त्याचे काय परिणाम दिसतील याचे स्पष्टीकरण केले आहे. परब्रह्मशक्तीचे स्फुरण होण्याची प्रक्रिया काय याचे मात्र स्पष्टीकरण दिलेले नाही. स्वतःला, प्रबोधिनीतल्या सर्वांना, हिंदुस्थानातल्या सर्वांना आपापला स्वधर्म कळू लागणे आणि त्याप्रमाणे जो तो वागू लागणे म्हणजे परब्रह्मशक्ती स्फुरणाची प्रक्रिया असे मला वाटते.

हिंदुस्थानातल्या सर्वांना आपापला स्वधर्म कळू लागणे आणि त्याप्रमाणे जो तो वागू लागणे म्हणजे परब्रह्मशक्ती स्फुरणाची प्रक्रिया असे मला वाटते.

स्वधर्म म्हणजे आपले दैनंदिन वागणे आणि आयुष्यभर जगणे हेतुपूर्वक होणे. पशु-पक्ष्यांचे वागणे आणि जगणे असे का वागतो आहोत किंवा असे का जगतो आहोत यासंबंधी विचारही त्यांच्या मनात न येता होते. असा विचार करून वागायचा आणि जगायचा प्रयत्न करणे म्हणजे स्वधर्म पाळायला लागणे. आपला स्वधर्म शोधताना चार पैलूंचा विचार करायला लागतो असे मला आतापर्यंत लक्षात आले आहे.

स्वधर्माचे चार पैलू

स्वावलंबनाने आणि स्वाभिमानाने जगता येईल असे काही तरी काम करणे, असे काम करताना आपल्या जास्तीत जास्त क्षमता वापरणे, व या क्षमतांचा विकास होईल असा प्रयत्न करणे हा स्वधर्माचा पहिला पैलू आहे. यामध्ये उपजीविका, नोकरी, व्यवसाय आणि जे कुटुंब प्रमुखावर अवलंबून आहेत त्यांचे कुटुंबातील कर्तव्य पालन हे सगळेच आले. चोखपणा, उत्तमता यासाठीचे प्रयत्न हे देखील यामध्येच आले.

आपण समाजाच्या आधाराने जगत असतो. त्यामुळे आपल्या जगण्याचा उपयोग समाजाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी झाला पाहिजे. समाजाचा गाडा योग्य दिशेने जाईल, योग्य गतीने जाईल, कुरकुर न करता चालेल, आपल्या वागण्याने त्याची दिशा किंवा गती चुकीच्या पद्धतीने बदलणार नाही, याची काळजी घेत काम करणे हा स्वधर्माचा दुसरा पैलू. इतरांना स्वावलंबनाने व स्वाभिमानाने काम करता येईल असा प्रयत्न करणे हा ही समाजाचा गाडा नीट चालण्याचाच भाग आहे.

समाजाच्या भविष्यकाळाचा विचार करत जगणे हा स्वधर्माचा तिसरा पैलू. पुढच्या काळातील समाजालाही चांगले जगता येईल असे पर्यावरण राखणे, पुढील पिढ्यांना चांगले जगता येईल अशा रितीने सर्व भौतिक व्यवस्था चांगल्या सांभाळणे व वाढवणे, आणि समाजाची माहितीची व ज्ञानाची परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा सांभाळणे व वाढवणे ही आपली पुढील पिढ्यांबाबतीत जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून आजचे आपले जीवन जगणे हा स्वधर्माचा तिसरा पैलू आहे.

आपली उपजीविका, समाजाच्या ‘आज’बद्दलची जबाबदारी आणि समाजाच्या ‘उद्या’बद्दलची जबाबदारी या सर्वांबरोबर दैनंदिन व्यवहारातून आपली चित्तशुद्धी होत जाणे हा स्वधर्माचा चौथा पैलू आहे. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर’ हे चित्तशुद्धीचे एक लक्षण आहे. माझा स्वधर्म वरील चार पैलूंसह मला कळू दे, त्या प्रमाणे वागण्याची शक्ती मला मिळू दे, ही आपल्या उपासनेतील एक महत्त्वाची प्रार्थना आहे. त्यासाठी प्रबोधिनीमध्ये उपासनेचा आग्रह असतो.

आपली उपजीविका, समाजाच्या ‘आज’ बद्दलची जबाबदारी आणि समाजाच्या ‘उद्या’ बद्दलची जबाबदारी या सर्वाबरोबर दैनंदिन व्यवहारातून आपली चित्तशुद्धी होत जाणे हा स्वधर्माचा चौथा पैलू आहे.

सौर कार्तिक १, शके १९२७, २३/१०/२००५