५. माझे आणि समूहाचे सुख-दुःख

व्यासपीठावरचे व मांडवात बसून राहिलेले लोक पाऊस आल्यावर एक पद्धतीने वागले. व्हरांड्यात जाऊन उभे राहिलेले दुसऱ्या पद्धतीने वागले. असे का झाले ?

समूहाचे मन

मराठवाड्यातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेच्या सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. तीस-पस्तीस शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर सदस्य मिळून सुमारे एक हजार जणांचे निवासी शिबिर होते. त्यातल्या एका सत्रासाठी प्रबोधिनीतील दोघांना अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. मी अध्यक्ष व दुसरे कार्यकर्ते त्या संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याने ते प्रमुख पाहुणे. दुपारपासून पावसाची लक्षणे होती. प्रमुख पाहुण्यांचे भाषण चालू असताना जोराचा पाऊस सुरू झाला. व्यासपीठावरचे आम्ही सर्वजण बसून राहिलो होतो. व्यासपीठावरच्या कापडी छतावर पावसाचे पाणी गोळा होऊन ते प्रमुख पाहुण्यांच्या एका खांद्यावर बरोबर पडायला लागले. त्यांचे भाषण तसेच चालू होते. श्रोत्यांमध्ये मात्र हालचाल झाली. जुने व पक्के असे सुमारे सहाशे-सातशे श्रोते पावसातही मांडवात बसून राहिले. नवे व कच्चे असे तीन-चारशे श्रोते मांडवातून पळत बाहेर गेले व कडेच्या इमारतीच्या व्हरांड्यात उभे राहून भाषण ऐकू लागले. व्यासपीठावरचे व मांडवात बसून राहिलेले लोक पाऊस आल्यावर एक पद्धतीने वागले. व्हरांड्यात जाऊन उभे राहिलेले दुसऱ्या पद्धतीने वागले. असे का झाले ?

घडविता घडविता घडवावे

वरील दोन प्रकारचे वागणे त्या दोन गटांची मने वेगळ्या प्रकारांनी घडली आहेत म्हणून तसे झाले. पावसात बसून राहणाऱ्यांनी ‘आपल्या समूहाचा कार्यक्रम ठरला आहे. पावसात भिजल्याने स्वतःची गैरसोय होईल एवढ्या कारणासाठी कार्यक्रम सोडून जाणे योग्य नाही’, असा विचार केला. याला अगदी प्राथमिक स्वरूपाची समूहनिष्ठा म्हणता येईल. ‘कोणीतरी सांगितले, त्यांना नाही म्हणता आले नाही, म्हणून मी कार्यक्रमाला आलो/आले आहे. पाऊस आला तर आपली सोय प्रथम पाहू’, असा विचार व्हरांड्यात जाणाऱ्यांनी केला. याला उपजत स्व-संरक्षण वृत्ती म्हणता येईल. समूहनिष्ठेला स्व-संरक्षण वृत्तीपेक्षा जास्त महत्त्व कधी द्यायचे हे कळणे आणि त्याप्रमाणे वागता येणे म्हणजे मन घडणे.

समूहनिष्ठेला स्व-संरक्षण वृत्तीपेक्षा जास्त महत्त्व कधी द्यायचे हे कळणे आणि त्याप्रमाणे वागता येणे म्हणजे मन घडणे.

सुखात किंवा विपदाकाली

एका कार्यक्रमात आलेला पाऊस ही एक छोटीशी विपत्ती आहे. आपल्याला वाटणारे छोटेसे सुख सोडून देऊन मोठ्या समूहाच्या सुखात आपण सुखी होणे हे सुद्धा मन घडण्यावर अवलंबून असते.

गेल्या महिना-दीड महिन्यात दोन मोठे कार्यक्रम प्रबोधिनीत झाले. हराळीचा वास्तुशांती आणि कलशारोपण कार्यक्रम पंचक्रोशीतील चार-साडेचार हजार ग्रामस्थ आणि प्रबोधिनीतील पाच-सातशे विद्यार्थी-कार्यकर्ते हितचिंतक यांच्या उपस्थितीत झाला. अनेकजण आपापली कामे व कार्यक्रम सोडून त्या कार्यक्रमाला गेले. त्यातल्या अनेकांना आपल्या प्रवासाचे सार्थक झाले असे कार्यक्रमात सहभागी होऊन वाटले. बरेचजण तिथे आयत्या वेळची कामे करायलाच गेले होते. हराळीच्या विद्यार्थ्यांनी तहान-भूक विसरून काम केले. त्या परिसरात येऊन बाकी काही न पाहता फक्त प्रसाद-भोजन घेऊन गेलेलेही होते.

छात्र-प्रबोधनच्या तपपूर्ती महोत्सवात पुण्याला बाहेरगावचे तेरा-चौदाशे विद्यार्थी-संयोजक कार्यकर्ते होते. तसेच पुण्यातील सहा-सातशे जण होते. या कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी भरपूर काम केले. कार्यक्रम चालू असताना पुढच्या सत्राची कामे करणारेही होते. प्रात्यक्षिकांच्या सत्राला आईस्क्रीम खायला जाणारेही होते. प्रत्येकाची सुखाची कल्पना तो कसा घडला असेल त्याप्रमाणे बदलते. समूहाच्या सुखापेक्षा स्वतःचे सुख छोटे, हे सुद्धा शिकायला लागते. समूहाच्या दुःखाच्या मानाने स्वतःचे दुःख छोटे, हे ही शिकायला लागते.

प्रत्येकाची सुखाची कल्पना तो कसा घडला असेल त्याप्रमाणे बदलते. समूहाच्या सुखापेक्षा स्वतःचे सुख छोटे, हे सुद्धा शिकायला लागते.

समूहनिष्ठा आणि निर्मत्सर वृत्ती

देशभर अनेक संघटनांमध्ये आणि प्रबोधिनीमध्येही स्व-संरक्षण वृत्तीपेक्षा समूहनिष्ठा महत्त्वाची, स्वतःच्या छोट्या सुखापेक्षा समूहाचे सुख मोठे हे समजलेले, पटलेले, अंगी बऱ्यापैकी बाणलेले, बाणवण्यासाठी धडपडणारे अनेक जण दिसतात. छोट्या समूहनिष्ठेकडून मोठ्या समूहनिष्ठेकडे, त्याकडून राष्ट्रनिष्ठेकडे सगळ्यांचा प्रवास चालू असताना दिसतो. या प्रवासात एक मोठी अडचण म्हणजे वेगळ्याच प्रकारची मत्सरवृत्ती कधीतरी या प्रवासातच नकळत निर्माण होते.

‘त्याने ठरवले असून तो आपले वागणे सुधारत नाही. तर मग मीच माझे वागणे का सुधारायचे ? त्याची प्रगती खुंटली आहे तर मीच प्रगती का करायची ?’

असा मत्सर ज्यांच्या मनात निर्माण झाला आहे त्यांच्या मनात एक स्वगत चालू असते. साधारणपणे हा स्वतःशी संवाद पुढील प्रमाणे असतो- ‘मी आणि तो एकच काम करतो. आमचे ध्येय एकच आहे. आम्हाला दोघांनाही बरोबर काय आणि चूक काय ते कळते आहे. आम्ही दोघांनी बरोबर तेच करायचे आणि स्वतःला बदलायचे हेही ठरवले आहे.’ इथपर्यंतचे स्वगत योग्यच आहे. विचित्र मत्सर पुढे सुरू होतो. ‘त्याने ठरवले असून तो आपले वागणे सुधारत नाही. तर मग मीच माझे वागणे का सुधारायचे ? त्याची प्रगती खुंटली आहे तर मीच प्रगती का करायची?’ हे slow-cycling च्या स्पर्धेसारखे झाले. सगळ्यात सावकाश कोण जातो याचीच स्पर्धा. अवगुण टाकण्याच्या बाबतीत ही मत्सरवृत्ती घातक आहे. आपण स्वतः राष्ट्रनिष्ठेच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि इतर अनेकांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या समूहनिष्ठेला, अवगुण सोडण्याच्या बाबतीत निर्मत्सर वृत्तीची जोड द्यायला लागेल.

सौर फाल्गुन ३, शके १९२७, २२/२/२००५ २३