६. कुटुंब आणि संघटन

मानवधर्म या शब्दातून व्यक्त होणारी भौतिकता व अतिव्याप्ती व राष्ट्रधर्म या शब्दात शिरू शकणारा अभिनिवेश टाळण्यासाठी त्यांनी संतधर्म असा शब्द वापरला आहे.

संघटना हे सूत्र बनावे

दिवाळीनंतरच्या आठवड्यात सोलापूरच्या युवक सदस्यांचे स्वाध्याय शिबिर झाले. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर सोलापूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर माचणूर नावाचे गाव आहे. तिथल्या एका आश्रमाच्या परिसरात तीन दिवस हे शिबिर झाले. सर्व दिवस मी त्या शिबिरात होतो. प्रबोधिनीच्या शैक्षणिक व ग्रामविकसन कार्याचा चित्रतबकडीच्या (व्हीसीडी) साहाय्याने परिचय करून घेणे, सोलापूरच्या वार्षिक वृत्तांमधल्या काही लेखांचे वाचन करणे, पद्यगायन, वैयक्तिक वाचन या सर्वांबरोबर विनोबांच्या लेखांचे गटात वाचन व गटचर्चा असा कार्यक्रम होता. त्याशिवाय संचलन घेण्याचे प्रशिक्षण, खेळ, पोहणे असाही कार्यक्रम असायचा. सकाळी प्रबोधिनीची सार्थ उपासना व्हायची. संध्याकाळी आश्रमातील सामूहिक प्रार्थनेला सर्वजण उपस्थित राहायचे. विदर्भातील एक सत्पुरुष कै. बाबामहाराज आर्वीकर यांनी माचणूरचा आश्रम स्थापन केला. सामूहिक प्रार्थनेसाठीच्या ओव्या व पदे त्यांनीच लिहिली. सामूहिक प्रार्थनेची पद्धतही त्यांनी ठरवून दिली. मानवधर्म या शब्दातून व्यक्त होणारी भौतिकता व अतिव्याप्ती व राष्ट्रधर्म या शब्दात शिरू शकणारा अभिनिवेश टाळण्यासाठी त्यांनी संतधर्म असा शब्द वापरला आहे. संतधर्माची स्थापना हे माचणूरच्या आश्रमाचे ध्येय त्यांनी सांगितले आहे. या संतधर्मामध्ये वैयक्तिक साधना आणि समाजजीवनाचे संघटन ही दोन कामे येतात. तीर्थक्षेत्रे, विद्यापीठे, कुटुंबे व गावे अशी समाजजीवनाच्या संघटनाची चार क्षेत्रे त्यांनी सांगितली आहेत.

समाजाचे मन तीर्थक्षेत्रांमधून, समाजाची बुद्धी विद्यापीठामधून, समाजाचे चित्त कुटुंबातून व समाजाचा अहंकार गावातून व्यक्त होतो अशी माचणूरच्या आश्रमामधली मांडणी आहे.

कौटुंबिक शाळा

शिबिराच्या सत्रांमधल्या मोकळ्या वेळात आश्रमाचे व्यवस्थापक प्रबोधिनीची माहिती जाणून घ्यायला, आश्रमाच्या विश्वस्तांचा व गावातील कर्त्या लोकांचा परिचय करून द्यायला, व आश्रमाने प्रकाशित केलेले साहित्य दाखवायला यायचे. एका पद्यसत्रामध्ये कै. बाबामहाराज आर्वीकरांचे एक राष्ट्रभक्तीपर गीतही त्यांनी शिबिरार्थीना सांगितले. त्यांच्याशी बोलण्यातून व त्यांनी दिलेल्या साहित्यातून समाजसंघटनाची वर दिलेली चार क्षेत्रे लक्षात आली. व्यक्तिगत जीवनामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे अंतःकरणाचे चार पैलू अनुभवाला येतात. समाजाचे मन तीर्थक्षेत्रांमधून, समाजाची बुद्धी विद्यापीठामधून, समाजाचे चित्त कुटुंबातून व समाजाचा अहंकार गावातून व्यक्त होतो अशी माचणूरच्या आश्रमामधली मांडणी आहे.

शिबिरामध्ये विनोबांचे जे लेख वाचत होतो त्यामध्ये ‘कौटुंबिक शाळा’ या नावाचा लेख होता. त्यात कुटुंबे कशी असावीत याबाबत विनोबांनी जे विचार मांडले आहेत, त्याला समांतर असे विचार बाबामहाराज आर्वीकरांनी मांडले आहेत. ‘समाजाचे चित्त शुद्ध होण्यासाठी कुटुंबाचे क्षेत्र शुद्ध झाले पाहिजे. म्हणजेच कुटुंबातील पैसा व श्रम शुद्ध झाले पाहिजेत. हा भारतीय विचार आहे. हेच आध्यात्मिक चिंतन आहे. पैसा व श्रम शुद्ध करणे म्हणजेच यज्ञ’. विनोबांच्या ‘कौटुंबिक शाळा’ या लेखात हे विचार कृतीत आणण्यासाठी काय केले पाहिजे याची यादीच विनोबांनी दिली आहे.

विनोबांनी शाळांची शालीन कुटुंबे झाली पाहिजेत व कुटुंबांमध्ये कौटुंबिक शाळा चालल्या पाहिजेत असे म्हणून शिक्षणाचे तुकडे करता येणार नाहीत हेच आग्रहाने सांगितले आहे.

प्रबोध कुटुंब

प्रबोध कुटुंब हे शब्द गेली सहा वर्षे आपल्या अंबाजोगाई केंद्रात वापरले जात आहेत. त्याचा आशय निश्चित करण्याचे काम अजून होते आहे. अंबाजोगाईला हे शब्द वापरायला सुरुवात केल्यावर छात्रप्रबोधनच्या काही उपक्रमकेंद्रांवरही या शब्दांमध्ये काय काय अर्थ पाहता येईल अशा चर्चा झाल्या आहेत. निगडीला गेली तीन वर्षे कुटुंब-शिक्षण, कुटुंब धर्म शिक्षण, कुटुंबातील मुलींचे शिक्षण असे विषय एकेका वर्षामध्ये अधिक सखोल विचारासाठी व प्रयोग करण्यासाठी निवडले होते.

विद्यार्थ्यांचे शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी कुटुंबानेही जबाबदारी उचलली पाहिजे हा विचार प्रबोधिनीत सुरुवातीपासूनच आहे. विनोबांनी शाळांची शालीन कुटुंबे झाली पाहिजेत व कुटुंबांमध्ये कौटुंबिक शाळा चालल्या पाहिजेत असे म्हणून शिक्षणाचे तुकडे करता येणार नाहीत हेच आग्रहाने सांगितले आहे. बाबामहाराज आर्वीकरांनी शिक्षणापलीकडे आणखी संघटनाचे कामही कुटुंबांमध्ये होत असते असे म्हटले आहे.

आपण काय काय करतो आहोत ?

कुटुंबांनी अर्थपूर्ण संस्कार करावेत… घरोघरी मातृभूमीचे चिंतन व पूजन कुटुंबातील आर्थिक व्यवहारांमध्ये स्त्रियांच्या स्थानासंबंधी चर्चा यासारख्या सुट्या सुट्या विषयांचा एकत्र विचार आपण करू शकलो तर ‘समाज-संघटनासाठी कुटुंबातील जीवन-व्यवहार कसा असावा’ हे अधिक स्पष्ट होईल.

प्रबोधिनीतल्या संस्कार-पोथ्या वापरून कुटुंबांनी अर्थपूर्ण संस्कार करावेत व स्वतःच घरच्या संस्कारांचे पौरोहित्य करून संस्कारविधीबाबतीत स्वावलंबी व्हावे असे शक्य तिथे आपण सांगत असतो. आपण जशा विद्यार्थ्यांच्या साहस सहली व शरीर-श्रमाच्या सहली काढतो तशा कुटुंबांनीही काढल्या तर कुटुंबांचे मानसिक आरोग्य सुधारते असा काही कुटुंबांचा अनुभव आहे. अशी कल्पना कोणी बोलून दाखवल्यास त्यांना आपण प्रोत्साहन देतो. प्रबोधिनीतील हिंदुस्थानची चित्रमूर्ती घरोघर पोहोचावी व घरोघरी मातृभूमीचे चिंतन व पूजन करायची वृत्ती वाढीला लागावी म्हणून या वर्षी निगडीच्या रौप्य महोत्सवानिमित्त २५०० घरी मातृभूमीपूजन उपासना करण्याचा संकल्प आहे. निगडीलाच पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेशाआधी सोळा व्याख्यानांचा पालक प्रबोधन वर्ग चालतो. वेल्हे परिसरात आरोग्य-प्रकल्पामध्ये कौटुंबिक आरोग्यावर प्रबोधनासाठी दांपत्यांचे वर्ग घेतले होते. वेल्हे परिसरातल्याच आणखी एका गावात सध्या घरोघर पिण्याच्या पाण्याचे विरजक (फिल्टर) वापरायला शिकवतो आहोत. बचत गटांच्या निमित्ताने कुटुंबातील आर्थिक व्यवहारांमध्ये स्त्रियांच्या स्थानासंबंधी चर्चा व कृती होऊ लागली आहे; या आणि यासारख्या सुट्या सुट्या विषयांचा एकत्र विचार आपण करू शकलो तर ‘समाज-संघटनासाठी कुटुंबातील जीवन-व्यवहार कसा असावा’ हे अधिक स्पष्ट होईल.

सौर अग्रहायण १, शके १९२७, २२/११/२००५