७. विकासाचे अधिष्ठान

अनेक गावांमध्ये मंदिरांची डागडुजी, विस्तार, जीर्णोद्धार अशी कामे झाल्याचे लक्षात आले गाव जेव्हा आपणहून एकत्र आले तेव्हा त्यांनी पहिले काम करायला घेतले ते मारुती मंदिराच्या विस्ताराचे.

गावाच्या संघटनाची सुरुवात

मागच्या आठवड्यात अंबाजोगाईला गेलो होतो. सुमारे दीड वर्षांपूर्वी तिथे ग्रामविकसनाचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू झाले. अनेक गावांतील सरपंचांच्या सहली व त्यांच्या विविध कार्यकर्त्यांशी भेटींनी प्रारंभ झाला. नंतर सरपंचांनीच गावात काय करायचे ते ठरवायचे आणि त्यांनीच गावकऱ्यांना गोळा करून कामे करायची. अशी पद्धत वर्षभर होती. वर्षभरामध्ये काय काय कामे झाली याचा आढावा घेत असताना अनेक गावांमध्ये मंदिरांची डागडुजी, विस्तार, जीर्णोद्धार अशी कामे झाल्याचे लक्षात आले.

प्रबोधिनीचे ग्रामविकसनाचे काम ज्या कल्याण गावात सुरू झाले तिथला कामाचा क्रम मला आठवला. जोपर्यंत कामाच्या आखणीत प्रबोधिनीचा पुढाकार होता तोपर्यंत बंधारे, संडास, रस्त्यावरच्या मोऱ्या, विहीर, शाळेची इमारत अशी कामे झाली. गाव जेव्हा आपणहून एकत्र आले तेव्हा त्यांनी पहिले काम करायला घेतले ते मारुती मंदिराच्या विस्ताराचे.

अडचणी येतात, नाईलाज असतो तेव्हा रस्ता, बंधारा, विहीर, शाळेसाठी खोल्या अशी कामे गावोगावी परस्पर सहकायनि होत असतातच; परंतु गावाचा कारभार सुरळीत चालू असतो तेव्हा काय होते ? तर बहुतेक ठिकाणी मंदिराच्या कामाला हात घातला जातो. लोक हौसेने जयपूरला किंवा पंढरपूरला मूर्ती आणायला जातात. व्यवहारी माणसाला ‘न परवडणारा खर्च’ वाटेल असा खर्च करून चांगली फरशी, उत्तम कळस, चमकदार रंगकाम करतात.

केवळ ग्रामविकसनाचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना बऱ्याच वेळा मंदिरावरचा खर्च हा अनाठायी खर्च वाटतो. त्या गावात काम करायचे ठरलेच आहे म्हणून ते गावकऱ्यांचा मंदिरांच्या बाबतीतला फाजील उत्साह सहन करतात. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी तरी अजून एखाद्या गावात मंदिर बांधून कामाला सुरुवात करूया, असे म्हटल्याचे ऐकिवात नाही.

शाळा हे मंदिर, यंत्रालय हे मंदिर, रुग्णालय हे मंदिर, ग्रंथालय हे मंदिर, प्रयोगशाळा हे मंदिर हे शब्द आपण सवयीने वापरतो की अर्थ मनात ठेवून वापरतो ?

मंदिराची पुनर्व्याख्या

प्रबोधिनीची पुण्यातील वास्तू बांधताना ती मंदिरासारखी दिसावी असा मुद्दाम प्रयत्न केला आहे. निगडीला मुद्दाम स्वतंत्र मातृमंदिराची वेगळी इमारत बांधली आहे. उपासना मंदिर, ध्यान मंदिर असे शब्द आपण वापरतो. शाळा हे मंदिर, यंत्रालय हे मंदिर, रुग्णालय हे मंदिर, ग्रंथालय हे मंदिर, प्रयोगशाळा हे मंदिर, असे शब्दही आपण वापरतो. हे शब्द आपण सवयीने वापरतो की अर्थ मनात ठेवून वापरतो ?

रामकृष्ण मठाचे नुकतेच दिवंगत झालेले माजी अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद दोन शब्द अनेक वेळा वापरायचे – static piety (स्थितिशील भाविकता) आणि dynamic spirituality (गतिशील आध्यात्मिकता). गावात बऱ्याच लोकांची भाविकता ही स्थितिशील असते. आपण कार्यकर्ते बऱ्याच वेळा ग्रामविकासाची किंवा व्यक्तिमत्त्व विकासाची कामे करताना ती स्थितिशील किंवा गतिशील ऐहिकतेतून करत असतो. गावकरी काय किंवा कार्यकर्ते काय, स्थितिशीलतेतून गतिशीलतेकडे आणि केवळ भाविकता किंवा केवळ ऐहिकता यांच्याकडून आध्यात्मिकतेकडे असा प्रवास सर्वांनी करत राहिले पाहिजे.

स्थितिशीलतेतून गतिशीलतेकडे आणि केवळ भाविकता किंवा केवळ ऐहिकता यांच्याकडून आध्यात्मिकतेकडे असा प्रवास सर्वांनी करत राहिले पाहिजे.

वैज्ञानिक वृत्ती म्हणजे वास्तवाचा स्वीकार

जी वस्तुस्थिती किंवा वास्तव आहे ते कितीही वेळा तपासून, पारखून घ्या पण शेवटी वास्तवाशी जुळणारे सिद्धान्त असले पाहिजेत अशी विज्ञानाची रीत आहे. जो नियम भौतिकशास्त्रात तोच सामाजिक शास्त्रातही लावावा लागतो. प्रबोधिनीचे बचत गटांचे काम सुरु झाले तेव्हाची गोष्ट आहे. पहिले सहा महिने फक्त बचत झाली. नंतर बचतगटांमध्येच कर्जवाटप सुरू झाले. बचत गट संयोजकांना महिलांनी कर्ज घेऊन त्या भांडवलातून स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत असे वाटत होते; पण महिलांनी कर्जे घेतली ती सुरुवातीला घरच्या बारीक सारीक दुरुस्त्यांसाठी, जीवनोपयोगी वस्तू घेण्यासाठी. नंतर कर्जे घेतली ती समारंभांच्या खर्चासाठी. नंतर विविध जाहिरातींमधून दिसणाऱ्या सुखसोयी घरामध्ये आणण्यासाठी. त्यानंतर शेतीसुधारणेसाठी. त्यानंतर मग काहीजणी व्यवसायासाठी भांडवल म्हणून कर्ज घेऊ लागल्या. शिक्षणासाठी कर्जाचा तर त्याच्याहीनंतर क्रम लागला. बचत गट चालवणाऱ्या सर्व संस्थांनी हा क्रम समजून घेण्यासाठी, त्याचा अर्थ लावण्यासाठी वेळ व पैसा कधी ठरवून, कधी न ठरवता खर्च केला; पण त्यांनी वास्तव स्वीकारले. आधी खावटी कर्जे नंतर गुंतवणुकीसाठी कर्जे. हा सामाजिकशास्त्रातला नियम लक्षात आला.

गावाच्या स्तरावरच्या प्राधान्यक्रमाचा असा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कोणीतरी करायला नको का ? गावाच्या विकासाचा प्रारंभमंदिरापासून होत असेल तर प्रारंभबिंदू म्हणून तो स्वीकारला पाहिजे. प्रारंभबिंदूपासून गाव पुढे काय टप्प्यांनी जाते ते शोधूया. त्याचे नियमही शोधूया आणि पुढच्या टप्प्यांचे कामही करूया. छोटी गावे नजरेच्या आवाक्यात येतात म्हणून मंदिर हा एक प्रारंभ बिंदू लक्षात तरी आला. मोठी गावे आणि शहरे येथील समाज संघटित होऊन कामाला लागण्याचा काय क्रम असतो ? शिक्षण, संघटन, ग्रामविकसन आणि संशोधन प्रभागातील सदस्यांसमोर नेमके वास्तव समजून घेऊन काम करण्याचे हे आव्हान आहे. गाव आणि शहर पातळीवरचा काही क्रम लक्षात आला आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी प्रकट चर्चा केली पाहिजे.

बचत गट चालवणाऱ्या सर्व संस्थांनी वास्तव स्वीकारले. आधी खावटी कर्जे नंतर गुंतवणुकीसाठी कर्जे. हा सामाजिकशास्त्रातला नियम लक्षात आला. गावाच्या स्तरावरच्या प्राधान्यक्रमाचा असा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कोणीतरी करायला नको का ?

सौर चैत्र १, शके १९२७, २२/३/२००५ ३१