
शांत क्रांतीचा महामेरू: डॉ. विवेक कुलकर्णी
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर !!!
आज केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश एका स्थित्यंतरातून जात आहे. कोणत्याही व्यवस्थेच्या विकासाच्या नाड्या या तिथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या हातात असतात. जर ही यंत्रणा संवेदनशील आणि कार्यक्षम झाली, तर देशाचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही. महाराष्ट्राच्या मातीला परिवर्तनाचा मोठा वारसा आहे. पण सध्या या भूमीत एक वेगळीच चळवळ आकाराला येत आहे. ही चळवळ रस्त्यावरील घोषणांची नाही, तर विचार आणि आचरणातून घडणाऱ्या एका शांत क्रांतीची आहे. ही क्रांती कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या प्रभावाखाली होत नसून, ती प्रशासकीय यंत्रणेच्या मुळाशी होत असलेल्या बदलातून उभी राहत आहे. हेच ओळखून, कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत शांतपणे ही यंत्रणा बदलण्याचे आणि तिला लोककल्याणाभिमुख करण्याचे महान कार्य डॉ. विवेक कुलकर्णी करत आहेत.
बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण तो बदल जेव्हा अत्यंत शांतपणे आणि रचनेतून घडतो, तेव्हा त्याचे परिणाम चिरंतन असतात. गेल्या तीन दशकांपासून पुण्याच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये असाच एक बदल घडत आहे. हे केवळ एक ‘स्पर्धा परीक्षा केंद्र’ नसून, हे प्रशासक घडवणारे एक विद्यापीठ बनले आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी… आणि त्याही पलीकडे
आज महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नाही, एकही तालुका नाही, जिथे या केंद्राने घडवलेला एकही अधिकारी कार्यरत नाही. हे जाळे केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान कार्यालयापासून (PMO) ते राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत (CMO) आणि तळागाळातील पंचायत समिती कार्यालयांपर्यंत प्रबोधिनीचे निष्ठावान अधिकारी आज देशसेवेत मग्न आहेत.
१९९३ साल. पुण्याच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या त्या ऐतिहासिक वास्तूत माझा तो पहिलाच दिवस होता. सुबोध कुलकर्णीसोबत मी ‘प्रचीती’च्या सदस्यांसाठी आयोजित केलेले एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. व्याख्यान संपलं आणि सुबोधने माझी ओळख करून दिली ती विवेक कुलकर्णी सरांशी. ती ओळख केवळ औपचारिक नव्हती, तर एका प्रदीर्घ प्रवासाची ती नांदी होती.
व्याख्यानानंतर सरांसोबत चालत असताना त्यांनी मला काही प्रश्न विचारले. पण ते प्रश्न एखाद्या चौकशीसारखे नव्हते. त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या लकबीत एक विलक्षण आपुलकी होती, एक सहजता होती. आवाजात कोणताही अभिनिवेश नाही, चढ-उतार नाही, पण तरीही संवादावर त्यांची जबरदस्त पकड होती. चालता चालता झालेल्या त्या काही मिनिटांच्या संवादात माझं त्यांच्याशी एक अदृश्य मैत्र जुळलं होतं. सरांच्या त्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावात माझे पुढचे दोन दिवस कसे गेले, हे मलाही कळलं नाही.
त्यानंतर वेळेनुसार माझं प्रबोधिनीत येणं-जाणं वाढलं. गांधी वस्तीतील सामाजिक काम आणि ‘प्रचीती’च्या अभ्यास शिबिरांमधून सरांची अधिक ओळख होत गेली. मी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात एक चांगला खेळाडू होतो, हे जेव्हा सरांना समजलं, तेव्हा आमचा संवाद अधिकच विस्तारला. सर स्वतः एक पट्टीचे खेळाडू! प्रबोधिनीच्या क्रीडांगणावर (दलावर) कबड्डी आणि खो-खो खेळताना त्यांचं ‘पॅशन’ वाखाणण्याजोगे असे.
सरांची शिकवण्याची पद्धतही तितकीच आगळीवेगळी. ते केवळ खेळ शिकवायचे नाहीत, तर खेळाचे कौशल्य आणि जिंकण्याची रणनीती एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचे. ‘कबड्डीतील भौतिकशास्त्र’ अशा विषयावर त्यांच्याशी होणाऱ्या चर्चा आजही अकल्पित वाटतात. मैदानावर चुरशीने लावलेल्या जोर-बैठकांच्या स्पर्धांतून त्यांनी अनेकांच्या आयुष्याला सामर्थ्यवान बनवलं. अगदी अलीकडचा काळ सोडला, तर संध्याकाळच्या खेळाच्या वेळी ‘चौरस धावा’ (बेसबॉल) खेळताना झेप मारून चेंडू पकडणारे सर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहतात. खेळाने त्यांना जी खिलाडूवृत्ती दिली, तीच त्यांच्या जगण्याचं सूत्र बनली. पायाला दोनदा फ्रॅक्चर होऊनही त्यांची जिद्द आणि मैदानावरील ‘जिकर’ कधीच कमी झाली नाही.
सरांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांचं ‘नातेसंबंधांचं जाळं’. प्रबोधिनीचा विस्तार देशव्यापी करण्यासाठी त्यांनी अनेक विस्तार शिबिरं घेतली. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना ते सांगलीच्या शिबिरात गेले आणि तिथल्या लोकांशी त्यांचं असं काही ऋणानुबंध जुळलं की ते कायमचं नातं बनलं. एखाद्या व्यक्तीची ओळख करून घेणं म्हणजे केवळ त्याचं नाव जाणून घेणं नव्हे, तर त्याच्या कुटुंबाशी, घरातील प्रत्येकाशी समरस होणं ही सरांची हातोटी! अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर ते अनेक वर्षांनंतरही भेटल्यावर घरातील व्यक्तींची नावानिशी चौकशी करतात, तेव्हा समोरचा माणूस भारावून गेल्याशिवाय राहत नाही.
माझ्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. माझे प्रबोधिनीतील अनेक मित्र किंवा ज्येष्ठ सहकारी जेव्हा अंबाजोगाईला माझ्या घरी यायचे, तेव्हा माझी आई फारशी त्यांच्याशी बोलत नसे. पण विवेकसरांच्या बाबतीत मात्र हा नियम अपवाद ठरला. आई नेहमी म्हणते, “तुमच्या प्रबोधिनीत विवेकसर मला अगदी आपला माणूस वाटतात.” आईची ही भावना केवळ माझ्या घरापुरती मर्यादित नाही. सरांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला हेच वाटतं की, हा माणूस फक्त माझा आहे. वागण्यातील सहजता, निखळ आपलेपणा आणि न विसरता संपर्क टिकवून ठेवण्याचं हे अजब कसब म्हणजे विवेक कुलकर्णी सर!
तपसाधना आणि प्रचीती: मूल्यांच्या पायावर उभे राहिलेले नेतृत्व
विवेक सरांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच तेजस्वी. मुंबईला IIT मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्यावरही त्यांचे प्रबोधिनी आणि सांगलीशी असलेले नाते कधीच विरळ झाले नाही. प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय आप्पासाहेबांचा एक आग्रह असे— “प्रबोधकांनी शिक्षणातील सर्वोच्च अशी ‘विद्यावाचस्पती’ (Ph.D.) ही पदवी मिळवलीच पाहिजे.” सरांनी आप्पासाहेबांचा हा शब्द प्रमाण मानला.
पीएच.डी. पूर्ण झाल्यावर त्यांच्यासमोर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची आलिशान दालने आणि गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे पर्याय खुले होते. पण, सरांनी त्या झगमगाटाकडे पाठ फिरवली आणि प्रबोधिनीच्या कामाला तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापनाला प्राधान्य दिले. पैसा आणि वैभवापेक्षा ध्येयाची ओढ किती प्रबळ असू शकते, याचे सर जिवंत उदाहरण आहेत.
सरांच्या व्यक्तिमत्वाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘सर्व वयोगटांशी साधता येणारा सहज संवाद’. अंबाजोगाईला आल्यावर ते जितक्या मायेने शिशुविहारच्या चिमुकल्यांशी खेळतात, तितक्याच आत्मीयतेने स्पर्धा परीक्षेच्या युवकांशी चर्चा करतात आणि गीता प्रबोधिनीच्या आजी-आजोबांशीही गप्पा मारतात. त्यांच्या ठायी असलेला आत्मविश्वास हा अहंकाराला स्पर्शही न करणारा आहे, म्हणूनच ते सर्वांना आपलेसे वाटतात.
प्रबोधिनीचे नेतृत्व विकासाचे प्रयोग महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरांनी ‘प्रचीती’ संकल्पनेला गती दिली. तो काळ आमच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणारा ठरला. व्याख्यानमाला, अभ्यास दौरे आणि शिबिरांच्या माध्यमातून तरुणांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. या प्रक्रियेत सरांनी युवक विभागासोबतच ‘प्रचीती’ला आपला मोलाचा वेळ दिला.
सरांसोबत काम करताना ‘वेळेचे व्यवस्थापन’ कसे असावे, याचा वस्तुपाठच मिळतो. दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मी जेव्हा अरुणाचल प्रदेशातून अंबाजोगाईला परतलो आणि येथे प्रबोधिनीचे कार्य सुरू करण्याचा मानस व्यक्त केला, तेव्हा सर तातडीने अंबाजोगाईला आले. खूप चर्चा झाली आणि शेवटी त्यांनी स्वतः कागद-पेन घेऊन माझ्या पूर्ण दिवसाचा दिनक्रम आखून दिला.
केवळ कामाचेच नव्हे, तर आपल्या सहवासातील प्रत्येकाच्या खासगी अडचणी, बारीकसारीक समस्या ते अतिशय संयमाने ऐकून घेतात. समोरच्या व्यक्तीचा दिनक्रम अधिक परिणामकारक कसा होईल आणि त्याच्या आयुष्यातील अडथळे कसे दूर होतील, यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. अनेक जणांच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उभे राहताना, त्यांनी अनेकांना कठीण प्रसंगातून बाहेर काढले आहे.
त्यांच्या या निस्पृह मार्गदर्शनामुळेच आज अनेक तरुण समाजकार्याच्या वाटेवर खंबीरपणे उभे आहेत. विवेक सर म्हणजे केवळ एक नाव नसून, ते एक चालतं-बोलतं प्रेरणास्थान आहेत.
साहसातील वत्सलता आणि वंचितांचा कैवारी: एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व
विवेक सरांच्या ठायी सोबतच्या व्यक्तीला ‘सलगी’ देण्याचे एक अफाट सामर्थ्य आहे. त्यांच्यासोबत ट्रेकला गेलेल्या प्रत्येकाने हा अनुभव नक्कीच घेतला असेल. शहराच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत स्वतःच्या क्षमतांचा कस लावताना, जेव्हा शरीराच्या प्रत्येक पेशीला शुद्ध प्राणवायू मिळतो, तेव्हा मन आणि मेंदू स्वच्छ होतात. अशाच एकांताच्या क्षणी सर प्रत्येकाला बोलतं करतात. आपली स्वप्नं, इच्छा आणि मनातली द्वंद्वं मोकळेपणाने मांडण्यासाठी ते एक सुरक्षित अवकाश निर्माण करतात. यातूनच केवळ मित्र नाही, तर एक घट्ट कौटुंबिक नातं तयार होतं.
सरांच्या साहसी वृत्तीसोबतच त्यांची ‘वत्सलता’ भारावून टाकणारी आहे. एकदा ट्रेक दरम्यान सचिनचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. अशा वेळी कोणताही विचार न करता सर स्वतः खाली उतरले आणि त्याला आपल्या पाठीवर घेऊन ती अतिशय अवघड चढण चढून वर आले. एका मार्गदर्शकाच्या पाठीवर जेव्हा एखाद्या शिष्याचा भार असतो, तेव्हा त्या नात्यातली माया शब्दांच्या पलीकडली असते.
पण हे गंभीर व्यक्तिमत्व तितकंच मिश्कील आणि विनोदी देखील आहे. अशाच एका साहसी मोहिमेवर असताना सरांना काही अंडी दिसली. त्यांनी अतिशय गंभीर चेहऱ्याने मुलांना सांगितले, “हे बघा, ही सशाची अंडी!” मुलंही मोठ्या कुतूहलाने ती पाहू लागली आणि एकमेकांना सांगू लागली. वातावरण एकदम जिवंत झालं आणि मग सर हसून म्हणाले, “अरे, ससा कधी अंडी घालतो का?” आणि सगळ्यांची एकच हसता हसता पुरेवाट झाली. त्यांच्या या मिश्कीलपणामुळेच कठीण प्रसंगही सुसह्य होतात.
सरांच्या आयुष्याचं मुख्य सूत्र म्हणजे ‘उदात्त करुणा’. समाजातील वंचितांसाठी काहीतरी ठोस करण्याची आणि इतरांवर तसा संस्कार करण्याची त्यांची तळमळ प्रचंड आहे. पडसऱ्यातील शंभर दिवसांची शाळा असो वा त्यातून उभे राहिलेले ‘साखर शाळांचे’ मोठे जाळे; ग्रामीण भागातील प्रज्ञा शोधून तिचा विकास घडवणारा ‘ग्रामीण प्रज्ञा विकास प्रकल्प’ असो, या प्रत्येक कामाच्या नियोजनात आणि चिंतनात सरांनी आपला वेळ आणि आयुष्य वेचले आहे. आज जेव्हा मी मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारतो आणि त्यांना कुठल्यातरी आश्रमशाळेत किंवा साखर शाळेत जागा मिळते, तेव्हा त्या मुळातील प्रयत्नांमागे विवेकसरांचा चेहरा डोळ्यासमोर येतो.
वंचितांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी सरांचा निकटचा संबंध. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीयांचे नातं वंचितांच्या वेदनेशी जोडलं गेलं. सरांचा परिचय म्हणजे केवळ एका व्यक्तीचा परिचय नाही, तर सामाजिक कार्याशी जोडलेला तो एक अत्यंत प्रभावी दुवा आहे.अहंकाराचा स्पर्शही नसलेला हा आत्मविश्वास, खेळाडूची खिलाडूवृत्ती आणि वंचितांबद्दलची अपार माया… असे हे विवेक कुलकर्णी सर म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक दीपस्तंभच आहेत!
विवेकनिष्ठ विश्लेषणाचे विद्यापीठ: ध्येयवादी नेतृत्वाचा सांगाती
समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ सामाजिक कार्यकर्ता असून चालणार नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेतही समाजकेंद्रित विचार करणारे नेतृत्व हवे, हा ज्ञान प्रबोधिनीचा मूळ विचार. हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले आहेत. गोडबोले सरांच्या व्याख्यानांपासून सुरू झालेली स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका, मुलांचे व्यक्तिगत समुपदेशन आणि त्यांना दिलेली दिशा यामागे विवेकसरांचा प्रचंड मोठा आवाका होता. सरांच्या कामाचा झपाटा थक्क करणारा आहे; एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याचे त्यांचे कौशल्य आणि जगातील जे जे ‘उत्तम’ व ‘नवे’ आहे ते आत्मसात करण्याची त्यांची ओढ आजही कायम आहे. विशेष म्हणजे, हे ज्ञान ते केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, दुसऱ्यात संक्रमित करण्यासाठी सदैव तत्पर असतात.
त्यांच्यातील लवचिकता आणि समर्पणाचे एक उदाहरण म्हणजे अंबाजोगाईतील स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात. दिल्लीच्या UPSC देणाऱ्या मुलांना शिकवणारे सर, जेव्हा अंबाजोगाईत चक्क दोन दिवस आठवीतील मुलांचे NTSE चे शिबीर घेतात किंवा प्रशालेतील चिमुकल्यांना ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ची गोष्ट रंगवून सांगतात, तेव्हा त्यांच्यातील शिक्षकाचे विशाल रूप समोर येते. विविध क्षेत्रातील त्यांचा हा वावर आम्हा सर्वांना समृद्ध करणारा ठरला आहे.
सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘तरुणांवर टाकला जाणारा अढळ विश्वास’. लातूरचा भीषण भूकंप झाला आणि प्रबोधिनीचे मदतकार्य सुरू झाले. मी मदतीला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि सरांनी एका क्षणात माझ्यासमोर पुढील दोन महिन्यांचे नियोजन मांडले. अनुभव नसतानाही माझ्यासारख्या तरुणावर इतकी मोठी जबाबदारी विश्वासाने सोपवणे, हे पाहून मी अचंबित झालो होतो. अर्थात, ही जबाबदारी सोपवून ते थांबले नाहीत; तर योग्य वेळी मार्गदर्शन, भावनिक पाठिंबा आणि वैचारिक रसद पुरवण्याची काळजी त्यांनी आईच्या मायेने घेतली.
अण्णा हजारे यांचे आंदोलन असो किंवा इतर कोणतेही सामाजिक पाऊल, मी सरांकडे शब्द टाकला की लगेच होकार आणि नियोजनाची हुकुमत तयार असायची. अण्णांच्या आंदोलनात पंधरा दिवस राहून जेव्हा मी आणि सुबोध परतलो, तेव्हा सरांनी तासभर आमचा अनुभव शांतपणे ऐकून घेतला. एखादा अनुभव फक्त ‘घेणं’ आणि तो ‘समजून घेणं’ यातला फरक त्यांनी आम्हाला शिकवला. त्या अनुभवाचे विश्लेषण कसे करायचे, त्यातील ‘Learning Outcome’ (शिकण्याचे मुद्दे) आपल्या जगण्याचा भाग कसे करायचे, हे त्यांनी ज्या पद्धतीने समजून सांगितले ते अफलातून होते.
त्यांची विश्लेषण करण्याची पद्धत अत्यंत ‘विवेकनिष्ठ’, नेमकी आणि मुद्द्याला धरून असते. कधी कधी ते एखाद्या विषयाचा खूप कीस पाडत आहेत असे वाटायचे, पण काळ लोटल्यावर लक्षात यायचे की, त्या सखोल विश्लेषणानेच आमच्या विचारांमधील संदिग्धता दूर केली होती. प्रबोधिनीच्या मूल्यांशी जोडून घेताना, विवेकसरांच्या या विश्लेषणात्मक मार्गदर्शनानेच आम्हाला अधिक प्रगल्भ बनवले.
चिंतनशील वाचक ते भविष्यवेधी मार्गदर्शक: एक समृद्ध प्रवास
बऱ्याच काळानंतर निवांत वेळ मिळाला की, सर एखादं असं पुस्तक हातावर ठेवतात जे जगण्याचं तत्वज्ञानच बदलून टाकतं. असंच एकदा त्यांनी मला हर्मन हेसेचं ‘सिद्धार्थ’ वाचायला दिलं. ते पुस्तक वाचताना मी इतका गढून गेलो की जणू काहीतरी गवसल्याचा भास झाला. दोन दिवसांनी जेव्हा मी सरांकडे गेलो, तेव्हा पुस्तकावरची चर्चा एका वेगळ्याच पातळीवर पोहचली. सर ज्या पद्धतीने पुस्तकं समजून घेतात, त्या नजरेतून मी जेव्हा दुसऱ्यांदा ‘सिद्धार्थ’ वाचलं, तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या वाचनातील फरक मला स्पष्टपणे जाणवला. जगण्याची एक नवी लय आणि कला मिळाल्यासारखं वाटलं.
बहिणीच्या लग्नात साध्या ‘थ्री-पीस सूट’साठी रुसणारा मी, विवेकसरांच्या सहवासात चक्क विवेकानंद केंद्राचा ‘जीवनव्रत्ती’ होण्याच्या निर्णयापर्यंत आलो. हा बदल छोटा नव्हता. जेव्हा मी माझा हा निर्णय त्यांना सांगितला, तेव्हा त्यांनी विचारलेले नेमके प्रश्न आणि केलेले स्पष्ट बोलणे त्यावेळी थोडे बोचले, पण माझ्या पुढच्या आयुष्यासाठी ते पायाचे दगड ठरले. माझ्यासारख्या कित्येकांच्या आयुष्याच्या वाटा सरांशी बोलून ठरल्या, बदलल्या आणि योग्य दिशेने धावू लागल्या.
सरांचे वाचन म्हणजे एक अफाट समुद्र आहे. रशियन ‘मीर’ प्रकाशनाच्या तांत्रिक पुस्तकांपासून ते ‘अनुभव’ आणि ‘साधना’ सारख्या मासिकांपर्यंत त्यांचा वाचनप्रपंच विस्तारलेला आहे. जगातील नवनवीन विचारप्रवाह समजून घेण्यात त्यांना विलक्षण रस असतो. विशेषतः ‘भविष्यवेध’ (Futurology) या शास्त्राचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. भविष्यातील आव्हाने कशी असतील आणि प्रबोधिनीच्या कामाची दिशा काय असावी, यावर त्यांचे तासही तितकेच रंगतदार असतात.
ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीत ‘भवितव्य’ लेखनाचा भाग महत्त्वाचा असतो. त्यात सरांचे योगदान मोलाचे आहे. ते अतिशय सखोल टिपणे काढतात, क्लिष्ट विषयांचे कोष्टक आणि ‘फ्लोचार्ट्स’ तयार करतात. त्यांचे ‘डॉक्युमेंटेशन’ इतकं अचूक असतं की, कित्येक वर्षांपूर्वीचे संदर्भ ते काही क्षणात उपलब्ध करून देतात. एखादा विषय घेऊन त्यांच्याकडे गेलं की, संदर्भग्रंथांचे भांडार आपल्यासमोर उघडलं जातं आणि निवांत चहा घेता घेता तो विषय आपल्या मनावर कोरला जातो.
नाविन्याची ही ओढ जितकी प्रबळ आहे, तितकीच प्रबोधिनीच्या ‘उपासनेवर’ त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यांची नियमित उपासना आणि त्यावरचे चिंतन हे केवळ शब्द नसून ते ‘आत्मगत चिंतन’ असते. मानसशास्त्र आणि योगशास्त्राची गुंतागुंतीची तत्वं ते व्यवहारातील उदाहरणे देऊन इतक्या सहजपणे सांगतात की मनातील तमस, अंधकार आणि दुर्बलता दूर होऊन काम करण्याची एक नवी ऊर्जा मिळते. विशेषतः दर शनिवारचे त्यांचे उपासना-चिंतन मनाला मरगळीतून बाहेर काढून कार्यक्षम बनवण्यासाठी संजीवनी ठरते.
खेळ, शिक्षण, सामाजिक कार्य, भविष्यवेध आणि अध्यात्म या सर्वच क्षेत्रांत सरांनी जी पायवाट निर्माण केली, ती आज अनेकांसाठी महामार्ग बनली आहे. विवेक सर म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि मार्गदर्शनाचा आधार असणारे एक चैतन्यमयी व्यक्तिमत्व!
अधिकारी घडवणारे ‘अक्षर’ शिल्पकार: समृद्ध भविष्याचे संघटक
गेल्या काही वर्षांत विवेक सर आणि सविताताईंनी आपला बहुतांश वेळ ‘स्पर्धा परीक्षा केंद्रा’साठी समर्पित केला. आज जगाच्या नकाशावर, देशाच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रबोधिनीने घडवलेला अधिकारी पाहायला मिळतो. पण सरांचा उद्देश केवळ अधिकारी घडवणे इतका मर्यादित कधीच नव्हता. या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वातून देशाचे वैभव वाढवावे, कार्यक्षम अधिकाऱ्यांचे एक भक्कम संघटन बनावे आणि त्यातून देशापुढील जटिल प्रश्नांची उत्तरे मिळावीत, ही त्यांची मूळ तळमळ.
विद्यार्थ्यांच्या सुख-दुःखात सर आणि ताई ज्या आत्मीयतेने सहभागी होतात, ते पाहून कधीकधी आम्हाला वाटायचे की सरांचा यात खूप वेळ जातोय. मात्र, कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा या सर्व अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा समोर आला, तेव्हा सरांनी ओतलेली ती भावनिक आणि वैचारिक ऊर्जा किती महत्त्वाची होती, याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.
प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांचे संघटन हा सरांच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांनी मांडलेली ‘विशेष उद्दिष्ट गट’ (Special Interest Groups) ही संकल्पना देशाच्या भविष्यासाठी किती मोलाची आहे, हे त्यांच्या सादरीकरणातून स्पष्ट होत होते. या सर्व प्रक्रियेत एखाद्या ‘क्षपणका’प्रमाणे (Propellant) स्वतःला झोकून देऊन इतरांना गती देण्याचे काम सर करत आले आहेत.
अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घडवणारे सर स्वतः मात्र कमालीचे साधे आहेत. प्रसिद्धी, पद आणि पैसा यांपासून ते नेहमीच मैलोन्मैल दूर राहिले. समोरच्या माणसाला केवळ मदत करणे त्यांना मान्य नाही; तर त्या माणसाला भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या ‘स्वावलंबी’ करणे, यावर त्यांचा भर असतो. आपल्यावर कोणी अवलंबून राहावे हे त्यांना रुचत नाही. समोरची व्यक्ती स्वतः एक ‘रोल मॉडेल’ बनावी, हीच त्यांची खरी गुरुदक्षिणा!
२०२० मध्ये जेव्हा प्रचीतीबद्दल आमची चर्चा झाली, तेव्हा मनात आले की, “सर, तुमच्यावर कोण लिहणार? मी लिहू का?” मला ठाऊक होते, असा प्रश्न विचारल्यावर त्यांची दाद काय असेल. “कुणी तुला हा चावटपणा करायला सांगितला?” असं म्हणत त्यांनी मिश्कील शब्दांत माझी फिरकीच घेतली असती. स्वतःचे गोडवे गायलेले त्यांना अजिबात आवडत नाही.
अनेक महिने मनात विचारांची जुळवाजुळव केल्यानंतर आज हे शब्द कागदावर उतरले आहेत. लिहिताना पदोपदी जाणीव होत होती की, सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शब्दात मांडणे अशक्यप्राय आहे. ते स्वतःच एक ‘अक्षर’ आहेत—अविनाशी आणि प्रेरक. त्यांना त्यांच्याच अक्षररूपात समजून घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न!@all