नवा विचार
माझा या वर्षात द्वितीय प्रतिज्ञेसंबंधी नव्याने काही विचार झाला. द्वितीय प्रतिज्ञा आयुष्यभरासाठी असते. प्रथम प्रतिज्ञेने आपण व्यक्तिशः राष्ट्रसेवेचे व्रत घेतो. द्वितीय प्रतिज्ञेनुसार आपण संघटनेचे घटक म्हणून राष्ट्रसेवा करण्याचे ठरवतो. ‘प्रबोधिनीचा मार्ग हा राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग’ की ‘कोणत्याही संघटनेचा घटक होऊन राष्ट्रसेवा करणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग’ असा प्रश्न अनेकांना पडतो असे त्यांच्याशी चर्चा करताना माझ्या लक्षात आले. ‘प्रबोधिनीचा मार्ग हाच माझ्यासाठी राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग’ असा माझा निश्चय व्हायला द्वितीय प्रतिज्ञा घेतल्यानंतर मला बारा वर्षे लागली. तो पर्यंत मला परिचित असलेली संघटना म्हणून आणि दुसऱ्या संघटनेत जाण्याचे कारण पडले नाही म्हणून मी प्रबोधिनी या संघटनेचा एक घटक होऊन काम करत राहिलो. त्यामुळे मला असे वाटते की कधीतरी व्यक्तिगत पराक्रम करण्याच्या मर्यादा लक्षात येऊ लागतात. हळूहळू संघटनेचा घटक बनून काम करण्याचे महत्त्व जाणवू लागते. त्यानंतर द्वितीय प्रतिज्ञा घ्यावी. प्रबोधिनीचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे हे पटेपर्यंत थांबण्याचे कारण नाही.
‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ या मंत्राला ‘परब्रह्मशक्ती स्फुरो संघटनेमध्ये’ असा पर्याय कै. आप्पांनी सुचवलेला आहे. त्यामुळे ‘राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा/समाजसंस्थापनेचा / राष्ट्रघडणीचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून मी ज्ञान प्रबोधिनीचा/अमुक संघटनेचा प्रतिज्ञित घटक आहे’ अशी द्वितीय प्रतिज्ञा अनेक संघटनांमध्ये घेतली जाऊ शकेल.
‘कोणत्यातरी संघटनेचा घटक होऊन काम करणे हा राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे’ इथपासून प्रारंभ केल्यावर प्रबोधिनीत काम करता करता ‘ज्ञान प्रबोधिनीचा मार्ग हा राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे’ हे हळुहळू कळत जाईल. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ या मंत्राचे कै. आप्पांनी सार्थ दैनंदिन उपासनेच्या पोथीत जे स्पष्टीकरण दिले आहे ते विचार क्रमशः स्वतःचे बनवत गेलो की प्रबोधिनीचा मार्ग आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हे उलगडत जाते.
संघटनेमध्ये परब्रह्मशक्तीचे स्फुरण
प्रतिज्ञा घेताना १) संघटनेचा घटक होऊन काम करण्याचे महत्त्व कळणे एवढे पुरेसे आहे. नंतर २) सामूहिक काम करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. त्यानंतर ३) सामूहिक पराक्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे. संघटनेचा घटक बनण्याची, सामूहिक कृतीची, सामूहिक पराक्रमाची पराकाष्ठा करणे म्हणजेच द्वितीय प्रतिज्ञेनुसार तनमनधनपूर्वक काम करणे. ४) विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्यामध्ये आपण स्वतः आघाडीवर राहणे व इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे हा पुढचा टप्पा झाला. ५) त्यानंतर आपली संघटनेतली सर्व कामे कर्ममय उपासना बनवणे व इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे हा पुढचा टप्पा येतो. असे आपल्याला जमू लागले म्हणजे आपण द्वितीय प्रतिज्ञेनुसार उत्तरदायी बनून काम करायला लागलो.
मी द्वितीय प्रतिज्ञा नोव्हेंबर १९७४ मध्ये घेतली. त्यानंतर बारा वर्षांनी एप्रिल १९८६ मध्ये प्रशालेचे २०० विद्यार्थी शिवगंगा-गुंजवणी खोऱ्यांतील १४० गावांमध्ये दुष्काळाची पाहणी करायला गेले होते. जुलै १९८६ मध्ये त्यातल्या ३४ गावांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचे गट गेले. तेव्हा पाणलोट क्षेत्र विकासाचा वैज्ञानिक पद्धतीने विचार प्रबोधिनीत सुरू झाला व मला विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणे म्हणजे काय हे समजले. त्यावेळी मी वरील चौथ्या टप्प्याला पहिल्यांदा स्पर्श केला. ‘प्रबोधिनीचा मार्गच माझ्यासाठी राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे’ अशी माझी खात्रीही तेव्हाच पटली. त्यानंतर आठ वर्षांनी ऑक्टोबर १९९४ मध्ये प्रबोधिनीतील सामाजिक प्रज्ञेवरील संशोधन शिक्षणात कसे वापरता येईल हे गोव्यातील मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण वर्गात मी त्यांना सांगितले. ते सांगता सांगता मी चौथ्या टप्प्यावर स्थिर झालो.
उपासनेतील प्रार्थनेला कायम प्रयत्नांची जोड असावी लागते. सगळे द्वितीय प्रतिज्ञित जर एक विचाराने असे प्रयत्न करत राहतील तर ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ ही प्रार्थना अधिकाधिक परिणामदायी होत जाईल. प्रबोधिनीच्या नित्य कामात अन्य द्वितीय प्रतिज्ञितांसह काम करताना पुढच्या पुढच्या टप्प्यांवर जाणे अधिक सुलभ व जलद होऊ शकते. प्रबोधिनीच्या विविध केंद्रांवर काम करत ६) स्वतःमधील व प्रबोधिनीतील इतरांमधील प्रतिभाशक्ती जोपासणे आणि ७) स्वतःमधील व प्रबोधिनीतील इतरांमधील ईश्वरी शक्तीचे भान वाढवत जाणे हे त्यापुढचे टप्पे आहेत. ८) आज हिंदुत्वाचा एक अंश असलेली प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी होईल असे काम करणे हा अंतिम टप्पा आहे. मी स्वतः आता बराचसा वेळ चौथ्या टप्प्यावर असतो. कधी कधी पाचव्या टप्प्यावर पाऊल पडते. क्वचित कधी पुढे मांडलेल्या सहाव्या टप्प्याला स्पर्श होतो. कधी गाफील राहिलो तर तिसऱ्या टप्प्यावर घसरल्याचेही कळते. स्वतःला तपासण्यासाठी, सावरण्यासाठी आणि पुढची वाट दाखवण्यासाठी अशा टप्प्यांचा विचार उपयुक्त आहे. आपणही या बाबतीतल्या विविध टप्प्यांवरील आपल्या अनुभवांबाबत इतर द्वितीय प्रतिज्ञितांशी अवश्य बोलावे. आठव्या टप्प्यापर्यंत आपण व्यक्तिशः व संघटनेचा घटक म्हणून स्वतःला, सहकारी संचाला व सर्व प्रबोधिनीला कसे घेऊन जाऊ शकू याचे चिंतन द्वितीय प्रतिज्ञितांनी करत राहिले पाहिजे. मग द्वितीय प्रतिज्ञेचे पालन आयुष्यभर करत राहता येईल.
कामाची आणि संघटनाची अनेक क्षेत्रे
संघटनेचा घटक बनू देशव्यापी अशी गतिशील, तेजस्वी संघटना करणे हे गाभ्याचे किंवा कळीच्या देशप्रश्नावरचे काम आहे असे कै. आप्पांनी म्हटले आहे. परंतु हे एकमेव काम नाही. इतर देशप्रश्न सोडवत सोडवतच हे काम करायचे आहे. म्हणूनच ‘जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही संघटना घडवू’ असे वर्षारंभ-वर्षान्ताच्या उपासनेत आपण म्हणतो. कै. आप्पांनी प्रबोधिनीच्या शैक्षणिक तत्वज्ञानावर एक लेख लिहिला होता. त्यामध्ये आणि प्रबोधिनीच्या घटनेतील उपक्रमांच्या परिच्छेदांमध्ये जीवनाच्या ज्या क्षेत्रांचा उल्लेख आहे त्यात खूपच साम्य आहे. दोन्हीमध्ये एकूण नऊ प्रकारच्या कामांचा उल्लेख समान आहे. ते प्रकार असे-
१) युवक-युवती कार्य : क्रीडा केंद्रांचे संचालन, क्रीडा-संस्कृतीला प्रोत्साहन. (कबड्डी, मुष्टियुद्ध, फुटबॉल इ. खेळ; पक्षी-निरीक्षण, पदभ्रमण, गिर्यारोहण, समुद्र-पर्यटन, ग्लायडिंग)
२) यांत्रिकी, विद्युत्-यांत्रिकी, विद्युत्-अणुशास्त्र, स्थापत्य, मास-कम्युनिकेशन, संगणकशासत्र, संदेश वहन शास्त्र, सायबरनेटिक्स्, इ. शास्त्रांतील प्रकल्प.
३) जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, इ. विविध विद्याशाखांचा शास्त्रीय, तात्त्विक, तांत्रिक अभ्यास व संशोधन.
४) आरोग्य आणि वैद्यकीविषयक प्रकल्प, रुग्ण सेवा, नैसर्गिक आपत्तीनंतरचे मदत कार्य.
५) व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय माहिती केंद्र चालवणे.
६) राष्ट्रीय अथवा सामाजिक ऐक्याचे उपक्रम व सामाजिक समतेचे उपक्रम चालवणे.
७) अनौपचारिक शिक्षण, तंत्रज्ञानाचा विकास, नवीन शेती-तंत्रांचा प्रसार, व्याख्यानमाला व चर्चासत्रे चालवणे, पुस्तके व पत्रके काढणे.
८) सामाजिक दुरितांचे म्हणजेच अन्याय, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता इ. चे निर्मूलन.
९) भौतिक, सामाजिक व औद्योगिक विकासाला चालना, बचतीची सवय लावणे.
वरील नऊ कामांशिवाय दहावे काम म्हणून अनेकांमध्ये निःस्वार्थ वृत्तीने कामाची आवड निर्माण करण्याचे म्हणजेच संघटनाचे गाभ्याचे काम कै. आप्पांच्या लेखात आले आहे. या शिवाय आणखी एक अकरावे काम प्रबोधिनीच्या घटनेत आले आहे. ते काम आहे विविध प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी व सार्वजनिक अशा संस्थांच्या बरोबर काम करण्याचे म्हणजेच पूल बांधण्याचे.
प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी होण्यासाठी द्वितीय प्रतिज्ञितांचे बळकट संघटन
द्वितीय प्रतिज्ञितांनी या पैकी कोणतेही एक किंवा अधिकही कामे राष्ट्रसेवेसाठी संघटनेचा घटक म्हणून केली, ती करत असताना आग्रहपूर्वक सामूहिक कृती केली, निवडलेल्या कामात सामूहिक पराक्रमाची पराकाष्ठा केली तर ते द्वितीय प्रतिज्ञेचे पालन करण्याच्या मार्गावरच आहेत. वरील अकरा प्रकारापैकी त्या त्या वेळी जी कामे प्रबोधिनीचे विभाग वा केंद्रे करत असतील त्यात सहभागी होता आले तर चांगलेच. अन्यथा स्वतंत्र नावाने पण कोणत्या तरी गटाचा भाग बनून काम करत राहिले पाहिजे. संघटनेचा घटक ते प्रबोधिनी राष्ट्रव्यापी करणे या द्वितीय प्रतिज्ञा-पालनाच्या आठ टप्प्यापैकी पहिले पाच टप्पे तर प्रबोधिनीचे घटक म्हणून किंवा अन्य कोणत्याही संघटनेचे घटक म्हणून आपल्याला गाठता येतील. ज्यांनी द्वितीय प्रतिज्ञा घेताना प्रबोधिनीचे कार्य हिंदुस्थानव्यापी करण्याचे आठव्या टप्प्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांना प्रबोधिनीद्वारेच सामूहिक कृती, सामूहिक पराक्रम आणि त्या पुढचे टप्पे गाठणे सोयीचे आहे. प्रबोधिनीचे केंद्र नसलेल्या ठिकाणी किंवा प्रबोधिनीशिवाय अन्य नावाने आज काही जणांना काम करावे लागत आहे. त्यांनीही प्रबोधिनीत नित्य काम करणाऱ्या आपल्या सहप्रतिज्ञितापैकी कोणाला तरी आपल्या कामाच्या प्रगतीची किंवा त्यातल्या अडचणींची, आणि प्रतिज्ञा-पालनाच्या टप्प्यांवरील आपल्या प्रगतीची किंवा त्यातल्या अडचणींची माहिती देत राहावी. द्वितीय प्रतिज्ञितांमधले संवादाचे व सहकार्याचे पूल बळकट असले तरच समाजातल्या इतर संघटना, पक्ष, संप्रदाय, पंथांमध्ये आपण पूल बांधू शकू . प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी होण्यासाठी असे पूल बांधण्याची आपली सामूहिक क्षमता वाढायला हवी.
( सौर आषाढ २४ शके १९३५ /१५ जुलै २०१३ रोजी द्वितीय प्रतिज्ञितांना लिहिलेले पत्र )