८. प्रतिज्ञेसाठी अविरत श्रमणे

प्रबोधिनीचा स्थापना दिन म्हणजे प्रबोधिनीच्या सर्व प्रतिज्ञित घटकांची, म्हणजे द्वितीय प्रतिज्ञिताची, वार्षिक पत्र-भेट घेण्याचा दिवस. आजच्या तारखेला या वर्षी आषाढी एकादशी पण आहे. आषाढी एकादशीला देव झोपी जातो असे म्हणतात. म्हणून ही देवशयनी एकादशी. तर कार्तिकी एकादशीला देव पुन्हा जागा होतो म्हणून ती प्रबोधिनी एकादशी. पूर्वीच्या काळी पावसाळा व शेतीच्या कामांमुळे, चातुर्मासात देवाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसावा, म्हणून त्याला बहुतेक झोपवत असावेत. शेतीची कामे संपल्यावर मग त्याला कार्तिकात पुन्हा झोपेतून उठवायचे. आपल्या सोयीनुसार देवाला शयन आणि प्रबोधन करायला लावले असले, तरी आपण मात्र नेहमीच ‘जागणे, जना जागविणे। अविरत श्रमणे हेच जिणे।।’ असा घोष करायला हवा.

पंढरपूरच्या विठ्ठलाला झोपवायला सर्व महाराष्ट्रातून दिंड्या आणि संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जमतात. त्यांच्या दोन-तीन आठवड्यांच्या वाटचालीत साऱ्या पालखी सोहळ्यांमध्ये कीर्तन-भजनाच्या द्वारे विचार-प्रबोधन होत असते. आपल्याला मात्र ‘जागविणे’ आणि ‘अविरत श्रमणे’ दोन्ही करायचे आहे. म्हणजेच अनुक्रमे
१) विचारप्रबोधन आणि
२) कार्यप्रबोधन करायचे आहे. हे दोन्ही जमले तर
३) देशाचे रूप पालटणार आहे. देशाचे रूप एकदाच पालटायचे नसून ते दर पिढीमध्ये मूळ तत्त्व न सोडता थोडेफार बदलत करत राहावे लागतील. त्यासाठी
४) हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे पुनर्जागरण ही करायला लागेल. म्हणजे काय बदलायचे नाही व काय बदललेले चालेल हे कळेल. व ५) नव्या पर्वासाठी नव्या तत्त्वांची प्राणशक्ती किंवा चैतन्यही निर्माण करायला लागेल.

ही पाच कामे करणे म्हणजे धर्मसंस्थापना करणे असे प्रबोधिनीच्या घटनेमध्ये म्हटले आहे. द्वितीय प्रतिज्ञा घेणे म्हणजे अशा धर्मसंस्थापनेसाठी प्रबोधिनीचा घटक बनणे.

संघटनाभिमुख आणि समाजाभिमुख

द्वितीय प्रतिज्ञितांसाठी विशेष प्रबोधिनीपणाची जी लक्षणे सुचवली आहेत त्या पैकी संघटनाभिमुखतेचा अधिक विचार या पूर्वीच्या एका वार्षिक पत्रात केला होता. संघटनेच्या विकासाचे सहा टप्पे उदाहरणांसह त्या पत्रात मांडले होते. लोकसंपर्क, लोकसंवाद आणि लोकसंग्रहानंतर त्यातला चौथा टप्पा लोकप्रशिक्षणाचा होता. लोकप्रशिक्षण करण्यासाठी संघटनाभिमुखतेबरोबर समाजाभिमुखताही हवी. आपण समाजाभिमुख असलो तरच विचारप्रबोधन आणि कार्यप्रबोधन या कामांमध्ये प्रबोधिनीचे घटक म्हणून तनमनधनपूर्वक सहभागी होऊ शकू. या पत्रामध्ये लोकप्रशिक्षणाची विचारप्रबोधन आणि कार्यप्रबोधन ही दोन अंगे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

प्रबोधिनीच्या घटनेमध्ये विचारप्रबोधन आणि कार्यप्रबोधन करणे अशी दोन उद्दिष्टे मांडली आहेत. हे दोन शब्द प्रबोधिनीच्या दैनंदिन व्यवहारात आपण फारसे वापरत नाही. विचारप्रबोधन झाले असे कधी म्हणता येते? एखादा विचार कोणीतरी केला आहे किंवा मांडला आहे असे कळले, तो विचार आपण स्वतःही समजून घेऊ शकतो असा अनुभव आला, तो विचार व्यवहारात आणणे आपल्याला प्राधान्याचे वाटायला लागले, तो विचार व्यवहारात कसा आणता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायला लागलो, व तो विचार जगणे, म्हणजेच कृतीत उतरवणे, आपल्या सवयीचे झाले की स्वतःचे विचारप्रबोधन झाले असे म्हणता येईल.

विचार प्रबोधनाची दोन उदाहरणे

प्लॅस्टिकचा वापर सर्व ठिकाणी, सर्व काळ करणे चुकीचे आहे हा कोणीतरी मांडलेला विचार झाला. असा विचार कोणीतरी मांडते आहे हे आपल्या ध्यानात आले. असा विचार ते का मांडत आहेत हे आपल्याला समजले. आपण स्वतःही प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे असे आपल्याला वाटू लागले. प्लॅस्टिकच्या वस्तूंऐवजी मातीच्या, धातूच्या, कागदाच्या, कापडाच्या किंवा झाडांच्या पानांपासून बनवलेल्या वस्तू कुठे कुठे वापरता येतील हे आपल्याला सुचायला लागले, आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंना पर्याय शोधत आपण सर्व व्यवहार करू लागलो, म्हणजे प्लॅस्टिकच्या वापराबाबत आपले विचारप्रबोधन झाले.

लेखन, संभाषण आणि मनात वाक्ये जुळवणे हा आपला भाषिक व्यवहार मातृभाषेत किंवा राष्ट्रभाषेत केला पाहिजे हा कोणीतरी मांडलेला विचार झाला. या विचारांप्रमाणे वागणारा काही गट आपल्याला दिसतो. स्वभाषेतील व्यवहाराचा स्वतःहून प्रचार करणारे पण काही लोक आपल्याला दिसतात. त्यांचा व्यवहार पाहून आणि आग्रहपूर्वक वागणे पाहून आपण हा स्वभाषा वापराचा आग्रह समजून घेतला. तसा वापर आपण करून पाहिला. आपल्याला तो जमू लागला व उपयुक्त वाटला. मग त्याचे महत्त्व आपल्याला पटले. स्वभाषेत व्यवहार करणे आपल्याला प्राधान्याचे वाटू लागले, व आपले विचार मांडताना आपण परभाषेतील शब्दांना प्रतिशब्द शोधत किंवा प्रतिशब्द तयार करत, स्वभाषेतच सर्व व्यवहार करायला लागलो, म्हणजे स्वभाषेच्या वापराबाबत आपले विचारप्रबोधन झाले. नुसते अनुकरण किंवा अनुसरण नको.

प्रबोधिनीच्या पद्यांमधून ‘यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची’, ‘जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ’, ‘विकसता विकसता विकसावे’, ‘तनूमनात एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान’, असे विचार सतत मांडत असतो. हे विचार समजून घेणे, आपलेसे करणे, प्रथम एकदा व नंतर अनेकदा कृतीत उतरवणे, आणि मग ते आपल्या नेहमीच्या वागण्याचे बनणे, म्हणजे आपले विचारप्रबोधन.

वृत्तिघडण आणि विचारप्रबोधन

विचारप्रबोधन प्रत्येक व्यक्तीचे करावे लागते. तसेच समाजाचेही करावे लागते. व्यक्तीच्या विचार प्रबोधनाला आपण प्रबोधिनीत वृत्तिघडण म्हणतो. तर समाजाच्या वृत्तिघडणीसाठी विचारप्रबोधन हा शब्द जास्त रूढ आहे. प्रबोधिनीत स्त्री शक्ती प्रबोधनाची चार उद्दिष्टे मांडलेली आहेत. स्त्रियांचा आत्मसन्मान वाढवणे व नेतृत्वकौशल्ये वाढवणे ही उद्दिष्टे एकेका स्त्रीच्या वृत्तिघडणीसाठी आहेत. तर कुटुंबसंस्थेत स्त्रियांना समुचित स्थान मिळण्याइतके विधायक बदल होणे व राष्ट्रीय विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग वाढणे ही उद्दिष्टे समाजाच्या विचारप्रबोधनासाठी आहेत.

या प्रमाणे विचारप्रबोधन करणारे अनेक जण होऊन गेले. सन १८५० पर्यंतच्या काळात राममोहन रॉय व लोकहितवादींचे काम झाले. नंतरच्या शतकात महात्मा फुले, नारायण गुरू, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विचारप्रबोधन केले. १९५० नंतरच्या काळात राम मनोहर लोहिया, दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, स्वामी चिन्मयानंद, स्वामी रंगनाथानंद, अमर्त्य सेन आणि वंदना शिवा यांनी विचारप्रबोधन केले. विचारप्रबोधन करणाऱ्यांची ही नावे उदाहरणादाखल दिली आहेत. त्यात अनेक नावांची भर घालता येईल.

कार्यप्रबोधन म्हणजे काय?

विचारप्रबोधनासारखाच दुसरा शब्द म्हणजे कार्यप्रबोधन. एखादे काम करायचे स्वतःला सुचणे, ते काम एकट्याने किंवा अनेकांनी मिळून करणे, ते काम करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्ये मिळवणे, अनेकांनी करायचे काम असेल तर ते काम करू इच्छिणाऱ्यांचा गट जमवणे, कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणे, कामाचा अपेक्षित परिणाम होतो आहे ना? हे सतत तपासून पाहणे, आणि नव्या कामाची नवलाई संपून ते स्वतःच्या आणि समाजातील इतर अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनून जाणे म्हणजे कार्यप्रबोधन, कोणी न सांगितलेला विचार स्वतःलाच सुचला असेल, तेव्हा त्या विचाराचा पडताळा कृती करून पाहिल्यावरच येतो. विचार सांगणारा अन्य कोणी नसतो, तेव्हा स्वतःला सुचलेले कृतीत आणणे म्हणजे स्वतःचे कार्यप्रबोधन. ती कृती का करायची हे न सांगता इतरांना फक्त कृती करायला सांगितली आणि कृतीच्या परिणामांचा पडताळा प्रत्येकजण स्वतःचा स्वतः घेऊन ते काम चालू ठेवू लागला म्हणजे इतरांचे कार्यप्रबोधन झाले.

कार्यप्रबोधनाची काही उदाहरणे

आपण बचत गटांचे तंत्र आधी अनेक महिलांना सांगितले. त्याचा प्रत्यक्ष पडताळा घेत बचत गटांची चळवळ पसरली. ते कार्यप्रबोधन झाले. आर्थिक साक्षरता (Financial Literacy) वगैरे शब्द आपण नंतर वापरायला लागलो. ते शब्द ज्यांना समजले व म्हणून जे बचत गटांच्या कामात आले त्यांचे विचारप्रबोधन झाले. इतरांचे कार्यप्रबोधन कृती करून आणि अनुभव घेतल्यावरच झाले.

गेली चार वर्षे युवकांचे गट उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वेल्हे तालुक्याच्या पासली खोऱ्यात श्रमकार्यासाठी जात आहेत. आधीच्या वर्षी कोरडी असलेली विहीर पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात भरलेली दिसते, तेव्हा नवीन जागी अशा विहीर खोल करण्याच्या होणाऱ्या श्रमकार्याला येणाऱ्यांची संख्या वाढते. हे युवकांचे कार्यप्रबोधन. एका गावातले काम पाहून दुसऱ्या गावातले लोक आपल्या गावातील विहिरी खोल करायला तयार होतात. तेव्हा गावकऱ्यांचेही कार्यप्रबोधन होते. डोंगराचा माथा ते दरीतील पायथ्यापर्यंत पाणी कसे अडवले पाहिजे हे सांगितलेले ज्यांना पटले व त्याप्रमाणे जे कामाला लागले त्यांचे विचारप्रबोधन झाले. प्रत्यक्ष कृती व कृतीचा परिणाम पाहून जे कामाला लागले त्यांचे कार्यप्रबोधन झाले. युवक-युवतींची बच्यांची पथके आणि त्या बरोबरचा वादक गट आणि ध्वजधारी गट पाहून अनेकांना असे गट आपणही तयार करावेत असे वाटले. त्यातले वादक गट तयार करणे हे त्यातल्या त्यात इतरांना सोपे गेले. आपण शिस्तबद्ध, जोशपूर्ण सामूहिक नृत्य करावे यासाठी लोकांचे विचारप्रबोधन करत राहिलो. पण वादकांचे मोठे मोठे ताफे शेकर्डोच्या संख्येने परस्पर उभे राहिले हे कार्यप्रबोधन झाले.

प्रेरणाजागरण आणि कार्यप्रबोधन

विचारप्रबोधनाप्रमाणेच कार्यप्रबोधन ही प्रत्येक व्यक्तीचे आणि तसेच समाजाचे पण करावे लागते. व्यक्तीच्या कार्यप्रबोधनाला आपण प्रबोधिनीत प्रेरणाजागरण म्हणतो. तर समाजाच्या प्रेरणाजागरणासाठी कार्यप्रबोधन हा शब्द जास्त रूढ आहे. स्वतः काही साहस करून, नवीन कल्पना लढवून, कष्ट करून स्वतःची परिस्थिती बदलायची इच्छा झाली म्हणजे व्यक्तीचे प्रेरणाजागरण झाले. समाजातील अनेक व्यक्तींचे प्रेरणाजागरण झाले व त्या व्यक्ती कामाला लागल्या की समाजात कार्यप्रबोधन होते. सन १८५०-१९५० या शतकामध्ये सावित्रीबाई फुले, जमशेटजी टाटा, वालचंद हिराचंद, लक्ष्मणराव किर्लोस्कर, सर विश्वेश्वरय्या, शाहू महाराज, भगिनी निवेदिता, साने गुरुजी, दुर्गाबाई देशमुख, अशा सारख्यांनी कार्यप्रबोधन केले. १९५० ते २०१५ पर्यंतच्या काळात धनंजयराव गाडगीळ, शंतनुराव किर्लोस्कर, विक्रम साराभाई, नानाजी देशमुख, व्हर्गीस कुरीअन, एम्. एस्. स्वामीनाथन, दत्तोपंत ठेंगडी, एकनाथजी रानडे, अब्दुल कलाम, विलासराव साळुंके, राजेंद्रसिंह राणा यांनी समाजात कार्यप्रबोधन केले.

त्या सर्वांच्या कामाचा कोणता तरी एक पैलू आपल्याला महत्त्वाचा वाटतो. काही जणांना या सर्वांनी केलेल्या कामाच्या प्रकारात अदलाबदल (कार्य ऐवजी विचारप्रबोधन आणि विचार- ऐवजी कार्यप्रबोधन) ही करावीशी वाटेल. दोन्ही प्रकारची कामे अनेकदा एकमेकांत मिसळलेली असतात. त्या कामाचा समाजावरील परिणाम आणि पाहणाऱ्याचा दृष्टिकोन या वरून ते काम प्राधान्याने कोणत्या प्रकारचे (कार्य की विचारप्रबोधन) हे ठरते.

आपण स्वतः काय करायचे ?

प्रबोधिनीतील पद्ये, उपासना, प्रतिज्ञा, प्रासंगिके, वैचारिके, बैठकी, अभ्यासशिबिरे, अभ्यासदौरे, मातृभूमीपूजन, संस्कार-पोथ्या ही सर्व विचारप्रबोधनाची साधने आहेत. आपले स्वतःचे व्यक्तिगत वाचन, परिषदा आणि परिसंवादांमधील सहभाग आणि विचारवंतांशी संवाद ही सुद्धा विचारप्रबोधनाची साधने आहेत. प्रबोधिनीतील सर्व विभागांचे नित्य काम हे कार्यप्रबोधनाचे साधन आहे. या कामांमध्ये आणि आज अन्यत्र काम करणाऱ्यांच्या कामामध्ये जेवढी उत्तमता आणता येईल, जेवढे नाविन्य आणता येईल, या कामांमधून आपण जेवढे देशप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, जितक्या लोकांना आपल्या पद्धतीनुसार काम करायला प्रेरित करू त्या प्रमाणात कार्यप्रबोधन होणार आहे.

आपल्याला असे काम जमावे यासाठी आपले स्वतःचे वृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण होते आहे ना हे पाहण्याची जबाबदारी आपली स्वतःचीच आहे. नवीन व आणखी कोणते विचार आपल्या मनात मुरवून ते कृतीत उतरवायचे, आपल्या नित्य कामाचा भाग बनवायचे, हे ठरवणे म्हणजे आपला वृत्तिघडणीचा संकल्प करणे. आपल्याला सुचलेल्या कोणत्या नवीन व वेगळ्या कल्पना व्यवहारात उतरवून, यासाठीचे काम आपण रोज वाढत्या उत्साहाने व गुणवत्ता वाढवत करायचे, याचे संकल्प आपल्या मनात दृढ ठेवायचे म्हणजे प्रेरणाजागरण जिवंत ठेवणे.

(सौर आषाढ २४, शके १९३८ / दि. १५ जुलै २०१६ रोजी द्वितीय प्रतिज्ञितांना लिहिलेले पत्र)