१६ : प्रबोधिनीने किंवा प्रबोधिनीच्या एखाद्या विभागाने ISO 9000, ISO 9001, ISO 9002 किंवा ISO 14000 या सारखी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का ?
उत्तर :- ज्ञान प्रबोधिनी ग्रामोद्योग प्रतिष्ठान या सध्या निष्क्रिय असलेल्या स्वतंत्र न्यासातर्फे कनक उद्योग नावाचा, आता बंद पडलेला एक उद्योग चालवला जायचा. या उद्योगाने ISO 9002 प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. नियोजनपूर्वक प्रयत्नाने या उद्योगाला ISO 9002 प्रमाणपत्र मिळालेही होते. त्यावेळी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया मी जवळून पाहिली होती. नंतर दीनानाथ रुग्णालयामध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. प्रमाणपत्राचे मर्यादित व्यावहारिक लाभ व तो मिळवण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट यांचे व्यस्त प्रमाण पाहून ती प्रक्रिया आपण नंतर मध्येच थांबवली.
कनक उद्योग व दीनानाथ रुग्णालयातील प्रक्रिया पाहिल्यामुळे, गुणवत्तेचे म्हणजेच उत्तमतेचे मी बहिरंग व अंतरंग या दोन स्तरांऐवजी तीन स्तर करायला लागलो ह्रह्न बहिरंग किंवा पृष्ठभागावरची उत्तमता, पृष्ठभागाखालची उत्तमता व अंतरंग किंवा तळापासची किंवा मुळापासची उत्तमता. पृष्ठभागावरची उत्तमता देखणी पण अनेक वेळा दिखाऊ असते. केवळ दिखाऊ उत्तमता असू नये या साठी ISO प्रमाणपत्रासाठी पृष्ठभागाखालच्या कामाच्या पद्धतींच्या उत्तमतेचा जास्त आग्रह असतो. ते योग्य दिशेचेच पाऊल आहे. पण त्यामध्ये मुळापासच्या उत्तमतेचे आपण ठरवलेले १) हेतू, २) आशय, ३) अभिनवता व ४) प्रभाव, या चार निकषांची फार दखल घेतलेली नसते. उलट असे प्रमाणपत्र मिळवणारे बरेच जण मुळापासूनची उत्तमता मिळवण्याबाबत गाफील व बेफिकीर राहतात असे मी पाहिले. अंतरंग किंवा मुळापासूनच्या उत्तमतेचे प्रमाणपत्र आपल्याला बाहेरचे कोणी देऊ शकणार नाही. ते आपणच स्वतःला दिले पाहिजे. या उद्दिष्टावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून याला वगळून त्या आधी वरवरच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळवण्यामागे आपण लागू नये असे मला वाटते. मुळापासूनची उत्तमता वाढू लागली की ती आपोआपच प्रथम पृष्ठभागाखालची व नंतर पृष्ठभागावरची उत्तमता म्हणून प्रकट होऊ लागेल असा विश्वास आपण ठेवला पाहिजे.