विज्ञानाभिमुखता

ज्ञान प्रबोधिनीच्या स्थायी दृष्टिकोनांपैकी उत्तमतेसंबंधी काही विचार आधीच्या प्रकरणात केला आहे. प्रबोधिनीचा दुसरा स्थायी दृष्टिकोन म्हणजे विज्ञानाभिमुखता.’अध्यात्म आणि ईश्वरचिंतन या बाबतीत चिरंतनाचे साधक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत आधुनिकाचे उपासक’, अशी प्रबोधिनीची धारणा आहे. प्रबोधिनीच्या प्रार्थनेत-‘विज्ञान ज्ञान अमुचे परिपूर्ण होवोअभ्यास देशास्थितीचा समतोल चालो’असे म्हटले आहे. त्यात विज्ञान आणि ज्ञान असे दोन शब्दप्रयोग केलेले आहेत.तसेच प्रबोधिनीच्या ध्येयवाक्यात’अविद्यया मृत्युं तीर्वा विद्यया अमृतम् अश्नुते।’असे म्हटले आहे. ‘अविद्या’ किंवा ‘विज्ञान’ हे शब्द प्रामुख्याने बाह्य सृष्टीचे वा पदार्थ सृष्टीचे ज्ञान अशा अर्थाने वापरले जातात. ‘ज्ञान’ किंवा ‘विद्या’ हे शब्द अंतःसृष्टीचे ज्ञान, अध्यात्म ज्ञान या अर्थाने उपयोगात आणले जातात. प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेत ‘अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमया मे शुद्धयन्ताम्’ असा मंत्र आहे. त्या विज्ञानमय कोशाचा उल्लेख आला आहे तो मुख्यतः बुद्धिग्राह्य ज्ञानाबद्दलचा आहे.विज्ञानाला सन्मुख असावे असे प्रबोधिनीला का वाटते? विज्ञान म्हणजे नेमके काय ? या दोन प्रश्नांचा काही परामर्श घेतला पाहिजे. विज्ञानाभिमुखता आवश्यक आहे कारण ती नसली तरी जिज्ञासा आणि प्रयोगशीलता मंदावते, सत्य-साधना क्षीण होते आणि पोथीवाद बळावतो, अंधश्रद्धा बळावते. म्हणून वैज्ञानिक दृष्टि जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टि म्हणजे काय ?

पण वैज्ञानिक दृष्टि म्हणजे काय ? विज्ञानाचे स्वरूप कोणते? विज्ञानाचा हेतू काय ? ‘निसर्ग आणि मानवी अनुभव यांचा वस्तुनिष्ठ रीतीने केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान’ असे स्वामी रंगनाथानंद यांनी म्हटले आहे.

घटनांचे वर्गीकरण करणे, त्यांचा क्रम समजून घेणे, कार्यकारणभाव जाणून घेणे हे विज्ञानाचे कार्य आहे आणि वरील निरीक्षणांमधून निरपेक्ष, वस्तुनिष्ठ पद्धतीने निष्कर्ष काढता येणे ही विज्ञान दृष्टीची विशेषता आहे असे कार्ल पीअर्सन हे शास्त्रज्ञ म्हणतात.

विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातले शास्त्र नव्हे. विज्ञानाचे दोन प्रकार आहेत. एक शुद्ध विज्ञान आणि दुसरे उपयोजित विज्ञान. शुद्ध विज्ञान हे जिज्ञासाने निसर्गाकडे पाहते, त्यात घडणाऱ्या घटनांचा वेध घेते, त्यांची कारण-मीमांसा करते. उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान हे शुद्ध विज्ञानाने शोधून काढलेल्या सत्यांचा मानवी संस्कृतीला कसा उपयोग होईल, लाभ होईल, यासाठी प्रयत्न करते.

वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्ये अशी आहेतः

१) मुक्त जिज्ञासा (Free enquiry)

२) सत्याचा निर्भय शोध (Bold quest of truth)

३) प्रयोगशीलता (Experimentation)

४) प्रत्यक्ष अनुभव (Direct perception)

५) पारखून वा कसोटी लावून पाहाणे (Test)

६) प्रात्यक्षिक (Demonstration)

७) अनुभवांचे सर्वसामान्य सिद्धांतांद्वारे सामान्यीकरण (Broad comprehensive generalignation)

८) चिकित्सक पडताळा (Critical verification)

मुक्त जिज्ञासेपोटीच आकाशीच्या ग्रहनक्षत्रांचा वेध मानवी प्रज्ञेने घेतला. कोणताही तात्कालिक लाभ नक्षत्रशास्त्रातून होण्यासारखा नव्हता. पण सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा असल्यानेच नक्षत्रज्योतिषाचा विकास झाला. मानवी शरीराचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना स्मशान भूमीतून प्रेते नेऊन त्यांची चिरफाड केल्याबदल अमानुष शिक्षा झाल्या. विषाचा पेला प्राशन करून सॉक्रेटिसने सत्याचा निर्भय शोध करण्यासाठी जीवनाची किंमत दिली. ब्रूनोला जिवंत जाळण्यात आले. परंतु सॉक्रेटिस, ब्रूनो यांचा वारसा चालवणारांची मोठी परंपरा शतकानुशतके सर्व भयावर मत करून अप्रतिहत राहिली.अखंड प्रयोगशीलता हेही या वैज्ञानिकांचे एक वैशिष्ट्य. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे -

अखंड सावधान रे । प्रयोग प्रेत्न मान रे।

करील प्रेत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ।।

अशा जिद्दीने वैज्ञानिक नवनवी सृष्टिरहस्ये शोधून काढत राहिले. विद्युत दिव्यासाठी वाहक म्हणून टंगस्टनची तार सापडण्यापूर्वी एडिसन ने हजारो प्रकारचे पदार्थ विद्युतवाहक म्हणून वापरता येतात का असे प्रयोग केले होते. जगातील अनेक शोध अशा दुर्दम्य प्रयोगशीलतेची फळे आहेत.

वस्तुनिष्ठ निरीक्षण

प्रत्यक्ष प्रमाणावर तर आद्य शंकराचार्यांनीच म्हणून ठेवले आहे की शंभर श्रुती जरी म्हणाल्या की अग्नि थंड आहे तरी त्यावर विश्वास ठेवू नका. तुमचा प्रत्यक्ष अनुभवच प्रमाण माना. प्रबोधन कालापूर्वी युरोपात मोठमोठ्या पंडितांच्या चर्चा होत. या चर्चामध्ये ग्रीक संदर्भ ग्रंथामधील प्रमाणे दिली जात. त्यातही व्यासांप्रमाणे ॲरिस्टॉटलची बुद्धी सर्वस्पर्शी. त्यामुळे त्याने जे लिहिले असेल ते सर्व विषयात प्रमाण मानले जाई.

घोड्याचे दात किती? ॲरिस्टॉटलने ग्रंथात लिहिले असतील तितके. अशी पोथीनिष्ठा बळावली होती. एक अशी आख्यायिका आहे की एका शास्त्रज्ञाने या पोथीनिष्ठेला हरकत घेतली. तो पंडितांच्या सभेतून उठून म्हणाला, ‘मी जाऊन घोड्याचे तोंड उघडून त्याचे दात मोजून येतो.’ बाकी पंडित मंडळी इतकी गतानुगतिक झाली होती की असे करता येईल हे कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते. बायबलप्रमाणेच ॲरिस्टॉटलचा शब्द प्रमाण ठरला होता. ज्या क्षणी त्या शास्त्रज्ञाने प्रत्यक्षानुभवाचा आग्रह धरला त्याच क्षणी तो विज्ञानाला अभिमुख झाला. अशा वस्तुनिष्ठ निरीक्षणातूनच अनेक विज्ञानशाखा जन्माला आल्या.

कोणतेही वैज्ञानिक तत्त्व वस्तुनिष्ठेच्या कसोटीवर घासून पाहिल्याखेरीज स्वीकारार्ह ठरत नाही. बिनतारी संदेश पाठविता येतात हे मार्कोनीने शोधलेले तत्त्व परोपरीने परीक्षून त्याची देशकालातीत सत्यता पारखून मगच स्वीकारण्यात आले. त्यासाठी अनेक ठिकाणी, अनेकविध परिस्थितीत त्याची प्रात्यिक्षिके करावी लागली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याचा पडताळा घेतला आणि रेडिओ लहरींचा शोध जगाने मान्य केला.

विविध ऊर्जा आणि त्यांचे स्वरूप याबद्दलचे सिद्धांत अशा अविश्रांत संशोधनातून सिद्ध होत गेले. गेल्या पंधरा-वीस वर्षांत असे ध्यानात येऊ लागले की पूर्ण वस्तुनिष्ठा ही शक्य नाही. निरीक्षणप्रक्रियेचा निरीक्षणांवर परिणाम होत असतो. म्हणजे जो निरीक्षक असतो तो पूर्ण अलिप्त राहू शकत नाही म्हणून त्याची भूमिका Observer ची न राहता Participant ची झाली. हे विशेषतः अणुप्रयोगांबाबत पुनः पुन्हा सिद्ध झाले. ऊर्जासंचय-कण किंवा लहरी अशा दोन्ही स्वरूपात इलेक्ट्रॉन्स असू शकतात, असे शास्त्रज्ञांच्या ध्यानी आले. आईन्स्टाइनने द्रव्य व शक्ती हे परस्पर परिवर्तनीय आहे असे सापेक्षता सिद्धांताने दाखवून दिले. यातून विश्वातील सर्व पदार्थांचे मूल स्वरूप एकच आहे या निष्कर्षाला शास्त्रज्ञ आले.

विज्ञानाचा हा प्रवास सहजासहजी घडून आलेला नाही. सामान्यतः लोक स्थितिवादी असतात. रोज नवी सत्ये सांगितलेली त्यांना मानवत नाहीत. पण वैज्ञानिकाला मात्र चिकित्सापूर्वक नवे सत्य स्वीकारण्याची सिद्धता, अनाग्रही नम्रता ठेवावीच लागते. आपल्याला लागलेला शोध हा आवृत्तिक्षम आहे, प्रयोगानुकूल विशिष्ट परिस्थिती निर्माण केली तर जगातल्या कुठल्याही ठिकाणी त्याच्या प्रयोगाची आवृत्ती होऊ शकते, हे दाखवून दयावे लागते.

हिंदुस्थानातील विज्ञान

हिंदुस्थानात गणिताची मोठी प्रगती झाली होती. वराहमिहिराने ग्रह- ताऱ्यांच्या गतीची अचूक निरीक्षणे केली होती. त्यांचे नियम शोधून काढले होते. सुश्रुत-चरकांनी मानवी शरीराचे विच्छेदन करून विविध शरीर व्यवस्थांचा अभ्यास केला होता. परंतु १० व्या शतकानंतर सुरू झालेल्या आक्रमणांच्या कृष्णकालात ही वैज्ञानिक वृत्ती, हा विज्ञानाचा प्रकाश लोपून गेला. लोक निवृत्तीवादी, प्रारब्धवादी बनले. पुराणांना महत्त्व आले आणि विज्ञान-प्रतिभा खुंटून गेली. युरोपातील प्रबोधनाच्या पहाटेचे किरण हिंदुस्थानात कालांतराने आले. त्यांनी हिंदुस्थानचे प्राचीन विज्ञानचैतन्य नव्याने जागविले. चंद्रशेखर रमण, जगदीशचंद्र बसुंसारखी विज्ञानरत्ने येथे उदयास आली. डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई, सेठना, रामण्णा, नारळीकर, गोवारीकर यांच्यासारखी तेजस्वी वैज्ञानिक परंपरा येथे सिद्ध झाली. भव्य अणुविज्ञान केंद्रे, अवकाशसंशोधन केंद्रे उभी राहिली.

समूह संशोधन

शास्त्रीय संशोधनासाठी कोण्या एकट्यादुकट्याची परिश्रमशीलताही आज आणि यापुढच्या काळात पुरणार नाही. त्रिवेंद्रमच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात हजारो संशोधक काम करितात. अवकाशयानांची जुळणी, बांधणी आणि उड्डाण यासाठी सर्व विज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. अंतरीक्ष संशोधन हे मोठ्या समूहांनी परस्पर सहकार्याने करावयाचे साहस आहे. सामूहिक प्रयत्न असूनही एकाग्रता, अचूकता- हजार टक्के अचूकता या संशोधनात आवश्यक असते. एखादी यंत्रणा कच्ची पडली तरी मोठा धोका संभवतो. म्हणून सांघिक संशोधन- समूहाने संशोधन हे एक मोठे कौशल्य आहे.

अंतःस्फूर्ती (Intuition)

प्रत्येक नवीन सिद्धांत शोधून काढल्यावर त्यातील अपवादांचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. आणि ते अपवाद का आहेत हे शोधता शोधताच नवीन सिद्धांतांचा जन्म होतो. स्वतःचे पूर्वसिद्धांत, पूर्वग्रह, मते बाजूला ठेवूनच निसर्गाला सामोरे जावे लागते. ज्ञात आणि अज्ञाताच्या सीमेवरचा हा प्रवास फार अवधानपूर्वक करावा लागतो. स्वतःच्या शुद्ध बुद्धीचा कौल सतत घ्यावा लागतो. त्यासाठी अंतः प्रेरणा, अंतःस्फूर्ती आणि अनुभवातून प्रतीत झालेल्या सत्याविषयीची श्रद्धा अतिशय आवश्यक असते. अंतःप्रेरणा ही परिश्रमी आणि अभ्यासक व्यक्तीच्याच साहाय्याला धावून येते. तपाशिवाय अंतःप्रेरणाही संभवत नाही. बेन्झिनच्या रचनेबद्दल केकूले दीर्घकाळ विचार-संशोधन करत होता, आणि एक दिवस स्वप्नात त्याला स्वतःचीच शेपटी तोंडात घेतलेला साप दिसला त्याला बेंझिनच्या रचनेचे रहस्य उलगडले. मनाची भूमी खूप नांगरलेली असली, प्रश्नांची बीजे त्यात पडलेली असली की अंतःस्फूर्तीच्या पाण्याने अवचित उत्तरे उमलून येतात असे अनेक शास्त्रज्ञांच्याबाबत दिसून येते.ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणातून अशी परिश्रमशीलता, जिज्ञासूवृत्ती, प्रयोगशीलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते. त्या दृष्टीने मुलांना वैज्ञानिक शोध प्रकल्प करायला देणे, मोठ्या शास्त्रज्ञांची व्याखाने त्यांच्यासाठी योजणे, शास्त्रज्ञांची चरित्रे सांगणे, वाचायला देणे, विविध विज्ञान प्रकल्पांना भेटी देणे, त्यांचा अभ्यास करणे इ. उपक्रम केले जातात.

विज्ञान म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे

विज्ञान आणि तंत्रज्ञान

तंत्रज्ञान हे विज्ञानाचे फळ आहे. पण पुष्कळदा तंत्रज्ञानाचीच मोठी भुलावण पडते आणि विज्ञानाचे विस्मरण होते. मनुष्याचे कष्ट वाचविणारी यंत्रे, संगणक, आकाशवाणी, दूरदर्शन ही सारी उपयोजित विज्ञानाची उदाहरणे आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिरेकाने माणूस आळशी बनेल, भोगवादी बनेल अशी शक्यता दिसते. भारताला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे की नाही ? फारच मोठी आवश्यकता आहे. शेती सुधारण्यासाठी, उद्योगव्यवसाय वाढविण्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील जिकीर कमी करण्यासाठीसुद्धा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. पण तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान असे समजणे योग्य नाही. दैनंदिन आहार, आरोग्य आणि स्वच्छता याबाबत वैज्ञानिक दृष्टी असणे, परंपरागत अंधश्रद्धा, दुष्ट रूढी यांच्यापासून आपले मन मुक्त असणे यासाठी तर विज्ञान हवेच. बुद्धी जिथवर पोचू शकते तिथवर बुद्धीच्या साहाय्याने जाता आले पाहिजे.

जड-चेतनाच्या पुसटत्या सीमा

विज्ञानाची खरी झेप तंत्रविज्ञानात दिसत नसून शुद्ध विज्ञानाच्या क्षेत्रात, अणुसंशोधनात, आणि अवकाश संशोधनात दिसून येते. विज्ञानाभ्यासाने परिष्कृत झालेल्या मानवी बुद्धीपुढे शुद्ध विज्ञान जी रहस्ये उलगडत जात आहे ती विलक्षण आहेत. The secret life of plants या पुस्तकाचे लेखक Peter Tompkins आणि Christopher Bird यांनी या पुस्तकात म्हटले आहे-

‘वनस्पती या जिवंत आहेत, त्या श्वासोच्छ्वास करू शकतात, संवाद करू शकतात, त्यांना व्यक्तिमत्व असते आणि आत्मा असतो हे कवी आणि तत्त्वज्ञांचे म्हणणे सत्य आहे असा पुरावा आता उपलब्ध झाला आहे. आपण मात्र अंध दृष्टीने त्यांना जड समजत आलो आहोत.’

हिंदू तत्त्वज्ञानात कशालाच जड मानलेले नाही. सर्वच चैतन्यमय आहे, ‘हे समस्तही श्री वासुदेव, असा संतांचा अनुभव आहे. विश्वाच्या मूलरचनेचा विचार करताना आत्मानुभवी योगी आणि विज्ञानवेत्ते हे एकाच सत्याप्रत येऊन पोचतात. Dr. Fritjoff Capra हे म्हणतात –

‘योग्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने वैज्ञानिक आपल्या शोधाचा प्रारंभ करतो. भौतिक जगताचे संशोधन करीत तो वस्तूंच्या मुळाशी जे वस्तुतत्त्व आहे त्याचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. वस्तूच्या मूळ स्वरूपाचा सखोल वेध घेता घेता त्याला वस्तुजाताच्या मुळाशी असलेल्या एकत्वाचे दर्शन होते. त्याला असेही ध्यानात येते की तो स्वतः आणि त्याची जाणीव हे त्या एकत्वाचेच अविभाज्य भाग आहेत. अशा रीतीने योगी आणि वैज्ञानिक हे शेवटी एकाच निष्कर्षाप्रत येतात. एक अंतःसृष्टीच्या शोधापासून प्रारंभ करतो तर दुसरा बाह्यसृष्टीच्या शोधापासून सुरुवात करतो. पण या दोन्ही शोधांच्या निष्कर्षांमध्ये जी एकवाक्यता दिसून येते तिचा उद्घोष हा प्राचीन भारतीयांच्याच शब्दात सांगायचा तर असा आहे की ब्रह्म म्हणजे विराट बाह्यसृष्टी आणि आत्मा म्हणजे सूक्ष्म अंतःसृष्टी हे दोन्ही एकच आहेत.’

विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुसंवाद

म्हणून भारतीय दृष्टीला विज्ञान आणि अध्यात्म हे विसंवादी नसून संवादी वाटतात. दोन्हींचेही उद्दिष्ट मनुष्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकास आणि पूर्णता हेच आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची जेव्हा फारकत केली जाते तेव्हा संस्कृतींचा विकास एकांगी होतो. आजची विज्ञानाद्वारे झालेली भौतिक प्रगती म्हणजे विज्ञान असे मानणाऱ्या संस्कृतीत शाश्वत मूल्यांचा ऱ्हास होण्याचा धोका असतो. विज्ञानाभिमुख संस्कृतीत हा धोका कमी आहे. केवळ अध्यात्मप्रधान संस्कृती या ऐहिक जीवनात प्रभावशून्य होण्याचा संभव असतो आणि केवळ विज्ञानवादी संस्कृतींत स्थायी-शाश्वत मूल्यांचा ऱ्हास होण्याचा धोका असतो, म्हणून विज्ञान आणि अध्यात्म हे हातात हात घालून गेले पाहिजेत. या दोन्हीच्या प्रकाशात मनुष्याचे व मनुष्यसमाजाचे लौकिक जीवन आणि अंतरिक जीवन उजळून निघाले पाहिजे. आज अणुबाँब तंत्रज्ञानामुळे सारे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. पण विज्ञानाला सत्तेच्या राजकारणाच्या दास्यत्वातून मूक्त करून मूल-सत्याचे शोधक आणि साधक बनविता आले तर उद्याची संस्कृती ही ‘अविद्यया मृत्युं तीर्ध्वा विद्ययाऽमृतमश्नुते’ अशी आरोग्यपूर्ण आकांक्षा धरणारी होईल.

अंध उपासक

विज्ञान आणि धर्म या दोन्हींचे अंध उपासक या देशात आहेत. जडवादी, इहवादी म्हणत आहेत की धर्म ही अफूची गोळी आहे. अध्यात्म हे थोतांड आहे. विज्ञान हेच सर्व काही आहे. विज्ञानाच्या माध्यमातून जे कळेल तेच सत्य. पण विज्ञानाच्या म्हणून काही मर्यादा आहेत. इंद्रियगोचर असे जे विश्व आहे त्या पलीकडे बुद्धीला न कळलेले असे आणखी विराट विश्व आहे. त्याच्या शोधासाठी केवळ तर्कबुद्धी कामी येत नाही. अंतःस्फूर्तीची आवश्यकता असते. ती अध्यात्म-साधनेने मिळते.

या उलट विज्ञानाची ओळखही न झालेला पाच लक्ष खेड्यांमध्ये राहणारा भारतीय समाज आहे. शहरातला सुशिक्षित माणूसही अंधश्रद्ध असल्याचे अनेकदा आढळून येते. देवदेवतांचे कोप, नावससायास, शकुन-अपशकुन या सर्व जंजाळात समाज अडकलेला आहे. भूतपिशाच्च, भानामती, करणी, असल्या अमानुष कल्पनांनी तो धास्तावलेला आहे. देवऋषी आणि भगत हे अद्याप चाबूक उगारून घुमत आहेत. ‘जट’ आली म्हणून मुलीला देवदासी करणारे आईबाप खेड्यापाड्यांतून आजही आहेत.

पिण्याच्या पाण्यात किती जंतू असतात हे त्यांना सूक्ष्मदर्शकाखाली दाखवले तर ते चक्रावून जातात. तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचलेलेच नाही. बायका वर्षानुवर्षे चुलीचा धूर खात क्षयाच्या बळी होताहेत. कोवळ्या मुलींची लग्ने होताहेत. तेरा-चवदाव्या वर्षी त्यांच्यावर बाळंतपणे लादली जाताहेत. इथे आवश्यकता आहे विज्ञान-दृष्टीची. विज्ञान केवळ प्रयोगशाळेत राहायला नको आहे. विंध्य-सातपुड्यातल्या, नागा प्रदेशातल्या गिरिवासी, वनवासींच्या घरात ते पोचायला हवे आहे. तिथले जीवन विज्ञानामुळे निरामय व्हायला हवे आहे.

प्रबोधिनीची संकल्पना

ज्ञान प्रबोधिनीला अपेक्षित असलेली विज्ञानाभिमुखता या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे; दैनंदिन व्यवहारातील विज्ञानदृष्टी जोपासण्यासाठी आहे. ‘प्रयत्नवाद, कर्तृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्व प्रयत्नांनी वाढू शकेल’ या दृष्टीने प्रयोगशील राहणे हीदेखील विज्ञानाभिमुखता आहे आणि ज्यांच्या बुद्धी-प्रतिभेत गगनाला गवसणी घालण्याची ताकद आहे त्यांच्यासाठी विश्वाच्या रहस्याचे वेध घेण्याचे आवाहनही तिच्यात आहे ! वेदान्त आणि विज्ञान हे एकाच गन्तव्याकडे जाणारे दोन मार्ग आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आणि तो अनुभव निःसंदिग्ध शब्दांत सांगू शकणारे द्रष्टे, चिंतक, आत्मानुभवी लोक येथे निर्माण व्हायला हवे आहेत. स्वामी विवेकानंदांनी हेच केले. एकविसाव्या शतकाची परिभाषा आणि वृत्ती ही विज्ञानाभिमुखतेची आहे. या काळात अध्यात्माकडे सुद्धा वैज्ञानिक वृत्तीने पाहावे लागेल. वैज्ञानिक परिभाषेत ते समजावून देता यावे लागेल.

धर्माबाबतही शास्त्रीयता

स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे-

‘प्रत्येक विज्ञानशाखा ही ज्याप्रमाणे तर्कबुद्धीच्या साहाय्याने स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करते.’ त्याप्रमाणेच धर्मानेही तर्कबुद्धीचा आधार घ्यावा काय ? विज्ञान आणि बाह्यसृष्टी यांचा शोध घेण्यासाठी जी साधने आणि पद्धती उपयोगात आणल्या जातात त्याच धर्मशास्त्राला लागू कराव्यात का? यावर माझे उत्तर आहे की, होय. हे जेवढ्या लौकर घडेल तेवढे बरे. जर असे केल्याने तो धर्म कोसळून पडणार असेल तर तो धर्म नसून एक निरर्थक, निरुपयोगी अंधश्रद्धा होती असे मानावे लागेल. अशी अंधश्रद्धा कोसळून पडणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे याबद्दल मला काडीइतकी शंका नाही. सगळे बांडगूळ काढून टाकले पाहिजे आणि धर्माचे खरे सत्त्व या शोध प्रक्रियेत तावून सुलाखून उजळून निघाले पाहिजे. पदार्थविज्ञान किंवा रसायन यांच्याइतकीच शास्त्रीयता धर्माबाबत आली पाहिजे. त्यामुळे तो अधिक सामर्थ्यशाली ठरेल. कारण पदार्थविज्ञान किंवा रसायन यातील सत्याची अंतःप्रचीती मनुष्याला येत नाही, पण धर्मातील सत्याबाबत ती अंतःप्रचीतीही तो अनुभवू शकेल.

अनुभव हा ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे. धर्म हा विज्ञान म्हणून शिकवला जात नाही. म्हणून त्यात सर्वप्रकरचा निसरडेपणा-अनिश्चितता आली आहे. असे होता कामा नये. जगात काही मूठभर माणसे तरी नेहमी अशी राहात आली आहेत की ज्यांनी धर्म हा अनुभवाचे शास्त्र म्हणून शिकविला. त्यांना योगी म्हणतात. सर्व धर्मांमधील योगी एकच परिभाषा बोलतात आणि एकाच सत्य सांगतात.’

धर्माबाबत शास्त्रीयता हवी

स्वामीजींचा ‘राजयोग’ हा ग्रंथ पाहिला तर त्यात अध्यात्म विज्ञानाच्या परिभाषेत मांडलेले दिसेल. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे शास्त्रशुद्ध पद्धतीने जो कोणी करील त्याला त्या त्या टप्प्यावर सांगितलेले अनुभव आलेच पाहिजेत. पतंजलींनी योग-शास्त्र लिहिले आहे. त्यातील शास्त्रीयता त्यांच्या मांडणीत आणि त्यांनी सांगितलेल्या अनुभवांच्या आवृत्तिक्षमतेत आहे.

एकविसाव्या शतकात अध्यात्म आणि धर्म विज्ञानाच्या वाटेने मनुष्याला कळणार आहेत, भावणार आहेत अशी शक्यता आहे. विढ्या आणि अविद्या, ज्ञान आणि विज्ञान यांचे मीलन-अद्वैत होण्याचा हा काल आहे. त्यामुळे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हीची जे उपासना करू इच्छितात त्यांनी विज्ञानाला अभिमुख होणे आवश्यक आहे.

3 thoughts on “विज्ञानाभिमुखता”

  1. गौरी कुलकर्णी

    केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणे.
    मुक्त जिज्ञासा
    प्रयोग करत राहणे
    प्रत्यक्ष अनुभव घेणे
    कसोटी किंवा परीक्षण
    चिकित्सक पडताळा
    आलेल्या निष्कर्षतून समाजात वापरणे
    नवे बदल स्वीकारण्याची तयारी असणे

  2. विज्ञानाभिमुखता यामध्ये ही दृष्टी वापरून त्रिकालज्ञान (इतिहासाचा रास्त अभिमान व शिकवणे, वर्तमानातील परिस्थितीकडे सुयोग्य नजरेने पाहणे, आणि उत्कृष्ट तंत्रे व आंतरविद्याशाखीयता वापरून भविष्यवेध घेणे) हा विज्ञानाभिमुखतेचा product म्हणून मांडणे असा विचार मांडायला हवा.

  3. पीयूष ओझर्डे

    वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटली. त्याचा विवेकपूर्ण वापर हवा असे वाटते.
    अपवादाच्या अभ्यासातून नवीन सिद्धांत निर्माण होतो. अपवाद लक्षात आला तरी त्याचा अभ्यास आणि सैद्धांतीकरणाची चिकाटी हवी.
    “धर्म अनुभवाच्या माध्यमातून शिकवायला हवा” – याच्या पद्धती, व्यक्ती समजून घ्यायला आवडेल. ते अवघड असणार म्हणूनच सर्वसामान्य नसणार.
    विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये परस्परविरोध, अपूर्ण ज्ञानातून चमत्कारिक (हेतुपूर्ण श्लेष!) विधाने करणे यावर अजून प्रयत्न करून शक्य ते सर्व मुळातून समजून घेणे उपयोगाचे वाटते.
    स्व अनुभवाला किती प्रमाण मानावे? प्रत्येक वाक्याला सिद्धतेशिवाय मानायचे की नाही यातला विवेक कसा पाळायचा?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *