जनी जनार्दन ऐसा भाव: निगडी येथील भाषणावर आधारित

धर्म, संस्कृती, समाज म्हणजे राष्ट्र

ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यरचनेमध्ये प्रतिज्ञांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा घेताना धर्म, संस्कृती आणि समाज म्हणजे राष्ट्र, अशी ‘राष्ट्र’ या शब्दाची व्याप्तीही दाखवली आहे. भगिनी निवेदितांनी जन, देश आणि धर्म मिळून राष्ट्र होते असे सांगितले आहे. देशाच्या भूमीचे रक्षण करणे हे काम आता देशाचे खडे सैन्य व सरकार करत असते. परंतु धर्म, संस्कृती, समाज यांचे रक्षण व संवर्धन करणे हे काम शासन करीत नाही. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून हे काम करावे लागते. प्रत्येकाने ही स्वतःची जबाबदारी विचारपूर्वक उचलावी यासाठीच प्रबोधिनीचे सर्व काम चालते.

प्रतिज्ञा घेण्याआधीही, ‘हा देश माझा’, ही भावना निर्माण व्हावी लागते. ही भावना निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर एक वर्षभर रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास करत पूर्ण देश हिंडून हा भाव स्वतःमध्ये निर्माण केला. त्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनीही सलग अडीच वर्षे भारत यात्रा केली. स्वामी दयानंद व समर्थ रामदासांनीही असेच देशाटन केले होते. गुरु नानक, चैतन्य महाप्रभु, नामदेव, शंकराचार्य यांनीही केले. या देशातील सर्वसामान्य माणूस जिथे राहतो, जे काम करतो, जे खातो, जे पाणी पितो, ज्यामध्ये मन रमवतो, ते सगळे स्वतः पाहून, अनुभवून, ते अनुभव पचवूनच हा भाव निर्माण होतो. राष्ट्राचा विचार करणे म्हणजे सर्वप्रथम समाजाचा विचार करणे.

आधी समाज मग संस्कृती

प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. तथा आप्पाजी पेंडसे यांनी राष्ट्रधर्माचे विवेचन करताना एक सिद्धान्त मांडला आहे. ते म्हणतात ‘हिन्दू राष्ट्र हे कारण आहे. हिन्दू जीवन पद्धती हे त्याचे कार्य आहे. हिन्दूराष्ट्राचे रक्षण व संवर्धन करा. त्यातून आपोआप हिन्दू जीवनपद्धती विकसित होईल. ती आज दिसत नाही म्हणून हिन्दू राष्ट्र धिक्कारू म्हणाल तर वृक्ष तर नाहीच पण बीजही जाईल’ याच भूमिकेच्या आधारे अनेक निमित्ताने केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी राष्ट्रधर्माच्या कल्पनेचा विस्तार केला आहे.

व्यक्ती आणि समाजाच्या बाबतीत त्यांनी म्हटले आहे की ‘समाजाचा कोणताही घटक मागासलेला राहून समाजाचा विकास होऊ शकणार नाही. तसेच काहीच व्यक्तींचा अनिर्बंध विकास ही कल्पना खोटी आहे. समाजाशिवाय व्यक्ती खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगूसुद्धा शकणार नाही.’

व्यक्तीचे समाजाशी असे अतूट नाते असल्यामुळे समाजात राहून त्याच्या विकासाच्या प्रयत्नात सहभागी व्हायचे असेल तर व्यक्तीला लवचिक आणि जुळवून घेणारं मन घडवावं लागेल. कै. आप्पा म्हणतात, ‘माझे समज-गैरसमज, मला प्रिय किंवा अप्रिय गोष्टी यांच्याशी मी स्वतःला घट्ट बांधून ठेवलं तर माझे ग्रह पक्के होत जातील. कधी कधी संबंधामध्ये कटुता येईल. तो मनुष्य स्वभावाचा नैसर्गिक परिणाम आहे. पण कटू प्रसंग पचवण्यासाठी आत्मौपम्य बुद्धी हवी’ आत्मौपम्य बुद्धी म्हणजे स्वतःला इतरांच्या जागी कल्पून विचार करणे.

‘आत्मौपम्य बुद्धी विकसित व्हायची असेल तर मर्यादित अशा ‘स्व’ च्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या विचारांनी आणि भावनांनी मनाचे पोषण झाले पाहिजे. अशा भावनात्मक पोषणाच्या अभावामुळे स्वार्थ, पराकोटीचा उपयुक्ततावाद, व्यक्तिकेंद्रितता, समाज बांधवांविषयी अनास्था, राष्ट्रप्रीती व मानव्यप्रीतीचा लवलेश नसणे हे सर्व दोष बळावतात.’ राष्ट्रधर्माचे आचरण करण्यासाठी हे दोष दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी कै. आप्पांनी व्यक्तिगत आणि सामूहिक उपासना हे साधन सांगितले आहे.

समाजप्रामाण्यबुद्धी, जनी जनार्दन भाव आणि सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान

कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्या आराध्य देवतेची किंवा इष्ट देवतेची पूजा करणे ही या समाजाची परंपरा आहे. सर्वांना पाहिजे त्या देवाची उपासना करायची मोकळीक देणे ही या समाजाची परंपरा आहे. अशी परंपरा असलेल्या समाजाच्या सुखदुःखांमध्ये स्वतःची सुखदुःखे मानणे, या समाजाच्या मान-अपमानात स्वतःचा मान-अपमान मानणे, या भावनेला प्रबोधिनीच्या संस्थापकांनी समाजप्रामाण्यबुद्धी असे नाव दिले आहे. या पद्धतीने हिन्दू समाजाकडे पाहातच स्वतःचे जीवन जगणे याच्यातच आपले राष्ट्रीयत्व आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. विचाराप्रमाणेच वागले की तो विचार हृदयात आतपर्यन्त जातो व त्याचे भावनेमध्ये रूपान्तर होते. प्रबोधिनीच्या वैचारिक तत्त्वांच्या मांडणीमध्ये या समाजप्रामाण्यबुद्धीलाच ‘जनी जनार्दन भाव’ असे नाव दिले आहे. जनार्दन म्हणजे जनांचे रक्षण करणारा परमेश्वर. परमेश्वर जनांमध्ये लोकांमध्ये आहे असा भाव ठेवणे म्हणजे जनी जर्नादन भाव. विचाराच्या अंगाने ‘समाजप्रामाण्यबुद्धी’ म्हटलं. भावनेच्या अंगाने ‘जनी जनार्दन भाव’ म्हटलं. त्यालाच कृतीच्या अंगाने ‘देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणे’ असे प्रबोधिनीच्या भवितव्य लेखात म्हटले आहे.

प्रबोधिनीचे कार्यकर्ते या भवितव्य लेखाचा म्हणजे भविष्य काळातील कार्यविस्तारातील योजनेचा पुन्हा पुन्हा आढावा घेत असतात. तीन वर्षांपूर्वी आढावा घेताना ज्या उपक्रमांतून : १) आर्थिक स्वावलंबन येते २) स्वतःसंबंधीचे निर्णय स्वतः घेण्याचे धाडस येते ३) स्वतः योजलेली कामे पूर्ण करण्याची कौशल्ये मिळतात व ४) इतरांना बरोबरीच्या नात्याने सामोरे जाता येते, त्यातून आत्मसन्मान वाढतो असे लक्षात आले.

नुकत्याच झालेल्या एका शिबिरात आत्मसन्मान वाढवणे म्हणजे काय, या कल्पनेचा विस्तार कार्यकर्त्यांनी केला. आपल्या कामातून उत्तमता प्रकट करण्याची इच्छा, आपण ठरवलेले झालेच पाहिजे असा काम पूर्ण करण्याचा आग्रह, काम पूर्ण केल्याचे समाधान, नवीन आणि मोठी जबाबदारी घेण्याची इच्छा, आपल्या मतांचा इतरांनी स्वीकार केल्याचा आनंद यातून आत्मसन्मान प्रकट होत असतो. आपली चूक सहन होत नाही – दुरुस्त कराविशी वाटते, आपल्या क्षमतांविषयी शंका व्यक्त झाल्यावर – त्या सिद्ध कराव्याशा वाटतात, परावलंबन सहन होत नाही, आपल्याला न विचारता गृहीत धरलेले सहन होत नाही अशा वागण्यातूनही आत्मसन्मान जागा असल्याचे कळते.

राष्ट्रधर्माचा आचार आणि विचार

सर्वसाधारण लोक ज्याला धर्म म्हणतात अशा धार्मिक संप्रदायाला तीन गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे विचार किंवा तत्त्वज्ञान. दुसरी गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्यासाठीची आचारसंहिता किंवा कर्मकांड. तिसरी गोष्ट म्हणजे त्या आचारसंहितेप्रमाणे वागणाऱ्या इतिहासातील आणि वर्तमानातील आदर्शाच्या कथा. या तिन्हींच्या मुळाशी लागतो श्रद्धेचा, आदराचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा भाव. राष्ट्रधर्म म्हटला तरीसुद्धा वरील तिन्ही गोष्टी आणि त्याच्या मागचा भाव लागणारच. अशा राष्ट्रधर्माच्या आचारसंहितेला मानव-आरोग्य-अभ्युदय-निःश्रेयस-शास्त्र असे भले मोठे सर्वसमावेशक नाव प्रबोधिनीच्या संस्थापकांनी दिले होते. याचे तपशील प्रत्येक पिढीला काळानुसार तयार करावे लागतात. सर्व व्यक्तींसाठी शुद्ध हवा, निर्मळ पाणी, स्वस्त उर्जा, हक्काचा निवारा आणि जीविताची व मालमत्तेची सुरक्षितता याची काळजी आता शासनाने व समाजाने घेतली पाहिजे असे मानतात. अन्न, वस्त्र, आरोग्य, उपजीविका आणि मनोरंजन याची व्यवस्था, व्यक्ती आणि समाज दोन्हीही करत असतात. याशिवाय केवळ व्यक्तीच योजना करू शकतात असे घटक म्हणजे स्वतःची कौशल्ये, संस्कार, ज्ञान, ध्येयदर्शन आणि प्रेरणा वाढविणे. या सर्वांचा विचार म्हणजे राष्ट्रधर्मातील मानव-आरोग्य अभ्युदय-निःश्रेयस-शास्त्र.

शास्त्र किंवा आचारसंहितेच्या बरोबरीने तत्त्वज्ञानाचा विचार करावा लागतो. अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते।, न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते।, सत्यमेव जयते नानृतम्।, तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्यस्विद् धनम्।, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे।, असतो मा सद्गमय।, हरि भजनावीण काळ घालवू नको रे।, या सर्व ऋषींच्या आणि संतांच्या वचनांमध्ये राष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान येऊन गेलेले आहे. प्रबोधिनीला या शिवाय वेगळे काही तत्त्वज्ञान मांडायचे नाही.

राष्ट्रधर्माच्या आचरणाचे आदर्श म्हणून प्रबोधिनीने रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद यांची चरित्रे समोर ठेवली आहेत. एकात्मता स्तोत्रातील सर्व पुण्यश्लोक स्त्री-पुरुषही असेच आदर्श म्हणून मानले पाहिजेत. एकात्मता स्तोत्रातील शेवटचा श्लोक ही आदर्शाची यादी न संपणारी आहे असे दाखवतो. तो श्लोक असा आहे:

अनुक्ता ये भक्ता प्रभुचरणसंसक्तहृदयाः ।

अविज्ञाता वीरा अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः ।

समाजोद्धर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणाः ।

नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ।।

आमच्या दृष्टीच्या परिघावरचे समाजघटक

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. ग. प्र. प्रधान यांचे ‘माझी वाटचाल’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी त्यांचे ‘साता उत्तराची कहाणी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताची परिस्थिती सात वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांना कशी दिसत होती, याचे वर्णन त्यांनी केले आहे. या सातही कार्यकर्त्यांना प्रथम परिस्थिती पालटण्यासाठी आपल्या पक्षाचे उत्तरच बरोबर आहे असे वाटत होते. प्रत्येकाच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला इतरांच्या उत्तरातही काही तथ्य आहे किंवा आपल्याजवळ पूर्ण उत्तर नाही, हे जाणवू लागले होते. प्रधानसरांनी या पुस्तकाचा उल्लेख करुन पक्षीय गटांच्या पलीकडे जाऊन आजच्या समाजगटांचा निर्देश करताना आपल्या आत्मचरित्रात पुढे म्हटले आहे – ‘स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानंतरही सात समाजगटांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत.’ साताउत्तरांच्या कहाणीपासून सुरुवात करुन सात समाजगटांच्या प्रश्नांपर्यंत ते आले. प्रधान सरांनी उल्लेख केलेले सात समाज घटक पुढील प्रमाणे आहेत:

१) स्त्रिया २) दलित ३) आदिवासी आणि भटक्या विमुक्त जमाती ४) भूमिहीन शेतमजूर ५) धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त विस्थापित ६) ईशान्य भारतातील जमाती ७) पंजाबी आणि काश्मिरी जनता. ‘या सात समाजघटकांचे प्रश्न हेच माझे प्रश्न आहेत. या सात गटांना त्यांचे त्यांचे प्रश्न सुटल्यावर जो आनंद होईल तोच माझा आनंद आहे. या सात गटातील लोकांचे जीवन सुंदर झाले म्हणजे माझेही आयुष्य सुंदर झाले’, असे वाटणे म्हणजे जनी जनार्दन असा भाव मनामध्ये निर्माण होणे.

प्रधान सरांची यादी अगदी अलीकडची म्हणून त्या यादीचा उल्लेख केला. आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांपासून आजूबाजूला पाहायला सुरवात केली तर प्रत्येक जण आणखी काही समाजगटांची भर या सातांच्या यादीत घालू शकेल. प्रत्येकाला स्वतःची यादी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

प्रबोधकांच्या जाणिवेचे विस्तारणारे वर्तुळ

प्रबोधिनीची वैचारिक मूलतत्त्वे पुस्तकरुपाने मांडण्याचा पहिला प्रयत्न जेव्हा केला, तेव्हा कुष्ठरुग्ण, ग्रामीण तरुण स्त्रिया आणि दलित या गटांचा उल्लेख त्या लेखामध्ये केला होता. पडसऱ्याला शंभर दिवसांची शाळा चालवण्याच्या निमित्ताने व नागाप्रदेशातील शाळेच्या निमित्ताने वनवासी गटांच्या प्रश्नांची ओळख झाली. बालग्राममधल्या मुलांची शिबिरे घेताना अनाथ मुलांच्या प्रश्नांची ओळख झाली. रिमांड होममधल्या मुलांना बर्ची नृत्य शिकवताना बालगुन्हेगारीचा प्रश्न लक्षात आला. येरवड्याच्या कारागृहात संगणक शिकवताना बंदीजनांच्या व्यथा समजू लागल्या. अशाच वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने झोपडपट्टीतले, बालकामगारांचे प्रश्न लक्षात आले. साखर शाळांच्या निमित्ताने ऊसतोडींच्या कामाला जाणाऱ्या भूमिहीनांचे अणि अल्पभूधारक जिरायती शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात आले. भूकंप किंवा वादळ अशा नैसर्गिक आपत्तीनंतर प्रांतोप्रातींच्या ग्रामीण दारिद्र्याचे दर्शन झाले. या अनेकविध कामांतून प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अनुभव विश्व वाढत गेले आहे.

सामाजिक जाणीव ते सामाजिक अतूट नात्यांची अनुभूती

अनुभवविश्व वाढले तरी भावविश्वात ‘जनी जनार्दन’ हा भाव निर्माण होतोच असे नाही. प्रथम निर्माण होते ती सामाजिक जाणीव. आपले आणि या समाजाचे दुर्लक्ष करता येणार नाही असे नाते आहे, हे प्रथम कळते. या नात्याची जाणीव झाली की मधून मधून मन अस्वस्थ व्हायला लागते. या अस्वस्थतेतून सामाजिक कृतीचा जन्म होतो. स्वतःची अस्वस्थता कमी व्हावी म्हणून केलेल्या किंवा निरपेक्ष बुद्धीने केलेल्या सामाजिक कृतीतून समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट होऊ लागते. त्याच्यातून सामाजिक बांधिलकी निर्माण होते. आपली विद्या, आपली बुद्धी, आपली शक्ती, आपला वेळ, आपल्या अनुभवविश्वाच्या परिघावर असलेल्या समाज गटांसाठी वापरावा, असे वाटू लागते. परिघावरच्या आणि परिघापलीकडच्या समाज गटांना आपल्या अनुभव विश्वाच्या केन्द्रस्थानी आणता आले की ‘जनी जनार्दन’ हा भाव निर्माण व्हायला लागतो.

आपल्या संस्कृतीमध्ये ‘अतिथिदेवो भव’ ही संकल्पना आहे. स्वतः जेवण्यापूर्वी आपल्या घराच्या दाराशी किंवा गावाच्या वेशीजवळ कोणी अतिथी आहे का, हे बघायचे. प्रथम त्याच्या जेवणाची व्यवस्था करायची आणि मग आपण जेवायचे, म्हणजे अतिथीच्या रूपात आलेल्या देवाची आपण पूजा केली. प्रबोधिनीमध्ये ‘अतिथीदेवो भव’ च्या पुढची ‘राष्ट्रदेवो भव’ ही संकल्पना मांडली आहे. उपासना करताना अध्वर्यूने ‘राष्ट्रदेवो भव’ असे सांगायचे आणि उपासकांनी ‘राष्ट्रदेवा भवेम’, ‘आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ’ असा प्रतिसाद द्यायचा, हे प्रबोधिनीमध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी वर्षान्त उपासनेच्या वेळी घडते. ‘आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ’ म्हणजेच ‘आम्ही जनी जनार्दन असा भाव आमच्या मनात निर्माण करु’ म्हणजेच ‘आमच्या जाणिवेच्या परिघावरच्या समाजगटांना जाणिवेच्या केन्द्रस्थानी आणू’ भक्ताला जसे देवाशिवाय अन्य काही सुचत नाही तसे आम्हालाही परिघावरच्या लोकांच्या कल्याणाशिवाय आणखीही काही सुचू नये म्हणजे ‘जनी जनार्दन’ हा भाव.

जाणीव ते अनुभूती पारंपरिक पद्धतीने

प्रबोधिनीने तयार केलेल्या विद्याव्रत संस्काराच्या पोथीमध्ये स्वाध्याय-प्रवचन हे एक व्रत सांगितले आहे. स्वाध्याय-प्रवचन म्हणजे शिकणे आणि शिकविणे. आपल्याला जे येते ते इतरांना शिकविल्याशिवाय आपले शिकवणे पूर्ण होत नाही. हे शिकणे-शिकवणे आयुष्यभर चालू राहाते. त्याच्या बरोबर काय काय चालले पाहिजे, याची एक यादी उपनिषदामध्ये दिली आहे. त्या यादीत ‘मानुषं च स्वाध्यायप्रवचने च।’ असे एक कर्तव्य सांगितले आहे. याचा अर्थ शिकण्या-शिकवण्याबरोबर इतरांचे माणूसपण वाढवण्याचा प्रयत्न करावा.

इतरांचे माणूसपण कसे वाढवायचे ? तर १) प्रत्येकाची आत्मप्रचीती वाढवण्याने हे माणूसपण वाढत जाते. २) इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्याने हे माणूसपण वाढत जाते. ३) भावनाकोषाच्या समृध्दीने हे वाढत जाते. ४) प्रश्न सोडविण्याची शक्ती दिल्याने माणूसपण वाढत जाते. ५) प्रतिभाशाली विचार करायला प्रोत्साहन दिल्याने माणूसपण वाढत जाते. ६) चिकित्सक विचाराचा आदर केल्याने माणूसपण वाढत जाते. ७) काम, कलाकुसर, संवाद इत्यादी अभिव्यक्तीच्या नवनवीन पद्धती वापरल्याने माणूसपण वाढत जाते. लोकशिक्षणाचे किंवा लोककल्याणाचे उपक्रम करत असताना या सातांपैकी मानवी व्यक्तिमत्त्वाचा कोणता ना कोणता पैलू कसा झळाळेल याचा विचार केला पाहिजे असा प्रबोधिनीमध्ये आग्रह असतो.

इतरांचे माणूसपण वाढवण्याच्या प्रयत्नानेच स्वतःचे माणूसपण वाढत असते. आपल्या संस्कृतीमध्ये माणूसपण विकसित होत जाण्याच्या चार पायऱ्या मांडल्या आहेत. पहिली पायरी आहे सलोकता. आपल्या आजूबाजूचे लोक ज्या परिस्थितीत राहतात, जे प्रश्न अनुभवतात, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यांना ज्याचा आनंद होतो, ते सगळे आपल्याला माहीत असणे, आपल्यालाही त्याचा काही अनुभव असणे म्हणजे सलोकता किंवा लोकांच्या बरोबर असणे. प्रबोधिनीच्या एक पद्यामध्ये ‘मन त्वरे जनपदी रमवावे’ असे म्हटले आहे. लोकांना ज्यात आनंद आहे त्यात आपल्यालाही रस घेता आला पाहिजे. बहुजन समाज पंढरीची वारी करत असेल तर आपल्यालाही दिंडीबरोबर चार पावले जाण्यात आनंद वाटला पाहिजे. बहुजन समाज गणेशोत्सवात धुंद होऊन नाचत असेल तर आपल्यालाही निःसंकोच नाचता आले पाहिजे. म्हणजे सलोकता.

समीपता

दुसरी पायरी आहे समीपता. समीपता म्हणजे शेजारी बसणे. शेजारधर्म पाळणे. शेजारच्या बिऱ्हाडातल्या लोकांबरोबर वस्तूंची व सुखदुःखांची जशी देवाण घेवाण होते तशी देवाण घेवाण समाजातल्या अनेक व्यक्तींबरोबर करता येणे म्हणजे समीपता. वादळामध्ये शेजाऱ्यांचे छप्पर उडून गेले तर चार दिवस ते आपल्या घरी राहतात. शेजारच्या प्रांतात निसर्गाच्या अवकृपेनी कोणाची घरे विस्कटली तर ती घरे उभारायला धावून जाने म्हणजे समीपता. शेजारच्या घरातला तरुण मुलगा बहकला तर त्यालाही बरोबरीच्या किंवा वडिलकीच्या नात्याने चार शब्द सांगता येतात. सीमेवरच्या राज्यातले तरुण ‘आम्ही या देशाचेच नाहीत’ असे म्हणायला लागले तर त्यांना जाऊन सांगणे की ‘हा देश आमच्या इतकाच तुमचाही आहे’ म्हणजे समीपता. प्रबोधिनीत ही समीपता अनुभवण्याचा आग्रह आणि योजना नेहमीच करत असतो.

सरूपता

तिसरी पायरी आहे सरूपता. अगदी लहान वयात फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेमध्ये मुले नेताजी किंवा झाशीच्या राणीचा पोशाख करतात. ‘चलो दिल्ली’ किंवा ‘मेरी झाँसी नही दूँगी’ असे वाक्य म्हणतात. भूमिका वठवण्याच्या प्रयत्नात भूमिकेशी एकरुप होऊन जाने म्हणजे सरूपता. चित्रपटात भूमिका करता करता तुकारामच झाले किंवा बाल ज्ञानेश्वर झाले, स्वतःमध्ये त्या भूमिकांचे गुण उतरवले, अशी उदाहरणे मराठी चित्रपट सृष्टीत झाली आहेत. प्रबोधिनीतले विद्यार्थी उन्हाळ्यात शिबिराला गेले की अनुभव म्हणून दीड-दोन किलोमीटर अंतरावरच्या झऱ्यावरती पाण्याचा हंडा भरून डोक्यावरून गावात आणण्याचा अनुभव घेतात. कोणी शिबिरामध्ये शेतात जाऊन टोमॅटो काढण्याचा किंवा भात लावण्याचा अनुभव घेतात. सहलीमध्ये असताना उन्हापावसात चालण्याचा अनुभव घेतात, बसस्टँडवर रात्र काढण्याचा अनुभव घेतात. हा समाजाशी एकरूप होण्याचाच छोटासा प्रयत्न आहे. ज्यांना सरूपता साधली त्यांना पाहून, ऐकून, वाचून किंवा कल्पना करूनही इतरांच्या जागी आपण आहोत याचा मनोमन अनुभव घेता येतो. कोणाला आपल्या जवळचे खायला द्यावेसे वाटणे यात सलोकता आहे. त्याला रोज खायला मिळते आहे ना, याची काळजी घेणे यात समीपता आहे. अन्नाच्या बाबतीत त्याला आपल्यासारखे स्वावलंबी बनवणे यात सरूपता आहे. सलोकतेकडून सरूपते कडे प्रवास झाला पाहिजे असा आग्रह असल्यामुळे प्रबोधिनीचे रोजगार निर्मितीचे उपक्रम नेहमीच स्वयंरोजगार निर्मिती आणि उद्योजकता विकासाच्या दिशेने सरकत असतात.

सायुज्यता

मनुष्यपणाच्या विकासाचा शेवटचा टप्पा आहे सायुज्यता. सायुज्यता म्हणजे पूर्णपणे मिसळून जाणे. मी केले, मी करतो आहे, मला करायचे आहे याचा विसर पडून समाजाचा एक घटक म्हणून समाजाच्या हितासाठी जे जे करायला लागेल ते आपल्या हातून आपोआप होने. कारगिलच्या युद्धाच्या वेळी आपल्या दातृत्वाचा उल्लेखही होणार नाही अशा पद्धतीने अनेकांनी संरक्षण निधीला मदत केली ही सायुज्यता. आपल्या घरची स्वच्छता काही गाजावाजा न करता सर्वजण रोज करत असतात. तितक्या सहजपणे समाजातील वातावरण मंगलमय करणे म्हणजे सायुज्यता. सायुज्यतेमध्ये कर्तृत्वाचा भार नसतो, कर्तृत्वाला दाद मिळाली पाहिजे अशी अपेक्षा नसते. आज देशाला जे जे आवश्यक आहे ते ते करू या असा विचार करत प्रबोधिनीत अनेक उपक्रम झाले आहेत. प्रबोधिनी हे नाव मागे ठेवून कधी समाज ऐक्य समिती नावाने, कधी व्यसनमुक्ती समिती नावाने, कधी जिव्हाळा नावाने, कधी पाणलोट विकास समिती नावाने अनेकांचे सहकार्य घेत आणि अनेकांच्या पुढाकाराला प्रतिसाद देत प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. नावाला महत्त्व न देता काम करणे ही सायुज्यता.

सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या मार्गाने समाजाशी नाते जोडत स्वतःच्या मनाचा विकास करत जाने म्हणजे राष्ट्रधर्माचे आचरण करणे, अशी प्रबोधिनीची कल्पना आहे.

जोडण्याची आणि पूल बांधण्याची भूमिका

आचारसंहिता, तत्त्वज्ञान आणि आदर्शाच्या कथा यांच्या मुळाशी पाहिजे आदरभाव आणि प्रेमभाव. राष्ट्रधर्मामध्ये आदर भाव लागतो, थोर परंपरा निर्माण करणाऱ्या समाजाबद्दल. प्रेमभाव लागतो, दिव्यत्वाची ओढ लागलेल्या समाजाबद्दल. दिव्यत्वाची ओढ लागली असली तरी तो समाज अपूर्ण मानवांचा आहे. या माणसांमध्ये गुणही आहेत आणि दोषही आहेत. या माणसांनी चांगली कामे केली आहेत आणि चुकाही केल्या आहेत. कधी ते देवांसारखे वागतात तर कधी असुरांसारखेही वागतात. सर्व गुणदोषांसकट, सर्व इतिहास आणि वर्तमानासकट, हा समाज माझा आहे आणि मी या समाजाचा आहे असा भाव मनात स्थिर करून राष्ट्रधर्माचे पालन करता येते. या माझ्या समाजाला गुणदोषांसकट मी ‘माझे’ मानले आहे म्हणून माझ्याकडे ते दोष दूर करण्याची जबाबदारी येते. या समाजावर मी प्रेम करतो म्हणून मला यातील लोकांवर रागावण्याचाही अधिकार येतो. या समाज नौकेबरोबर बुडायची माझी तयारी आहे म्हणूनच ती बुडू द्यायची नाही असा माझा निर्धार आहे. माझे या समाजावर प्रेम आहे म्हणून त्याच्या जीवन पद्धतीवर आणि संस्कृतीवर माझे प्रेम आहे. असे सर्व विचार मनामध्ये सतत असणं, त्या विचारांनी स्वतः कामाला प्रवृत्त होणं याला प्रबोधिनी मध्ये ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ असे म्हटले आहे.

पूर्वीच्या ऋषींनी ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ अशी घोषणा करुन त्यावेळचे अग्नी, यम आणि मातरिश्वा हे सर्व देव म्हणजे एकाच देवाची विविध नावे आहेत असे जाहीर केले. विसाव्या शतकातील ऋषी विनोबा यांनी ही नाममाला वाढवली. भारतातील व भारताबाहेरील सर्व पवित्र नावांना एका श्लोकात गुंफून टाकले:

ब्रह्म मज्द तू यह्व-शक्ति तू येशु पिता प्रभु तू

रुद्र विष्णु तू राम कृष्ण तू रहीम ताओ तू

‘सर्व देव सारखे आहेत’, या प्रार्थनेतील भूमिकेचा सामाजिक व्यवहार, म्हणजे सर्व राजकीय पक्ष, धार्मिक संप्रदाय, आर्थिक व सामाजिक विचारसरणी, विविध संघटना, विविध भाषिक गट, सर्व जातीजमाती यांच्यामध्ये पूल बांधण्याची भूमिका घेणे. प्रबोधिनीला असे पूल बांधण्याचे काम करायचे आहे. या समाजावर प्रेम करायचे म्हणजे इथले प्रतिगामी आणि पुरोगामी, आधुनिक आणि सनातनी, कट्टरपंथी आणि प्रागतिक, पोलिस आणि गुन्हेगार अशा सर्व लोकांना ते आपलेच आहेत असे ओळखायचे. समाजसंघटनेच्या आणि समाज विकासाच्या कामात त्यांचे योगदान कसे होईल याचा विचार करायचा. अशी प्रत्यक्ष कृती हीच मनात जनी जनार्दन भाव आहे याची पावती होईल.

नव्या समाजरचना

‘समाजबांधवांविषयी अनास्था संपून बन्धुत्वावर आधारित, समतेवर आधारित नव्या समाजरचना कशा निर्माण करायच्या हा हिन्दुस्तानपुढील महत्त्वाचा प्रश्न समूह आहे’, असे कै. आप्पांनी म्हटले आहे. ‘परस्पर सामंजस्य हा जिचा आधार आहे अशी समाज रचना निर्माण करणे आणि त्या बरोबर ग्रामीण पुनरुज्जीवन करणे’ म्हणजे राष्ट्रधर्माचे आचरण करणे.

समाज चिंतन करायचे असेल, देश विचारांच्या सगळ्या कल्पनांनी समाजमन भारून टाकायचे असेल तर ‘गांधीजींनी जसे काँग्रेस अधिवेशन ग्रामीण भागात भरवले तसा आपल्या सर्व विचारांचा केन्द्र बिन्दू ग्रामीण भागात नेला पाहिजे’, असे कै. आप्पांनी सांगितले. फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन पाहण्यासाठी कै. आप्पा स्वतः गेले होते. प्रबोधिनीची औपचारिक स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी ग्रामीण भागातील कामाला प्रारंभ केला होता. गावातील तरुण आणि विशेषतः दलित वस्तीतील तरुणांना आत्मनिर्भर कसे करायचे यावर त्यांचे चिंतन सतत चालू असे.

जीवन पद्धतीचा आधार समाज आणि समाजाचा पाया म्हणजे हातावर पोट असणारा समाजगट. त्याला केंद्रस्थानी मानून विचाराला प्रारंभ करायचा. देशातील सर्व संपत्ती, कर्तृत्व, बुद्धिमत्ता, प्रेरणा आणि संघटना यांचा, समाजाचा हा पाया मजबूत करण्यासाठी कसा उपयोग करता येईल याचे सतत चिंतन करायचे, म्हणजे जनी जनार्दन हा भाव मनामध्ये स्थिर करणे. जे कर्तृत्वाने, बुद्धिमत्तेने, साधन समृद्धीने इतरांपेक्षा उंच आहेत त्यांना खाली वाकून तळातल्यांना वरती उचलून घेण्यात आयुष्याचे सार्थक वाटणे म्हणजे जनी जनार्दन हा भाव मनामध्ये स्थिर होणे.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘आपला समाज हेच एकमेव जागृत दैवत आहे. व्यर्थ अशा देवतांच्या मागे आपण धावत आहोत. पण भोवताली पसरलेल्या विराट अशा साक्षात परमेश्वराला मात्र आपण पूजीत नाही. आवश्यकता कशाची असेल तर ती चित्तशुद्धीची आहे, हृदयाच्या पावित्र्याची आहे. ही चित्तशुद्धी कशी होईल ? प्रथम आवश्यक आहे विराटाची पूजा- आपल्या भोवती असणाऱ्या सर्व जीवांची पूजा. त्या विराटाची पूजा करा. माणसे व पशू हे सर्व आपले देव आहेत. आणि ज्यांची आपण सर्व प्रथम पूजा करावी असे देव म्हणजे आपले देशबांधव आहेत’. विवेकानंदाचे हेच विचार प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रबोधिनीने ‘जनी जनार्दन’ हे तत्त्व आपल्या कामाचा एक मूलाधार मानले आहे.

देह्यामधे आत्मा असतो । देहे पूजिता आत्मा तोषतो ।

देहे पीडिता आत्मा क्षोभतो । प्रत्यक्ष आता ।।

देह्यावेगळी पूजा पावेना । देह्याविण पूजा फावेना ।

जनी जनार्दन म्हणोनि जना । संतुष्ट करावे ।।

— दासबोध १८.४.३४,३५.