आपण जिद्दीने कामाला लागतो तेव्हा ‘करुच करु‘ किंवा ‘करुन दाखवूच’ यांपैकी एक भावना आपल्या मनात असते. या जिद्दीचा जन्म कशात आहे हे शोधू लागलो की त्यातला मोठा फरक जाणवू लागतो.
करुच करु आणि करुन दाखवूच
या महिन्यात छात्र प्रबोधनच्या उपक्रम केंद्रांना संचालक भेटीचे कार्यक्रम झाले. शेवटची भेट डोंबिवलीला होती. तिथून पुण्याला परतण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर गेलो होतो. तिथे फलाटावरच्या सूचना पाहताना एके ठिकाणी ईशान्येकडे जाणाऱ्या गाड्या व आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या गाड्या अशी पाटी दिसली. स्थानकावर समांतर व शेजारी असणारे रूळ झपाट्याने एकमेकांपासून दूर होत भारताच्या दोन टोकांपर्यंत जातात. आधी फरक अगदी सूक्ष्म पण तोच वाढत जम्मू तावी, तिनसुखिया आणि कन्याकुमारी यांच्यामधल्या अंतराएवढा वाढत जातो.
आपणच आपल्या कामाचे परीक्षण करताना कधीकधी काही बारीक गोष्टी लक्षात येतात. फरक एवढा लहान असतो की एरवी आपण फार विचार करत नाही.
आपण जिद्दीने कामाला लागतो तेव्हा ‘करुच करु’ किंवा ‘करुन दाखवूच’ यांपैकी एक भावना आपल्या मनात असते. वर वर पाहिले तर त्यात फरक अगदी थोडा. पण मनात खोलवर जाऊन या जिद्दीचा जन्म कशात आहे हे शोधू लागलो की त्यातला मोठा फरक जाणवू लागतो.
आपुलाचि वाद आपणासी
विद्यावाचस्पतीचा अभ्यास करताना मला एक प्राध्यापक होते. त्यांचे नाव डॉ. रेजिनाल्ड मिचेल. त्यांना स्वतःशीच मोठ्याने बोलत चालण्याची सवय होती ‘Come on Reg. you are being lazy’, ‘Reg, you are not upto your mark’, ‘Reg, why not try again?’ ही वाक्ये त्यांच्या मागून-पुढून चालताना अनेक वेळा कानावर पडायची. रेज् हे रेजिनाल्डचे लघुरूप. ‘तुझा आळस जरा वाढलाय्’, ‘तू करु शकतोस तसे काम करत नाहीस’, ‘पुन्हा एकदा करुन पहा’ असे स्वतःलाच ते जाता येता सांगायचे. ‘माझ्या मनातल्या चांगल्या, मोठ्या महत्त्वाच्या, उत्तम कामासारखे काम मला प्रत्यक्ष केले पाहिजे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही’. अशी ज्यांची मनःस्थिती असते ते ‘करीनच करीन’, ‘जाईनच जाईन’, अशी भाषा बोलतात. ‘जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाउच जाउ’ ही घोषणा अशा मनःस्थितीतून येते. तिथे जग काय म्हणते आहे, याच्यापेक्षा मला काय पाहिजे, हे महत्त्वाचे असते. सत्कार्याच्या बाबतीत आपली कामे ‘करूच करू’ या जिद्दीतून होणे चांगले आहे.
‘माझ्या मनातल्या चांगल्या, मोठ्या महत्त्वाच्या, उत्तम कामासारखे काम मला प्रत्यक्ष केले पाहिजे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही’. अशी ज्यांची मनःस्थिती असते ते ‘करीनच करीन’, ‘जाईनच जाईन’, अशी भाषा बोलतात.
इतरांच्या तालावर काम
‘आम्ही एवढा चांगला कार्यक्रम केला पण पत्रकार आलेच नाहीत’, ‘आम्ही सगळी बातमी तयार करून छायाचित्रांसह पाठवली पण वर्तमानपत्रांनी छापलेच नाही’. असे उद्गार बऱ्याच वेळा आपल्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळतात. अर्थातच पत्रकारांनी यावे आणि आपली बातमी छापावी यासाठीच्या आपल्या योजनेत काहीतरी कमी पडते आहे. पण असेही ऐकायला मिळते ‘आपण काम केले, नाव मात्र त्या संस्थेचे आले’. ‘आमचा पहिला क्रमांक असून आमचे नाव नाही. त्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला तर छायाचित्र छापून आले’, ‘आपण एका प्रकारचे एवढे मोठे काम केले तर कोणी दखलही घेत नाही. त्यांनी दुसऱ्या प्रकारचे एवढेसे काम केले तर त्याचे किती कौतुक होत आहे’, आपल्या बातम्या आल्या नाहीत याची खंत आणि दुसऱ्यांच्या बातम्या आल्या याची असूया, या दोन्ही गोष्टी साचत राहिल्या की त्यांचा परिणाम म्हणून कधीतरी अचानक सगळ्यांच्या लक्षात येईल असे काहीतरी ‘करून दाखवूच’ असे वाटायला लागते. काहीच न करण्यापेक्षा हे बरे. पण इथे आपले करणे इतरांनी टाळ्या वाजवण्यावर अवलंबून राहते.
आधी केले मग सांगितले
अनेकांना कामाला लावायचे आहे तेव्हा करून दाखवलेच पाहिजे. करायचे ते शाबासकी मिळावी म्हणून नाही, तर कसे करायचे हे इतरांना कळावे म्हणून. पण ज्यांचा मुख्य सूर ‘करूच करू’ असा आहे त्यांनाच इतरांना सांगायचा अधिकार मिळतो. ज्यांना टाळ्यांच्या अपेक्षेने ‘करून दाखवूच’ म्हणावेसे वाटते. त्यांना स्वतःला काही करायचे नसते हे लक्षात ठेवले पाहिजे.
खंत आणि असूया, या दोन्ही गोष्टी साचत राहिल्या की कधीतरी अचानक सगळ्यांच्या लक्षात येईल असे काहीतरी ‘करून दाखवूच’ असे वाटायला लागते.