घडविता, मिळविता, विकसावे – ६. निवेदन भाव

आपल्या कामाची नोंद राहते म्हणून, वाचणारा कामात सुधारणा सुचवतो म्हणून, आपल्याच प्रगतीचा आलेख कळतो म्हणून, आपण संचालकांचा एक हात आहोत म्हणून, स्वकर्मकुसुम म्हणून, अशी निवेदन लिहिण्याची माझी भूमिका क्रमाने बदलत गेली.

निवेदन याचा मूळ अर्थ आहे समर्पण. वृत्तनिवेदन याचा अर्थ आहे वृत्त सांगण्याच्या निमित्ताने केलेल्या कामाचे समर्पण करणे. दैनंदिन काम करताना आपण आपल्या वरिष्ठांना कामाचे निवेदन करत असतो. तिथे निवेदन याचा अर्थ माहिती देणे असा असतो.

माझ्या अंदाजाप्रमाणे सलग काही वर्षे नियमितपणे लेखी निवेदन करणारे कार्यकर्ते प्रबोधिनीमध्ये सुमारे पंचवीस ते तीस असतील. उत्साहाने लेखी निवेदन करण्याचा प्रत्येकाचा काही कालखंड असतो. मी सुमारे दहा वर्षे लेखी साप्ताहिक निवेदन केले असेल. त्यांपैकी दोन वर्षे तर दैनंदिन वृत्त-निवेदन लिहिल्याचे आठवले.

साप्ताहिक निवेदन लिहिण्याला माझी सुरुवात कै. आप्पांनी समोर बसवून लिहून घेण्यापासून झाली. नंतर आपल्या कामाची नोंद राहते म्हणून, वाचणारा कामात सुधारणा सुचवतो म्हणून, आपल्याच प्रगतीचा आलेख कळतो म्हणून, आपण संचालकांचा एक हात आहोत म्हणून, स्वकर्मकुसुम म्हणून, अशी निवेदन लिहिण्याची माझी भूमिका क्रमाने बदलत गेली. संचालक म्हणून काम करू लागल्यानंतर साप्ताहिक निवेदन लिहिणे थांबले. पण दैनंदिनी लेखनाच्या रूपाने आत्मनिवेदन सुरू झाले. दैनंदिनी लेखनही प्रबोधिनीत अनेकजण करतात. परंतु फक्त आत्मनिवेदन पुरेसे नाही. परस्पर-निवेदन व समाजाला निवेदनही हवे. त्रैमासिक वृत्त वेळेवर निघावे असा प्रयत्न मी करतो, कारण माझ्या दृष्टीने ते प्रबोधिनीचे समाजाला निवेदन आहे. मासिक वृत्ताचा प्रयोगही परस्पर निवेदन म्हणून चालवला.

‘आमच्या कामात काय विशेष आहे ?’ अशा विनाकारण नम्रतेमुळे किंवा नम्रतेच्या बुरख्याखाली वृत्त लेखनाचा आळस झाकला जातो.

कामाचे नावीन्य संपले की त्याचे वृत्त लिहिण्याचा उत्साह संपतो. ‘आमच्या कामात काय विशेष आहे?’ अशा विनाकारण नम्रतेमुळे किंवा नम्रतेच्या बुरख्याखाली वृत्त-लेखनाचा आळस झाकला जातो. ‘ज्यांना निवेदन करायचे ते काम पाहात असतातच. मग कशाला वृत्त लिहायचे?’ असाही युक्तिवाद केला जातो. ‘आमचे काम इतरांना कळण्यासारखे नाही’ म्हणूनही आपण बरेच काम लोकांना सांगत नाही. खूप काळ वृत्त लिहीत गेल्यावर नेमके तोंडी वृत्त सांगणे जमू लागते. मग लिहिणे थांबते. वृत्त निवेदनाच्या प्रयोगाचा हा टप्पा थांबवताना वृत्तनिवेदन, मग वृत्त-वाचन, त्यातून गुणग्रहण ही एक साखळी आहे याकडे लक्ष वेधू इच्छितो. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की परस्परांचे गुणग्रहण ही संघटनेची पहिली पायरी आहे. आपल्याला तर परस्परांचे गुणग्रहण आणि त्यापुढे गुणवर्धनही करायचे आहे.