आमचे व्यवहार्य आदर्श – ४. हिंदुभूमी आणि मी

मा. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या कष्टाचे चीज तर झालेच, परंतु या देशाच्या गौरवातच माझा गौरव आहे याचा सहज साक्षात्कार कोट्यवधी भारतीयांना झाला.

दि.११ आणि १३ मे या दोन दिवशी भारतीय अणुऊर्जा आयोगाने राजस्थानात पोखरण येथे अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या आणि देशातले वातावरण एकदम बदलून गेले, ‘गर्व से कहो हम हिंदू है।’ हे न सांगताही अनेकांना एकदम समजले. केवळ भारतातीलच नव्हे तर भारताबाहेर काम करणाऱ्या भारतीयांनाही मूठभर मांस चढले. पहिल्या दिवशी झालेल्या चाचण्यांमध्ये, ‘एका वेळी तीन चाचण्या झाल्या’, हायड्रोजन बॉम्बसाठी आवश्यक चाचणी झाली’, ‘अतिशय गुप्तपणे सर्व चाचण्या झाल्या’, असे बरेच विशेष होते. दुसऱ्या दिवशी भारतीयांच्या अनुकूल आणि परकीयांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया कळायला लागल्या. अमेरिका, जर्मनी, जपान यांनी आर्थिक निर्बंध जाहीर केले. असे असूनही पुन्हा तिसऱ्या दिवशी आणखी दोन चाचण्या झाल्या. आमचा देश इतरांच्या धमक्यांची फिकीर करत नाही हे लक्षात येताच पहिल्या दिवशीच्या चाचण्यांमुळे वाटलेला अभिमान दुणावला.

नेमकी कृती नेहमीच अतिशय प्रभावी असते. मा. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे या आण्विक चाचण्यांमध्ये सहभागी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या कष्टाचे चीज तर झालेच, परंतु या देशाच्या गौरवातच माझा गौरव आहे याचा सहज साक्षात्कार कोट्यवधी भारतीयांना झाला. कोणालाही साऱ्या भारतीयांना झालेल्या आनंदापासून वेगळे राहाता आले नाही. हिंदुस्थानाच्या अशा गौरवाच्या प्रसंगी ज्यांना आपण या हिंदू समाजाचे अभिन्न भाग आहोत हे जाणवते, ते आज भारतात असोत किंवा भारताबाहेर जन्मलेले असोत, ते सारे हिंदूच आहेत. अशा प्रसंगी कळते की हिंदुत्व ही अनुभवण्याची हिंदुत्व ही अनुभवण्याची गोष्ट आहे, व्याख्या करण्याची किंवा चर्चा करण्याची गोष्ट नाही.

‘सगळ्या जगाने आर्थिक निर्बध घातले तरी आम्ही ताठ राहू’ हे म्हणायची हिंमत सर्वसामान्य भारतीयांना मा. पंतप्रधानांच्या या एका निर्णयामुळे आली आहे.

हिंदू समाजाची मान अभिमानाने ताठ झाल्याचा अनुभव आल्यावरच, ही मान ताठ राहण्यासाठी ‘पडेल तो त्रास सोसू’, हेसुद्धा कोणी न सांगताच मनात येते. ‘सगळ्या जगाने आर्थिक निर्बंध घातले तरी आम्ही ताठ राहू’ हे म्हणायची हिंमत सर्वसामान्य भारतीयांना मा. पंतप्रधानांच्या या एका निर्णयामुळे आली आहे. या चाचण्या सफल व्हाव्यात म्हणून जे संशोधन, जी पूर्वतयारी गेली अनेक वर्षे हजारो- जणांनी केली, मा. पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला आणि ज्यांनी या निर्णयाची कार्यवाही अचूकतेने आणि गुप्तपणे केली त्या सर्वांचीच ही कृती ‘राष्ट्रार्थ’ आहे, ‘भव्य’ आहे आणि ‘पराक्रमाची’ ही आहे. परकीय मदत न घेता स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कुशलतेच्या बळावर ही ‘कृती’ करून दाखवू अशा ‘ईर्षे’ ने या सर्वांनी या अणुचाचण्या पार पाडल्या. जी प्रार्थना आपण नित्य म्हणतो, जसे काम आम्ही करायची इच्छा बाळगतो, त्या कामाचा जणू एक वस्तुपाठच या चाचण्यांच्या निमित्ताने बघायला मिळाला. आमच्या प्रार्थनेतील ओळींचा अर्थच जणू आकार घेऊन समोर उभा राहिला.

या देशातील लोकांच्या गौरवात माझा गौरव, या सर्वांच्या उत्कर्षात माझा उत्कर्ष आणि यांच्या अडचणी या माझ्याच अडचणी असा अनुभव आज सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रसंगातून आला. उद्या नित्याच्या कृतीतून हा राष्ट्रीय अभिमान सतत जागता ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.