हिंदुत्वातील व्यक्तिसापेक्षता आणि स्थिर तत्त्व

हिंदुत्वातील व्यक्तिसापेक्षता आणि स्थिर तत्त्व

भारताच्या पूर्व आणि पश्चिम टोकांबर सूर्योदय वेगवेगळ्या वेळी दिसतो. कन्याकुमारी आणि लडाखमधील लेहमधून ध्रुवतारा आकाशात वेगवेगळ्या उंचीवर दिसतो. पण म्हणून सूर्य आणि ध्रुव तारा बदलत नाही. तशी आपल्या प्रत्येकाची जीवनदृष्टी थोडी थोडी वेगळी असेल. पण आपल्या सर्वांच्या जीवनदृष्टीची तुलना केली, तर त्यातला समान भाग बराच जास्ती आहे. तीच आपल्या हिंदू राष्ट्राची जीवनदृष्टी असेल. एका बाक्यात सांगायचे झाले, तर हिंदू जीवनदृष्टी म्हणजे आत्म्याचा अनुभव. तो सर्व लोकांना सर्व काळात, सर्व स्थळी एकच येतो. पण त्याचे प्रकटीकरण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या जागी वेगळे होते. म्हणूनच सारी मानवजात एक. पण राष्ट्र अनेक आहेत. त्यांचे राष्ट्रीत्व ही वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होते.

भारताने सगळ्या जगासमोर उदाहरण म्हणून राहायचे असेल, तर भारताला जगाशी संबंध तोडून चालणार नाही. प्राचीन इतिहासातील तर आपल्याला काही माहिती नाही, पण इ. स. ६०० नंतर इ. स. १००० पर्यंत सरासरी दर दहा वर्षांनी भारतातून बौद्ध भिक्षूचा एक संघ चीनमध्ये जायचा, अशी इतिहासात नोंद आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच सगळा पूर्व आशिया आणि आग्रेय आशिया भारतीयांनी आपल्या संपर्कात ठेवला होता. नंतर एक हजार वर्ष हा संपर्क थांबला. पारतंत्र्याबरोबरच जगाविषयीचे अज्ञान भारतात बाढत गेले. विवेकानंदांपासून भारतीयांनी पुन्हा भारताबाहेर जाण्याची पद्धत सुरू झाली.

गमू पंथ आनंत या राघवाचा

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात दोन-तीन गावांमध्ये गेलो होतो. रात्रीचा मुक्काम खुटवासा नावाच्या एका गावात होता. उन्हाळा आणि भारनियमन असे दोन्ही असल्याने एका घराच्या अंगणातच झोपलो होतो. पहाटे गावातल्या प्रभातफेरीच्या आवाजाने जाग आली, पडल्या पडल्याच शब्द लक्ष देऊन ऐकू लागलो. ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’ ही परिचित धून चालू आहे हे ओळखू आले. चालही ओळखीची वाटली. गणेशोत्सवात आरतीनंतर भरभर म्हणून ही धून उरकतो तशी मात्र ती नव्हती. प्रभातफेरीतले गावकरी ती धून आळवून आळवून म्हणत होते. त्याच पद्धतीने आळवून म्हटलेली ही धून अठ्ठावीस वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्या खुटवासा पासून सरळ रेषेत हजार-बाराशे किलोमीटर दूर असलेल्या आंध्र प्रदेशातल्या समुद्र किनाऱ्याजवळच्या इस्माईलबेगपेट गावामध्ये रात्रीच्या भजनात ऐकली होती. आंध्र प्रदेशात ऐकली तेव्हा धून ओळखीची होती, चाल वेगळी होती. मध्यप्रदेशात धून आणि चाल दोन्ही ओळखीची होती. दोन राज्यांच्या ग्रामीण भागात येट संपर्काचे काही साधन नसताना व कारण नसताना हा समान धागा कोठून आला ? हा समान धागा जाणवणे म्हणजे भारताचा प्राण कशात आहे ते ओळखणे.

वरवरचे वेगळेपण आणि सारखेपणा

गेला दीड महिना छात्र प्रबोधनच्या तपपूर्ती निमित्तचा शेवटचा कार्यक्रम ‘ईशान्य भारत अभ्यास व मैत्री’ दौरा झाला. ईशान्येकडच्या सात राज्यांमध्ये जवळ जवळ दोनशे जण गेले होते. या सातही राज्यांमध्ये हवामान, भाषा, कपड्यांची रंगसंगती, घरांची बांधणी, सण-उत्सव यांच्यात सर्व प्रकारची विविधता आहे. आणि या सातही राज्यांमधल्या या सर्व गोष्टी पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या आहेत. वेगळेपणा शोधू गेलो की अनेक ठिकाणी वेगळेपण दिसायला लागते. पण हा मैत्री दौरा होता. अभ्यास विविधतेचा वेगळेपणाचा केला तरी मैत्री जोडायला सारखेपणा शोधावा लागतो. कधी हा सारखेपणा छंद आणि आवडी-निवडींमध्ये सापडतो. पण नवीन गोष्टींबाबत कुतूहल, आपल्या गोष्टींचा अभिमान, वेगळेपणा समजून घेण्याची व स्वीकारण्याची तयारी, आतिथ्य करण्याची प्रवृत्ती, सुख-दुःखांच्या गुजगोष्टी करणे या मानवी स्वभावातील समान गोष्टीही वरवरच्या वेगळेपणाखाली सापडतात. त्यामुळेच मैत्री करणे शक्य होते. अनेक वेळा वरवरचे सारखेपण सापडते ते पुरते. त्या आधारावरच वर्षानुवर्षे मैत्रीचा व्यवहार आणि पत्र मैत्री, मेटी आणि परत भेटी, सहभोजने आणि सहप्रवास चालू राहतो.

खोलवरचे वेगळेपण आणि सारखेपण

मित्र, सखा, सुहृद, दोस्त असे मित्रांचे अनेक प्रकार लोक सांगतात, आनंद साजरा करण्यासाठीचे मित्र आणि अडचणीत धावून येणारे मित्र, दुःख वाटून घेणारे मित्र आणि प्रगतीची संधी दाखवून देणारे मित्र, असे वेगवेगळ्या पद्धतीने वागणारे मित्र भेटतात. हा फरक पडतो तो जीवनमूल्ये, जीबनादर्श, ध्येय आणि प्राधान्ये यातील वेगळेपणामुळे. दोन धार्मिक वृत्तीचे मित्र एकाला धर्मप्रचाराची हौस असते, दुसऱ्याला स्वतःच्या चोख धर्माचरणाची काळजी असते. दोन सचोटीने व्यवहार करणारे मित्र एकाला इतरांनी सचोटीने वागावे म्हणून धडपडावेसे वाटते, दुसऱ्याला आपला व्यवहार संपवून कुटुंबात वेळ घालवावासा वाटतो. दोन भटके मित्र एक भटकत असताना समाजाचे निरीक्षण करत असतो दुसरा निसर्गाचे निरीक्षण करत असतो. दोन चळवळे मित्र – एकाला अन्यायाला वाचा फोडाविशी वाटते, दुसऱ्याला थेट कृतीने अन्यायाविरुद्ध झगडावेसे वाटते. या बाहेर दिसणाऱ्या वेगळेपणाचे चितन करत राहिले तर टिळक-आगरकर, गांधीजी सावरकर, नेताजी-नेहरू यांच्यामध्ये परस्परांविषयी उदासीनतेपासून स्पर्धा-संघर्षापर्यंत विविध स्तरांवरचे विरोधी भाव प्रकट झाले तसे होते. आतील सारखेपणा लक्षात आला की परिस्थितीमुळे विरोधी पवित्रे घ्यावे लागले तरी परस्पर सद्भाव कायम राहतो. हेतूची शुद्धता ओळखता येणे, मन स्वाथनि संकुचित झालेले नसून व्यापक व सर्वसमावेशक झालेले ओळखता येणे, म्हणजे खोलवरचे सारखेपण ओळखता येणे.

भारताचा प्राण आध्यात्मिकतेत आहे

समाजाचे निरीक्षण करत भारत भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंदाना भारताच्या एकात्मतेचे, दीर्घ परंपरेचे सूत्र इथल्या आध्यात्मिकतेत सापडले. भारताच्या विविध राज्यांमधल्या ग्रामीण भागात हिंडत असताना हे सूत्र आपल्या नजरेला सापडते आहे का असा माझा शोध चालू असतो. देवाच्या भजनात सहज भान हरपून जाणं हे सूत्र बारा-पंधरा राज्यांमध्ये तर नक्की सापडले आहे. वेगवेगळ्या राज्यांतील संतांची चरित्रे व संतांच्या रचनाही अनेक राज्यांमध्ये पोचलेल्या आढळतात. आणि त्या संत चरित्रांतील व संतांच्या रचनांमधील समान सूत्रांचा शोध घेऊ गेलो की ‘गमू पंथ आनंत या राघवाचा’ हे सूत्र गवसते. विवेकानंदांना भारताचा प्राण धर्मात, आध्यात्मिकतेत आहे असे म्हणताना हेच सूत्र अभिप्रेत असेल का ?

शोधा म्हणजे सापडेल

‘विविधतेतील एकता शोधणे’ हा वरवरच्या समानतेचा शोध आहे. ‘एकाची बिबिध रूपे पाहणे’ हा खोलवरच्या समानतेचा शोध आहे. मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशात, पश्चिमवाहिनी नर्मदेच्या खोऱ्यात आणि पूर्व वाहिनी कृष्णेच्या मुखाशी, समुद्र किनारी, एकच धून एकाच चालीत वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या काळी, बेगवेगळ्या लोकांच्या तोंडून ऐकायला मिळणे म्हणजे भारताच्या एकाच प्राणाची विविध रूपे पाहायला मिळाली असे मला वाटते.