धर्म व राष्ट्र

प्रस्तावना

या अंकाचा विषय ‌‘धर्म-निरपेक्षता आणि आपण‌’ असा आहे. सध्या ही भाषा रूढ असली तरी ‌‘धर्मनिरपेक्षता‌’ म्हणजे ‌‘धार्मिक संप्रदायनिरपेक्षता‌’ आणि ‌‘आपण‌’ म्हणजे ‌‘आपले सरकार‌’ असा मर्यादित अर्थच संपादकांना अपेक्षित असावा असे मी गृहीत धरतो. या लेखाचा विषय ‌‘धर्म व राष्ट्र‌’ असा आहे. ‌‘धर्म व राष्ट्र‌’ या विषयावर लिहिताना धर्म म्हणजे शीख, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिश्चन असे ‌‘धार्मिक संप्रदाय‌’ व ‌‘राष्ट्र‌’ म्हणजे ‌‘राष्ट्राचे सरकार‌’ असे त्या शब्दांचे संकुचित अर्थ मी धरलेले नाहीत. तसेच धर्म व राष्ट्राचा जागतिक पातळीवरील विचार एवढ्या व्यापक विषयावर ही मी लिहिणार नाही. हिंदू धर्म व हिंदू राष्ट्र या विषयावर प्रबोधिनीमध्ये जे चिंतन झाले आहे त्यावरच लक्ष केंद्रित करून मी त्या मर्यादित कक्षेमध्ये लिहित आहे.

‌‘श्री माताजी – श्री अरविंद काय म्हणाले ?‌’ हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित झाले. ते प्रबोधिनीच्या संस्थापकांचे शेवटचे पुस्तक. त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे “हिंदूधर्मप्रणीत हिंदूसमाज म्हणजेच आधुनिक जगतात ज्याला राष्ट्र म्हणतात, ते हे हिंदूराष्ट्र आहे हे प्रथम उद्घोषित केले स्वामी विवेकानंद यांनी. जो अध्यात्मशून्य आहे तो हिंदूच नव्हे अशी त्यांची व्याख्या होती.”

याच पुस्तकामध्ये श्री अरविंदांच्या उत्तरपाडा येथे १९०९ साली झालेल्या भाषणातील एक उतारा छापला आहे. त्यात श्री अरवदांनी म्हटले आहे  “या (सनातन) धर्माचे नाव हिंदू धर्म आहे कारण हिंदू राष्ट्राने तो टिकवून ठेवला आहे. …… हे हिंदूराष्ट्र सनातन धर्माबरोबर जन्माला आले; त्याच्याच बरोबर चालते आणि त्याच्याचबरोबर वाढते. जेव्हा धर्माचा अपकर्ष होतो तेव्हा हे राष्ट्रही अपकर्षाप्रत जाते, आणि जर या सनातन धर्माचा नाश होणे शक्य असेल, तर सनातन धर्माबरोबर हे राष्ट्रही नाशाप्रत जाईल. सनातनधर्म म्हणजेच राष्ट्रीयत्व हा संदेश मला आपल्याला विशद करायचा आहे.”

स्वामी विवेकानंद व श्री अरविंद यांनी मांडलेले धर्म व राष्ट्रसंबंधी विचार व्यापक आहेत. परंतु जगात या शब्दांचा जो अर्थ घेतला जातो, त्यापेक्षा ते विचार अधिक मूलभूत आहेत. प्रबोधिनीत विवेकानंद व अरवदांना अभिप्रेत असलेल्या अर्थानेच धर्म व राष्ट्र हे शब्द वापरले गेले आहेत. राष्ट्राचे सरकार हे राष्ट्रीय जीवनाचे एक अंग असते. सरकार धार्मिक संप्रदायनिरपेक्ष असलेच पाहिजे. परंतु सरकार म्हणजे राष्ट्र नव्हे व धार्मिक संप्रदाय म्हणजे धर्म नव्हे. विवेकानंद आणि अरविंद ज्या भारतीय आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधी आहेत त्या परंपरेला अनुसरूनच धर्म व राष्ट्राचा मूलभूत व व्यापक अर्थ समजून घेऊन प्रबोधिनीमध्ये विचार करायला पाहिजे.

धर्माची चार अंगे :

समाजाचे जीवन समाजातल्या विविध व्यवस्थांमुळे सुरळीतपणे चालते. शासन किंवा सरकार ही त्यापैकी एक व्यवस्था. न्यायालये, बाजारपेठा, बँका, वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, संशोधन व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, या व अशासारख्या अनेक व्यवस्था समाजात असतात. यातून समाजाची जीवनपद्धती बनते.

या सर्व व्यवस्था चालू राहायच्या म्हणजे त्यातले योग्य-अयोग्य, बरोबर-चूक, चांगले-वाईट, उत्कृष्ट-निकृष्ट, हवेसे-नकोसे, हितकारक-अहितकारक, फायद्याचे-तोट्याचे काय ते ठरवावे लागते. हे ठरविणे रूढीने, परंपरेने, कायद्याने, व्यक्तिगत व समूहाच्या पसंतीने होते. हे सर्व ठरत असताना समाजातील बहुसंख्य आणि प्रभावी लोकांच्या मनात हे ठरविण्याचे किंवा निवडण्याचे अनेक निकष असतात. या सगळ्या निकषांनी मिळून  समाजाचे समूहमन बनलेले असते.

समाजाचे समूहमन अनेक पिढ्यांपासून घडत आलेले असते. प्रत्येक पिढीच्या अनुभवांमधून त्यात बदल होत असतात. कोणत्या अनुभवांचा परिणाम किती व्हायचा हे त्या समाजाचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन म्हणजे समाजाची जीवनदृष्टी ठरवत असते. ही जीवनदृष्टीच त्या त्या समाजाचे ध्येय ही घडवत असते.  समाजाची जीवनपद्धती, समाजाचे समूहमन, समाजाची जीवनदृष्टी आणि समाजाचे ध्येय मिळून धर्म होतो अशी भारतातील पूर्वीपासूनची संकल्पना आहे.

प्रत्येक देशाचा समाज आपल्या जीवनदृष्टीतून आपले ध्येय निश्चित करत असतो. बहुतेक सगळ्या समाजांचे ध्येय अधिकाधिक समृद्ध व सुरक्षित जीवन जगणे असे असते. आधुनिक राष्ट्रांपैकी फ्रान्सचे ध्येय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असे आहे. तर अमेरिकेचे ध्येय स्वातंत्र्य, समता आणि सुखाचा शोध (pursuit of happiness) असे आहे.

भारतीय समाजाची जीवनदृष्टी म्हणजेच हिंदू जीवनदृष्टी काही मूलभूत श्रद्धांमुळे विकसित झाली आहे. १) मीपणाच्या किंवा स्वत:च्या असण्याच्या जाणिवेच्या खरेपणावर श्रद्धा, २) जीवसृष्टीच्या ऐक्यावर श्रद्धा, ३) सजीव-निर्जीवांच्या ऐक्यावर श्रद्धा, ४) जन्म-मृत्यूच्या पलीकडील अस्तित्वावर श्रद्धा आणि ५) स्वत:ची इच्छाशक्ती व सगळ्या अस्तित्वाची इच्छाशक्ती यांच्या ऐक्यावर श्रद्धा, या पाच श्रद्धांनी मिळून भारतीयांची आध्यात्मिक जीवनदृष्टी बनलेली आहे, असे विनोबांनी म्हटले आहे. हिंदूच्या या आध्यात्मिक जीवनदृष्टीतून हिंदू समाजाचे जीवनध्येयही ठरले आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वत:मधील पूर्णत्वाचे व्यक्तिगत व सामाजिक जीवनामध्ये प्रकटीकरण करणे हे ते ध्येय आहे.

दोन पर्याय  :  जीवनपद्धतीला प्राधान्य कवा जीवनदृष्टीला प्राधान्य

आधुनिक काळात धर्माच्या चार अंगांपैकी जीवनपद्धती जास्त महत्त्वाची मानली गेली. शासन हा जीवनपद्धतीचा भाग आहे, तर धार्मिक संप्रदायांशी एकनिष्ठ राहणे हा समूहमनाचा भाग आहे. जीवनपद्धती महत्त्वाची मानली की समूहमनाला तिच्यापेक्षा कमी महत्त्व आपोआपच येते. त्यामुळे जीवनपद्धतीचा भाग असलेले शासन जास्त महत्त्वाचे व समूहमनाचा भाग असलेले संप्रदाय कमी महत्त्वाचे हे ही ठरून जाते. म्हणून आधुनिक काळात शासन धार्मिक  संप्रदायनिरपेक्ष (म्हणजे धार्मिक संप्रदायांनी प्रभावित न होणारे) असले पाहिजे ही कल्पना आली.

प्राचीन काळापासून भारतात जीवनपद्धतीहून कवा समूहमनाहून जीवनदृष्टी जास्त महत्त्वाची मानली गेली आहे. ‌‘एकं सत्‌‍ विप्राः बहुधा वदन्ति‌’ म्हणजे ‌‘सत्य एक आहे, जाणते लोक त्याचे वेगवेगळ्या नावाने वर्णन करतात‌’अशी सनातन धर्माची जीवनदृष्टी आहे. या जीवनदृष्टीला अनुकूल असे समूहमन घडविण्याचे काम भारतात अनेक पिढ्या झाले. त्यामुळे ‌‘प्रत्येकाने आपापल्या संप्रदायाशी एकनिष्ठ राहून इतरांच्या संप्रदायांचा मनमोकळा स्वीकार करायला हवा‌’ असे समूहमन घडत गेले. भारतीय शासन हे भारतीय समूहमनातून घडले असल्यामुळे शासन सर्व संप्रदायांचा सारखाच आदर करणारे असले पाहिजे हा आग्रह त्यातून आला.

‌‘सर्व संप्रदायांचा सारखाच आदर करणारे शासन‌’ ही विधायक संकल्पना हिंदू कवा भारतीय कवा सनातन जीवनदृष्टीतून आली. तर ‌‘कोणत्याच संप्रदायाने प्रभावित न होणारे शासन‌’ ही निषेधात्मक संकल्पना आधुनिक जीवनपद्धतीच्या आकर्षणातून स्वीकारली गेली.

धर्म ही व्यापक संकल्पना न समजल्यामुळे शासन आणि संप्रदायनिरपेक्षता याबाबत भ्रामक समजुती तयार होतात. त्याचप्रमाणे राष्ट्र ही व्यापक संकल्पना न समजल्यामुळे सरकार कवा शासन कवा राज्य-व्यवस्था म्हणजेच राष्ट्र असाही भ्रम होतो.

समान ध्येयाने बांधलेला समाज म्हणजे राष्ट्र

जीवनपद्धती, समूहमन, जीवनदृष्टी व सामूहिक ध्येय मिळून धर्म होतो हे वर म्हटलेच आहे. खरे तर धर्माची ही चारी अंगे समाजानेच अनेक पिढ्यांच्या काळात निर्माण केलेली असतात. परंतु कालांतराने सामूहिक ध्येयासाठी समाजाचे अस्तित्व ही भावना समूहमनात पक्की होते. म्हणजेच समाजाचे राष्ट्र बनते.

हिंदू समाजाचे ध्येय प्रत्येक मनुष्यातले पूर्णत्व म्हणजेच ईश्वरत्व प्रकट करणे हे आहे. ‌‘श्री माताजी – श्री अरविंद काय म्हणाले ?‌’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच प्रबोधिनीच्या संस्थापकांनी म्हटले आहे, ‌‘हिंदूराष्ट्राने स्वतःमध्ये अधिकाधिक ईश्वरत्व विकसित करीत सबंध मानवतेत ईश्वरत्व अवतरविण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, असा श्री अरविंदांचा आग्रह होता.‌’ हे ईश्वरत्व विकसित करणे कवा अवतरविणे कवा प्रकट करणे म्हणजेच मानवतेचे कल्याण हे हिंदूराष्ट्राचे ध्येय आहे. समृद्ध जीवन, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सुखाचा शोध या इतर राष्ट्रांच्या ध्येयांपेक्षा ते अधिक व्यापक व अधिक दूरवरचे आहे.

प्रत्येक व्यक्तीत आणि चराचर सृष्टीत ईश्वरत्व आहे ही जीवनदृष्टी व ते ईश्वरत्व प्रकट करायचे आहे हे ध्येय, म्हणजे सनातन धर्म किंवा हिंदूधर्म किंवा भारतीय राष्ट्रधर्माचा कायस्वरूपी भाग. त्याबरोबर भारतीय समाजाचे समूहमन आणि जीवनपद्धती हा भारतीय राष्ट्रधर्माचा भाग दर पिढीमध्ये काही प्रमाणात बदलत जाणारा आहे. हे बदल दोन प्रकारचे असतात.

बदलांचा पहिला प्रकार इतर राष्ट्रांशी जुळवून घेण्याचा असतो. संगणक उद्योगाची वाढ, पर्यावरणाविषयी जागरूकता, जागतिक व्यापार संघटनेत सहभाग, चांद्रमोहिमेची योजना या सगळ्यांमुळे भारतीय समाजाची जीवनपद्धतीही बदलते आहे आणि समूहमनातील यशाच्या आणि उत्तमतेच्या कल्पनाही बदलत आहे.

हिंदू जीवनदृष्टीचे पुनःस्मरण होऊन किंवा तिचे नित्य भान असल्यामुळे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात ईश्वरत्वाचे प्रकटन काही अंशाने वाढते. हे ईश्वरत्वाचे प्रकटन वाढल्यामुळे होणारा बदल म्हणजे दुसऱ्या प्रकारचा बदल. आसन, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद याच्याबद्दलच्या आस्थेतील वाढ; स्त्रिया व मागास जातींमधील व्यक्तीना सन्मानपूर्वक वागणूक व संधी देण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या संख्येतील वाढ; देवस्थानांनी आपली संपत्ती सामाजिक कामांसाठी वापरण्याच्या प्रमाणात वाढ हे सर्व दुसऱ्या प्रकारचे बदल आहेत.

राष्ट्राच्या विकसित शरीराचेही आधुनिक काळात महत्त्व आहे

भारतीय समाजाची जगातील वैशिष्ट्यपूर्ण ओळख भारतीय जीवनदृष्टीमुळे, तिच्यातून विकसित झालेल्या ध्येयामुळे, नित्य नवी रूपे धारण करणाऱ्या जीवनपद्धतीमुळे व ‌‘अतिथिदेवो भव‌’सारख्या समूहमनातील दृढमूल भावनांमुळे तयार झाली आहे. ही चार अंगे हाच भारतीयांचा राष्ट्रधर्म. आधी समाजाने हा धर्म तयार केला. मग समाज या धर्मासाठी जगू लागला. म्हणूनच सुरुवातीला ‌‘हिंदू धर्मप्रणीत हिंदू समाज म्हणजे हिंदू राष्ट्र‌’ असे म्हटले आहे.

इतर राष्ट्रांमध्ये धार्मिक संप्रदायांचे आस्तित्व हे समाजजीवनाचे एक अंग असते. हिंदूराष्ट्राच्या बाबतीत हिंदूधर्म हा त्याचा प्राणच झाला आहे. म्हणूनच ‌‘सनातन धर्माचा म्हणजे हिंदूराष्ट्राने टिकवलेल्या धर्माचा नाश होणे म्हणजे हिंदूराष्ट्राचा नाश होणे‌’, असे श्री अरविंदांनी म्हटले आहे. धर्म हा या राष्ट्राचा प्राण असला तरी इथल्या समाजाच्या समूहमनात व जीवनपद्धतीत समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि विज्ञानातील उत्तमता या संकल्पना रुजायला हव्यात आणि मुळात असलेल्या ईश्वरत्वाचे पैलू म्हणून प्रकट व्हायला हव्यात. देशाची प्रादेशिक अखंडता, सामाजिक ऐक्य, भौतिक समृद्धी, आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढता सहभाग आणि परराष्ट्र संबंधांमधील मुत्सद्देगिरी यातून राष्ट्राचे शरीर घडते. ते घडविण्यात आणि टिकविण्यात, भारतीय समाजाने आजपर्यंत धर्म विकसित करण्यात आणि टिकविण्यात जेवढी जागरूकता व तत्परता दाखविली,  तेवढीच जागरूकता व तत्परता दाखवायला हवी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *