इतरांच्या तुलनेत भारत
तुलना दोन प्रकारांनी करता येते. एकाच प्रकारच्या कामात कोणी कमी, कोणी जास्त काम केले हे बघता येते. जे इतर कोणी करत नाही असे वेगळे काय करतो हे पण बघता येते. पहिल्या तुलनेला ‘प्रमाणाची’ तुलना म्हणता येईल. दुसऱ्या तुलनेला ‘प्रकाराची’तुलना म्हणता येईल. जे मोजता येते त्याची प्रमाणाची तुलना करता येते. लोकसंख्या, उत्पादन, आर्थिक उत्पन्न, जन्मदर, मृत्युदर, विद्यार्थ्यांची पटसंख्या, साक्षरता, शाळेतून गळतीचे प्रमाण, डॉक्टरांची संख्या, रुग्णालयांची आणि त्यातील खाटांची संख्या, लसीकरणाचे प्रमाण, पाणी-वीज रेल्वे-रस्ता-एस्.टी. असलेल्या गावांची संख्या, दूरभाष चलभाष स्वयंचलित वाहने गॅस जोडणी-दूरदर्शन संच यांची एकूण व दरडोई संख्या, असे जे जे मोजता येते ते मोजून त्यात भारताचा इतर देशांच्या तुलनेत क्रमांक कितवा ते पाहता येईल. ही झाली प्रमाणाची तुलना. यातून आपण इतरांच्या किती पुढे किंवा मागे आहोत, ते कळते.
अधिकाधिक क्षणिक सुख
जून महिन्याच्या अखेरीला तीन दिवसांचा प्रबोधक प्रशिक्षण वर्ग झाला. त्यातले एक सत्र ‘विकसित भारताचे स्वप्न’ या विषयावर झाले. या सत्रामध्ये ‘अधिकाधिक क्षणिक सुख’ हा शब्दप्रयोग वापरण्यात आला. माणसाच्या शारीरिक पातळीवरच्या गरजा असोत किंवा मानसिक व सामाजिक पातळीवरच्या गरजा असोत, या गरजा जो देश भागवू शकतो तो विकसित देश अशी कल्पना सर्वत्र रूढ आहे. या सर्व गरजा पूर्ण झाल्यावर काय होते? तर सुख मिळते! ते सुख कसे असते ? तर क्षणिक असते! एकदा सुखाची संवेदना निर्माण झाली की ती संपते व पुन्हा गरज निर्माण होते. पुन्हा सुखाची संवेदना होण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतात. सर्व देशांच्या विकासाची ही अधिकाधिक क्षणिक सुख गोळा करण्याची दिशा आहे. या विकासाच्या रेषेवर भारत कुठे आहे? अजून तो मागे रेंगाळणाऱ्या देशांमध्येच आहे. ही प्रमाणाची तुलना झाली.
विकासाचा वेगळा प्रकार
स्वामी विवेकानंदांनी एकदा असे उद्गार काढले आहेत की, ‘भारताने संत निर्माण करण्याशिवाय गेली शतकानुशतके आणखी काय केले आहे?’ हा प्रश्न अभिमानाने केला आहे, वैतागाने नव्हे. जास्तीत जास्त माणसांना सुखाची साधने मिळावीत हा विकासाचा पहिला प्रकार आहे. सुखी माणसे निर्माण करणे हा विकासाचा दुसरा प्रकार आहे. विवेकानंदांनी ‘अधिकाधिक क्षणिक सुखाला’ ही देशाच्या घडणीमध्ये स्थान दिले आहे. ते म्हणतात, ‘कष्टकरी माणसांना चैनीची साधने मिळू द्या. मगच त्यांना या साधनांनी मिळणारे सुख क्षणिक आहे हे सांगा,’ पण भारताचे हातखंडा कौशल्य (core competence) संत निर्माण करण्याचे आहे. देशाच्या विकासाला ते ही आवश्यक आहे असे मानणे, अशी आपली आजवरची रीत आहे. संत निर्माण करण्याच्या विकासाच्या दिशेची इतर देशांना कल्पनाही करता आलेली नाही. याबाबतीत ‘या सम हाच’ असेच भारताच्या स्थानाचे वर्णन करावे लागेल. ही प्रकाराची तुलना आहे.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
खेळाडू, राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, कलाकार हे सर्व स्थानिक पातळीपासून देशपातळीपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर आपले कर्तृत्व दाखवीत असतात.
संतांच्या बाबतीतही अशी कार्यक्षेत्रांची भांजणी दिसते. काही संतांचा प्रकाश काही कुटुंबांना पोचतो. काहींचा एखाद्या गावाला. पाच-पन्नास गावे ज्यांच्या सल्ल्याने कौटुंबिक व सार्वजनिक निर्णय घेतात असेही संत दिसतात. ज्यांची प्रेरणा जिल्ह्याच्या व राज्याच्या पलीकडे पोचते असेही संत आहेत. देशभर आणि देशोदेशी ज्यांचे विचार व चरित्र पोचले आहे, असेही संत आहेत. प्रत्येक शतकात, प्रत्येक पिढीत, देशाच्या प्रत्येक भागात सर्व स्तरावर संत निर्माण झालेले दिसतात. या अखंड परंपरेलाच मांदियाळी असा शब्द ज्ञानेश्वरांनी योजला आहे. संत ईश्वरनिष्ठ असतात हे त्यांचे वैशिष्ट्य. आपले भारतीयत्व – हिंदुत्व – हिंदुस्थानीपणा Indianness म्हणजेच आपले राष्ट्रीयत्व या ‘ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी’ मध्ये आहे.
सामान्यपणाच्या आधाराने वैशिष्ट्य
निवडणुकीत प्रत्येकाने मत दिले पाहिजे हा सामान्यपणा झाला. त्याच्या आधारावर मत कोणाला द्यायचे हे ठरवण्याची विवेकबुद्धी हे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहे. तसे शरीर-इंद्रिये-मन-बुद्धी यांना जाणवणारी सुखे देणारी साधने व संधी निर्माण करत राहणे हा कोणत्याही देशातील माणसांमध्ये आढळणारा सामान्यपणा आहे. बुद्धीपलीकडच्या ईश्वराला ओळखण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक देशातील काही माणसांमध्ये आढळणारे वैशिष्ट्य आहे. भारतात अशा माणसांची संख्या एकुणात व लोकसंख्येच्या प्रमाणातही जास्त राहिली आहे. म्हणून ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’, निर्माण करणारा देश हे आपले वैशिष्ट्य आपणच ओळखले पाहिजे. इतर देशांना या वैशिष्ट्याची जाणीव नसल्याने विकासाचे प्रमाण मोजताना ते याची दखलही घेणार नाहीत.
समाजाला सामान्य सुखांची साधनांनी मिळणाऱ्या सुखांची गरज असते. अशा क्षणिक सुखांचा पोकळपणा समाजाने प्रत्यक्ष अनुभवला नसतो. राष्ट्र म्हणून आपला विकास व्हायचा असेल तर कोणती सुखे क्षणिक आहेत व कोणती शाश्वत आहेत हे समाजातील प्रत्येकाला स्वतः अनुभव घेऊन ठरवता येईल यासाठी ईश्वरनिष्ठांनीही प्रयत्न केले पाहिजेत. प्रमाणाने मोजता येणारा विकास तर राष्ट्र घडणीसाठी व्हायला हवाच. पण आपले वैशिष्ट्य असलेला विकासाचा प्रकारही अभिमानाने टिकवायला हवा.