ज्ञान प्रबोधिनी : देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना

१. प्रबोधिनीचे वर्णन “संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना” असे करावे हे प्रथम १९९० मध्ये सुचले. त्याचे स्पष्टीकरण आजवर कोणी विचारले नव्हते आणि मी ही केले नव्हते. डिसेंबर २००७ मध्ये राजगुरुनगर येथील प्रबोधक प्रशिक्षण वर्गाच्या वेळी प्रभागश: भूमिका मांडणारी सत्रे झाली तेव्हा असे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता जाणवली. हे टिपण माझ्या मनातील अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी लिहिले आहे. यावर प्रथम मध्यवर्ती सहविचार समितीत चर्चा व्हावी. त्यानंतर त्यात आवश्यक वाटतील एवढे बदल करून विस्तारित सहविचार समिती आणि विविध केंद्रांच्या केंद्रीय किंवा सहविचार समित्या या ठिकाणी चर्चा व्हावी. त्यानंतर हे स्वतंत्र टिपण तसेच ठेवावे किंवा तत्त्वसप्तकामध्ये ‘संघटना’ या विषयावरील लेखाच्या नव्या आवृत्तीत त्याचा समावेश करावा.

२. देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना हे प्रबोधिनीचे व्यवच्छेदक — इतर संघटनांपासून प्रबोधिनीचे निराळेपण दाखवणारे — लक्षण आहे असे वाटते. ते प्रबोधिनी या संघटनेचे परिपूर्ण वर्णन नाही.

३. एखादी संघटना विविध संस्था, उच्च पदस्थ व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा उत्सव मंडळे यांना हुकमी स्वयंसेवकांचे बळ पुरवण्यासाठी नाही हे ठसवण्यासाठी “संघटनेसाठी संघटना” असा शब्द प्रयोग झाला असावा. त्याचा अर्थ ‘स्वांतःसुखाय संघटना करावी’ असा न करता, ‘संघटनवृत्ती जोपासण्यासाठी संघटना करावी’ असा घेतला पाहिजे. प्रबोधिनीचे काम ‘संघटनेसाठी संघटना’ पेक्षा अधिक अपेक्षित आहे हे कळावे यासाठी ‘धर्मसंस्थापनेसाठी संघटना’, ‘राष्ट्रनिर्मितीसाठी संघटना’ किंवा ‘मनुष्यघडणीसाठी संघटना’ असे शब्द प्रयोग वेळोवेळी वापरले गेले आहेत. ‘संघटनवृत्ती जोपासण्यासाठी’ पेक्षा ‘मनुष्यघडणीसाठी’, त्यापेक्षा ‘राष्ट्रनिर्मितीसाठी’, आणि त्यापेक्षा ‘धर्मसंस्थापनेसाठी’ ही अधिकाधिक व्यापक उद्दिष्टे आहेत. ही चार उद्दिष्टे मुख्यतः दिशादर्शक आहेत. कार्यदर्शक उद्दिष्टे मांडल्याचा जास्त उपयोग होईल असे वाटल्याने प्रबोधिनी या संघटनेचे व्यवच्छेदक लक्षण मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

४. भवितव्य-लेखाच्या मांडणीमध्ये धर्मसंस्थापनेची तीन कार्यक्षेत्रे कल्पिली आहेत —

त्यापैकी १), २), ३) चा आपण तत्त्व-सप्तकात समावेश केला आहे. त्यामुळे तत्त्व-सप्तकातील इतर चार तत्त्वांचा संस्कार करायला हवा असेही भवितव्य-लेखात मांडले आहे —

यापैकी ६) चा संस्कार हा मूलभूत संस्कार आहे. ७) हे त्याचेच विकसित वैशिष्ट्य आहे. ४) व ५) आधुनिक काळासाठी आवश्यक कार्यसाधक तत्त्वे आहेत. त्यांचे मूळ हिंदू जीवनदृष्टीत सापडले तर उत्तमच. नाहीतर ती मागून घातलेली भर आहेत असेही म्हणायला हरकत नाही. ती इतरांकडून शिकलो आहोत असे कोणाला म्हणावेसे वाटले तरी चालेल. आधुनिक समाजात ती आवश्यक आहेत एवढे मात्र निश्चित.५. ‘संघटना’ व ‘विकास’ ही तत्त्वे देखील आधुनिक समाजाला आवश्यक अशीच आहेत. यज्ञसंस्था व चातुर्वर्ण्य व्यवस्था यात कोणी संघटना तत्त्वाचे मूळ शोधतात. आधुनिक समाजात संघटनेचे हे दोन्ही स्रोत कोणाला अप्रस्तुत वाटू शकतील. ‘मनुष्यत्वा’कडून ‘देवत्वा’कडे किंवा ‘बद्ध’पणाकडून ‘सिद्ध’पणाकडे व्यक्तीचा विकास असा विकासाचा विचार पूर्वी झाला आहे. समाजाचा विकास ही कल्पना अलिकडच्या काळातील आहे. थोडक्यात, आधीच्या मुद्द्यातील उत्तमता व विज्ञानाभिमुखता आणि या मुद्द्यातील संघटना व विकास या तत्त्वांना प्राचीन भारतीय पार्श्वभूमी असली तरी आता त्यांना आधुनिक आंतरराष्ट्रीय संदर्भही प्राप्त झाला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.६. खालील आकृतीप्रमाणे निखळ भारतीय तत्त्वे उभ्या अक्षावर व आंतरराष्ट्रीय संदर्भ असलेली तत्त्वे आडव्या अक्षावर मांडता येतील:

हिंदू जीवनदृष्टी हा पाया आहे. तर धर्मसंस्थापना हे चिरकालिक ध्येय आहे. व्यक्तीच्या, समूहाच्या, समाजगटांच्या आणि राष्ट्राच्या पातळीवर अ) वर्तुळातील चार तत्त्वांचा संस्कार, आ) संघटना आणि इ) विकास यांचा विचार करता येईल. म्हणजेच संस्कार व्यक्तींवर, समूहांवर व राष्ट्रावर करायचे आहेत. संघटना व्यक्तींची, लोकसमूहांची आणि देशव्यापी समाजाची करायची आहे. विकास व्यक्तींचा, लोकसमूहांचा आणि देशव्यापी समाजाचा करायचा आहे.७. देशव्यापी समाजावर जीवनदृष्टीचे संस्कार करणे, देशव्यापी समाजाचे संघटन करणे व देशव्यापी समाजाचा विकास करणे म्हणजेच राष्ट्रनिर्मिती. ‘राष्ट्रनिर्मितीसाठी संघटना’ म्हणताना संघटना, विकास, संस्कार हे एकाच प्रक्रियेचे तीन पैलू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही एकाबरोबर बाकीचे दोन पैलू येणारच. उदा. संघटना करताना संघटनेतील व्यक्तींवर वरील आकृती ३ मधील वर्तुळातील चार तत्त्वांचे संस्कारही करावे लागतील. आणि संघटना करताना विकासही करावा लागेल. या तिन्ही पैलूंचे परस्परावलंबित्व स्वीकारलेले असणे हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे.८. देशव्यापी समाजाच्या विकासामध्ये — भौतिक विकास, त्यासाठी आर्थिक विकास, त्यासाठी राजकीय/प्रशासकीय व्यवस्थांचा विकास, त्यासाठी सामाजिक संबंधांचा विकास, त्यासाठी शैक्षणिक-सांस्कृतिक विकास, त्यासाठी पुन्हा भौतिक विकास अशा चक्राला गती देण्याची योजना करावी लागेल. वेगवेगळे लोक चक्रावरच्या वेगवेगळ्या बिंदूंपाशी गती देतील. कुठूनही गती दिली तरी एवढ्याच बिंदूला नाही तर संपूर्ण चक्राला गती द्यायची आहे हे लक्षात ठेवून, गती देण्याची प्रक्रिया अखंडित चालू ठेवावी लागेल. ही प्रक्रिया अखंडित चालू ठेवण्यासाठी जी काही रचना करावी लागेल त्यामध्ये वेगवेगळ्या बिंदूंवर वेगवेगळ्या प्रमाणात भौतिक, आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक घटक असावे लागतील.९. एकेका विशिष्ट बिंदूपाशी विकास चक्राला गती देणाऱ्या व्यक्तींच्या लहान-मोठ्या समूहांना ‘संघटना’ म्हणता येईल. त्या त्या बिंदूंपाशी गती देण्याचे काम अखंडित चालू राहावे यासाठी संघटनेने उभ्या केलेल्या रचनांना ‘संस्था’ म्हणता येईल. रक्ताच्या नात्याने जोडलेल्या आणि आयुष्याचा बऱ्यापैकी काळ एकत्र राहणाऱ्या गटाला ‘कुटुंब’ म्हणतात. या कुटुंबाने काही भौतिक, आर्थिक, प्रशासकीय, संबंधाधारित, सांस्कृतिक रचना उभी केलेली असते. ती त्या कुटुंबाची संस्था. कुटुंब ही संघटना व त्या कुटुंबाची संस्था ही संकल्पना इतकी चिवट व पायाभूत आहे की ‘वसुधैव कुटुंबकम्’ — म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच संघटना व त्या संघटनेची एकच संस्था अशा एकाच विश्वकुटुंबाची कल्पना भारतात केली गेली. रक्ताच्या नात्याच्या एकक कुटुंबापासून विश्वकुटुंपर्यंतच्या या सातत्यकावर (Continuum), हे टोकाचे दोन बिंदू सोडले तर मधल्या बिंदूंवरच्या समूहांना किंवा गटांना कुटुंब हे संबोधन सहसा वापरत नाहीत. लोकसमूह आणि त्याने उभी केलेली रचना यापैकी

ज्याला महत्व अधिक त्यानुसार त्या बिंदूंना संघटना किंवा संस्था हे संबोधन वापरतात.