समाज स्थिर, गट बदलते

अनेक माध्यमातून एक आकार

वेगवेगळ्या घरांच्या शो-केसेसमध्ये अनेक प्रकारच्या शोभेच्या वस्तू बघायला मिळतात. एकदा दिल्लीमध्ये दहा-बारा दिवस राहायला लागले, कामानिमित्त अनेक खासदार, मंत्री, अधिकारी, वकील यांच्या घरी जायला लागले, शिवाय बरेच दिवस मुक्काम असल्याने संध्याकाळी व रात्री नव्या-जुन्या परिचितांकडेही जाणे व्हायचे. नकळत सगळ्या घरांच्या बैठकीच्या खोलीतील शो-केसेसमध्ये ठेवलेल्या वस्तूंची मनात नोंद व्हायची. एके रात्री अचानक लक्षात आले की आठवड्याभरातला आठवा हत्ती आपण पाहतो आहोत. एक बंदनाचा, एक काचेचा, एक लाल भाजलेल्या मातीचा, एक संगमरवरी, एक मण्यांनी मढबलेला, एक गन्-मेटल्चा, एक काळ्या दगडातला, एक कागदाच्या लगद्याचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती पाहिले. सोंड आणि कानांवरून हत्ती ओळखू यायचा. बाकी सर्व अवयव कलाकारांच्या प्रतिभेप्रमाणे असायचे. पण कशाचाही बनवलेला असला तरी तो हत्ती आहे हे कळायचे.

एका माध्यमातून अनेक आकार

हल्ली प्लॅस्टीसीन नावाचा चिकण मातीचा एक प्रकार मिळतो. लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये या मातीचे वेगवेगळ्या आकारचे गोळे मिळतात. त्यांचे सहज तुकडे करता येतात. हाताने ते थापता येतात. त्यांना वेगवेगळे आकार देता येतात. छोटे छोटे गोळे नुसते एकमेकांवर दाबले तरी ते चिकटतात. त्यामुळे खेळाचा एक प्रकार एबढेच त्याकडे पाहात नाहीत. तर आर्किटेक्ट, शिल्पकार, अभियंते, लष्करी डावपेच आखणारे, इत्यादी अनेक प्रकारचे व्यावसायिक या प्लॅस्टीसीनचा उपयोग घरे, जमिनीचे चढ-उतार, यंत्रांचे सुटे भाग, भू-रचना, उपकरणे यांच्या प्रतिकृती बनवण्यासाठी करताना दिसतात. अनेक पशु-पक्ष्यांचे आकार या प्लॅस्टीसीनच्या मदतीने बनवता येतात, मोडता येतात व त्यांमध्ये पाहिजे तो बदल सहज करता येतो.

हिंदू समाज माध्यम आहे, आकार नव्हे

बऱ्याच वेळा विचार करताना असे वाटते की हिंदू समाज या प्लॅस्टीसीन मातीप्रमाणे आहे. भारतातील एकेक धार्मिक संप्रदाय म्हणजे जणू काही या प्लॅस्टीसीन मातीतून बनवलेली एकेक आकृतीच, संप्रदाय म्हटला म्हणजे त्याची पूजा पद्धती आली, व्रते आली, सण आले, पवित्र दिवस, वस्तू, चिन्हे आली. त्यातून त्या संप्रदायाचा आकार ठरतो. धर्मग्रंथ, विधि-निषेध, आदर्श स्त्री-पुरुषांची चरित्रे इत्यादीतून तो आकार पक्का होतो. या आकाराप्रमाणे वागणाऱ्या लोकांचे समूह त्या संप्रदायाला जिवंतपणा आणतात. हिंदू ख्रिश्चन, हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, हिंदू जैन, हिंदू बौद्ध, हिंदू वारकरी, हिंदू स्वाध्यायी म्हणजे जणू हिंदू समाजाच्या प्लॅस्टीसीन मातीतून बनलेल्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत.

मराठी वारकरी म्हणजे लाल प्लॅस्टीसीन मातीतून घडवलेला, तर तमिळ वारकरी म्हणजे निळ्या प्लॅस्टीसीन मातीतून घडवलेला, परस्परांना एकमेकाचे अस्तित्वही माहीत नसते. पण एखाद्या दिवशी तमिळ वारकरी पुण्यात येऊन शुद्ध उच्चारामध्ये तुकारामांचे अभंग म्हणतो आणि ओळख पटते. लाल, निळे रंग असले तरी माती एकच आहे हे जाणवते. ती माती म्हणजे हिंदू समाज. गेल्या वर्षी नाशिकमध्ये आणि यावर्षी उज्जैनमध्ये सिंहस्थाच्या स्नानाला गेलेले भाविक म्हणजे हिंदू समाजाचा एक आकार, सिंहस्थ पर्वणीला या क्षेत्रांपासून जाणीवपूर्वक दूर राहणारे म्हणजे तो आकार घेऊ न इच्छिणारी प्लॅस्टीसीन माती. पण तिचा वेगळा आकार तयार होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम निष्ठेने करणारे हे या मातीचा एक आकार. अंधश्रद्धांना कवटाळून बसणारे म्हणजे या मातीचा दुसरा आकार. सर्व आकारांचा अनुभव इच्छिणारे आणि स्वतःला कोणत्याही आकाराच्या साच्यामध्ये न घालणारे शेवटी त्याच मातीचा हिंदू समाजाचा भाग आहेत.

अनेक राष्ट्र-अनेक माध्यमे यातून समान आकार

जन्माने इंडोनेशियन, जन्माने डच, जन्माने रशियन, जन्माने आयरिश, जन्माने मेक्सिकन, जन्माने ब्राझिलिअन असे ‘हरे कृष्ण पंथीय’ मी पाहिले आहेत. जपानी, कोरिअन, सयामी, थाई, व्हिएतनामी, चिनी आणि अमेरिकन निग्रो ‘बौद्ध’ मी पाहिले आहेत. ख्रिश्चन आणि मुसलमानही अनेक राष्ट्रांमधले आहेत. इस्राएल मध्ये १८९८ ते १९४८ या पन्नास वर्षात काळे, गोरे, लाल, पिवळे, तपकिरी असे सर्व वंशांचे ज्यू लोक वसाहती करायला गेले होते. धर्म न मानणारे रशियन, क्यूबन, चिलीवासी, मंगोलिअन, चिनी कम्युनिस्टही १९४५ ते १९९० या काळात बघायला मिळाले. एकच संप्रदाय मानणारे वेगवेगळ्या देशांमधले लोक म्हणजे जणू वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले हत्तीच. संप्रदायाच्या आकाराचे साम्य त्यांच्यामध्ये आहे. पण त्यांच्या त्यांच्या देशाचा इतिहास, भूगोल, हवामान, राजकारण, तंत्रज्ञान यांनी प्रत्येक देशाचा समाज एकेक वेगळ्या पदार्थासारखा बनलेला आहे.

संप्रदायाचा आकार आणि समाजाचे गुणधर्म

भारतीय, हिंदू, हिंदुस्थानी, इंडिअन हे शब्द आपण मातीला उद्देशून वापरत असतो. आज नाव घेऊन दाखवता येईल असा एकेक संप्रदाय म्हणजे या मातीच्या एकेका गोळ्याला दिलेला आकार. पूर्वीचे असे अनेक आकार पुन्हा मातीत गडप झाले आहेत. उद्या आणखी नवे आकार निर्माण होतील. आजही सर्व माती कुठल्या तरी आकृतीत आहे असेही नाही. आवडीने सर्व संप्रदायांच्या प्रार्थना म्हणणाऱ्यांना कोणत्या आकारात बसवणार? या समाजातले लोक कोणत्याही आकारात सुबद्ध असले तरी आपण त्या विशिष्ट आकारातील मातीचे अंश आहोत हे लक्षात यायला पाहिजे. संप्रदायाचा आकार आणि मातीचे गुण एकाच वेळी असू शकतात. आकार स्वीकारला म्हणजे मातीचे गुण सोडले पाहिजेत असे नाही. आकार विस्कटला तर मातीचे गुण नाहीसे होतात असेही नाही.

आपले राष्ट्रीयत्व म्हणजेच आपले भारतीयत्व, हिंदुत्व, हिंदुस्थानीपणा किंवा Indianness. धार्मिक संप्रदाय, राजकीय पक्ष, आर्थिक वर्ग, भाषिक गट, सामाजिक जात, संघटनेचे सदस्यत्व हे सर्व एकाच प्लॅस्टीसीन मातीतून तयार झालेले वेगवेगळे आकार आहेत. या आकारांमध्ये अडकून न राहता आपल्या या मातीचे म्हणजेच हिंदू किंवा भारतीय समाजाचे गुणधर्म बघायला जमले पाहिजे. हे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य म्हणजे आपले राष्ट्रीयत्व आहे.