फार प्राचीन काळी भारतीयांनी बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. त्यानंतर बाह्यसृष्टीबरोबर प्रत्येकाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या आतील अंत सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. पुढे बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष झाले व अंतः सृष्टीच्या शोधातच भारतीय समाज रमला. नेमका त्याच काळात आधुनिक विज्ञान व समुद्रप्रवासाच्या साहाय्याने युरोपने बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा मोठा प्रयत्न चालू केला. आज आता आपल्याला दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांचे महत्त्व कळले आहे. बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू ठेवला नाही, तर पारतंत्र्य, गरीबी आणि अज्ञान वाढते. अंतःसृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्न चालू ठेवला नाही तर आयुष्यात असमाधान, दिशाहीनता आणि पोकळपणा जाणवायला लागतो. ज्या समाजात हे दोन्ही एकाच वेळी करायचा उत्साह आहे आणि तसे प्रयत्न चालू आहेत, तिथली माणसे देवमानव बनायच्या दिशेने प्रगती करू लागतात.
पूजनीय आणि रक्षणीय
रौप्यपदक कोणाला ?
हे प्रकट चिंतन लिहित असताना अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूला पहिले रौप्य पदक मिळाले होते. वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले ब्राँझ पदक मिळाल्यानंतर बावन्न वर्षांनी आणखी एका भारतीय खेळाडूला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पुढचे रौप्य पदक मिळाले. मेजर राज्यवर्धन राठोड यांनी रौप्यपदक मिळाल्यानंतर स्पर्धेच्या वेळच्या स्वतःच्या मनःस्थितीचे ‘मी शंभर वेळा मरण अनुभबले’ असे वर्णन केले आहे. त्याक्षणी त्यांच्या या मनःस्थितीत किती भारतीय सहभागी झाले असतील? नंतरच्या आनंदात अथेन्सला गेलेला सर्व भारतीय संघ, व भारतात बातमी कळत गेली तसे सर्व भारतीय सहभागी झाले. म्हणजे रौप्यपदक मिळवण्याचा सराव एकाने केला, स्पर्धेच्या वेळचा ताण त्यानेच सहन केला, पण आनंद त्याला व सर्व भारतीयांना झाला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनाही झाला असेल. छायाचित्र पाहिले नाही तरी नाव ऐकताच हा रौप्यपदक विजेता भारतीय आहे हे कळते. ज्या सगळ्यांना या रौप्यपदकाचा आनंद झाला ते परस्परांशी ज्या नात्याने जोडलेले असतात त्याला म्हणतात राष्ट्रीयत्व. पराक्रम एकाचा पण आनंद राष्ट्रातील सर्वांना.