साधनपूजा आणि प्रतीकपूजा

आपले आयुष्य सुखी-समाधानी करायचे असेल, तर सृष्टीतली अनेक साधने नैसर्गिक स्थितीत किंवा त्यावर प्रक्रिया करून वापरावी लागतात. या सर्व साधनांची पूजा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. भूमिपूजन, वास्तुपूजन, शस्त्रपूजन, यंत्रपूजन, ग्रंथपूजन, वृक्षपूजन, गोपूजन या सगळ्या पद्धती या जीवनदृष्टीतूनच आलेल्या आहेत. पूर्वी चुलीची आणि उखळाची पूजा करायचे, तर आज दिवाळीच्या पाडव्याला वहीपूजनाबरोबर संगणकाचीही पूजा करतात. नवीन वाहनाचीच नाही, तर प्रक्षेपण करण्यापूर्वी अग्निबाणाचीही पूजा करतात, आणि चाचणी घेण्यापूर्वी क्षेपणास्त्रांचीही पूजा करतात.

निसर्गाच्या शक्तींवर प्रेमाने विजय आणि साधनांची पूजा ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. याबरोबर भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. साधनांच्या पूजेप्रमाणेच आम्ही प्रतीकांचीही पूजा करतो. देव कोणाला दिसलेला नाही. पण देवाचे प्रतीक म्हणून आम्हांला धातूची, दगडाची किंवा लाकडाची, कोणत्याही रंगाची आणि रूपाची मूर्ती चालते. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार प्रतीक निवडावे आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची पूजा करावी. कारण पूजा मूर्तीची नसते. मूर्ती ज्याचे प्रतीक त्या देवाची ती पूजा असते. तुकाराम महाराजांचा एक अभंग ही कल्पना स्पष्ट करतो.

केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती ।।

शिवपूजा शिवासि पावे। माती मातीमाजि सामावे ।।१।।

केला पाषाणाचा विष्णू । परी पाषाण नव्हे विष्णू ।।

विष्णुपूजा विष्णुसि अर्पे। पाषाण राही पाषाणरूपे ।।२।।

केली काशाची जगदंबा। परी कासे नव्हे अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणे। कासे राहे कासेपणे ।।३।।

ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी ।।

ज्याची पूजा तेणेचि घेणे। आम्ही पाषाणरूप राहणे ।।४।।

तुकारामांचा हा अभंग मी पहिल्यांदा वाचला, तेव्हा मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्याने, मला त्या शास्त्रातले एक उदाहरण आठवले. बहुतेक शाळांमध्ये प्राणवायू बनविण्याचा प्रयोग निदान दाखवला तरी जातो. पोटॅशिअम क्लोरेट नावाचे एक पांढरे संयुग गरम केल्यावर त्यातून प्राणवायू बाहेर पडतो. पण त्याला कित्येक तास लागतात. त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे मँगेनीझ डायऑक्साईड मिसळल्यावर काही तासांच्या ऐवजी काही मिनिटांत सर्व प्राणवायू बाहेर पडतो. पण मँगेनीज डायऑक्साईड आहे तसेच राहते. मँगेनीझ डायऑक्साईडला उत्प्रेरक (catalyst) असे म्हणतात. त्याने रासायनिक अभिक्रियेची गती प्रचंड वाढते. परंतु तो आहे तसाच राहतो. तुकारामांनी या अभंगात मूर्ती उत्प्रेरकासारखी आहे, असे सांगितले आहे. मूर्तीच्या साहाय्याने आपली पूजा म्हणजेच पूजेतील आपला समर्पण भाव देवापर्यंत पोहोचतो. मूर्ती आहे तशीच राहते. मूर्तीशिवाय परमेश्वराची ओळख पटायला काही दशके लागतील. ते काम मूर्तीमुळे काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांत ही होते. हा भारतीयांनी वैज्ञानिक पद्धतीने घेतलेला आध्यात्मिक शोध आहे.

अशी पूजा करताना नुसता नमस्कार केला तरी चालेल. मूर्तीवर भांडंभर पाणी घातलं तरी चालेल. मूर्तीला पंचामृताचे स्नान घातलं तरी चालेल. एक तुळशीपत्र, बेलाचे त्रिदल किंवा दूर्वांची जुडी वाहिली तरी चालेल किंवा रंगीबेरंगी फुलांच्या पाच पाच पदरी माळा घातल्या तरी चालेल. एक सुपारी समोर ठेवली तरी चालेल किंवा अनेक प्रकारच्या फळांचे ढीग वाहिले, तरी चालेल. यांतले काहीच न करता मूर्तीसमोर बसून जप केला तरी बालेल, प्राणायाम केला तरी चालेल किंवा देवासाठी एक दिवस निराहार राहिले, तरी चालेल.

‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता ।’

हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच प्रतीक कोणतेही चालेल. आणि त्याची पूजा कोणतीही पूजा सामग्री वापरून किंवा न वापरूनही केलेली चालेल. यालाच पूर्वी हिंदू धर्म असे म्हणायचे.