३. प्रत्येक कृतीत ध्येयविचार

नवीन ग्रंथाचे मुखपृष्ठ

दि. १७ ऑगस्ट २००८ या दिवशी ‘ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ४’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्याचे मुखपृष्ठ कसे असावे या संबंधी चित्रकाराबरोबरची पहिली चर्चा सहा-सात महिन्यांपूर्वी झाली होती. साधारण महिन्यापूर्वी दोन चित्रांचे नमुने बघायला मिळाले. त्यातल्या अधिक उण्याची तुलना चालू असताना मुखपृष्ठासाठी आणखी एक कल्पना पुढे आली.

देशातील सुप्त मनुष्यशक्तीपर्यंत पोचणे, तिला जागे करणे, उभे राहायला लावणे आणि तिचा आत्मसन्मान वाढविणे ही आपल्या कामाची दिशा साधारण चौदा-पंधरा वर्षांपूर्वी आपण ठरवली. पुढची पाच वर्षे तरी अजून तीच दिशा राहणार आहे. सुप्त मनुष्यशक्ती ही कर्तृत्वाच्या शिडीच्या पायाशी पडलेली असते. ती जागी झाली, उभी राहिली, की ती कर्तृत्वाच्या शिडीची एक एक पायरी चढायला लागते. त्यातूनच तिचा आत्मसन्मान वाढतो. आपल्या कामाची ही दिशा व्यक्त होईल असे मुखपृष्ठ असावे, अशी ती कल्पना होती.

चित्रकाराबरोबर चर्चा झाली. नैसर्गिक प्रकाश ज्याच्यावर पडतो ती वस्तू उजळून निघते. त्याचप्रमाणे पाण्यावर पडलेल्या प्रकाशाने त्याचा पृष्ठभाग उजळून निघतो. परंतु पाण्याच्या आत शिरलेला प्रकाश मात्र हळू हळू क्षीण होत जातो. पाण्यात खोलवर असलेली वस्तू अशा झिरपून क्षीण झालेल्या प्रकाशाने उजळून निघत नाही. कर्तृत्वाच्या शिडीच्या पायाशी असलेले सुप्त किंवा निद्रिस्त लोक जणू पाण्याच्या तळाशी आहेत. अशा तळाशी प्रकाश पोचायचा असेल तर तो खूपच प्रखर पाहिजे. तळाशी असलेल्यांचा आत्मसन्मान जागा करायचा म्हणजे त्यांना स्वतः मध्येच असलेल्या शक्तीची जाणीव करून द्यायची. ‘घडो ज्ञानाचा उद्बोध’ हे तर आपले घोषवाक्यच आहे. त्यामुळे चित्रकाराने समाजसागराच्या तळाशी असलेल्या सुप्त मनुष्यशक्तीमध्ये ज्ञानाचा उद्बोध झाला हे दाखविण्यासाठी पाण्याच्या तळाशी प्रकाशाने उजळून निघालेली, ज्ञानाचे प्रतीक असलेली, सरस्वतीची आकृती दाखवली आहे. पाण्याच्या लाटा त्यातून झिरपणारा प्रकाश, प्रकाशित झालेला तळ आणि उजळलेली सरस्वतीची आकृती, तसेच या सर्वांतील रंगसंगती हे सर्व चित्रकाराचे कौशल्य आहे.

नव्या ग्रंथाची अर्पण-पत्रिका

साधारणपणे एक किंवा दोन लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये अर्पण-पत्रिकेचे एक पान असते. माझ्याही एका छोट्या पुस्तिकेला अर्पण-पत्रिका जोडलेली आहे. त्या पुस्तिकेतले बरेचसे लेखन मीच केले आहे. दुसऱ्या छोट्या पुस्तिकेला मी अर्पण-पत्रिका जोडलेली नाही. कारण त्यात बरेचसे संकलनच आहे. स्वतंत्र लेखन फारसे नाही. आपले काही असेल तर अर्पण करता येते. आपले नसेल तर ते अर्पण करणेही बरोबर नाही.

खंड ४ मध्ये २४ लेखकांचे २१ लेख आहेत. शिवाय ४ विभागशः प्रस्तावना व एक संपूर्ण खंडाची प्रस्तावना लिहिणारे ५ जण आहेत. म्हणजे २६ लेखक झाले. ते ही सर्वजण त्यांच्या विभागाचे, प्रकल्पाचे, केंद्राचे प्रतिनिधी म्हणूनच लेखक बनलेले आहेत. अनेकांचे काम, चिंतन, संशोधन यातून त्या त्या ठिकाणचे काम उभे राहिले. ते फक्त शब्दबद्ध करण्याचे काम काही जणांनी केलेले आहे. अनेकांमुळे गोळा झालेले संचित केवळ काही जणांनी परस्पर अर्पण करावे का ?

खंड १, २, ३ मध्ये तर काही अपर्ण-पत्रिकेचे वेगळे पान नाही. त्यामुळे खंड ४ मध्येही अर्पण-पत्रिका नको, असे ठरविले. परंतु खंड २ मध्ये अनुक्रमणिका संपल्यावर पुढच्याच पानावर ‘शुभ्र सुगंधित पुष्पे आणिक शुभ्र सुगंधित मने’ हे पद्य छापले आहे. त्यामुळे ग्रंथ अर्पण करायचा नसला तरी ग्रंथातील लेखक आपली मने आणि संकल्प निश्चितच अर्पण करू शकतात. खंड ४ मध्ये अर्पण-पत्रिकेसाठी जे पान राखीव ठेवले होते, त्या अनुक्रमणिकेच्या आधीच्या पानावर आपल्या दैनंदिन उपासनेतील विरजा मंत्रांचा अर्थ सांगणारा मराठी पद्यानुवाद छापला आहे. ‘ज्योति असे मी विमल निरागस ईश्वरचरणी समर्पिता’ असे त्या पद्याचे पालुपद आहे. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे शुद्ध करून त्याचे ईश्वरी कार्यासाठी समर्पण सांगणारी, ग्रंथाऐवजी ग्रंथाच्या लेखक वाचक संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाची, ही अर्पण-पत्रिका आहे.

नव्या ग्रंथाचे मध्यवर्ती सूत्र

खंड ४ तयार होत असताना वेळोवेळी त्यातील लेखांमधल्या आशयासंबंधी, लेखांच्या क्रमासंबंधी आणि त्यांच्या वर्गीकरणासंबंधी चर्चा झाली. ग्रंथ मुद्रणाला जाण्यापूर्वीचे मनातील सूत्र त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत छापले आहे. ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने एक परिसंवाद घ्यावा व त्यामध्ये पन्नास-साठ जणांना ग्रंथातील लेखांचा परिचय करून द्यावा अशी एक कल्पना पुढे आली. त्या प्रमाणे दि. १७ ऑगस्टला प्रकाशन समारंभापूर्वी दुपारी १ ते ५ या वेळात एक परिसंवाद योजला होता. तो उत्तम झाला. त्यात ‘रूप पालटू शिक्षणाचे’ हे सूत्र घेऊन सुरुवातीला मी बोलावे असे परिसंवादाचे संयोजक प्रा. विवेकराव पोंक्षे यांनी सुचवले. त्या निमित्ताने ‘रूप पालटू शिक्षणाचे’ या आपल्या पुस्तिकेतील भूमिका-लेख मी खंड-४ समोर ठेवून वाचला.

‘देशाच्या कायापालटासाठी जे जे करायला लागेल ते सर्व म्हणजे शिक्षण’ ही तर आपली मुख्य भूमिका. वर्गातील अध्ययन-अध्यापनाच्या पलीकडे गेले तरच आपल्याला अपेक्षित शिक्षण होऊ शकते हे ही आपल्याला माहीत आहे. ‘रूप पालटू शिक्षणाचे’ या पुस्तकाच्या भूमिका-लेखात आपल्याला अपेक्षित शिक्षण होण्यासाठी समाजात त्याला अनुकूल वातावरण आपणच तयार केले पाहिजे असे म्हटले आहे. असे वातावरण तयार करण्यासाठी संस्कार कार्यक्रम, समाजातील सर्व विधायक चळवळी व अनेक शैक्षणिक चळवळींची आवश्यकता त्यात मांडली आहे. खंड ४ मधल्या तीन विभागांतील लेख मुख्यतः शैक्षणिक व विधायक चळवळींमध्ये रूपांतर होऊ शकण्याच्या विविध टप्प्यांवर असलेल्या प्रबोधिनीतील उपक्रमांविषयी आहेत. ‘रूप पालटू देशाचे’ म्हणतो तेव्हा देशाचे सर्वांना दिसणारे भौतिक रूप पालटायचे आहे आणि समाजमानसही पालटायचे आहे. समाजमानस पालटण्याचा गोवर्धन पर्वत उचलायला आपण शैक्षणिक कामांद्वारे कसा हात घातला आहे त्याचे वर्णन हे खंड-४ या आपल्या नव्या ग्रंथाचे मध्यवर्ती सूत्र आहे, असे ‘खंड- ४’ व ‘रूप पालटू शिक्षणाचे’ एकत्र वाचताना मला जाणवले.

सौर भाद्रपद १, शके १९३० दि. २३/८/२००८