२. उपक्रमातून उद्दिष्टाकडे

मिरवणुकीतील ध्वजधारी

आठवड्यापूर्वीच गणेशोत्सव संपला. गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, विराट जनसमूहाचे दर्शन, हा अनुभव याही वर्षी आला. विसर्जन मिरवणुकांमधून सामूहिक शिस्तबद्ध नृत्याप्रमाणेच केवळ सामूहिक वाद्य-घोष करणारे ताफे या वर्षी आणखी वाढलेले दिसले. या वर्षी आणखी एक बदल दिसला तो म्हणजे प्रबोधिनीच्या बर्ची-नृत्य गटातील ध्वजधाऱ्यांप्रमाणे ध्वजदंड सरळ रेषेत वर-खाली नाचवणारे ध्वजधारी इतरही काही गटांमध्ये दिसले.

दरवर्षीप्रमाणे ध्वजधाऱ्यांच्या आचार संहितेबाबत, म्हणजे ध्वजदंड कसा असावा, कळस कसा असावा, ध्वजाला हार कोणत्या प्रकारचा असावा, एका ध्वजधाऱ्याला सलग किती वेळ ध्वज नाचवता आला पाहिजे, ध्वजधाऱ्याने वाद्यांच्या लयीबरोबर ध्वज नाचविण्याची लय वाढवायची की नाही, ध्वजधारी म्हणून निवड करताना कोणते निकष असावेत असे अनेक प्रश्न माझ्याकडे रुजुवातीसाठी किंवा खुलासा करून घेण्यासाठी आले. मी फक्त सरावाच्या वेळी ध्वज नाचवला आहे. मिरवणुकीत कधी नाचवला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मी सगळ्या प्रश्नांचा खुलासा सामान्य व्यवहारज्ञानातून करत गेलो.

प्रश्न विचारायला येणारे बहुतेक जण मात्र ध्वजाच्या आणि ध्वज नाचविण्याबाबतच्या पावित्र्याच्या काही कल्पना मनात धरून, ‘आपल्याकडून ध्वजाचे जे काही सोवळे असेल ते मोडायला नको’, अशा सावध भूमिकेतून प्रश्न विचारत आहेत, हे मला जाणवत होते. कोणतीही गोष्ट उत्तम करायची झाली तर तिचे शास्त्र करायला लागते. आणि शास्त्र झाले की मग ती गोष्ट शास्त्रशुद्ध केली पाहिजे हे मला मान्य आहे. त्यामुळे पूर्वी मिरवणुकीत ध्वज नाचविणाऱ्यांनी त्याचे काही तरी शास्त्र केले असणार, ते समजून घेऊन त्याप्रमाणेच नवीन ध्वजधाऱ्यांनी ध्वज नाचवायला पाहिजे.

इतकी वर्षे उभ्या रेषेत ध्वज वर-खाली नाचविण्याची प्रबोधिनीच्या गटांची मक्तेदारी या वर्षी मोडली गेली. इतर काही नृत्य-पथकांमध्येही प्रबोधिनीतल्या पद्धतीप्रमाणे ध्वज नाचवला जात असलेला बघायला मिळाला. इतरांची गुणवत्ता वाढली हे चांगलेच झाले. आपण मग गुणवत्तेचे अधिक उंच मानदंड प्रस्थापित करायला हवेत. त्यामुळेच प्रबोधिनीचे ध्वजधारी इतरांपेक्षा वेगळे कसे असले पाहिजेत, याचा मी विचार करू लागलो.

ध्वजपथक आणि ध्वजधारी

ध्वजपथक म्हणजे ध्वज धरणाऱ्यांचे आणि ध्वज नाचविणाऱ्यांचे पथक. मिरवणुकीत किंवा संचलनात ध्वजपथक आघाडीवर असते. पूर्वी युद्धाच्या प्रसंगी ध्वजपथक सैन्याच्या मध्यभागी किंवा पिछाडीला असे. ध्वजपथक आघाडीवर असण्याचे कारण अर्थातच ध्वजाच्या उंचीमुळे त्या मागच्या सर्व ताफ्याच्या आगमनाची पूर्वसूचना समोरच्या लोकांना लवकरात लवकर मिळावी हे आहे. ध्वजपथक मध्यभागी किंवा पिछाडीला असण्याचे कारण अर्थातच ध्वजाच्या सुरक्षिततेसाठी असे आहे. प्रबोधिनीतील ध्वजपथक नेहमी आघाडीवरच असते.

ध्वज म्हणजे सर्व ताफ्याची ओळख. त्याचे प्रतीक. पुढे ध्वज त्या ताफ्याच्या ध्येयाचेही प्रतीक बनला. ध्वज जेवढा उंच, डौलदार तेवढे त्या ताफ्याचे किंवा सैन्याचे मनोधैर्य अधिक चांगले राहणार असाही अर्थ त्या प्रतीकाला आला. ध्वज पडणे, फाटणे, ध्वजदंड तुटणे, ध्वजावरचा कळस तिरका होणे म्हणजे त्या ताफ्याला आपल्या प्रतीकाची अर्थात ध्येयाची काळजी घेता न येणे असाही त्याला अर्थ आला असणार. त्यामुळेच ध्वज, ध्वजधारी, ध्वजपथक यांची आचारसंहिता बनली असणार. या प्रतीकाला आलेल्या महत्त्वामुळेच ध्वजाची आचारसंहिता ही पवित्र गोष्ट बनली असणार. नवखे ध्वजधारी जेव्हा आचारसंहितेबाबत शंका विचारतात, तेव्हा त्या जशा तांत्रिक स्वरूपाच्या असतात तशा आपल्याकडून आपल्या ध्वजाच्या म्हणजेच आपल्या ताफ्याच्या गौरवाला धक्का बसू नये या काळजीतूनही विचारलेल्या असतात.

ध्वजाला आलेल्या महत्त्वामुळे त्या त्या ताफ्यातील सर्वोत्कृष्ट सदस्य ध्वजपथकात असतील अशीही काळजी घेतली जाऊ लागली. एकदा गणेशोत्सवाला कित्येक महिने अवकाश असताना कै. आप्पांनी काही जणांना अचानकच विचारले की ‘तुमच्यापैकी ध्वजपथकात कोण कोण असणार ?’ ध्वजधारी ठरविण्याचे काम सहसा संचालकांना करावे लागत नसल्याने आम्ही एकदम बुचकळ्यात पडलो. मग कै. आप्पांनीच खुलासा केला. प्रबोधिनीच्या बिनीच्या पथकातले कार्यकर्ते, अग्रणी कार्यकर्ते, प्रबोधिनी पुढे नेणारे व प्रबोधिनीला मोठे करणारे कार्यकर्ते म्हणजे प्रबोधिनीच्या ध्वजपथकाचे सदस्य. ‘मिरवणुकीत ध्वज नाचवता नाचवता आपल्याला प्रबोधिनीच्या कार्याचे ध्वजधारी व्हायचे आहे हे तुम्ही शिकणार आहात ना ?’ या कै. आप्पांच्या खुलासेवजा प्रश्नावर तो संवाद संपला. नंतरही एक दोनदा हा विषय पुन्हा निघाला होता.

वेदान्त-विज्ञानाचे ध्वजधारी

त्यानंतर काही वर्षांनी दैनंदिन उपासनेची पोथी (पहिली आवृत्ती) वाचताना कै. आप्पांनी ध्वजपथका-संबंधीचा प्रश्न या पोथीलेखनाच्या काळात केला होता हे लक्षात आले. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ या मंत्रावरचे भाष्य लिहिताना ‘…. वेदान्त विज्ञानाचे अनेकानेक ध्वजधारी येथे निर्माण व्हावेत, अशी प्रार्थना करायची. त्यासाठी परमेश्वराजवळ सामर्थ्य मागावयाचे,’ …. असे वाक्य त्या पोथीत होते.

मिरवणुकीत स्वतः ध्वज नाचवलेला नसल्याने मी सामान्य व्यवहारज्ञानाने जसा ध्वजधाऱ्यांच्या दरवर्षीच्या शंकांना उत्तरे देतो, तसेच दैनंदिन उपासनेच्या पोथीची तिसरी आवृत्ती काढताना ‘वेदान्त-विज्ञानाचे ध्वजधारी’ याचे मी पुढीलप्रमाणे गद्य भाषांतर सरधोपटपणे केले ‘वेदान्त तत्त्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यामध्ये आणि विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्यामध्ये नेहमी आघाडीवर राहणारे नेतृत्वगुणसंपन्न युवक-युवती आणि स्त्री-पुरुष येथे निर्माण व्हावेत. अशी प्रार्थना करून परमेश्वराजवळ सामर्थ्य आता मागू या.’

मिरवणुकीमध्ये प्रबोधिनीच्या ध्वजधाऱ्यांप्रमाणे डौलदार व चैतन्यपूर्ण ध्वज नाचवणारे ध्वजधारी इतर ताफ्यांमध्येही दिसल्यावर ‘प्रबोधिनीचा ध्वजधारी इतरांपेक्षा वेगळा कसा असावा?’ हा प्रश्न वरील पार्श्वभूमीमुळे मनात आला. ध्वजधारी म्हणजे नेहमी आघाडीवर राहणारे हा अनुवाद तर ठीक वाटतो. पण ‘वेदान्त-विज्ञानाचे ध्वजधारी’ याचा मी केलेला अनुवाद बरोबर आणि पुरेसा आहे का ? काय वाटते ते कळवावे.

सौर आश्विन १, शके १९३० दि. २३/९/२००८