जीवनदृष्टी
जपानमध्ये एखाद्या उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तिथे जपानी पद्धतीच्या चहाचे दुकान आढळते. जर्मनी, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंडमध्ये डोंगराच्या निसर्गरम्य ठिकाणी कॉफीची किंवा वाईन आणि बिअरची दुकाने सापडतात. अमेरिकेतल्या डोंगरांवरच्या प्रेक्षणीय स्थळी उंच ठिकाणी किंवा कड्याच्या टोकाशी एक दुर्बिण बसवलेली असते. कुठल्या दिशेने पाहिल्यावर कोणती स्थळे दिसतील याचा नकाशाही तिथे लावलेला असतो. मात्र २५ सेंटचे नाणे टाकल्याशिवाय दुर्बिणीच्या भिंगावरचे झाकण उघडत नाही. भारतामधील उंच डोंगरावर, निसर्गरम्य स्थळी छोटेसे तरी शिवमंदिर सापडते. मग त्याशिवाय देवीचे, मारुतीचे किंवा ग्रामदैवतांचीही देवळे दिसतील. जपान आणि युरोपमध्ये जिभेच्या सुखासाठी आणि अमेरिकेत डोळ्यांच्या सुखासाठी व्यवस्था केलेली असते. भारतामध्ये मात्र इंद्रियांच्या सुखापेक्षा मनःशांतीसाठी योजना केलेली असते. हा चार देशांमधल्या आयुष्याकडे बघण्याच्या पद्धतीतलाही फरक आहे. सर्वच देशांमध्ये एखाद्या ठिकाणी जास्ती लोक आले की तिथे बाजार भरायला लागतो. परंतु भारतामध्ये कितीही बाजार भरला तरी मध्यभागी देऊळ लागतेच. आजसुद्धा भारतात पर्यटन करणाऱ्या भारतीयांची संख्या पाहिली, तर प्रेक्षणीय स्थळांना जाणाऱ्यांपेक्षा तीर्थयात्रा करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही जास्ती आहे. ही भारतीयांची आयुष्याकडे बघण्याची पद्धत आहे, तिलाच जीवनदृष्टी म्हणतात.
केवळ भारतामध्येच नद्यांमध्ये उभे राहून, नदीतले पाणी ओंजळीत घेऊन ते पाणी देवाला किंवा सूर्याला अर्घ्य म्हणून नदीतच सोडणारे लोक सापडतील. जे परमेश्वराने दिलेले आहे, त्याचा त्यालाच नैवेद्य दाखवून आपण त्यातला थोडा भाग प्रसाद म्हणून घ्यायचा व बाकीचा त्यालाच किंवा त्याच्या नावाने लोकांना द्यायचा, ही भारतीय जीवनदृष्टी आहे.
जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे
आपण बारकाईने निरीक्षण करत गेलो, तर सर्वसामान्य लोकांच्या साध्या-साध्या कृतीतून ही जीवनदृष्टी व्यक्त होत जाते. एखाद्या समाजाची ओळख त्याच्या जीवनदृष्टी वरूनच होते. जीवनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका फुलाचे उदाहरण घेऊन म्हटले आहे,
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती |
कोणी त्यांची महती गणतीकेली असे |
परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणीं ठेविले |
कमलपुष्प ते अमर झाले मोक्षदायी पावन ॥
प्रसिद्ध हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदी यांनी सावरकरांच्या ही पुढे जाऊन देवाच्या चरणी वाहिले जाण्यापेक्षा मातृभूमीसाठी बलीदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडवले जाणे अधिक भाग्याचे असे असे एका कवितेत म्हटले आहे. कवी म्हणतो,
चाह नही मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ |
चाह नही प्रेमी माला में बिंध प्यारी को ललचाऊँ |
चाह नही सम्राटों के शव पर हे हरि ! डाला जाऊँ |
चाह नहीं तेरी मूरतपर चढूँ भाग्य पर इठलाऊँ |
मुझे तोड लेना वनमाली उस पथ पर देना तुम फेंक |
मातृभूमि पर शीष चढ़ाने जिस पथ जावे वीर अनेक |
दोन्ही कवितांमध्ये फुलांच्या रूपाने स्वतःच्या जीवनपुष्पाच्या समर्पणाचीच भावना व्यक्त होते. पहिल्या कवितेत, सुकून निर्माल्य व्हायचेच आहे, तर देवाला वाहिले जाऊन निर्माल्य होण्यात कृतार्थता मानली आहे. तर दुसऱ्या कवितेत फूल, आपल्याला झाडावरून तोडून मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडविले जाण्यासाठी त्यांच्या फाशीच्या तक्त्याकडे जायच्या वाटेवर टाकायला देवालाच सांगते आहे. इतरांसाठी जगण्यातच आनंद मानणे ही आमची आयुष्य जगायची पद्धत आहे. तिलाच जीवनपद्धती म्हणतात. प्रत्येक घरात कुटुंबासाठी जगण्यात आनंद मानणारी आई भारतीय जीवनपद्धती प्रमाणे जगण्याचे मूर्त उदाहरण असते.
संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती
जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती यांना मिळून आज संस्कृती असा शब्द वापरतात. पूर्वीच्या काळी भारतीय भाषांमध्ये संस्कृती हा शब्द वापरात नव्हता. त्याऐवजी धर्म हा शब्द आपण वापरायचो. समाजाची धारणा करणारा म्हणजे समाजाला एकसंध व प्रगतिशील ठेवणारा तो धर्म, अशी धर्माची व्याख्या आहे. निश्चित जीवनदृष्टी आणि त्यानुसार बनलेली जीवनपद्धती असेल तरच समाजाची धारणा होते. म्हणजे समाजातील सर्व व्यवस्था उत्तम चालतात आणि समाजाची प्रगती होत जाते. जेव्हा आपण हिंदू धर्म असा शब्द वापरतो, तेव्हा त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि व्यवहार्य अध्यात्म अशा दोन गोष्टी येतात. भारतीय संस्कृतीची दृष्टी अशी आहे, की निसर्गाच्या सर्व शक्तींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा.
संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय
बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदू समाजाने प्राचीन काळात विज्ञान संशोधनामध्ये मोठी आघाडी मारली होती. गणितातील दशमान पद्धती आणि शून्याची कल्पना, खगोलशास्त्रातील पृथ्वीला गती आहे, पण ती स्थिर भासते हा सिद्धांत, रसायनशास्त्र, वैद्यक आणि शल्यचिकित्सा या सगळ्यांमध्येच हिंदू समाजाने आघाडी घेतलेली होती. अगदी पेशवाईच्या काळापर्यंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हिंदू समाजाने सांभाळले. इंग्लंडमध्ये न पाहिलेली प्लॅस्टिक सर्जरी आणि लसीकरण इंग्रजांना भारतात पहायला मिळाले होते. विज्ञानात गती असूनही पारतंत्र्य आल्यावर तेराव्या शतकाच्या सुमारास हिंदुस्थानातल्या विज्ञानाचा विकास थांबला. हिंदू समाजाने संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये कथा, काव्य, नाट्य यात बरेच प्रयोग केले होते. संगीताचेही शास्त्र बनविले होते. त्याचबरोबर नीतीशास्त्र, शिल्पकला, योगविद्या, स्थापत्य यांतही प्रगती केलेली होती. व्याकरण आणि भाषाशास्त्र, उद्यानविद्या, हत्ती आणि घोड्यांचे आयुर्वेद ही सर्वच शास्त्रे विकसित झाली होती. हे सर्व निर्माण करू शकणारा समाज बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याची इच्छा असणाराच असतो.
काही शतकांच्या खंडानंतर हिंदू समाजाने या बाह्य विषयांकडे पुन्हा लक्ष वळविले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १९९५ साली ‘व्हिजन २०२०’ ही योजना तयार झाली. त्यामध्ये एकूण वीस प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये भारत जगातल्या पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये यावा, अशी विकासाची योजना मांडली होती. त्यात मांडलेली जवळ जवळ सर्व उद्दिष्टे २०२० पर्यंत पूर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. त्या योजनेमध्ये कुठेही भारत महासत्ता व्हावा किंवा superpower व्हावा, असे म्हटले नव्हते. वीस तंत्रज्ञानांत प्रगती झाल्यावर भारत महासत्ता होईल ही प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली हवा आहे.
बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय
हिंदू संस्कृतीचे असे वैशिष्ट्य आहे, की भारतीयांना कधीच महासत्ता व्हावेसे वाटले नाही. पूर्वीच्या काळीही नाही, आणि आजही नाही. भारतीय समाजाने स्वप्न पाहिले, ते विश्वगुरू होण्याचे. सामान्य मनुष्यापासून देवमाणूस कसे बनायचे हे सगळ्या जगाला शिकवावे, अशी भारतीयांची इच्छा होती. जगाला शिकवणे म्हटल्याने किंवा विश्वगुरू म्हटल्यानेही आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू शकते. तशी श्रेष्ठत्वाची भावनाही भारतीयांनी कधी दाखवली नाही.
भारतीयांचे म्हणणे असे आहे की, ‘बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे यातच सर्व काही नाही हे आम्हांला सर्वांच्या आधी कळले. त्यामुळे प्रत्येकाच्या आतमधील शक्तीचा स्रोत शोधायला सर्वांच्या आधी आम्ही सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या आतील हे शक्तिकेंद्र सापडल्यावर माणसाचा देवमाणूस होतो हे आमच्यातील काही जणांना कळले. ते इथले ऋषी, मुनी, आणि योगी व संत होते. काही जणांना जे कळले ते सगळ्या भारतीयांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विश्वगुरू बनणे म्हणजे आमच्या देशात सर्व समाजातून देवमाणसांचा संघ आम्ही कसा करतो आहोत, हे इतर देशांतल्या लोकांनी बघावे आणि स्वतःही तसेच बनण्याचा प्रयत्न करावा.’ ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही जशी म्हण आहे, तसे ‘पुढच्याची प्रगती पाहून मागचा शहाणा’ अशी ही विश्वगुरू बनण्याची कल्पना आहे.
निसर्गातील शक्तींवर विजय मिळविताना किंवा जगाला शिकवताना, सर्वांना प्रेमाने जिंकावे ही भारतीयांची दृष्टी राहिली आहे. कुठल्या वनस्पतीचा औषधी उपयोग कसा करता येईल, हे शोधून काढणे म्हणजे निसर्गावरती विजय मिळवणे. पण हा विजय प्रेमाने मिळवायचा म्हणजे एखाद्या वनस्पतीचा भाग औषध म्हणून वापरायचा असेल, तर त्या वनस्पतीची प्रार्थना करून तिची परवानगी घेऊन मग ती वनस्पती तोडावी, असे आपली संस्कृती सांगते. शुद्ध आयुर्वेदानुसार वैद्यकी करणारे अनेक वैद्य आजही ही पद्धत पाळतात. तसेच आदिवासीही याच पद्धतीने प्रार्थना करून मग वनस्पतींचा उपयोग करतात.
साधनपूजा आणि प्रतीकपूजा
आपले आयुष्य सुखी-समाधानी करायचे असेल, तर सृष्टीतली अनेक साधने नैसर्गिक स्थितीत किंवा त्यावर प्रक्रिया करून वापरावी लागतात. या सर्व साधनांची पूजा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. भूमिपूजन, वास्तुपूजन, शस्त्रपूजन, यंत्रपूजन, ग्रंथपूजन, वृक्षपूजन, गोपूजन या सगळ्या पद्धती या जीवनदृष्टीतूनच आलेल्या आहेत. पूव चुलीची आणि उखळाची पूजा करायचे, तर आज दिवाळीच्या पाडव्याला वहीपूजनाबरोबर संगणकाचीही पूजा करतात. नवीन वाहनाचीच नाही, तर प्रक्षेपण करण्यापूव अग्निबाणाचीही पूजा करतात, आणि चाचणी घेण्यापूव क्षेपणास्त्रांचीही पूजा करतात.
निसर्गाच्या शक्तींवर प्रेमाने विजय आणि साधनांची पूजा ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. याबरोबर भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. साधनांच्या पूजेप्रमाणेच आम्ही प्रतीकांचीही पूजा करतो. देव कोणाला दिसलेला नाही. पण देवाचे प्रतीक म्हणून आम्हांला धातूची, दगडाची किंवा लाकडाची, कोणत्याही रंगाची आणि रूपाची मूत चालते. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार प्रतीक निवडावे आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची पूजा करावी. कारण पूजा मूतची नसते. मूर्ती ज्याचे प्रतीक त्या देवाची ती पूजा असते. तुकाराम महाराजांचा एक अभंग ही कल्पना स्पष्ट करतो.
केला मातीचा पशुपति | परि मातीसि काय महती ॥
शिवपूजा शिवासि पावे | माती मातीमाजि सामावे ॥१॥
केला पाषाणाचा विष्णू | परी पाषाण नव्हे विष्णू ॥
विष्णुपूजा विष्णुसि अर्पे | पाषाण राही पाषाणरूपे ॥२॥
केली काशाची जगदंबा | परी कासे नव्हे अंबा |
पूजा अंबेची अंबेला घेणे | कासे राहे कासेपणे॥३॥
ब्रह्मानंद पूर्णामाजी | तुका म्हणे केली कांजी ॥
ज्याची पूजा तेणेचि घेणे | आम्ही पाषाणरूप राहणे ॥४॥
तुकारामांचा हा अभंग मी पहिल्यांदा वाचला, तेव्हा मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्याने, मला त्या शास्त्रातले एक उदाहरण आठवले. बहुतेक शाळांमध्ये प्राणवायू बनविण्याचा प्रयोग निदान दाखवला तरी जातो. पोटॅशिअम क्लोरेट नावाचे एक पांढरे संयुग गरम केल्यावर त्यातून प्राणवायू बाहेर पडतो. पण त्याला कित्येक तास लागतात. त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे मँगेनीझ डायऑक्साईड मिसळल्यावर काही तासांच्या ऐवजी काही मिनिटांत सर्व प्राणवायू बाहेर पडतो. पण मँगेनीझ डायऑक्साईड आहे तसेच राहते. मँगेनीझ डायऑक्साईडला उत्प्रेरक (catalyst) असे म्हणतात. त्याने रासायनिक अभिक्रियेची गती प्रचंड वाढते. परंतु तो आहे तसाच राहतो. तुकारामांनी या अभंगात मूर्ती उत्प्रेरकासारखी आहे, असे सांगितले आहे. मूर्तीच्या साहाय्याने आपली पूजा म्हणजेच पूजेतील आपला समर्पण भाव देवापर्यंत पोहोचतो. मूर्ती आहे तशीच राहते. मूर्तीशिवाय परमेश्वराची ओळख पटायला काही दशके लागतील. ते काम मूर्तीमुळे काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांत ही होते. हा भारतीयांनी वैज्ञानिक पद्धतीने घेतलेला आध्यात्मिक शोध आहे.
अशी पूजा करताना नुसता नमस्कार केला तरी चालेल. मूर्तीवर भांडंभर पाणी घातलं तरी चालेल. मूर्तीला पंचामृताचे स्नान घातलं तरी चालेल. एक तुळशीपत्र, बेलाचे त्रिदल किंवा दूर्वांची जुडी वाहिली तरी चालेल किंवा रंगीबेरंगी फुलांच्या पाच पाच पदरी माळा घातल्या तरी चालेल. एक सुपारी समोर ठेवली तरी चालेल किंवा अनेक प्रकारच्या फळांचे ढीग वाहिले, तरी चालेल. यांतले काहीच न करता मूतसमोर बसून जप केला तरी चालेल, प्राणायाम केला तरी चालेल किंवा देवासाठी एक दिवस निराहार राहिले, तरी चालेल.
‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता |’
हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच प्रतीक कोणतेही चालेल. आणि त्याची पूजा कोणतीही पूजा सामग्री वापरून किंवा न वापरूनही केलेली चालेल. यालाच पूर्वी हिंदू धर्म असे म्हणायचे.
व्यवहार्य, म्हणजे आयुष्य जगण्यात आणता येईल असे अध्यात्म
बाह्य सृष्टीला प्रेमाने जिंकणे, साधनपूजा, प्रतीकपूजा आणि आपल्याला पाहिजे ते प्रतीक आणि साधन निवडा असे स्वातंत्र्य, या सगळ्याला भारतीय जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती किंवा संस्कृती म्हटले, तर त्याशिवाय हिंदू धर्मात आणखी काय राहिले? हिंदू धर्म हे समूहवाचक नाम आहे. एक डझन म्हणजे बारा वस्तू, एक किलो म्हणजे हजार ग्रॅम, एक रीम म्हणजे ४४० कागद, एक एकर म्हणजे चाळीस गुंठे, तसे हिंदू धर्म म्हणजे हिंदुस्थानात निर्माण झालेले कमीत कमी आठ संप्रदाय. शिव, विष्णू, देवी, गणपती किंवा सूर्य यापैकी एकेका देवतेची पूजा करणारे पाच जुने वैदिक म्हणजे वेदांना मानणारे संप्रदाय हिंदुस्थानात आहेत. याशिवाय बौद्ध, जैन व शीख हे तीन स्वतःला अवैदिक म्हणवणारे, म्हणजे आम्ही वेद मानत नाही असे म्हणणारे तीन संप्रदाय आहेत. भारतात निर्माण झालेला कोणताही संप्रदाय किंवा पंथ हा हिंदू धर्माचाच भाग आहे. मूर्तिपूजा न मानणारे आर्यसमाजी किंवा स्वामीनारायणपंथी हे सुद्धा हिंदू धर्माचेच. या सगळ्या संप्रदायांमध्ये बरीच विविधता आहे. मग त्यांना हिंदू धर्माचा भाग का म्हणायचे? त्यांचे आचार, सण, पूजापद्धती वेगवेगळ्या असल्या तरी ‘सर्व जगाचे नियंत्रण करणारी शक्ती एकच आहे. तीच शक्ती स्वतःच्या आणि प्रत्येकाच्या शरीर, मन, बुद्धीचे नियंत्रण करत असते आणि त्या शक्तीच्या अस्तित्वावर केवळ कोणीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा नसून, प्रत्येकाने त्याचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे,’ हे या सर्वांचे उद्दिष्ट आहे. सर्वांमधल्या शक्तीच्या स्रोताला भारतीय परंपरेमध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो. हा आत्माच शक्तीचा स्रोत आहे आणि त्या आत्म्याची शक्ती आपल्या जीवनातून प्रकट करायची आहे हा हिंदू धर्माचा गाभा आहे. या विचाराला व्यवहार्य अध्यात्म असे म्हणतात.
सर्वसमावेशक अध्यात्म
भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि मुसलमानांचे धर्म हे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात का? ‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता’, आणि प्रतीक व साधन यांच्या निवडीत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या तीन गोष्टी त्यांनी स्वीकारल्या तर त्यांचे त्यांचे धर्म ही सनातन धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. सप्तशतीमध्ये एक लोक आहे,
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
त्यामुळे ‘आम्ही कोणताच धर्म मानत नाही, आम्ही आमच्या बुद्धीलाच प्रमाण मानतो. आधुनिक विज्ञान आणि तर्कशास्त्र सांगेल, त्याचप्रमाणे आम्ही वागणार’ असे म्हणणारे ही हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. कारण बुद्धी देखील सर्व विश्वाच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचेच एक रूप आहे. आम्ही हिंदू धर्माचा भाग नाही, असे म्हणायचे स्वातंत्र्य त्यांना आहेच. तसेच ते मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारसी यांनाही आहे. ते स्वतःला हिंदू धर्माचे म्हणवून घ्यायला तयार नसतील तर आपण आपले म्हणणे त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगत राहिले पाहिजे. स्वतःच्या धर्ममताचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांनाही आहेच. पण कोणालाच सक्तीने किंवा प्रलोभन दाखवून इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. असे धर्मांतर रोखणे किंवा असे धर्मांतर झालेल्यांची ‘घर वापसी’ करणे हे सर्वसमावेशक अध्यात्मात येते. म्हणूनच ते व्यवहार्य अध्यात्म आहे.
हिंदू राष्ट्र हे मुळात आध्यात्मिक आहे. याचा अर्थ अध्यात्म हा या राष्ट्राचा आदर्श आहे. हिंदू राष्ट्राचे रूप सांस्कृतिक आहे. याचा अर्थ स्वतःच्या जीवनदृष्टी व जीवनपद्धती बाबतीत ठाम आणि इतरांच्या बाबतीत स्वीकारशील अशी इथली संस्कृती आहे. हिंदू राष्ट्राची ओळख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशी प्रथम होते. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण हा हिंदू राष्ट्राचा पोशाख आहे. प्रत्येक पिढी आपल्या आवडीनुसार हा पोषाख बदलत जाईल.
हिंदू समाजाचा कायापालट
महाभारत काळात ‘आत्मार्थं पृथिवीं त्यजेत्’ म्हणजे स्वतःच्या हितासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा, अशी घोषणा होती. पाच हजार वर्षांनी विवेकानंदांनी त्या घोषणेत सुधारणा केली. ‘आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च’ अशी घोषणा त्यांनी केली. ‘स्वतः देवमाणूस बनण्यासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा’, या ऐवजी ‘स्वतः देवमाणूस बनावे आणि जगालाही देवमाणूस बनायला मदत करावी’, अशी नवीन घोषणा त्यांनी केली.
जेव्हा ‘आत्मार्थं पृथिवीं त्यजेत्’ ही घोषणा होती, तेव्हा भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. प्रत्येकाने आपआपल्या वर्णाचे काम करावे आणि स्वतःचे हित बघावे त्यातून समाजाचे हित आपोआप साधले जाईल. अशी तेव्हाची समजूत होती. तेव्हा ती पुरेशीही वाटत होती. पण विवेकानंदांनी मूळची घोषणा सुधारित केल्यावर सर्व समाजाची चारच गटांत विभागणी करण्याची कल्पनाही सोडून द्यावी लागेल. योगी अरविंद हे सुद्धा विवेकानंदांसारखेच राष्ट्रद्रष्टे संत होते. म्हणजे राष्ट्राचा भविष्यकाळ पाहू शकणारे संत होते. भारताने सर्व जगाला देवमाणूस कसे बनायचे, हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून द्यायचे असेल, तर प्रत्येकाचा आयुष्यभर एकच वर्ण, ही कल्पना सोडून दिली पाहिजे असे योगी अरविंदांनी सांगितले.
श्रीकृष्ण लहानपणी गवळ्याचा पोर होता, गोपालन करायचा, म्हणजे तो वैश्य होता. त्याने अनेक दुष्टांचा संहार केला, म्हणून तो क्षत्रिय होता. त्याने भगवद्गीतेत ब्रह्मविद्या सांगितली म्हणून तो ब्राह्मण होता. कौरव-पांडवांच्या युद्धात त्याने अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना खरारा केला आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात जेवणाच्या पंगतीनंतरची आवराआवर केली म्हणून तो शूद्र होता. प्रत्येक व्यक्तीमध्ये चारही वर्णांची कामे करण्याची क्षमता कमी-अधिक प्रमाणांत असते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात त्याला वेगवेगळ्या वर्णांची कामे करावी लागतात. त्यामुळे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च’ या नव्या घोषणेचा काळात समाजाची चार वर्णांतील विभागणी चालणार नाही.
भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर चातुर्वर्ण्याच्या चौकटीतून बाहेर पडावे लागेल. चातुर्वर्ण्यच नको म्हटल्यावर जातींची उतरंडही तत्त्वतः आपोआपच गेली. व्यवहारात चातुर्वर्ण्य आणि जातिभेद या दोन्हीचा जाच आणि बोच जाण्यासाठी आणखी काही पिढ्या मुद्दाम प्रयत्न करायला लागतील.
स्त्रियांचे सामाजिक स्थान
वेदकाळापासून वेदांतील सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया, ब्रह्माच्या स्वरूपासंबंधी चर्चा करणाऱ्या स्त्रिया, लढवय्या स्त्रिया, राजकारणी स्त्रिया होऊन गेल्या आहेत. स्त्री संतही अनेक होऊन गेल्या आहेत. स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये एकच ईश्वरी शक्ती आहे, हे ही सर्वांनी मान्य केले आहे. कुटुंबामध्ये स्त्रियांना व पुरुषांना परस्परपूरक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. परंतु व्यक्तिशः व कुटुंबापलीकडच्या सामाजिक जीवनात स्त्रिया व पुरुष समान क्षमतेचे आहेत हे तत्त्वतः आपण मान्य केलेले आहे. काही वर्षांपूव एकाच वेळी राष्ट्रपती, लोकसभेच्या सभापती आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमख स्त्रियाच होत्या. कायद्याने ग्रामपंचायतीत स्त्रियांना ५०% आरक्षण मिळाले आहे. विधानसभेत आणि लोकसभेत ३३% आरक्षण एक ना एक दिवस येणारच आहे. पण भारतीय जीवनदृष्टी कायद्यापेक्षा धर्माला जास्ती महत्त्व देणारी आहे. वेदांची सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया झाल्या आहेत. पण नवीन स्मृती रचणाऱ्या किंवा नवीन घटनादुरुस्ती मांडणाऱ्या स्त्रिया जेव्हा पुढे येतील, तेव्हा हिंदू समाजाचा कायापालट पूर्ण होईल. समाजाचे व्यावहारिक जीवन पूव स्मृतींनुसार चालायचे आणि आता घटनेनुसार चालते. चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था जाण्याइतकेच स्त्रिया स्मृतिकार किंवा घटनाकार होणे याची २१व्या शतकात गरज आहे. म्हणजे मनु, याज्ञवल्क्य, शंकराचार्यांसारख्या आचार्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकार स्त्रियांची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार समाजाचे व्यवहार चालले पाहिजेत. असा विचार आपल्याला करता येतो, कारण हिंदू धर्म आपला गाभा कायम ठेवून काळानुसार आपले स्वरूप बदलत असतो. असे काळानुसार बदलता येण्यामुळेच हिंदू धर्माचा गाभा जे अध्यात्म ते व्यवहार्य आहे असे आपण म्हणतो.
हिंदू समाज, भारतीय संस्कृती आणि व्यवहार्य अध्यात्म हे तिन्ही मिळून हिंदू राष्ट्र होते हे आपण पाहिले. चातुर्वर्ण्य आणि नंतर त्यातून निर्माण झालेली जातिव्यवस्था ही हिंदू समाजातील एक व्यवस्था आहे. भारतीय संस्कृती किंवा व्यवहार्य अध्यात्माचा टाळता न येण्यासारखा असा भाग तो नाही. ‘नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए’ असे एक गीत आहे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च’ या ध्येयासाठी काम करणे हे हिंदू राष्ट्राचे नवीन पर्व आहे. त्यासाठी जन्मावर आधारित चातुर्वर्ण्यात किंवा जातींमध्ये विभागलेला समाज हा अडथळाच होईल. ‘आपण सर्वच ईश्वराचे समान अंश आहोत,’ असे म्हणणाऱ्या भारतीयांचा संघटित समाज हा नव्या पर्वाचा नवीन प्राण आहे.
संघटित समाज हेच राष्ट्राचे शरीर
राष्ट्र म्हणजे परंपरेच्या मध्यवत सूत्राभोवती आणि परस्पर आत्मीयतेच्या नात्याने संघटित झालेला समाज. राष्ट्राच्या आम्हीपणात व्यक्तीचे मीपण विरघळवून टाकायला शिकणे म्हणजे राष्ट्र घडवणे. राष्ट्रापुढे माणसाचा देवमाणूस बनविण्याचे ध्येय असले, असे देवमाणूस बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची परंपरा असली, तरी एखादा समाज जेव्हा आपली आजची स्थिती सुधारण्यासाठी संघटित होतो तेव्हाच त्या समाजाचे राष्ट्र बनते. आजचा हिंदू समाज भारतीय संस्कृतीच्या रूपाने इतिहासाशी जोडलेला आहे. व्यवहार्य अध्यात्माच्या रूपाने भविष्याशी जोडलेला आहे. पण संघटनेच्या रूपाने वर्तमानकाळाशी जोडलेला नाही. आम्ही राष्ट्र आहोत ही जाणीव सर्व स्त्री-पुरुषांमध्ये निर्माण करणे ही राष्ट्रघडणीची गरज आहे.
व्यवहार्य अध्यात्म हे आमच्या हिंदूपणाचे पहिले तत्त्व आहे, त्यातून सर्वांमध्ये ईश्वरी शक्ती पाहण्याची जीवनदृष्टी हे आमच्या हिंदूपणाचे दुसरे तत्त्व आहे. या जीवनदृष्टीतून तयार झालेली सर्व प्रकारची विविधता स्वीकारणारी जीवनपद्धती हे आमच्या हिंदूपणाचे तिसरे तत्त्व आहे. हे अध्यात्म, ही जीवनदृष्टी आणि ही जीवनपद्धती घडवणारी हजारो वर्षांची परंपरा हे आमच्या हिंदूपणाचे चौथे तत्त्व आहे. या सर्वांच्या बळावरच आजचा हिंदू समाज विस्कळीत असूनही त्याला मधून-मधून एक राष्ट्र असल्याची आठवण होते. ही आठवण मनात सदैव ताजी राहण्यासाठी समाज संघटित होणे हे हिंदूराष्ट्र घडविण्याचे पाचवे तत्त्व आहे. या संघटित समाजाने वर्तमानकाळातही समृद्ध, सबळ आणि ज्ञाननिर्मितीत अग्रेसर व्हावे हे राष्ट्रघडणीचे सहावे तत्त्व आहे.
प्रतिकूल परिस्थितीत काही कंद जमिनीखाली सुप्तावस्थेत राहतात आणि हवा-पाणी अनुकूल झाल्यावर त्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन वेगाने वाढू लागतात. आजच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाची पहिली चारच तत्त्वे असल्यामुळे हे राष्ट्र जमिनीखालच्या कंदाप्रमाणे सुप्त अवस्थेत गेले आहे. संघटना आणि सर्व क्षेत्रातील विकास करून हा कंद अंकुरला पाहिजे म्हणजे आधुनिक अर्थाने राष्ट्र बनला पाहिजे.
बाह्यसृष्टी व अंतःसृष्टी यांचा समतोल
फार प्राचीन काळी भारतीयांनी बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. त्यानंतर बाह्यसृष्टीबरोबर प्रत्येकाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या आतील अंतःसृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. पुढे बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष झाले व अंतःसृष्टीच्या शोधातच भारतीय समाज रमला. नेमका त्याच काळात आधुनिक विज्ञान व समुद्रप्रवासाच्या साहाय्याने युरोपने बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा मोठा प्रयत्न चालू केला. आज आता आपल्याला दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांचे महत्त्व कळले आहे. बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू ठेवला नाही, तर पारतंत्र्य, गरीबी आणि अज्ञान वाढते. अंतःसृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्न चालू ठेवला नाही तर आयुष्यात असमाधान, दिशाहीनता आणि पोकळपणा जाणवायला लागतो. ज्या समाजात हे दोन्ही एकाच वेळी करायचा उत्साह आहे आणि तसे प्रयत्न चालू आहेत, तिथली माणसे देवमानव बनायच्या दिशेने प्रगती करू लागतात.
हिंदू आणि हिंदुत्व शब्दांचा उगम
सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना पूवच्या पार्शियन लोकांनी हिंदू म्हणायला सुरुवात केली. जिथे हिंदू लोक राहतात, तो हिंदुस्थान म्हणजेच भारत, म्हणजेच इंडिया. हिंदू समाज राहतो तो हिंदुस्थान. हिंदू समाजाची संस्कृती ती हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृती. हिंदुस्थानात उत्पन्न झालेले सर्व संप्रदाय म्हणजे हिंदू धर्म आणि त्या सर्वांचे सार म्हणजेच व्यवहार्य अध्यात्म. हिंदुस्थानची भूमी, इथला समाज, या समाजाचा इतिहास आणि परंपरा, या समाजाची संस्कृती आणि या समाजाचा आदर्श या सर्वांना मिळून मी हिंदू राष्ट्र असा शब्द वापरतो.
संस्कृतमधे एखाद्या शब्दाला ‘त्व’ ही अक्षरे जोडली तर त्या शब्दाचे सार असा अर्थ होतो. उदा. सभासद आणि सभासदत्व, व्यक्ती आणि व्यक्तित्व, पशू आणि पशुत्व. ‘त्व’या अर्थाने मराठीमधे ‘पण’ किंवा ‘पणा’ ही अक्षरे आपण जोडतो. उदा. माणूस आणि माणूसपण, घर आणि घरपण, वडील आणि वडीलपण.
याचप्रमाणे हिंदू शब्दाला ‘त्व’ अक्षरे जोडून संस्कृतमध्ये हिंदुत्व हा शब्द तयार होतो. त्याचा मराठीतला अर्थ हिंदूपणा असा आहे. हिंदूंमधली जीवनवैशिष्ट्ये त्यांची इतरांपासून वेगळी ओळख निर्माण करतात. त्यालाच हिंदूपणा किंवा हिंदुत्व म्हणायचे.
हिंदुस्थानचे राष्ट्रत्व
प्राण्यांमध्ये प्राण्यांना स्वतःची वेगळी ओळख नसते. कोणताही प्राणी त्याच्या प्रजातीचा प्रतिनिधी असतो. व्यक्तीच्या बाबतीत मात्र व्यक्ती मानवजातीची केवळ प्रतिनिधी नसते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी ओळख असते. ‘मी कोण आहे’, मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे, या ‘मी’पणाची अखंड जाणीव म्हणजे व्यक्तीचे व्यक्तित्व असते. त्याचप्रमाणे एखाद्या समाजाला आपल्या वेगळ्या परंपरेची अखंड जाणीव असणे म्हणजे त्या समाजाचे राष्ट्रत्व आहे. समाज, त्या समाजाची परंपरा आणि तो समाज जिथे पिढ्यान्पिढ्या राहिला ती भूमी या तिन्ही गोष्टी मिळून राष्ट्र बनते.
हिंदुस्थानात कृष्णाला पूजणारे लोक भारतभर आहेत. पण बिहारच्या काही भागात जरासंघाची पूजा करणारेही लोक आहेत. भारतभर रामाची पूजा करणारे लोक आहेत. पण दक्षिण भारतात रावणाचेही भक्त आहेत. वामन अवतारामधे विष्णूने बळीला पाताळात पाठवले. आपल्या देशात विष्णूप्रमाणेच बळीची पूजा करणारेही लोक आहेत. कृष्ण-जरासंध, राम-रावण, विष्णू-बळी ही सर्व आपल्या परंपरेतीलच नावे आहेत. या व्यक्तींच्या काही कृती, काही मते किंवा काही विचार आपल्याला मान्य नसतील, पण या सर्व व्यक्ती आपल्या आहेत असे मानणे व त्यांच्या गुणांचा अभिमान वाटणे म्हणजे परंपरेची अखंड जाणीव.
पृथ्वीराज चौहानने महंमद घोरीचा सतरा वेळा पराभव केला, या त्याच्या पराक्रमाचा अभिमानच आहे. परंतु शत्रू ओळखू न आल्यामुळे त्याला सतरा वेळा सोडून दिले ही त्याची चूकच झाली, असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते. हजारो रजपूतांनी केसरिया करून हौतात्म्य पत्करले या त्यांच्या शौर्याचा अभिमानच वाटला पाहिजे. परंतु माघार घेऊन त्यांना गनिमी काव्याने लढण्याचे का सुचले नाही असा विचार करण्यामध्ये काही चूक नाही. परंपरेचा अभिमान वाटूनही त्यामधील स्त्री-पुरुषांच्या उणिवा आणि चुका यांचा शोध घेण्यामध्ये आपण त्यांचे मोठेपण अमान्य करत नाही. मोठी माणसेही चुका करू शकतात कारण ती माणसेच आहेत, असा विचार राष्ट्राच्या बाबतीत करावा लागतो.
हिंदू राष्ट्राचा आदर्श काय आहे? प्रत्येकाने आपल्या स्वतःमधील शक्तीचा स्रोत अनुभवावा, इतरांना त्यांच्या त्यांच्यामधील शक्तीचा स्रोत अनुभवायला मदत करावी, हे सर्व शक्तीचे स्रोत वेगवेगळे नसून एकच आहेत हे अनुभवावे, आणि ती शक्ती व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिकाधिक प्रमाणात प्रकट करावी. हा हिंदुराष्ट्राचा आदर्श आहे. व्यवहार्य अध्यात्म मानणाऱ्या सर्व भारतीयांचा हाच आदर्श असला पाहिजे. ही माझी हिंदुत्वाची कल्पना आहे. मी हिंदू आहे. त्यामुळे मला माझे राष्ट्रीयत्व ज्या प्रकारे समजले त्यालाच मी हिंदुत्व समजतो.
हिंदुत्वातील व्यक्तिसापेक्षता आणि स्थिर तत्त्व
भारताच्या पूर्व आणि पश्चिम टोकांवर सूर्योदय वेगवेगळ्या वेळी दिसतो. कन्याकुमारी आणि लडाखमधील लेहमधून धु्रवतारा आकाशात वेगवेगळ्या उंचीवर दिसतो. पण म्हणून सूर्य आणि ध्रुव तारा बदलत नाही. तशी आपल्या प्रत्येकाची जीवनदृष्टी थोडी थोडी वेगळी असेल. पण आपल्या सर्वांच्या जीवनदृष्टीची तुलना केली, तर त्यातला समान भाग बराच जास्ती आहे. तीच आपल्या हिंदू राष्ट्राची जीवनदृष्टी असेल. एका वाक्यात सांगायचे झाले, तर हिंदू जीवनदृष्टी म्हणजे आत्म्याचा अनुभव. तो सर्व लोकांना सर्व काळात, सर्व स्थळी एकच येतो. पण त्याचे प्रकटीकरण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या जागी वेगळे होते. म्हणूनच सारी मानवजात एक. पण राष्ट्रे अनेक आहेत. त्यांचे राष्ट्रीत्व ही वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होते.
भारताने सगळ्या जगासमोर उदाहरण म्हणून राहायचे असेल, तर भारताला जगाशी संबंध तोडून चालणार नाही. प्राचीन इतिहासातील तर आपल्याला काही माहिती नाही, पण इ. स. ६०० नंतर इ. स. १००० पर्यंत सरासरी दर दहा वर्षांनी भारतातून बौद्ध भिक्षूंचा एक संघ चीनमध्ये जायचा, अशी इतिहासात नोंद आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच सगळा पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया भारतीयांनी आपल्या संपर्कात ठेवला होता. नंतर एक हजार वर्ष हा संपर्क थांबला. पारतंत्र्याबरोबरच जगाविषयीचे अज्ञान भारतात वाढत गेले. विवेकानंदांपासून भारतीयांनी पुन्हा भारताबाहेर जाण्याची पद्धत सुरू झाली.
हिंदूपणा कसा व्यक्त करू या
आजच्या काळातील हिंदुत्व म्हणजे काय, असा विचार आपल्याला करावाच लागेल. १) सर्व व्यक्तींमधील व सर्व जगातील एकाच जाणीव असलेल्या समान शक्तीवरती विश्वास, २) समाज टिकण्यासाठी व संस्कृतीचे जतन करण्यासाठी कुटुंबसंस्थेच्या आवश्यकतेवर विश्वास, ३) पैसा हे साध्य नसून साधन आहे यावर विश्वास, आणि ४) आपण पुढाकार घेऊन जगातील इतर राष्ट्रांशी देवाण-घेवाण चालू ठेवली, तरच आपण ‘जगत् हिताय च’ काम करू शकू यावर विश्वास, या चार गोष्टींवर विश्वास असणे म्हणजे आपला हिंदूपणा किंवा आपल्यातील हिंदुत्व आहे. हा विश्वास आपल्या वागण्यातून व्यक्त व्हायचा असेल तर १) चातुर्वर्ण्य आणि जातींची उतरंड यांच्या चौकटीबाहेर पडलेले आणि सर्व जातींमधील सर्व स्त्रिया आणि सर्व पुरुषांचा व्यक्ती म्हणून आदर करणारे समाजजीवन, २) देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची अखंड जागती जाणीव असणारे समाज, शासन आणि सैन्य, ३) भारतीय संस्कृतीतील चांगले ते टिकवण्याची आणि प्रयोगशील राहून नवीन भर घालण्याची धडपड करणारे समाजातील नेते व कार्यकर्ते आणि ४) भौतिकशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांच्या प्रगतीचा समतोल राखणारे वैज्ञानिक, या चार गोष्टी एकत्रित व्हायला लागतील.