परवा एका ज्येष्ठ मित्राबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलणे चालले होते. बुद्धिबळ खेळणारा संगणक, कविता लिहिणारा संगणक, चित्रे काढणारा संगणक, मान्सूनचा अंदाज वर्तवणारा संगणक या सर्वांमधून बुद्धिमत्तेचीच झलक दिसत असते. संगणकशास्त्रामध्ये अधिकाधिक प्रगती होऊन मानवी मेंदूपेक्षा कार्यक्षम संगणक तयार करण्याचे स्वप्न अनेकांच्या मनात असते. असा संगणक तयार झालाच तर त्याची कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर मात करील का? या प्रश्नावर आम्ही बोलत होतो.
जोपर्यंत संगणक अशा व्हाॅल्टेज स्टॅबीलायझरवर अवलंबून आहे तोपर्यंत संगणकाची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होणे शक्य नाही.
गप्पा संपल्यावर मला एकदम सुचले की हे होणे शक्य नाही. याचे कारण व्होल्टेज स्टॅबिलायझर ! कोणताही संगणक घेतला तरी त्याला लागणारी ऊर्जा विजेच्या स्वरूपात पुरवावी लागते. वीजपुरवठा अनियमित असेल तर संगणक नीट चालत नाही. वीज, पुरवठा नियमित असला तरी तो विशिष्ट दाबाने व्हावा लागतो. कमी दाब असला तरी संगणक चालणार नाही आणि जास्त दाब असला तरी चालणार नाही. बाहेरून कमी-जास्त होणारा वीजपुरवठा नियंत्रित करून विशिष्ट दाबाने तो संगणकाला पुरवण्याचे काम व्होल्टेज स्टॅबिलायझर करतो. सगळ्याच विद्युत उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर लागतो. तो वेगळा जोडलेला असेल कवा आतमध्येच बसवलेला असेल. परंतु तो अपरिहार्य आहे. जोपर्यंत संगणक अशा व्होल्टेज स्टॅबिलायझरवर अवलंबून आहे, तोपर्यंत संगणकाची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होणे शक्य नाही.
मानवी बुद्धिमत्तेच्या कामात अशी मर्यादा कोणती आहे? शरीर व मनाचे आरोग्य राखणारा आहार, भावनिक संतुलन, बुद्धीचा नियमित वापर या सर्व गोष्टी व्होल्टेज स्टॅबिलायझरसारखेच काम करतात. या गोष्टी कमी असून चालत नाही. जास्त असून पण चालत नाही. पण या सर्वातून मिळणाऱ्या ऊर्जेशिवाय मानवी बुद्धिमत्ता आणखी एका प्रकारेसुद्धा कार्यरत होते. हा दुसरा मार्ग प्रेरणेचा आहे. प्रेरणेतून मिळणारी शक्ती आहार, व्यायाम, भावनिक संतुलन यांतून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा वेगळीच आहे. या शक्तीला स्टॅबिलायझरचा नियम लागू नाही. तिला एकाच बाजूने मर्यादा आहे. प्रेरणा शून्य असेल तर मानवी बुद्धीसुद्धा काम करत नाही. प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी काम करायला लागते. पण याला विजेच्या दाबासारखी मर्यादा नाही. प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी कामच करायची थांबली असे होत नाही. बुद्धी अधिकाधिक कार्यक्षम होत जाते. प्रेरणेच्या शक्तीने काम करण्याचा हा दुसरा मार्ग संगणकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला उपलब्ध नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता कधी मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होईल असे वाटत नाही.
प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी कामच करायची थांबली असे होत नाही. बुद्धी अधिकाधिक कार्यक्षम होत जाते.
प्रेरणा वाढविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. “जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाउच जाऊ” असे आपण पद्यात म्हणतो. “जिथे जायचे ठरले” हे कसे ठरते? भविष्यवेध घेणे हा एक मार्ग हे ठरवण्यासाठी उपलब्ध आहे. प्रबोधिनीचा भवितव्य लेख तयार करताना भविष्यवेधशास्त्रातली काही तंत्रे आपण वापरली. कुठे जायचे? का जायचे? त्यासाठी काय करायचे? हे स्पष्ट असेल व मनापासून जिथे जायचे ठरले तेथे जावेसे वाटत असेल तर प्रेरणा वाढतेच वाढते. त्यामुळे प्रबोधिनीतील सदस्य आणि विद्यार्थ्यांनी आपापला भविष्यवेध घेऊन स्वत:चा भवितव्य लेख मांडायचा प्रयत्न केला तरच प्रबोधिनीच्या भविष्यवेधातून आपणा सर्वांना वाढती प्रेरणा मिळणार आहे.
माझ्या कल्पनेतील “उद्या” प्रत्यक्षात येण्यासाठी “मला” किती बदलायला हवे याचा विचार आपण करतो का?
प्रबोधिनीतील सर्वांचाच विचार करायचा झाला तर आपण स्वत:, आपले कुटुंब आणि आपला प्रबोधिनीतील विभाग कोणत्या दिशेने चालले आहेत हे आपण किती पाहात असतो? “उद्या” मी स्वत:, माझे कुटुंब, माझा प्रबोधिनीतला विभाग कसा असला पाहिजे याचे काही चित्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे का? माझ्या कल्पनेतील “उद्या” प्रत्यक्षात येण्यासाठी “मला” किती बदलायला हवे याचा विचार आपण करतो का? आज मी करत नाही असे मला आणखी काय करायला हवे? आज मी करत आहे असे मला काय थांबवायला हवे? स्वत:च्या भवितव्याचा विचार करताना आपण कितीजणांना तो विचार करण्यात सामावून घ्यायला तयार आहोत? एकाच विभागात, एकाच खोलीत, एकाच प्रकारचे काम करणाऱ्यांच्या मनातली “उद्या” ची कल्पना वेगवेगळी असू शकते. ती परस्परांना सांगून त्यातून आपल्या सर्वांच्या “उद्या” ची कल्पना स्पष्ट होते. प्रबोधिनीचा वीस वर्षांचा भवितव्य लेख प्रत्यक्षात अवतरायचा असेल तर वीस वर्षांनी आपण सगळे कसे असणार आहोत याचे आपापले चित्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात तयार व्हायला लागेल.