निरर्थक रूढी आणि सार्थ प्रथा
लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’च्या पहिल्या पानावर ‘स्वयमेव मृगेन्द्रता’ या श्लोकाची एक ओळ छापलेली असायची. सिंहाचे वनराज असणे त्याच्या कृतीतूनच सिद्ध होते, त्यासाठी इतरांनी राज्याभिषेक करायला लागत नाही, हा त्या श्लोकाचा भावार्थ. या ओळीप्रमाणेच लोकमान्यांच्या काळात ‘केसरी’ने महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व केले. एखादे सुवचन ध्येय म्हणून शीर्षस्थानी छापणे ही ‘केसरी’च्या बाबतीत सार्थ प्रथा होती. इतरही अनेक साप्ताहिके व दैनिकांच्या मुखपृष्ठावर किंवा अग्रलेखाच्या पानावर शीर्षस्थानी एखादे सुवचन छापलेले असते. ते ध्येयाची घोषणा म्हणूनच छापलेले असते. पण त्या सुवचनाशी म्हणजे ध्येयाच्या घोषणेशी कृतीचा संबंध राहिला नाही म्हणजे ते सुवचन छापणे ही निरर्थक रूढी बनते.
प्रबोधिनीच्या मासिक वृत्ताच्या शीर्षस्थानी ‘घडो ज्ञानाचा उद्बोध । भक्तिप्रेमाचा कल्लोळ’ ही ओळ छापलेली असते. मासिक वृत्त वाचणाऱ्यांपैकी सात-आठ जणांना विचारले की ‘ही ओळ आपण का छापतो ?” “वाचायला चांगले वाटते”, “छान अर्थ आहे”, अशी उत्तरे मिळाली. आणखी एकाने सांगितले, ” ‘अविद्यया मृत्युं तीर्वा विद्यया अमृतम् अश्नुते’ या आपल्या संस्कृत बोध-वाक्याचा अर्थ एकदम कळत नाही म्हणून ही मराठी बोध-वाक्याची ओळ छापत असू.” ही उत्तरे ऐकून आपण ही ओळ का छापायला सांगितली या विचारात मी पडलो.
उक्तीप्रमाणे कृतीचे वृत्त-निवेदन
गेल्या चौदा-पंधरा वर्षांचे मासिक वृत्ताचे अंक माझ्याकडे धारिणीला लावलेले आहेत. ही सर्व वृत्ते मी एकदा एकत्र पाहिली. पाहताना मराठी बोध-वाक्याप्रमाणे प्रबोधिनीचे काम होते आहे असे या वृत्तांमधून जाणवते का ? असा प्रश्न मनात ठेवला. प्रत्येकाला “ज्ञानाचा उद्बोध” आणि “भक्तिप्रेमाचा कल्लोळ” यांचा अर्थ त्याच्या त्याच्या चिंतनाप्रमाणे कळत असतो. त्यामुळे बोधवाक्याच्या दिशेने काम झाले आहे की नाही हे ठरविणे ज्याला त्याला समजलेल्या अर्थावर अवलंबून राहते. मग विचार केला की आधी ज्या संतांनी ही ओळ लिहिली त्यांच्या मनात काय अर्थ होता हे पाहावे.
संत एकनाथांचा अभंग
बरीच शोधाशोध केल्यावर आणि अनेकांना सांगितल्यावर श्री. व्यंकटराव भताने यांनी आळंदीच्या एका कीर्तनकारांकडून ही ओळ असलेला अभंग मिळवून दिला. तो अभंग असा आहे :
धन्य जगी तोचि एक हरि रंगी नाचे ।
राम कृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे ।। १ ।।
सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ।
ज्ञानाचा उद्बोध भक्ति प्रेमाचा कल्लोळ ।। २ ।।
विषयी विरक्त जया नाही आप पर ।
संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ।। ३ ।।
जाणीव शाहणीव ओझे सांडुनीया दूरी ।
आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ।। ४ ।।
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ।। ५ ।।
साक्षात्कार झालेल्या भक्ताचे, जीवन धन्य झालेल्या व्यक्तीचे हे चित्रण आहे. आपण बोध-वाक्य म्हणून मधलीच ओळ निवडली आहे. शिवाय ‘घडो’ हा शब्द जास्तीचा जोडलेला आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञानाचा उद्बोध झाला आहे, ज्याच्या आयुष्यात भक्ती प्रेमाचा कल्लोळ दिसतो असा माणूस प्रबोधिनीतून घडायला पाहिजे हा आपल्या बोध-वाक्याचा अर्थ आहे.
स्थिती आणि कृती दर्शविणारे शब्द
या मराठी बोध-वाक्यात ‘ज्ञान’ आणि ‘भक्ति-प्रेम’ हे मनाची स्थिती दाखविणारे शब्द आहेत. ‘उद्बोध’ आणि ‘कल्लोळ’ यातून काहीतरी बदल, घडामोड, हालचाल किंवा कृती व्यक्त होते. या शब्दांचे कोणते अर्थ एकनाथांच्या मनात असावेत हे वरील अभंगाच्या साहाय्यानेच शोधायचा प्रयत्न केला.
“ज्ञान” दर्शविणारे तीन चरण व एक पूर्ण ओळ आहे. ‘सुख दुःख समान’, ‘विषयी विरक्त’, ‘संतुष्ट सर्वदा स्वये’ हे तीन चरण व ‘जाणीव शाहणीव ओझे सांडुनीया दूरी’ ही ओळ ज्ञान झाल्याची स्थिती दाखवतात.
“उद्बोध” दर्शविणारेही तीन चरण व एक ओळ आहे, ‘सकळ जीवांचा कृपाळ’, ‘जया नाही आप पर’, ‘व्यापक निर्धार’, हे तीन चरण आणि ‘आपण वस्तीकर वर्ततसे संसारी’ या ओळीतून ज्ञानाचा उद्बोध म्हणजे ज्ञानाचे वागणुकीतून प्रकटीकरण दिसते.
“भक्तिप्रेम” दर्शविणाऱ्या दोन ओळी आहेत. ‘राम कृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे’ आणि ‘आसनी शयनी सदा हरीचे चिंतन’ या ओळींमधील ‘सदा स्मरे’ आणि ‘सदा चिंतन’ हे शब्द भक्ति-प्रेमाने मन भारल्याची स्थिती दाखवतात.
“कल्लोळ” दर्शविणाऱ्या दोन ओळी आहेत. ‘धन्य जगी तो चि एक हरि रंगी नाचे’ आणि ‘एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन’ या ओळींमधील ‘हरि रंगी नाचे’ आणि ‘नित्य हरीचे कीर्तन’ हे शब्द भक्ति-प्रेमाचा कल्लोळ म्हणजे मनातील भाव कृतीतून उसळणे दाखवतात.
आपण ध्येयाच्या कोणत्या टप्प्याला आहोत ?
अभंगातील ‘उद्बोध’ दर्शविणाऱ्या चरणांचा अर्थ मला पुढीलप्रमाणे वाटतो. ‘सकळ जीवांचा कृपाळ’ म्हणजे सर्वांचे हित पाहणारा. ‘जया नाही आप पर’ म्हणजे निःस्वार्थी. ‘व्यापक निर्धार’ म्हणजे राष्ट्राच्या आणि मानवतेच्या हितासाठी न कंटाळता अविरत झटणारा. आणि ‘आपण वस्तीकर वर्ततसे संसारी’ म्हणजे कामाच्या श्रेयाच्या मोहात न अडकणारा. ही सगळी लक्षणे सहज वागण्यात दिसायला लागली म्हणजे ज्ञानाचा उद्बोध झाला. पण ज्ञान होण्यासाठी आधी या लक्षणांप्रमाणे ठरवून वागावे लागते. त्याला ज्ञानाचे प्रबोधन करणे म्हणता येईल. आधी प्रयत्नपूर्वक प्रबोधन. त्यामुळे ज्ञान. त्या ज्ञानाचा नंतर सहज उद्बोध असा क्रम मला दिसतो. आपले काम प्रबोधनासाठी होते आहे ना, हे मासिक वृत्तातून तपासले पाहिजे.
‘नित्य हरीचे कीर्तन’ आणि ‘हरि रंगी नाचे’ यातून भक्ती प्रेमाचा कल्लोळ दिसतो. आपला हरी म्हणजे आपली मातृभूमी. मातृभूमीच्या उत्थान कार्यात आपण रमून जाणे आणि इतरांना या कार्याची गोडी लावणे हाच आपला मातृभूमी रंगी नाच आणि हेच मातृभूमीचे कीर्तन. मनात मातृभूमीचे प्रेम आणि भक्ती जागी व्हावी म्हणून आधी हा देशभक्तीचा गजर करायचा. गजर करता करताच सदा मातृभूमीचे स्मरण आणि चिंतन असे भक्ती-प्रेम निर्माण होईल. आधी प्रयत्नपूर्वक गजर. त्यामुळे भक्ति-प्रेमाचा नित्य अनुभव. त्यातून सहज कल्लोळ असा क्रम दिसतो. एकनाथांच्या अभंगामुळे आपल्या बोध-वाक्यात मला प्रबोधन आणि गजराचे साधन दिसले. तुम्हाला काय दिसते ?
सौर कार्तिक १, शके १९३० दि. २३/१०/२००८