५. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : समग्रता

निरीक्षण आणि तुलना

मागच्या आठवड्यात महेंद्रभाईबरोबर सोलापूरहून पुण्याला येत होतो. शेजारी दोन डच ज्येष्ठ नागरिक बसले होते. भारतातला दोन महिन्यांचा प्रवास संपवून परतीच्या मार्गावर होते. त्यातील एक जण वेळ घालविण्यासाठी ‘सुडोकू’ ची कोडी सोडवत बसला होता. महेंद्रभाईंनी चौकशी केल्यावर ‘हे डच भाषेतील शब्दांचे ‘सुडोकू’ कोडे आहे, आकड्यांचे नाही’, अशी माहिती त्याने पुरवली, वर जाता जाता एक शेरा मारला, “आकड्यांचे सुडोकू तुम्हा भारतीयांसाठी. तुम्ही गणितात हुशार असता. आमच्यासाठी शब्दांचे सुडोकूच बरे. आम्हाला तुमच्या इतकी गणितात गती नाही”. ही तुलना नसून त्याची दोन व्यक्तिगत निरीक्षणे त्याने सांगितली. प्रत्यक्षात अशी स्थिती असेलच असे नाही.

मग महेंद्रभाईंच्या आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या. त्याचा हा भारतातला तिसरा प्रवास आहे कळल्यावर महेंद्रभाईंनी ‘गेल्या काही वर्षात भारतात काही बदल झाल्याचे तुम्हाला जाणवते आहे का ?’ असे विचारले. ‘सुबत्ता वाढलेली जाणवते,’ असे त्यांनी सांगितले. हे ही एक निरीक्षणच.

पण पुढे त्याने एक तुलना मांडली. तो म्हणाला, “जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत पाच सहा भारतीयांची नावे एका वर्तमानपत्रात नुकतीच वाचली. भारतीयांची नावे अशी अलीकडेच झळकायला लागली आहेत. हे सुबत्ता वाढल्यामुळेच झाले. पण गरीब लोकांची संख्याही वाढलेली दिसते. सुबत्तेबरोबर विषमताही वाढलेली दिसते. आमच्या हॉलंडमध्ये असे नाही. अब्जाधीश कोणी नाहीत. पण गरीबही कोणी नाहीत. श्रीमंत लोक आहेत. पण श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये फार डोळे दिपवून टाकणारा फरक नाही.” ही मला तुलना वाटते.

गणितात गती आहे किंवा नाही आणि कोणाला किती गती आहे या निरीक्षणांना काही आधार नाही. ते व्यक्तिगत अनुभव आहेत. पण वाढलेली सुबत्ता, अब्जाधीशांची संख्या, श्रीमंत-गरीबांमधील फरक, ही तुलना सर्वांना खुल्या असलेल्या माहितीच्या आधारे केली आहे.

तुलना आणि समावेशकता

दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या समोर ठेवल्या आणि सर्वांना समजेल किंवा उपलब्ध होईल अशा माहितीच्या आधारे त्यातील फरक किंवा साम्य दाखवले की तुलना होते. साम्याचे मुद्दे जास्त असतील तर सारखेपणा आहे असे आपण म्हणतो. फरकाचे मुद्दे जास्त असतील तर वेगळेपणा आहे असे आपण म्हणतो. पण फक्त साम्याचे मुद्देच पाहिले व फरकाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले तर वेगळेपणा असूनही सारखेपणा वाटायला लागतो. यालाच ‘विविधतेत एकता’ असे म्हणतात. ही जाणूनबुजून एकाच गटात समावेश करण्याची रीत आहे. याला समावेशकता म्हणतात.

राजकीय पक्षाचे सदस्यत्व किंवा क्लबचे सभासदत्व सदस्यता शुल्क भरल्यावर मिळू शकते. भिन्न स्वभावाच्या व्यक्ती ‘पक्षाचे सदस्य’ किंवा ‘क्लबचे सभासद’ अशी आपली ओळख सांगतात. ही समावेशकता. अठरापगड लोक गणवेशाची टोपी घातली की एका संघटनेचे म्हणून ओळखू येतात. ही समावेशकता. उलट फरकाच्या मुद्यांकडेच पाहिले की अनेक बाबतीत सारखेपणा असूनही फुटीरता वाढते. गटबाजी, पंथांची निर्मिती, वेगळ्या जागेची मागणी, फाळणी, वाटणी हे सर्व फुटीरतेमुळे येते. तुलना करताना समावेशकता वाढावी किंवा फुटीरता वाढावी यापैकी कोणताही हेतू मनात असू शकतो.

समावेशकता आणि समग्रता

प्रबोधिनीचे काम सर्वसमावेशक आहे की समग्र आहे ? आपण धोरण म्हणून बुद्धिपूर्वक साम्याच्या मुद्यांवर भर देऊन काम करत असलो तर आपले काम सर्वसमावेशक आहे. आपण स्वभाव म्हणून हृदयपूर्वक आणि बुद्धिपूर्वक साम्याचे मुद्दे पाहत असलो तर आपले काम समग्र आहे. एखाद्या संघटनेचा स्वभाव तिचे ध्येय, कार्यक्रम आणि सदस्यांचा व्यवहार यातून घडत असतो. त्याचप्रमाणे संघटनेच्या सदस्यांचा व्यवहार संघटनेच्या स्वभावाप्रमाणे होत असतो. आपण सदस्यांच्या प्रबोधिनीपणाचा विचार सर्वसाधारण आणि विशेष प्रबोधिनीपणाच्या गुणांच्या आधारे करतो. प्रबोधिनीच्या प्रबोधिनीपणाचा म्हणजेच प्रबोधिनीच्या स्वभावाचा शोध घेतला तर ‘समग्रता’ हाच प्रबोधिनीच्या स्वभावाचा पहिला व मुख्य पैलू होईल. समग्रता म्हणजे सर्वसमावेशकता आणि एकात्मता. सर्वसमावेशकता बुद्धिपूर्वक वाढवता येते. एकात्मता हृदयाने अनुभवावी लागते.

प्रबोधिनीतील समग्रता
  1. अखंड मातृभूमीची चित्रमूर्ती आणि अखंड मातृभूमी अजिंक्य व्हावी ही प्रार्थना यामध्ये समग्रता आहे.
  2. ‘होती अनेक हृदये जरि एकरूप’ या सदैव जपायच्या मंत्रात समग्रता आहे.
  3. ज्ञान-कर्म-युत भक्ति-व्रत आचरण्यामध्ये समग्रता आहे.
  4. हे व्रत इतिहास-निसर्ग-माने ठरवण्यामध्ये समग्रता आहे.
  5. विज्ञान-ज्ञान-अभ्यास देशस्थितीचा समतोल चालण्यामध्ये समग्रता आहे.
  6. शारीरिक-मानसिक-बौद्धिक आत्मिक विकासाचा विचार करण्यामध्ये समग्रता आहे.
  7. शिक्षण-संशोधन उद्योग-ग्रामविकसन-आरोग्य संघटन एकत्र चालण्यामध्ये समग्रता आहे.
  8. वीर आणि तत्त्वज्ञ कार्यकर्ते घडावेत या अपेक्षेमध्ये समग्रता आहे.
  9. डाव्या-उजव्या मेंदूंच्या गुणांची जोपासना करण्यात समग्रता आहे.
  10. प्रादेशिक व सामाजिक गटांच्या विकासाचा असमतोल दूर करण्यामध्ये समग्रता आहे.
  11. व्यक्तिगत संसार करूनही राष्ट्रसेवा करणे व संन्यस्त वृत्तीने राष्ट्रसेवा करणे हे दोन्ही आदर्श समान महत्त्वाचे मानण्यामध्ये समग्रता आहे.
  12. भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊन आध्यात्मिक ज्ञानाने अमृतत्व अनुभवणे हे समग्रतेचे मुख्य सूत्र आहे.

राजकीय, भाषिक, आर्थिक, सांप्रदायिक गटांमध्ये सामंजस्याचे पूल बांधणे हा समग्रतेचा व्यावहारिक कार्यक्रम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संघटना घडविणे हा समग्रतेचा व्यावहारिक कार्यक्रम आहे. हिंदुस्थानमध्ये समग्रतेच्या पायावर समाजसंस्थापना करणे हे प्रबोधिनीला घडलेले हिंदुत्वाचे दर्शन आहे.

सौर चैत्र १, शके १९३० दि. २१/३/२००८