६. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सहविचार

संघर्षातून विचारविनिमय

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प आणि त्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीमती मेधाताई पाटकर ही नावे महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेशातील बहुतेक जणांनी ऐकलेली असतात. या आंदोलनामुळे मोठे प्रकल्प करावेत की नाहीत ? आणि मोठ्या प्रकल्पातील विस्थापितांचे पुनर्वसन कोणी ? कधी ? कुठे ? कसे ? करावे हे प्रश्न चर्चेमध्ये आले. सुमारे वीस वर्षांपूर्वी पुण्याच्या प्रशालेतील एक माजी विद्यार्थिनी तिथे सहा महिने जाऊन आली तेव्हा या विषयाच्या तपशीलात मी विचार सुरू केला. माझे व्यक्तिगत मत मोठे प्रकल्प करून पाहिले पाहिजेत असे असल्याने मी मुख्यतः पुनर्वसनाच्या प्रश्नावरील चर्चा समजून घेत होतो. महिना-दीड महिन्यापूर्वी सरदार सरोवर प्रकल्पाच्या मानाने अतिशय छोट्या अशा महाराष्ट्रातील निळवंडे प्रकल्पामध्ये ‘पाणी अडविण्यापूर्वी पुनर्वसन पूर्ण’ अशी बातमी वाचली. मला ती बातमी वाचल्यावर मेधाताई पाटकरांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून कोणीतरी शिकले याचा आनंद झाला. आंदोलनाच्या निमित्ताने समाजमानसात जी काही साधकबाधक चर्चा झाली त्याला मी नाव दिले ‘संघर्षातून विचारविनिमय’. यातून समाजाचे सावकाश शिक्षण होत गेले. आणि एका छोट्या प्रकल्पाच्या बाबतीत तरी न्याय्य अपेक्षेप्रमाणे पुनर्वसन झाले.

न्यायालयीन प्रक्रियेतून विचारविनिमय

एप्रिल २००८ च्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या खंड-पीठाने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षणाच्या केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी २७% जागा राखीव ठेवाव्यात असा निर्णय एकमताने दिला. दोन वर्षे चाललेल्या वादावर या निमित्ताने पडदा पडला. केंद्र सरकार, विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अशा सर्वांनी २७% राखीव जागा मुद्यावर वेगवेगळ्या बाजू घेतल्या आणि हिरिरीने मांडल्या. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही आवश्यक तर जागा वाढवून २७% आरक्षण द्यावे अशी सूचना केली. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, कायदेशीर, घटनात्मक आणि राजकीय अशा कितीतरी बाजू या आरक्षणाच्या प्रश्नाला होत्या. अनेकांनी आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडले. शेवटी खंडपीठाने निर्णय दिला. सर्वांनी तो निर्णय स्वीकारला. इथे निर्णय झाला पण विचारविनिमयातून शिक्षण झाले की नाही, हे सांगता येत नाही.

प्रश्न सोडविण्यासाठी विचारविनिमय

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ‘द थर्टीन डेज्’ या नावाचे एक पुस्तक वाचल्याचे मला आठवते. तेव्हा तीन-चार वेळा त्या पुस्तकाचे पारायण केले होते. एक आणीबाणीचा प्रसंग १९६१ साली उद्भवला होता. अमेरिकेच्या किनाऱ्यापासून शे-दीडशे किलोमीटर अंतरावरच्या क्यूबा या बेटावरच्या देशाच्या सरकारने रशियाला आपल्या बंदरांमध्ये अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे बसवायची परवानगी दिली. तशी क्षेपणास्त्रे बसलीही आणि मग अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याला याची बातमी लागली. तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. केनेडी यांनी सैन्य, गुप्तहेर खाते, गृहखाते, परराष्ट्रखाते अशा वेगवेगळ्या विभागातील सल्लागारांना एकत्र बोलावले. सतत तेरा दिवस आणि रात्री त्या सर्वांच्या विचारविनिमयाच्या फैरींवर फैरी झाल्या. क्यूबावर आणि रशियावर अण्वस्त्रांचा हल्ला करायची तयारी तर एका बाजूला चालू ठेवायची, पण अण्वस्त्रे वापरायची वेळ येणार नाही आणि रशिया आपली अण्वस्त्रे क्यूबाच्या भूमीवरून परत नेईल असा दबाव रशियाचे अध्यक्ष श्री. कुश्चेव्ह यांच्यावर चर्चेतून वाढवत न्यायचा, असा दुहेरी व्यूह या चर्चागटाने आखला. रशियाच्या प्रत्येक प्रतिसादानंतर केनेडी आपल्या सल्लागारांची चर्चा कशी घ्यायचे आणि सर्वांनी आपले मत सांगितल्यावर पुढच्या पाऊलाचा निर्णय कसा घ्यायचे याचे वर्णन ‘द थर्टीन डेज्’ या पुस्तकात आहे. तेराव्या दिवशी रशियाने अण्वस्त्रे मागे घ्यायला सुरुवात केली आणि अमेरिकेच्या सुरक्षेविषयीची आणीबाणी संपुष्टात आली. इथे प्रश्नाचे उत्तर शोधून तो सोडविण्यासाठी विचारविनिमय झाला.

समग्र दर्शनासाठी विचारविनिमय

वर तीन प्रसंग दिले आहेत. एकात समाजमानस थोडेसे बदलले. एकात निर्णय झाला. एकात प्रश्न सुटला. केवळ एकाने विचार करून या तीनही प्रसंगांमधील विषयाच्या सर्व बाजू पुढे आल्या नसत्या. वाद-प्रतिवाद, शंका-समाधान, सूचना-प्रतिप्रश्न अशा वेगवेगळ्या पद्धतींनी विचारविनिमय किंवा विचारांची देवाण-घेवाण झाली. केनेडी निर्णय घेत गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला. सरदार सरोवराच्या निमित्ताने झालेल्या विचारविनिमयातून दृष्टिकोन बदलल्यामुळे निळवंडे प्रकल्पात नव्या जाणिवांमधून निर्णय झाला. केनेडींनी निर्णय घेत राष्ट्राचे नेतृत्व केले. सर्वोच्च न्यायालयाने किंवा निळवंडे प्रकल्प अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले. विचारविनिमयामुळे ते ते निर्णय व केनेडींचे नेतृत्व एकांगी न होता सर्वांगीण किंवा समग्र झाले. परिस्थिती अनेक बाजूंनी समजणे हा विचार-विनिमयाचा मुख्य लाभ आहे.

विचारविनिमय म्हणजेच सहविचार

प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत ‘विचारविनिमयात्मक नेतृत्वपद्धती’ हे शब्द एका दमात उच्चारायला अवघड जातात अशी तक्रार काही जणांनी केली. त्यावर उपाय म्हणून ‘विचारविनिमयात्मक’ ऐवजी ‘सहविचारात्मक’ असा शब्द सुचला व तो रूढ करायचे ठरले. प्रबोधिनीचे संचालक सहविचारात्मक पद्धतीने नेतृत्व करतील एवढेच सुरुवातीला ठरले होते. पण नंतर लक्षात आले की नेतृत्व करणाऱ्याप्रमाणे गटातील सदस्यांनाही सहविचाराचा अनुभव पाहिजे. गेल्या पंचवीस वर्षांत वाढत्या प्रमाणात आपण सहविचारात्मक कार्यशैलीचा वापर करत आलो आहोत. आपल्या विचारात व कामात समग्रता येण्यासाठी सहविचार अत्यावश्यक आहे असे जाणवत राहिले आहे. म्हणूनच प्रबोधिनीच्या प्रबोधिनीपणाचा किंवा स्वभावाचा समग्रतेनंतरचा दुसरा पैलू सहविचार आहे.

सौर वैशाख १, शके १९३० दि. २१/४/२००८