नेतृत्वविकसनातील पहिला प्रयोग
१९९२ साली प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त काढलेल्या स्मरणिकेत पुढील परिच्छेद आहे:
“नेतृत्व म्हणजे त्या त्या क्षेत्रात नवे सुचून ते प्रत्यक्षात आणता आले पाहिजे अशी कल्पना केली. एखाद-दुसऱ्या गावाऐवजी पंचवीस गावांच्या खोरे विकसनाची योजना आखली ती त्यामुळे. आयुर्वेदिक सूक्ष्मौषधे बनवून त्यांच्या प्रसाराचा प्रयत्न केला तो त्यामुळे ! मराठीत शिकलेल्यांना सर्व विषय एकदम इंग्रजीतून देवनागरी लिपीचा वापर करून शिकवण्याचा प्रयोग केला तो त्यामुळे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना तामिळनाडूत दुष्काळी गावात हातपंप बसवायला पाठवले आणि पदवीधर युवतींना पंजाबात अतिरेक्यांची समजूत घालायला पाठवले, ते ही नेतृत्वाच्या या कल्पनेमुळेच. कुशल कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावातच यंत्रकुटिर सुरू करायला प्रोत्साहन दिले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फटाके विक्रीत लाखांचे व्यवहार करायला लावले आणि शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात तीस ठिकाणी शिबिरे घ्यायला पाठविले ते ही नेतृत्वाची ही वैशिष्ट्यपूर्ण कल्पना समोर ठेवल्यामुळेच ! दारूबंदीचे अभियान असेल, संस्कारांच्या नवीन पोथ्या असतील किंवा आता पंचवीस वर्षे जुने झालेले गणेशोत्सवातील बर्ची नृत्य असेल, सर्वच केले ते ‘समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नवीन रुजवून दाखवू’ या इच्छेने. नवे रुजवणे, नवे शिकविणे म्हणजे नेतृत्व !”
प्रबोधिनी – एक प्रयोगभूमी
दोन वर्षांपूर्वीच्या एका प्रकट-चिंतनात परिस्थिती ज्ञानाचे तास, गटकार्यांचा अभ्यासक्रम, निर्णय कौशल्यांचे संशोधन, प्रतिभा-विकसनाचे अभ्यासक्रम, पुण्यातील सातवी शिष्यवृत्ती योजना, सोलापूरची विद्याव्रत शिबिरे, निगडीतील देह-परिचय उपक्रम, हराळीची समाज-संपर्क अभियाने, साळुंब्यातील पवनामाईचा उत्सव हे सर्व प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिभाशक्तीने फुलवलेले उपक्रम आहेत असे म्हटले होते.
नव-विचारांचे प्रात्यक्षिक करणारी संघटना
त्रिमितीतील प्रतिकृती करण्याच्या मार्गदर्शन पुस्तिकेपासून बचत गट संचालनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेपर्यंत, शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीच्या प्रशिक्षणापासून गावात घरटी एक विरजक (फिल्टर) पोचवण्यापर्यंत, डोंबिवली केंद्राच्या रात्र-शिबिरापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्यांच्या समाज-दर्शन शिबिरापर्यंत, काश्मिरी युवकांना महाराष्ट्र-दर्शन घडविण्यापासून महाराष्ट्रातील दोनशे युवकांना ईशान्य भारत दर्शन घडविण्यापर्यंत, अभिक्षमता मापनाच्या संगणकीय चाचण्यांपासून संगीत शिक्षण व अभिव्यक्तीसाठी प्रेरणा-जागरणाच्या संशोधनापर्यंत, भविष्यवेधशास्त्रातील प्रकल्पांपासून मातृभूमी पूजनाच्या कार्यक्रमांपर्यंत, उपासना-केंद्रापासून विज्ञान प्रयोगशाळेतील प्रकल्पांपर्यंत दलांची विविध रूपे, यातून नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन प्रात्यक्षिके यांचे असे आविष्कार प्रबोधिनीत सतत होत असतात.
प्रबोधिनीच्या प्रबोधिनीपणाचा चौथा पैलू
प्रबोधिनीच्या प्रबोधिनीपणाचे समग्रता हे पहिले लक्षण आपण आधीच्या एका लेखात पाहिले. समग्रतेमध्ये जुने आणि नवे, भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही येते. आजपर्यंत केले नाही असे उद्या काय करणार ? उद्यासाठी नवे सुचणे म्हणजे सर्जनशीलता. नवे सुचलेले प्रत्यक्षात आणता येणे म्हणजे खरे स्वावलंबन. नवे सुचण्याचा मक्ता कोणा एकाला दिलेला नाही. कोणालाही नवे सुचू शकते. आणि एकट्याला नवीन सुचले नाही तर सहविचाराने समूहाला नवीन सुचू शकते. नवीन सुचले पाहिजे हे मुख्य. समग्रता हा पाया, सहविचार आणि स्वावलंबन ही दैनंदिन कामातली सूत्रे आणि सर्जनशीलता हा स्थायीभाव. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण अशा चार पैलूंनी युक्त असे आहे.
टीकाकार आणि आप्तांची काळजी
नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा असेच प्रतिभेचे सर्जनशीलतेचे नवनिर्मितीक्षमतेचे वर्णन करतात. जिथे नवीन सुचण्याला खंड नाही ती नवनवोन्मेष-शीलता. नव्या कल्पनांचे झोत पेलण्याचे सामर्थ्य सहसा उपजत नसते. ते मिळवावे लागते. त्यामुळे प्रबोधिनीतील नवीन प्रयोग ज्या विविधतेला जन्म देतात ती विविधता पेलणेही अवघड असते. आपले टीकाकार आणि हितचिंतक आप्त म्हणतात “प्रबोधिनीने focussed व्हावे.” म्हणजे मर्यादित क्षेत्रातील मर्यादित कामे निष्ठेने करावीत. काम निष्ठेने आणि सातत्याने करणे चांगलेच. समग्रतेमध्ये ते ही येते. पण समग्रतेचा पाया जेवढा पक्का तेवढी विविधता आणि नाविन्य पेलायची शक्ती वाढते. नवीन निर्माण करणे, नवीनाला सामोरे जाने, नवीन पचवणे, नवीन सुचणे म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेची हिंदुत्वाला आज गरज आहे. प्रबोधिनी हिंदुत्वातील नवविचारांची प्रात्यक्षिके करण्यासाठीच आहे.
प्रतिभा हे सर्जनशीलतेचे एक रूप आहे. उद्योजकता हे सर्जनशीलतेचे आणखी एक रूप आहे. नवा कारखाना, नवे दुकान, नवे उत्पादन, नवा व्यापार, नवी शाळा, नवी संशोधनिका, नवे रुग्णालय, नवे बांधकाम, नवी कार्यालय व्यवस्था, नवी संदेशवहन व्यवस्था, नवी व्यायामशाळा, नवी प्रयोगशाळा, नवा मार्गदर्शन वर्ग, नवी रहदारी व्यवस्था, नवी चळवळ, नवे अभियान, नवे आंदोलन, नवी सुरक्षा व्यवस्था अशा कितीतरी गोष्टी नव्याने सुरू करण्यासाठी उद्योजकता लागते. हे देखील एक प्रकारचे सर्जनच असते. प्रतिभाला उद्योजकतेची जोड देण्याची कल्पना प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासूनच आहे. देशाचे रूप पालटण्यासाठी सर्जनशीलता हेच प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण आवश्यक आहे.
सौर आषाढ १, शके १९३० दि. २२/६/२००८