७. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : स्वावलंबन

स्थानिक संसाधनांचा वापर

युवक विभागाच्या दलावर मार्गदर्शक म्हणून काम केलेला एक प्रबोधक सध्या आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करतो. व्यवसायाला सुरुवात केल्यापासूनच ‘मी स्वस्तातल्या इमारतींची आरेखने करतो व करणार’ असे तो म्हणायचा. त्याच्या सुरुवातीच्या ग्राहकांकडून मी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त झालेली पाहिली. ‘तो म्हणतो तसे त्याच्या आरेखनांप्रमाणे केलेले काम स्वस्त नसते’, ‘इतरांना येतो तेवढाच खर्च येतो’, ‘त्याच्याकडे गेलो आणि जास्तच खर्च करून बसलो’, असे अभिप्राय ऐकायला मिळाले. एकदा मी हे अभिप्राय त्याच्या कानावर घातले. अजिबात अस्वस्थ न होता तो म्हणाला, “मीही असेच ऐकले आहे. मी सांगतो तेच बरोबर आहे. पण लोकांना कळत नाही. म्हणून ‘स्वस्तातल्या इमारतीं’ ऐवजी ‘स्थानिक रित्या पाच-दहा किलोमीटर परिसरात सहजपणे मिळणाऱ्या साहित्यातून बांधलेल्या इमारती’ असे मी आता लोकांना सांगतो.” नंतर, स्थानिक साहित्य वापरून बांधलेल्या इमारती, मालकाला भांडवली खर्च म्हणून क्वचित महाग वाटल्या तरी, दीर्घ कालावधीत मालकाला, देशाला व पर्यावरणाला कशा किफायतशीर म्हणजेच स्वस्त पडतात हे त्याने मला बराच वेळ समजावून सांगितले.

गांधीजी व विनोबांची स्वदेशीची म्हणजेच ग्राम-स्वावलंबनाची कल्पनाही अशीच होती. गावातल्या लोकांनी गावातल्या संसाधनांचा वापर करून गावाला लागणाऱ्या सर्व वस्तू व सेवा निर्माण करायच्या किंवा पुरवायच्या ही त्यांची ग्राम-स्वावलंबनाची कल्पना. प्रत्येक गावाने असे स्वावलंबी होणे ही खरी स्वदेशी.

स्वदेशी : वस्तूंपासून कार्यकर्त्यांपर्यंत

सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रबोधिनीच्या निगडी व सोलापूर केंद्रांमध्ये स्वदेशी वस्तूंच्या वापराची चळवळ एक अभियान म्हणून विद्यार्थ्यांकरिता व त्यांच्याद्वारे त्या त्या केंद्राच्या परिसरातल्या नागरिकांकरिता सुरू झाली. ते अभियानच असल्यामुळे मर्यादित काळाचे होते. पण त्या वेळच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहिल्यावर असे वाटले की स्वदेशीचा विचार फक्त वस्तूंपुरताच मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यातून ‘छात्र-प्रबोधन’ मधील स्वदेशीवरील लेखमालेचा जन्म झाला. आता ती लेखमाला ‘स्वीकारशील स्वदेशी’ या पुस्तकात संग्रहित झाली आहे.

ती लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित होताना स्वदेशी शिक्षण पद्धती, स्वदेशी अर्थ-व्यवस्था, स्वदेशी न्याय-व्यवस्था, स्वदेशी व्यवस्थापन-शास्त्र असेही काही लेख हवे होते असे वाटत होते. पण सध्या अनेक ठिकाणी सगळ्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे ‘स्वदेशी’ कार्यकर्त्यांचा तुटवडा. जो कार्यकर्ता ज्या संघटनेत काम करतो तिथेच त्याने प्रशिक्षण व प्रेरणा घेतली असेल तर तो ‘स्वदेशी’ कार्यकर्ता म्हणजेच स्थानिक पातळीवर आणि स्थानिक प्रक्रियेतून घडलेला कार्यकर्ता. बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून व क्वचित महाराष्ट्राबाहेरून पत्रे, निरोप व दूरभाष प्रबोधिनीच्या केंद्रांवर येत असतात. मागणी एकच ‘एक तरी चांगला कार्यकर्ता पाठवा.’ ‘आमच्याकडे जागा आहे, पैसे आहेत, कामाची आवश्यकता आहे, आम्ही सर्व मदत करू. फक्त एक कार्यकर्ता पाठवा.’ त्यांची अशी गोड गैरसमजूत असते की प्रबोधिनीत तयार कार्यकर्ते संधीची किंवा निमंत्रणाची वाट पाहत बसलेलेच आहेत. अशा मागण्या करणाऱ्यांना सांगावे लागते की ‘तुम्हाला प्रबोधिनीसारखे काम करायचे असेल तर तुम्हाला स्वतःच कार्यकर्ते प्रशिक्षित करायला लागतील. त्यांची प्रेरणा जागी करायला लागेल’. कार्यकर्ते स्थानिक व्यक्तींमधूनच हेरायचे आणि उभे करायचे म्हणजेच ‘स्वदेशी’ कार्यकर्त्यांची संघटना वाढवायची हे संघटनेतील स्वावलंबन.

स्वावलंबनाचा विस्तृत पाया

प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर असे कार्यकर्ते उभे करायचा, त्यांच्यावर जबाबदारी टाकायचा, त्यांना स्वयंप्रेरित करण्याचा प्रयत्न चालू असतो. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ‘तुमच्या उपक्रमाला लागणारे पैसे तुम्ही उभे करा’, ‘तुमच्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर शोधा’, ‘तुम्हाला पाहिजे त्या आशयाची पद्ये तुम्हीच रचा’, ‘तुम्हाला पाहिजे तसा विषय मांडला जावा म्हणून तुम्हीच वक्ते व्हा’, ‘तुम्हीच लेखक व्हा’, ‘तुम्हीच संपादक व्हा’, ‘तुम्हीच गावाची पाणी-समिती बनवा, आपला पाण्याचा प्रश्न सोडवा’, ‘तुम्हीच आपला बचत गट चालवा’, ‘तुम्हीच उपासना सांगा’, ‘तुम्हीच देशप्रश्न निवडा व सोडवा’ ‘तुम्हीच संधी निर्माण करा’, ‘तुम्हीच संकल्प करा, योजना करा, योजना पार पाडा, शोध-बोध घ्या आणि चुका दुरुस्त करा’ असा धोशा प्रबोधिनीत सतत चालू असतो.

जी जी कामे केल्यामुळे ‘स्वदेशी’ कार्यकर्त्यांची संख्या वाढेल त्या त्या कामातील स्वावलंबन म्हणजे संघटना बांधणी. संस्थेचा आकार वेगाने वाढायला नेमकी मदत बाहेरून भाड्याने किंवा विकत घेण्याचा (आउटसोर्सिंगचा) उपयोग होतो. प्रबोधिनीतील अनेक केंद्रांना व विभागांना तात्कालिक कामे यशस्वी करण्यासाठी बाहेरून साहाय्य घ्यावे लागते व यापुढेही लागेल. परंतु प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण स्वावलंबनात आहे.

‘स्वावलंबन’ : ‘स्वधा’ शक्तीचा वापर

आपण वर्षान्त उपासनेत लागोपाठ दोन श्लोक म्हणतो. पहिल्याचा एक चरण आहे ‘आनीत् अवातं स्वधया तदेकम्’. म्हणजे ‘सृष्टीचे आदितत्त्व स्वतःच्या शक्तीने (जणू) वायूशिवाय श्वसन करत होते’. दुसऱ्या श्लोकातला चरण आहे ‘एकः अहं बहु स्याम्’ म्हणजे ‘मी एक आहे, (माझ्या शक्तीने) मी अनेक होईन.’ आदितत्त्वाचे आणखी कशाच्याही आधाराशिवाय असणे आणि स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या बळावर एकाचे अनेक होणे, हे त्याच्या ‘स्वधा’ शक्तीने म्हणजे स्वतःवरच अवलंबून राहण्याच्या शक्तीने होते. व्यक्ती आणि संघटना त्याच तत्त्वाचे अंश असल्याने त्यांच्यामध्ये ‘स्वधा’ शक्ती असते. प्रबोधकांनी आणि प्रबोधिनीने ती वापरणे म्हणजेच स्वावलंबन.

सौर ज्येष्ठ १, शके १९३० दि. २२/५/२००८