
/
हिंदू जीवनदृष्टी
जीवनदृष्टी जपानमध्ये एखाद्या उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तिथे जपानी पद्धतीच्या चहाचे दुकान आढळते….
धर्मसंस्थापना: संक्षिप्त
धर्मसंस्थापना: आधुनिक काळातील समाजसंस्थापना
प्रबोधिनीचे अंतिम ध्येय म्हणून धर्मसंस्थापना हा शब्द प्रबोधिनीचे पहिले वैचारिक मूलतत्त्व म्हणून तत्व स तप्त…
धर्मसंस्थापना : भारतीय राष्ट्राच्या विकासासाठी समर्थांचे विचार
तत्त्वसप्तक समारोप
३.८ तत्त्वसप्तक समारोप सिंहावलोकन ज्ञान प्रबोधिनीच्या वैचारिक भूमिकेची काही मांडणी आधीच्या सात प्रकरणांमधून करण्याचा प्रयत्न…
विज्ञानाभिमुखता
कालाच्या स्पर्शाने मलिन होत नाहीत अशा काही शाश्वत संकल्पना असतात. सहस्त्रो वर्षांपूर्वी जीवनाला त्या जेवढ्या सामर्थदायी होत्या, तेवढ्याच त्या आज आहेत आणि उद्याही रहातील. अशा व्यापक आणि शाश्वत संकल्पनांपैकी धर्मसंस्थापना ही संकल्पना आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थापक संचालकांनी ते ध्येय म्हणून कार्यकर्त्यांपुढे ठेवलेले आहे.’धर्मसंस्थापना’ या शब्दाचा संदर्भ भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या पुढील वचनात सापडतो-‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।”जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माची सरशी होते, तेव्हा तेव्हा सज्जनांना अभय देण्यासाठी आणि दुर्जनांचे निर्दालन करण्यासाठी प्रत्येक युगात मी जन्म घेतो.’
धर्म म्हणजे उपासना पंथ नव्हे !
सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन हा धर्मसंस्थापनेचा प्राचीन कालापासूनचा महत्त्वाचा अर्थ आहे. तो देश, काल, संस्कृती आणि उपासना पंथ यांच्याशी बांधलेला नाही. धर्मसंस्थापना याचा अर्थ कोण्या उपासना पंथाची, ‘रिलिजन’ची प्रतिष्ठापना असा या लेखात घेतलेला नाही.महाभारताच्या आश्वमेधिक पर्वात श्रीकृष्ण आपला जीवन हेतू उत्तंकाला सांगताना म्हणतात, ‘धर्मसंस्थापनाथार्य धर्मसंरक्षणाय च।’ धर्माची प्रतिष्ठापना आणि संरक्षण हा माझ्या जीवनाचा हेतू आहे.याचा अर्थ असा की जेथे अशुभ शक्ती या शुभ शक्तींच्या नियंत्रणात आहेत अशी एक संतुलित समाजस्थिती भगवान श्रीकृष्णांना निर्माण करायची होती. अशा संतुलित समाजस्थितीसाठी आवश्यक असलेला आचार हा ज्ञान प्रबोधिनीला अभिप्रेत असलेला ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ आहे. तथापि धर्म हा शब्द विविध अर्थांनी प्राचीन कालापासून कसा वापरला गेला याचा काहीसा मागोवा घेणे उचित होईल.मीमांसाकारांनी ‘आचारप्रभवो धर्मः।’, ‘चोदनालक्षणो धर्मः ।’ ‘आचाराधारित धर्म, चैतन्यलक्षण म्हणजे धर्म अशा प्रकारे धर्माची व्याख्या करून आचार आणि व्यवहार यांवर विशेष भर दिला आहे. आचारात त्यांनी नित्य नैमित्तिक कर्मे, यज्ञयाग, निर्वाहासाठी आवश्यक कर्मे यांचा अंतर्भाव केला आहे.स्मृतिकारांनी-‘धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः ।धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ।।’असे म्हटले आहे. धर्म, क्षमा, संयम, अपरिग्रह, शुचिता, इंद्रियनिग्रह, बुद्धी, विद्या, सत्य, शांती या दशविध गुणांची संपादना म्हणजे धर्म म्हटले आहे. म्हणजे आचारापेक्षाही त्या मागील नैतिक मूल्यांना महत्त्व दिलेले आहे. महाभारतात त्याला सामाजिक संदर्भ प्राप्त झालेला दिसतो. शांतिपर्वात म्हटले आहे-‘धारणात् धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजाः ।यः स्यात् धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः।।”धर्म हा शब्द ‘धृ’ या धातूपासून आलेला असून धर्मानेच प्रजेचे धारण होते. ज्यामुळे प्रजेचे धारण होते तो धर्म असे निश्चित समजावे, परंतु प्रजेची किंवा समाजाची धारणा म्हणजे काय ?’यतः अभ्युदयनिःश्रेयससिद्धिः सः धर्मः।”ज्यामुळे अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नती आणि निःश्रेयस म्हणजे पारमार्थिक उन्नती साधते तो धर्म.’ धर्मामुळे समाजाची धारणा होते याचा अर्थ वरील दोन्ही गोष्टी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असते.अभ्युदयात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन हे संपन्न, भरभराटलेले असावे, स्वभिमानयुक्त असावे, अशी अपेक्षा असते, तर निःश्रेयसात स्वतःच्या ठायी असलेल्या ईश्वरत्वाचे प्रकटन व्हावे, इतरांच्यात किंबहुना सर्व सृष्टीत ईश्वराचे दर्शन व्हावे, ईशशक्तीशी एकरूप होऊन जावे, अशी आकांक्षा असते. या दोन्ही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल अशी समाजरचना निर्माण करण्याचे प्रयत्न हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून होत आले. हे सर्व धर्मसंस्थापनेचे प्रयत्न होते. ज्या स्वार्थी, विकारी, विध्वंसक प्रवृत्ती या आकांक्षांच्या पूर्तीच्या आड आणि आडव्या येत होत्या त्यांचे निर्दालन त्या त्या काळातील शासनकर्त्यांनी, वीर स्त्री-पुरुषांनी केले. ज्यांचा प्रवास अभ्युदय-निःश्रेयसाच्या आकांक्षा पूर्ण करण्याकडे चालला होता, त्यांना त्या काळच्या राज्यकर्त्यांनी, विचारवंतानी अभय दिले आणि निर्भय बनविले. आकांक्षापूर्तीची साधने उपलब्ध करून दिली. हाही सर्व धर्मसंस्थापनेचा प्रयत्न होय.
धर्मस्थापनेचे नर
समर्थ रामदासांनी म्हटले आहे-‘धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।झाले आहेती पुढे होणार । देणे ईश्वराचे ।।’शिवाजी महाराजांना त्यांनी अगत्याने लिहिले आहे-‘सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । काय सांगणे तुम्हाप्रती ।धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ।।’आनंदवनभुवनाचे जे चित्र श्रीसमार्थ्यांनी रेखाटले आहे त्यात ‘बुडाला औरंग्या पापी’, ‘अभक्तांचा क्षयो झाला’, ‘मोडिली मांडिली क्षेत्रे’ अशा प्रकारे दुर्जनपरिहाराचे आणि सुजनांना मिळालेल्या अभयाचेच वर्णन आहे. त्यांनाही असेच अभिप्रेत होते की जेथे निर्भय चित्ताने अभ्युदयाची साधना आणि निःश्रेयसाची उपासना करता येते अशी समाजस्थिती घडविणे म्हणजे धर्मसंस्थापना.अशी समाजस्थिती एके काळी या देशात होती. अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्ही प्रकारच्या वैभवाचा जणू कळस झाला होता. महायोगी अरविंदांनी या कालाचे अतिशय सुंदर वर्णन करून ठेवले आहे. ते लिहितात-
हिंदुस्थानचा गौरवशाली भूतकाल
‘हिंदुस्थानच्या भूतकालाकडे पाहिले तर प्रचंड विजिगीषेइतकीच प्रखरपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे जीवनाचा आनंद अनुभवण्याची अप्रतिहत शक्ती आणि कल्पनेची झेप पोचणार नाही इतकी भव्य, प्रतिभाशाली नवनिर्मिती. किमान तीन सहस्त्र वर्षे हिंदुस्थानात संतत विपुल आणि बहुदिश नवनिर्मिती होत होती. जानपदे, राज्ये आणि साम्राज्ये, तत्त्वज्ञाने आणि विश्वरचनाशास्त्रे, विज्ञान आणि कला, काव्ये आणि शिल्पे, राजमंदिरे, देवालये, सार्वजनिक कार्ये, नवसमाज, संप्रदाय, स्मृती आणि आचारसंहिता, भौतिक आणि आध्यात्मिक शास्त्रे, योगविद्या, राज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, उद्योग, व्यापार आणि कितीतरी. या गणतीला अंतच नाही. पुन्हा यांतील प्रत्येक निर्मिती अत्यंत संपन्न आहे. हिंदुस्थान असे विलक्षण सर्जन सतत करत राहिला. त्याची प्रतिभा कधी शिणली नाही. यापुढेही शिणणार नाही. तिला शैथिल्य माहीत नाही आणि विश्रांतीची आवश्यकताच नाही !”भारतीय पौरुष आपल्या भूमीच्या चतुःसीमा ओलांडून दूरदेशी गेले. सागरातून त्यांनी नौका हाकारल्या आणि हिंदुस्थानचे भरभरून चाललेले वैभव ज्यू भूमीवर, इजिप्त आणि रोम यांच्या भूमीवर जाऊन पोचले. या भूमीच्या पुत्रांनी येथील कला, महाकाव्ये आणि विचारप्रणाली थेट सयाम, कांबोज, जावा आणि सुमात्रा येथपर्यंत नेऊन पोचविली. मेसोपोटेमियाच्या वालुकामय प्रदेशात हिंदू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. हिंदुस्थानातील धर्म चीन आणि जपानमध्ये विस्तार पावून अॅलेक्झांड्रियापर्यंत पोचला. उपनिषदांतील रूपके आणि बौद्ध वचने ख्रिस्ताच्या वाणीतून प्रतिध्वनित झालेली दिसतात.”भारतीय जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रखर बुद्धिवाद. प्रौढ आणि संपन्न, सामर्थ्यशाली आणि सूक्ष्म, शक्तिमान आणि तरल, तत्त्वचिंतनात अतिभव्य आणि तपशिलात अतिसूक्ष्म झालेला असा येथील बुद्धिवाद होता. सुरचना आणि सुव्यवस्था या येथील बुद्धिवादाच्या प्रथम प्रेरणा होत्या. वस्तुजाताच्या अंतरंगात असलेली स्वाभाविक रचना त्याला शोधायची होती आणि त्या रचनेला सुसंगत अशी बाह्य व्यवस्था त्याला निर्माण करायची होती.
अध्यात्मप्रधान संस्कृतीची रचना
‘मनुष्यमात्राच्या आणि अखिल विश्वाच्या ठायी असलेल्या आंतरिक सत्याचा शोध आणि ते सत्य प्रकट करणाऱ्या प्रक्रियेचा शोध येथील प्रज्ञेने घेतला. त्याला धर्म असे म्हटले. मग धर्माचे नित्य जीवनात आचरण कसे करायचे याचे भारतीय ऋषींनी चिंतन केले आणि एक जीवनपद्धती बसविली. तिचे नियम तपशीलात जाऊन निश्चित केले. प्रथम आत्मशोध. मग त्या शोधाची प्रक्रियानिश्चिती म्हणजे धर्मशोध झाला, मग त्या धर्माचे सुगठित शास्त्र झाले.’ही सर्व रचना एका अध्यात्मप्रधान संस्कृतीची होती. श्री अरविंद पुढे म्हणतात-‘शासन, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था या संस्था लौकिकदृष्ट्या मानवाचे सुकर सहजीवन, सौख्य, प्रगती, शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता यांच्यासाठी उपयुक्त असतात, परंतु अध्यात्माचे उदिष्ट समोर असलेल्या संस्कृतीत ही सर्व मिळून अशी एक चौकट निर्माण करतात की त्या चौकटीत मनुष्याला स्वतःमधले आत्मतत्त्व प्रकट करणे सुलभ होते आणि संपूर्ण समाजालाच प्रकाश, शांती आणि संतुलन प्राप्त करून घेऊन देवसमाज होण्याच्या दिशेने वाटचाल करता येते.’श्री अरविंदांचे हे चिंतन ज्ञान प्रबोधिनीने मार्गदर्शक मानले आहे. अध्यात्माच्या, अद्वैताच्या पायावर हिंदुस्थानची उद्याची समाजरचना उभी राहावी असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्वाना हे चिंतन मार्गदर्शक ठरेल. परिपूर्ण ऐहिक विकास झाला तरी ‘ततः किम् ?’ हा प्रश्न राहतो- ‘कुठे जात आम्ही, पुढे काय आहे?’ असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून निःश्रेयसाचा विचार महत्त्वाचा आहे. पण निःश्रेयसाचा कोणता अर्थ येथे अभिप्रेत आहे?
निःश्रेयस म्हणजे काय?
मृत्यूनंतर माणसाचे काय होते ? स्वर्गलोक, देवलोक आहेत का? पुनर्जन्म आहे का? या सर्व गोष्टींची चर्चा या लेखाच्या कक्षेत घेतलेली नाही. परमसत्तेच्या स्पर्शाने इहलोकीचे जीवन जे आनंदमय करील, आपल्या बांधवांमध्ये ईश्वरत्व पाहायला शिकविल, व्यक्तींच्या सुप्त शक्तींना जागृती आणून व्यक्तीमधले आणि समाजातले ईश्वरत्व प्रकट करील अशा प्रकारचे निःश्रेयस येथे अभिप्रेत आहे.पूर्णतेकडे प्रवास, शुद्ध व निरपेक्ष सत्याचा शोध, निर्भेळ आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती आपल्यातील अमरत्वाचा प्रत्यय अशा प्रकारच्या आकांक्षेने मानवी मनाला सदैव व्यापून टाकले आहे. जडवादाने, संशयवादाने पुनःपुन्हा तिला झाकोळून टाकले तरी पुनःपुन्हा मानवी मनाची पकड घेते. ही प्रेरणा धर्माची अथवा अध्यात्माची आहे. कालाच्या ओघात या प्रेरणेचा शुद्ध प्रवाह काही वेळा गढूळलेला दिसतो. पुरोहितशाही, संघटित धर्मसंस्थांचा आततायीपणा, आक्रमकता आणि संकुचित दृष्टीकोन, विज्ञानपराङ्मुखता, मूळ सत्याचे आंधळ्या अर्थहीन रुढीप्रमाणे झालेले रूपांतर, शुष्क कर्मकांड, गूढवादाचे प्राबल्य यामुळे निःश्रेयसाचा, अध्यात्माचा शुद्ध प्रवाह कुंठित झालेला दिसतो. अशी उदाहरणे इतिहासात ठायी ठायी सापडतात.परंतु आपण ज्यांना धर्मसंस्थापक म्हणतो त्या श्रीकृष्ण, श्रीराम, बुद्धदेव, महावीर, शंकराचार्य, नानक, चैतन्य यांच्यासारख्या महापुरुषांनी हा प्रवाह पुन्हा शुद्ध आणि तेजस्वी केला. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांसारख्या राष्ट्रद्रष्ट्या संतपुषांनीही असे निसंदिग्धपणे म्हटले आहे की या राष्ट्राला उन्नत करायचे असले तर सर्व सुधारणा धर्माच्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोचवाव्या लागतील. तीच भाषा लोकांच्या ओळखीची आहे. महात्मा गांधींनी, पूजनीय विनोबाजींनी Spiritualization of Politics – राजनीती सुद्धा अध्यात्मावर आधारित असावी असे प्रतिपादन केलेले आहे. धर्म न मानणाऱ्या लोकांनाही हिंदुस्थानच्या सामाजिक उत्थानाचा विचार करताना धार्मिक प्रेरणांची दखल घ्यावीच लागते. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म हा आमच्या राष्ट्रीय जीवनाचा प्राणस्वर आहे.कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ उपासनेत म्हटले आहे-‘ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्मविद्या आणि भौतिक विद्या यांचा समतोल राखणे नि अभ्युदय-निःश्रेयसाची चरमसीमा गाठणे हा व्यक्तिजीवनाचा परमोच्च बिंदू आहे. उन्नत व्यक्ती जीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील अद्वैत पुसले जाऊन तेथे समभाव निर्माण व्हावा, हे आम्हाला साध्य करावयाचे आहे. त्यासाठी शिक्षण ! स्वामी विवेकानंद म्हणत असत, Education is the manifestation of Perfection already in man, and Religion is the manifestation of Divinity already in man. शिक्षण म्हणजे काय ? मानवात मुळात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटन करणे म्हणजे शिक्षण, आणि धर्म म्हणजे काय? तर मानवात मुळातच असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे प्रकटन करणे म्हणजे धर्म !
धर्मसंस्थापनेसाठी काय काय करावे लागेल ?
निराळ्या शब्दात आमचे ध्येय ‘धर्मसंस्थापना’ करणे हे आहे. स्वतःच्या हृदयातील देव जागृत करणे आणि त्याचबरोबर इतर बांधवांच्या हृदयातील देव जागृत करणे याचे नाव धर्मसंस्थापना ! ही धर्मसंस्थापना करणे हे आमचे परंपरागत राष्ट्रीय ध्येय आहे. त्यासाठी काय काय करावे लागेल यासंबंधी काही गोष्टींचा विचार पुढे केला आहे:
१. भौतिक समृद्धी-नीतिमंत श्रीमंती
२. जीवनमूल्यांची पुनःस्थापना
३. उपासनेसि लावावे जग
४. उपस्यानाम् अनियमः
५. वरील साध्यांच्या आड आणि आडव्या येणाऱ्या भ्रष्ट, दुष्ट, विध्वंसक, स्वमतांध व्यक्ती आणि शक्ती यांचा पौरुषयुक्त प्रतिकार.
१. भौतिक समृद्धी
महात्मा गांधी म्हणाले होते की उद्या परमेश्वराला हिंदुस्थानात जन्म घ्यायचा असेल तर तो भाकरीच्या रूपाने घ्यावा लागेल. मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय त्याहून वरच्या श्रेणींच्या गरजांकडे मनुष्याचे लक्ष सहजपणे वळत नाही. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजा समाधानकारक रीतीने पूर्ण होतील अशा प्रकारची अनुकूलता हिंदुस्थानात निर्माण व्हावयास पाहिजे. स्वामी विवेकानंद तर मनुष्येतर सृष्टीचाही यात अंतर्भाव करीत असत. ‘या देशात जोवर एक कूत्रा जरी भुकेलेला आहे, तोवर मला मोक्ष नको, असे त्यांनी म्हटले आहे.’पोटापुरता पसा पाहिजे’ अशी ही अल्पसंतुष्ट भूमिका नाही. पुरुषार्थ प्रयत्नाने मोठे वैभव प्राप्त करू, नीतीच्या मार्गाने, परिश्रम नि बुद्धिसंपदा ओतून येथे आर्थिक भरभराट करू, भीक मागण्याचा प्रसंगच येथे येणार नाही, आज दलित नि वंचित असलेल्या माणसालाही चांगली मिळकत करून सन्मानाने जगता येईल एवढे उद्यम-व्यवसाय उपलब्ध होतील असे घडावयास हवे.आग्र्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी घडी बसविली त्यात शेती, व्यापार, संरक्षण, स्थावराची जपणूक वगेरे सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार केलेला होता. उन्मत्त वतनदारांना वचक बसवलेला होता. कोणत्याही प्रकारे प्रजेचे शोषण होणार नाही आणि प्रत्येकाला निर्भयपणे, स्वास्थ्यपूर्वक स्वतःचा व्यवसाय करून कुटुंब चालविता येईल अशी तरतूद होती.हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंतीया घराघरातुन वसो क्षेम-सुख-शांतीआनंदवनेभुवने उभवू या येथेही शपथकंकणे आज करी बांधियलीअशी आकांक्षा ही अभ्युदयाची किमान आकांक्षा आहे. नीतिमंत श्रीमंती म्हणजे भ्रष्टाचार आणि शोषण याशिवाय निर्माण होणारी, यापासून मुक्त असलेली श्रीमंती. अशी श्रीमंती येण्यासाठी व्यक्तिविकास, उद्योगविकास, तसेच देशातील लहान-मोठ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सत्ता, तसेच त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्था या परस्परांना पूरक, अनुकूल असाव्या लागतील. म्हणजे व्यक्ती स्वतःचा विकास करीत असतानाच समाजाच्या गरजाही पूर्ण करू शकेल. मनुष्याची उत्पादकता वाढेल असे शिक्षण तिला देणे आवश्यक आहे. तथापि त्याच बरोबर, उदंड संपत्ती अवश्य मिळवावी पण संपत्ती हे अंतिम ध्येय मानू नये, असा संस्कारही आवश्यक आहे. उत्तम तंत्रज्ञान, कल्पक व्यापारतंत्रे, उपलब्ध निसर्गसंपत्तीचा उपयोग, नव्या ऊर्जाचा शोध आणि या सर्वांसाठी योग्य असे मनुष्यबल व कौशल्ये निर्माण करणे या भौतिक विकासाच्या बहुविध दिशा आहेत.हिंदुस्थानात भौतिक समृद्धी कशी निर्माण करायची ह्याचा तपशीलवार विचार मांडायचा तर तो स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. या लेखाचा हेतू मुख्यतः तत्त्वमांडणीचा आहे. आर्थिक समृद्धी येथे कोणत्या मार्गाने येईल या बाबतीत अनेक मते असू शकतील. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले असू शकतील. पण एकमेकांच्या प्रयत्नांना खीळ न घालता, एकमेकांचा तेजोभंग न करता, परस्पर आदर राखून, विधायक भूमिकेने सहकार्य केले पाहिजे. कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी म्हटले आहे -मतभेद विसरून काम केले पाहिजे…. ‘आचारांचे, प्रतिपादनांचे अथवा विचारांचे बाह्य भेद कितीही असले तरी आतून आमची अंतःकरणे जुळलेली असू देत. माझी जीवनधारा पोसण्याचा मला जेवढा अधिकार आहे, तितकाच स्वतःची जीवनधारा पोसण्याचा त्याला अधिकार आहे. तो देशद्रोही नाही, पंचमस्तंभी नाही, देशबुडव्या नाही. देशभक्तच आहे; माझे त्याचे पटत नाही. एवढेच; न पटेना, पण त्यामुळे एकत्र काम करण्यात उणीव येणार नाही. त्याच्या जीवनधारेला जनमताने उचलून धरले तरी मला त्याचे वैषम्य वाटणार नाही. माझ्या जीवनधारेचा देशाने स्वीकार केला तर त्याला वाईट वाटणार नाही. असा विश्वास, अशी भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. यातच खरोखरीची सहिष्णुता अथवा सत्यत्व आहे.’म्हणून भिन्न-भिन्न आर्थिक अथवा राजकीय विचारसरणीच्या लोकांनीही देशावरच्या आपत्प्रसंगी आणि दारिद्र्याच्या नित्य भेडसावणाऱ्या प्रश्नावर सहकार्यांने उत्तर शोधली पाहिजेत. सहिष्णुता ही केवळ धर्म-पंथ-प्रांत यांच्या संदर्भात आचरावयाची गोष्ट नसून ती सर्वच क्षेत्रांत काम करताना बाणवायची एक मूलभूत वृत्ती होणे आवश्यक आहे.
२. जीवनमूल्यांची पुनःस्थापना
शार्लटन ब्रॉशबर्न यांनी महात्मा गांधीना विचारले होते की स्वातंत्र मिळाल्यानंतर आपण सर्वप्रथम कोणते कार्य अंगावर घेणार? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता महात्माजी म्हणाले होते, ‘कोणते म्हणजे? चारित्र्य घडणीचे !’ स्वामी विवेकानंदांनी मॅन मेकिंग अँड कॅरॅक्टर बिल्डिंग एज्युकेशन-‘ मनुष्य घडणीचे, चारित्र्य घडणीचे शिक्षण- याला राष्ट्रबांधणीत सर्वाधिक महत्त्व दिले आहे. जीवनमूल्ये चित्तात खोल ठसल्याने चारित्र्य घडण होते. शिक्षणातून जीवनमूल्ये रुजविणे, व्यक्तिगत आणि सामाजिक- राष्ट्रीय चारित्र्य घडविणे यालाच वेगळ्या शब्दात मूल्यांची पुनःस्थापना म्हटले आहे. निर्भयता, प्रामाणिकपण, समानता, माणुसकीची चाड आणि अन्यायाची चीड नि प्रतिकार, स्त्रीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य ही महत्त्वाची मूल्ये आहेत. हिंदू जीवनपद्धतीत नैसर्गिक प्रेरणांवर संयम; स्वार्थ अन् उपभोगलालसा यांच्यावर संयम हे एक महत्त्वाचे मूल्य मानले गेले आहे. सत्याचरण, वचनपालन ही मूल्ये आहेत. स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले गेले आहे. स्वराष्ट्राविषयीचा ज्वलंत अभिमान, त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता हे श्रेष्ठ राष्ट्रीय मूल्य मानले गेले आहे. राष्ट्रीय संपत्तीची जपणूक, वर्धन हे आनुषंगिक आहेच. वर उल्लेखिलेल्या विविध मूल्यांचे आचरण ज्यांनी आपल्या जीवनात केले त्या व्यक्ती भारतीय समाजाचे शतकानुशतके आदर्श बनून राहिल्या आहेत.
आमचे आदर्श : कच, शिबी, श्रीराम, हरिश्चंद्र…
वृद्धापकाळ आला तरी उपभोगाची इच्छा धरणारा ययाती हा आमचा आदर्श कधीच होऊ शकत नाही. उलट देवहिताकरिता प्राणांची आहुती देणारा, देवयानीचे सौंदर्य नम्रपणे नाकारून संन्यस्त राहिलेला कच हा आमचा जीवनादर्श आहे. स्वतःचे मास देऊन कबुतराचे प्राण वाचविणारा शिबी राजा हा आदर्श आहे. वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी राज्यवैभवाचा त्याग करून वनात जाणारे श्रीराम आणि स्वप्नात दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी राज्यत्याग करणारे हरिश्चंद्र हे आमचे जीवनादर्श आहेत. अन्याय प्रतिकार, अधर्माचा उच्छेद अशा पुरुषार्थी कर्मांनी तर भगवान श्रीकृष्णांचे सारे जीवन मंडित झाले आहे. जुलमी कंस जरासंध यांचे निर्दालन, शंभर पापे भरल्यावर शिशुपालाचा संहार, द्रौपदीच्या शीलाला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कौरवांचा निःपात, हे सर्व श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घडवून आणले आहे. तुळजाभवानीची मूर्ती फोडणाऱ्या अफजलखानाची आतडी शिवाजी महाराजांनी बाहेर काढली आणि अधर्माला दरारा बसेल असे शासन केले. कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्यवती सुनेला त्यांनी सन्मानाने परत पाठविले आणि आपल्या प्रजेतील स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले !स्वराष्ट्रनिष्ठेचे मोठे उदाहरण खंडोजी बल्लाळांणी घालून दिले. संभाजी राजांनी त्यांच्या वडिलांना हत्तीच्या पायी दिले, कुलाचा विध्वंस केला, पण स्वराज्याला वाहिलेली खंडोजींची निष्ठा अभंग राहिली.
देशासाठी मरणे… जगणे
‘बुडाला औरंग्या पापी, हिंदुस्थान बळावले।’अलीकडच्या काळात देशाच्या स्वतंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांनी ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी’ असे म्हणत हसत हसत फाशीच्या तख्तावर प्राणार्पण केले. देशाकरिता प्राणार्पण हे जसे निष्ठेचे एक अंग, तसे, देशाकरिता जगणे, उत्तम रीतीने कार्य, सेवा करीत जगणे हेही आदर्शभूत आहे. कोणी रुग्णसेवेतून देशसेवा करतील, कोणी ज्ञानोपासनेतून करतील, कोणी शास्त्रसंशोधनातून करतील, कोणी शासनव्यवस्थेची धुरा सांभाळतील. पण कलंकित पैशाला स्पर्श न करता उत्तम कार्यक्षमतेचे आदर्श घालून देतील, कोणी संरक्षण व्यवस्था बलवान करण्याचे दायित्व स्वीकारतील तर कोणी उद्योग व्यवसायात उत्पादनाचे विक्रम घडवून आणतील. कोणी हरितक्रांतीचा, कोणी श्वेतक्रांतीचा तर कोणी सहकारी चळवळींचा ध्यास घेऊन त्या प्रभावी करून दाखवतील. क्षेत्र कोणतेही असो पण मूलभूत धारणा-‘स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः ।’अर्थात्- तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा । तोषालागी ।। अशी असली पाहिजे.
३. उपासनेसि लावावे जग
स्वतःमधील आणि इतरांमधील ईश्वरत्व प्रकट करणे हा धर्मसंस्थापनेचा एक भाग आहे. त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक उपासना आवश्यक आहे, अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उपासनेला अनन्य स्थान असायला पाहिजे. उपासना म्हणजे परमेश्वरी शक्तीशी संवाद. त्या शक्तीशी हळूहळू एकरूपता पावण्याची साधना. ही साधना प्रत्येक व्यक्तीची वेगळी असेल. पण प्रसंगी, ठरावीक काळाने मोठ्यासमूहांमध्ये उपासना केली पाहिजे. कारण सामूहिक उपासनेत सहस्त्रावधी व्यक्तींचे शुभ संकल्प एकवटतात आणि त्यांची एक शक्ती निर्माण होते. दैनंदिन उपासनेने चितशुद्धी होते. नित्याचे व्यवहार अधिक कार्यक्षमतेने आणि प्रसन्नतेने होतात. एकत्रित काम करत असताना व्यक्तिमत्त्वाचे जे संघर्ष होतात, अहंकाराच्या ज्या टकरा होतात, त्या नित्य उपासनेमुळे कमी होतात. कारण एका चरम सत्यापुढे, ईश्वरापुढे शरण जाण्याची मन-बुद्धीला सवय होते. मन-बुद्धी व्यापक होते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे-‘सांडूनि मीठपणाचा लोभु । मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभु ।।तैसा अहं देऊनि शंभु- शांभावि झालो ।।”मिठाचा खडा मीठपणाचा लोभ सोडून समुद्रात विरून जातो तसा मी माझा अहंकार विसर्जन करून शिव-शक्तिरूप झालो.’अशा भावाने दैनंदिन उपासना झाली तर कालांतराने संताप, ईर्ष्या, मत्सर हे स्वाभाविक प्रकृतिगत दोष हळूहळू कमी होतात. या विकारांच्या आहारी गेल्याने जो शक्तीव्यय होतो त्या शक्तिची बचत होऊन ती चांगल्या कामी लावता येते.इतिहासाचा आढावा घेतला तर ईर्ष्या, मत्सर, त्यापोटी दुही या दुर्गुणांनी आणि अति रजोगुणी, तमोगुणी प्रकृतीच्या व्यक्तींनी राष्ट्रीय हिताची मोठी हानी केली आहे असे दिसून येते. म्हणून आरोग्यपूर्ण अशा कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनासाठीसुद्धा दैनंदिन उपासना आवश्यक आहे. याचाच अर्थ समाजधारणेसाठी, धर्मसंस्थापनेसाठी व्यक्तिगत व सामूहिक उपासना महत्त्वाची आहे.महात्माजींचा दैनंदिन प्रार्थनेवर मोठाच भर असे. कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उपासनेवाचून अन्नग्रहण केले नाही. व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याला तेजस्विता आणि मोल प्राप्त करून देणाऱ्या उपासनेबद्दल समर्थांनी म्हटले आहे-‘उपासनेचा मोठा आश्रयो, उपासना नाही तो निराश्रयो ।’
४. उपस्यानाम् अनियमः ।
हिंदुस्थानात आजवर भिन्न भिन्न उपासना पंथ, संप्रदाय उदयाला आले. विदेशांमधूनही काही उपासना पंथ येथे आले. ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति।’ अशी आपली वैदिक धारणा असल्यामुळे शिव, देवी, विष्णू, बुद्ध किंवा महावीर जिन हे एकाच परब्रह्मशक्तीचे विविध आविष्कार आहेत हे प्रत्येक संप्रदायातील सत्यदर्शी लोकांना कळलेले होते. विदेशातून आलेले अल्ला आणि आकाशस्थ पिता ही देखील परब्रह्मशक्तीचीच रूपे आहेत आणि पैगंबर व ख्रिस्त हे तिचेच अंश आहेत असे मानण्यास येथील समाजाला कसलीही अडचण वाटत नाही.परंतु संप्रदायाबरोबरच माझाच ग्रंथ खरा, माझाच प्रेषित खरा अशी अभिनिवेशाची भूमिका बळावते. आपला पंथ इतरांनी स्वीकारावा यासाठी प्रलोभने दाखविली जातात, हिरीरीने प्रचार होतो. एखाद्या पंथाचे अनुयायी जर स्वमतांध, असहिष्णू असतील तर ते तलवारीच्या जोरावर पंथ-प्रसार करतात, नाना तऱ्हेचे अत्याचार करतात, आपला पंथ जे मानीत नाहीत ते काफर, पाखंडी असे म्हणून त्यांची कत्तल करतात. सर्व धर्माना समानतेने वागविण्याबद्दल ख्याती असलेल्या अकबराने हिंदुस्थानातील अनेक प्रांतात लाख लाख हिंदूंच्या कत्तली केल्या. अफजलखानाने तुळजाभवानीची मूर्ती फोडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मुगली असहिष्णुतेला शासन केले. म्हणून रामदासांनी त्यांना धर्मसंस्थापक म्हटले आहे.जे शक्तियुक्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंशधर्मसंस्थापनेचा हव्यास । तेथेचि वसे ।।असा त्यांच्या कार्याविषयीचा आनंद व्यक्त केला आहे.पूजनीय विनोबाजींचे धर्मसहिष्णुतेबद्दलचे विचार श्री. राधाकृष्ण बजाज यांनी ‘भारत का धर्म’ या शीर्षकाखाली वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या ‘गोग्रास’ या मासिकात प्रकाशित केले आहेत. त्या लेखाचा काही अंश येथे दिला आहे.
भारतका धर्म
हम भी जिये, तुम भी जिओ-हिंदूहम ही जिये, दूसरा नहीं-अहिंदूहिंदू नामक कोई धर्म था ही नहीं। वैदिक धर्म, सनातन धर्म आदी अनेक नाम रहे हैं हिंदू धर्म यह नाम तो बहुत अर्वाचीन है। संभवतः विदेशी लोगोंने हिंदुस्थानके धर्म को हिंदू कहना शुरू किया हो। सिंधुके पार रहनेवाले लोगोंका देश हिंदुस्थान – उसी प्रकार हिंदुस्थान में रहनेवाले लोगोंका धर्म हिंदू। यह किसी एक धर्मका नाम न होकर सामान्य नाम है । जो हिंदुस्थान में रहते हैं वे सब हिंदू।……जो सबका समावेश करे वह हिंदू, इस दृष्टीसे देखा जाए तो इस देशमें रहनेवाले अधिकांश लोगोंको हिंदू माना जा सकता है। राम और रामायण को माननेवाला हिंदू, कृष्ण और गीता को माननेवाला हिंदू, शिवजी और दुर्गा को माननेवाला हिंदू, करुणामूर्ती बुद्ध एवं धम्मपदको माननेवाला हिंदू, भगवान महावीर को माननेवाला हिंदू, प्रभुपुत्र ईसा मसीह एवं बाईबल माननेवाला हिंदू, उक्त सभी भारतवासीयोंको हिंदू मान सकते हैं बशर्त कि वे अपना धर्म निभाते हुए दूसरेका निषेध न करें।अब सवाल रहता है कि अहिंदू कौन? अहिंदू वह है जो असहिष्णू है। जो कहता हे कि हमारे धम्मपदमेंही धर्म है और भगवान बुद्धही एकमात्र भगवान के अवतार है, दुसरे सब झूठ हैं। अहिंदू वह है जो कहता है कि मुहम्मद पैगंबरही एक मात्र भगवान का दूत है और सारा धर्म कुरान शरीफ मैं ही है, दूसरे संत और ग्रंथ सब झूठे हैं। फेकनेलायक है अहिंदू वही है जो कहता है कि भगवान एकही ईसा मसीह हुआ है, बाइबलमें जो लिखा है वही सत्य है, दुनियाक उद्धार तभी होगा जब जब बाप्तिस्मा लेकर ईसाई बनेंगेमहात्मा गांधीनी म्हटले आहे की धर्म किंवा उपासना पंथ हा आईप्रमाणे असतो. भुलवून वा सक्तीने तो बदलायला लावणे हे आईपासून तोडण्यासारखे पाप आहे. धर्मांतरामुळे स्वतःच्या राष्ट्राविषयीची निष्ठा लोपून परराष्ट्राविषयी, शत्रुराष्ट्राविषयी आत्मीयता निर्माण होत असेल तर धर्मांतर अधिक धोक्याचे. अशा सर्व प्रकारच्या स्वमतांधतेशी आणि असहिष्णुतेशी सामना करणे, विविध उपासना पंथीयांना इतरांच्या उपासना स्वातंत्र्याचा आदर करून मोकळेपणाने आपल्या उपास्य देवतेची उपासना करणे शक्य व्हावे, अशी समाजस्थिती निर्माण करणे ही धर्मसंस्थापनेचीच एक बाजू आहे.
५. कंटकांचे निर्दालन
भगवान श्रीकृष्णांनी ज्याला ‘विनाशाय च दृष्कृताम्।’ म्हटले आहे, तुकाराम महाराजांनी ‘दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे’ म्हटले आहे, ते कंटक कोणते ?
… आणि निर्दालन कंटकांचे
कंटकांचा एक वर्ग आपण पहिला. तो वर्ग इतरांच्या उपास्य दैवतांचा विनाश वा अपमान करतो. इतर उपासना पंथीयांनी एक तर आपल्या उपासना पंथाच्या पंखाखाली यावे म्हणून प्रयत्न करतो, किंवा त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. या कंटकांना कायद्यानुसार शासन करविणे, अथवा ते शक्य नसल्यास बहिष्कारादी सामाजिक शासन करणे हे धर्म संस्थापनेचेच एक अंग आहे.स्त्रियांवर अत्याचार करणारा समाजकंटकांचा आणखी एक प्रकार आहे. रांझ्याच्या पाटलाने स्त्रीवर बलात्कार केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडून टाकले. स्त्री, मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, तिची प्रतिष्ठा सांभाळली गेली पाहिजे. भोग्य वस्तू म्हणून, हुंडा पद्धती वा सासुरवासाचा बळी म्हणून आज स्त्रियांवर जे अत्याचार करतात त्यांनाही एवढेच अथवा यापेक्षाही कडक शासन झाले पाहिजे.एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत आहे असे दिसले तर ती ख्रिश्चन आहे की मुस्लिम की अन्यधर्मीय याचा विचार न करता आपण संरक्षणार्थ धावून जातो. ती स्त्री अन्यधर्मीय म्हणून परकी ठरत नाही. उलटपक्षी खंडोजी खोपडे किंवा राघोबादादा पेशवे यांसारखे राज्यद्रोही स्वधर्मीय म्हणून आपले ठरत नाहीत. नीती आणि न्याय हा विचार उपासना पंथाशी निगडित नाही. तो स्वतंत्र, सार्वभौम, सार्वत्रिक आहे.
प्रतिकाराचे मार्ग
अनीतीच्या मार्गाने पैसा मिळवणारे, त्यासाठी लोकांचे शोषण करणारे भ्रष्टाचारी हे तिसऱ्या प्रकारचे समाजकंटक आहेत. दारूच्या चार बाटल्यांसाठी शासनाची गोपनीय कागदपत्रे विदेशांना विकणारे देशद्रोही आहेत. लोकांना व्यसनाची चटक लावून अनीतीच्या मार्गाने गब्बर होणारे समाजद्रोही आहेत. सत्तेच्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करू पाहणारे अतिरेकी राष्ट्रद्रोही आहेत. अशा भ्रष्टाचारी देशद्रोह्यांना तर कठोरातले कठोर शासन हवे. शहाजीराजांना पकडून देणाऱ्या बाजी घोरपड्याला शिवाजी महाराजांनी निखंदून काढले. तेथे दया माया काही उपयोगाची नव्हती.अन्याय, अनीती, भ्रष्टाचार, बलात्कार यांना शासन करण्याचे काम फक्त पोलिसांचे, सरकारचे आहे असे आपण समजतो ते योग्य नाही. या सर्व गोष्टी घडत असताना, घडण्यापूर्वीही थांबवता येतात. देश पारतंत्र्यात असतानाही थांबविता येतात, मग स्वातंत्र्याच्या काळात तर अवश्य थांबविता आल्या पाहिजेत. मात्र याचा अर्थ कायदा हातात घ्यावयाचा असा नसून डोळ्यांदेखत गुन्हा घडू दयायचा नाही असा आहे. शरीरबलाचा वापर, आत्मबलाचा वापर, सामाजिक बहिष्कार आणि इतर अनेक प्रकारे अत्याचार थोपविण्याचे, अत्याचाराला धडा शिकविण्याचे मार्ग पुढच्या पिढीला शिकवावे लागतील.भगवान श्रीकृष्णांचे चरित्र यासाठी मार्गदर्शक आहे. अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांचे चरित्र ह्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हिंदुस्थानात धर्म आणि अधर्म यांचा विवेक शिकवणारी संतांची मोठीच मांदियाळी होऊन गेली. पर-उपकार म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप; ज्यातून विकासाला साहाय्य होते तो धर्म, विकासाची गती खुंटविणारा, अकल्याण करणारा तो अधर्म असे त्यांनी वेळोवेळी सांगून ठेवले आहे.पण’जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः ।जानामि अधर्म न च मे निवृत्तिः ।।”धर्म काय ते मला कळते पण त्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही आणि अधर्म म्हणजे काय तेही मला कळते पण त्यापासून मी दूर राहू शकत नाही’, असे म्हणणारे दुर्योधनासारखे दुरात्मेही प्रत्येक काळात जन्माला येत असतात. त्यांचे हृदयपरिवर्तन होतेच असे नाही. त्यांचे रणांगणात वा अन्यत्र निर्दालनच करावे लागते. नुसते श्रेष्ठ तत्त्वज्ञान पुरत नाही, तत्वज्ञानी पुरत नाहीत. त्यांना विषाचा पेला देणारे किंवा जिवंत जाळणारे जे नराधम त्यांचा समूळ बीमोड करणारे पराक्रमी स्त्री-पुरुषही सर्व काळात जन्मास यावे लागतात. संत आणि पराक्रमी स्त्री- पुरुष मिळून धर्मसंस्थापनेचे कार्य पूर्ण होते. अशा प्रकारची धर्मसंस्थापना हिंदुस्थानात व्हावी अशी ज्ञान प्रबोधिनीची आकांक्षा आहे.कै. डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी ‘विवेकानंद काय म्हणाले या आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे की जिथे तत्त्वज्ञान आणि शूर पुरुष यांचे साहचर्य एकाच कालखंडात परस्परांना साहाय्य करीत उदय पावते, तेथे तत्त्वज्ञानाचा विकास, त्यानुसार समाजधारणा- म्हणजे आधिभौतिक आणि आध्यात्मिक विकास दोन्ही साधते. अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीही सिद्धीला जातात. ते पुढे म्हणतात-
तत्त्वज्ञान आणि पौरुष यांचे साहचर्य
‘आज हिंदुस्थानची आवश्यकता हीच आहे. रामकृष्ण जन्मले, विवेकानंद जन्मले पण हिंदुत्वाचा ध्वज रणांगणात विजयी करणारा शूर पुरुष शिवराणा अजून जन्मला नाही. तो जर जन्मता तर आमच्या समाजात दिसणारी दुर्बलता, आत्मविश्वासशून्यता, निरुत्साहिता, किंकर्तृव्यमूढता ही दिसली नसती. येथील बुद्धिमान लोक परधार्जिणे झालेले असतात. स्वदेशाचा साक्षात्कार त्यांच्यात नसतो. तसे घडले नसते. स्वराष्ट्राभिमान्यांच्यात जी कर्तृत्वशिथिलता आढळते, गगनभेदी प्रतिभेची जी उणीव सापडते, ती सापडली नसती. शिवछत्रपतींचा पराक्रम डोळ्यांदेखत घडला असता तर अशा शूर पुरुषांचा वारसा म्हणजे अप्रतिहत नवनवोन्मेषशालिनी विजयमनीषा, ती पदोपदी दृष्टोत्पत्तीस आली असती आणि त्या थोर ब्रह्मर्षांची मनोवांच्छा म्हणजे विश्वविजयाकांक्षा, तिचा उत्साह मनामनांमधून ओसंडत असलेला पाहण्यात आला असता.’पुढे आप्पा विवेकानंदांची उत्कट प्रार्थान करतात- ‘अहो विवेकानंद ! आपल्या गुणगानाने आम्हांमध्ये सद्गुण उत्पन्न होऊ देत ! हा समाज खऱ्या बुद्धिनिष्ठेच्या, खऱ्या श्रद्धेच्या पायावर उभा राहो- संघटना, पराक्रम आणि विश्वविजय यांचा उपासक बनू दे. आपण म्हणालात की, जोपर्यंत या देशातील एक कुत्रा सुद्धा भुकेलेला आहे तोपर्यंत मला मुक्ती नको. मी पुनःपुन्हा जन्म घेऊन या देशाची सेवा करीन. या देशातले दैन्य अजूनही पुरते संपलेले नाही, हे आपण पाहता ना! आपण पुनरपि भारतात या. येताना श्रीशिवछत्रपतींना घेऊन या. अभेदय, चतुरस्त्र, विजयशाली संघटना करून या देशाचे दैन्य नित्याचे विलयाला न्या. पुरातन असलेली हिंदू संस्कृती येथे पुन्हा एकदा प्रकर्षाने नांदू दया. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव आणि सर्वांआधी राष्ट्रदेवो भव या नमनाचे निनाद चोहीकडून कानी पडू दयात ! जे ईश्वरतत्त्व माझ्यात आहे, तेच माझ्या पलीकडच्या बांधवात आहे हे उमगल्याने त्याला वगळून कोणतेही ऐहिक व पारमार्थिक भोग भोगण्याची लालसा आमच्या मनात न उरू दया ! प्रत्येक अंतःकरणातून त्याच आत्मतत्त्वाचे स्फुरण होऊ ! उपनिषदांचे तत्त्वज्ञान घराघरातून गायिले जाऊ दया ! आणि कृण्वन्तो विश्वम् आर्यम् हा ध्येयमंत्र आमच्या हातून प्रत्यक्षात उतरू दया!’या भावस्पर्शी आवाहनाचा अर्थ नीट जाणून घेतला पाहिजे. आप्पा जेव्हा म्हणतात की स्वामी विवेकानंद आणि शिवछत्रपती यांनी हिंदुस्थानात पुन्हा जन्म घ्यावा तेव्हा त्यांनी ‘अवतार’ घ्यावा असे ते म्हणत नाहीत. आपल्या सर्वांमधून स्वामी विवेकानंद आणि शिवछत्रपती यांच्यातील गुणसंपदा प्रकट व्हावी असे ते म्हणताहेत. म्हणजेच वीर-तत्त्वज्ञ कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत असे ते म्हणताहेत. त्यांच्या एका भाषणात त्यांनी म्हटले आहे,’आपण वाघसिंहाच्या कुलात जन्माला आलात. अशा ठिकाणी वाढता आहात. मग आपण पुरुषव्याघ्र होऊन दाखवा. पुरुषसिंह होऊन दाखवा. शेकडो लोक या दिशेने प्रयत्न करत राहतील तर कोणी तरी एक शिवछत्रपती झाल्यावाचून राहणार नाही. मी समजा छत्रपती नाही झालो तर मी नेताजी पालकर होईन, प्रतापराव गुर्जर होईन, हंबीरराव मोहिते होईन. मी सावरकर होईन. माझ्यात जी शक्ती आहे तिच्या साहाय्याने जेवढे उंच जाणे मला शक्य आहे तेवढा मी उंच जाईन.’
प्रबोधिनी गतिशील करावयाची आहे
ज्ञान प्रबोधिनी म्हणजे एकाच जागी खिळून बसणारे कार्य व संस्था करावयाची नाही. ती प्रतिक्षण वाढणारी, गतिशील, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, राष्ट्रकारण, मानव्यकारण यांना गती देणारी अशी संघटना करावयाची आहे. वीर पुरुषांना, वीर स्त्रियांना घडविणारी संघटना करावयाची आहे. अशी स्वप्ने रंगवायला लागा आणि अशी उज्ज्वल स्वप्ने रंगवायला लागलात ना, की मार्ग असा सरळच्या सरळ समोर दिसेल ! अमक्याला नाही जमले तर तमक्याला जमेल. आपण एवढे सगळे लोक आहात ना, त्यांच्यातल्या कोणाला ना कोणाला जमेलच जमेल. आपल्यापैकी प्रत्येकाला काही तरी नक्कीच जमेल. जे उत्तुंग जमावयाला हवे आहे ते उत्तुंगसुद्धा घडविणारे लोक आपल्या येथे निर्माण होतील असा मला विश्वास वाटतो. आपण प्रयत्न करा.’भाग्यासी काय उणे ?यत्नावाचोनि, वीर-तत्त्वज्ञ कार्यकर्त्यांवाचोनि राहिले!’कै. आप्पांच्या दृष्टीपुढचे धर्मसंस्थापनेचे चित्र आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे कार्यकर्ते पाहिजेत यासंबंधीचे चिंतन वरील परिच्छेदांमधून प्रकट झालेले आहे. या चिंतनाच्याच प्रकाशात ‘हिंदुत्व’ आणि ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ या दोन साधनतत्त्वांची संघटना, विकास, उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता या दृष्टिकोनांची येणाऱ्या प्रकरणांमध्ये मांडणी केली आहे.
समृद्धी निर्माण करणे
चांगली मूल्ये जपणे
उपासना करणे
सर्वांचा आदर करणे
वाईट गोष्टींना विरोध करणे
धैर्याने काम करणे
बुद्धिवादी विचार आणि भक्ती एकत्र कशी ठेवता येईल?
धर्माचे रक्षण करणारे, स्व- कर्तव्याचे निष्ठेने पालन करणारे, शूरत्व, सहिष्णुतता बाळगणारे, आणि चरेवेती चरेवेती असे गतिमान प्रेरणादायी जीवन जाणारे कार्यकर्ते असोत.
आदर्शवादी देश आणि आदर्शवादी जीवन अपेक्षा आहेत. स्वत: चे आत्मपरीक्षण करून चिंतनातून हे घडू शकेल असे वाटते.
धर्म संस्थापना म्हणताना रूढी, रिती आणि अनीती या सगळ्याच गोष्टी पहायला हव्यात… आणि हे जितके जास्त लोक समजतील, जाणून घेतली जायला हवी. यातूनच धर्माचे निकष ठरणार असे वाटते
आपली विद्यारंभ ते आचार्यव्रत (अधिक विकासव्रत) ही साखळी धर्मसंस्थापना तत्त्वातील व्यक्तिघडणीचा आशय म्हणून मांडली गेली पाहिजे.