औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २४

२४ : प्रबोधिनीच्या प्रशालांमधून कार्यकर्ते का घडत नाहीत ?

उत्तर :- “मी या प्रश्नाचा अर्थ ‘अपेक्षित गतीने, अपेक्षित संख्येने आणि अपेक्षित गुणवत्तेचे कार्यकर्ते का घडत नाहीत?’ असा घेतो”, असे म्हटल्यावर प्रश्नकत्यनि मला समजलेला प्रश्नाचा अर्थ बरोबर आहे असे सांगितले.

गेल्या महिन्याभरात दोन तीन ठिकाणी मी प्रबोधिनीचा इतिहास सांगितला. तो सांगताना मी दोन शब्दसमूहांचा उल्लेख केला. त्यापैकी पहिला शब्दसमूह ‘Polishing the Human Gems’ (मानवी रत्नांना पैलू पाडण्याचे काम) हा होता. प्रबोधिनीच्या खंड-२ मध्ये कै. शंतनुराव किर्लोस्करांच्या लेखाचे शीर्षक ‘Polishing the Human Gems’ असे आहे. विविध क्षमता आणि कौशल्यांचा विकास करणारी संस्था असे प्रबोधिनीचे वर्णन त्यात केले आहे. प्रशालांचे काम उत्तम चालते तेव्हा हे पैलू पाडण्याचे काम उत्तम होते. परंतु केवळ तेवढ्याने कार्यकर्ते घडत नाहीत.

दुसरा शब्दसमूह डॉ. अब्दुल कलामांच्या पुस्तकाचे शीर्षक असलेला ‘Ignited Minds’ हा आहे. ‘प्रज्वलित मने’ हे त्याचे भाषांतरही प्रसिद्ध झाले आहे. मने पेटणे-पेटवणे म्हणजे प्रेरणा जागरण करणे. युवक विभाग व युवती विभागाचे काम उत्तम चालते तेव्हा मने प्रज्वलित होतात. परंतु केवळ तेवढ्याने अपेक्षित गुणवत्तेचे कार्यकर्ते घडत नाही.

‘Polishing the Human Gems’ आणि ‘Ignited Minds’ ही दोन्ही कामे एकाच वेळी परस्परपूरक चालावी लागतात. तेव्हा अपेक्षित संख्येने, गतीने व गुणवत्तेचे कार्यकर्ते घडतात. यातली एक बाजू लंगडी पडली किंवा दोन्ही बाजू स्वतंत्रपणे चांगल्या पण एकमेकांना छेद देत चालत असल्या तर कार्यकर्ते घडण्याचा वेग मंदावतो. त्या त्या ठिकाणच्या प्रशालेमधील अध्यापकांचा कार्यसंघ आणि युवक विभाग व युवती विभागांमधील मार्गदर्शक व प्रतोदांचा कार्यसंघ या दोन कार्यसंघांचे संघटन व्यक्तींच्या संघटनापेक्षाही जास्त अवघड असते, असा अनुभव प्रबोधिनीच्या सर्व प्रशालांमध्ये येतो आहे.