ज्ञान प्रबोधिनी : देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना

१. प्रबोधिनीचे वर्णन “संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना” असे करावे हे प्रथम १९९० मध्ये सुचले. त्याचे स्पष्टीकरण आजवर कोणी विचारले नव्हते आणि मी ही केले नव्हते. डिसेंबर २००७ मध्ये राजगुरुनगर येथील प्रबोधक प्रशिक्षण वर्गाच्या वेळी प्रभागश: भूमिका मांडणारी सत्रे झाली तेव्हा असे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता जाणवली. हे टिपण माझ्या मनातील अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी लिहिले आहे. यावर प्रथम मध्यवर्ती सहविचार समितीत चर्चा व्हावी. त्यानंतर त्यात आवश्यक वाटतील एवढे बदल करून विस्तारित सहविचार समिती आणि विविध केंद्रांच्या केंद्रीय किंवा सहविचार समित्या या ठिकाणी चर्चा व्हावी. त्यानंतर हे स्वतंत्र टिपण तसेच ठेवावे किंवा तत्त्वसप्तकामध्ये ‘संघटना’ या विषयावरील लेखाच्या नव्या आवृत्तीत त्याचा समावेश करावा.

२. देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना हे प्रबोधिनीचे व्यवच्छेदक — इतर संघटनांपासून प्रबोधिनीचे निराळेपण दाखवणारे — लक्षण आहे असे वाटते. ते प्रबोधिनी या संघटनेचे परिपूर्ण वर्णन नाही.

३. एखादी संघटना विविध संस्था, उच्च पदस्थ व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा उत्सव मंडळे यांना हुकमी स्वयंसेवकांचे बळ पुरवण्यासाठी नाही हे ठसवण्यासाठी “संघटनेसाठी संघटना” असा शब्द प्रयोग झाला असावा. त्याचा अर्थ ‘स्वांतःसुखाय संघटना करावी’ असा न करता, ‘संघटनवृत्ती जोपासण्यासाठी संघटना करावी’ असा घेतला पाहिजे. प्रबोधिनीचे काम ‘संघटनेसाठी संघटना’ पेक्षा अधिक अपेक्षित आहे हे कळावे यासाठी ‘धर्मसंस्थापनेसाठी संघटना’, ‘राष्ट्रनिर्मितीसाठी संघटना’ किंवा ‘मनुष्यघडणीसाठी संघटना’ असे शब्द प्रयोग वेळोवेळी वापरले गेले आहेत. ‘संघटनवृत्ती जोपासण्यासाठी’ पेक्षा ‘मनुष्यघडणीसाठी’, त्यापेक्षा ‘राष्ट्रनिर्मितीसाठी’, आणि त्यापेक्षा ‘धर्मसंस्थापनेसाठी’ ही अधिकाधिक व्यापक उद्दिष्टे आहेत. ही चार उद्दिष्टे मुख्यतः दिशादर्शक आहेत. कार्यदर्शक उद्दिष्टे मांडल्याचा जास्त उपयोग होईल असे वाटल्याने प्रबोधिनी या संघटनेचे व्यवच्छेदक लक्षण मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

४. भवितव्य-लेखाच्या मांडणीमध्ये धर्मसंस्थापनेची तीन कार्यक्षेत्रे कल्पिली आहेत —

त्यापैकी १), २), ३) चा आपण तत्त्व-सप्तकात समावेश केला आहे. त्यामुळे तत्त्व-सप्तकातील इतर चार तत्त्वांचा संस्कार करायला हवा असेही भवितव्य-लेखात मांडले आहे —

यापैकी ६) चा संस्कार हा मूलभूत संस्कार आहे. ७) हे त्याचेच विकसित वैशिष्ट्य आहे. ४) व ५) आधुनिक काळासाठी आवश्यक कार्यसाधक तत्त्वे आहेत. त्यांचे मूळ हिंदू जीवनदृष्टीत सापडले तर उत्तमच. नाहीतर ती मागून घातलेली भर आहेत असेही म्हणायला हरकत नाही. ती इतरांकडून शिकलो आहोत असे कोणाला म्हणावेसे वाटले तरी चालेल. आधुनिक समाजात ती आवश्यक आहेत एवढे मात्र निश्चित.

५. ‘संघटना’ व ‘विकास’ ही तत्त्वे देखील आधुनिक समाजाला आवश्यक अशीच आहेत. यज्ञसंस्था व चातुर्वर्ण्य व्यवस्था यात कोणी संघटना तत्त्वाचे मूळ शोधतात. आधुनिक समाजात संघटनेचे हे दोन्ही स्रोत कोणाला अप्रस्तुत वाटू शकतील. ‘मनुष्यत्वा’कडून ‘देवत्वा’कडे किंवा ‘बद्ध’पणाकडून ‘सिद्ध’पणाकडे व्यक्तीचा विकास असा विकासाचा विचार पूर्वी झाला आहे. समाजाचा विकास ही कल्पना अलिकडच्या काळातील आहे. थोडक्यात, आधीच्या मुद्द्यातील उत्तमता व विज्ञानाभिमुखता आणि या मुद्द्यातील संघटना व विकास या तत्त्वांना प्राचीन भारतीय पार्श्वभूमी असली तरी आता त्यांना आधुनिक आंतरराष्ट्रीय संदर्भही प्राप्त झाला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

६. खालील आकृतीप्रमाणे निखळ भारतीय तत्त्वे उभ्या अक्षावर व आंतरराष्ट्रीय संदर्भ असलेली तत्त्वे आडव्या अक्षावर मांडता येतील:

हिंदू जीवनदृष्टी हा पाया आहे. तर धर्मसंस्थापना हे चिरकालिक ध्येय आहे. व्यक्तीच्या, समूहाच्या, समाजगटांच्या आणि राष्ट्राच्या पातळीवर अ) वर्तुळातील चार तत्त्वांचा संस्कार, आ) संघटना आणि इ) विकास यांचा विचार करता येईल. म्हणजेच संस्कार व्यक्तींवर, समूहांवर व राष्ट्रावर करायचे आहेत. संघटना व्यक्तींची, लोकसमूहांची आणि देशव्यापी समाजाची करायची आहे. विकास व्यक्तींचा, लोकसमूहांचा आणि देशव्यापी समाजाचा करायचा आहे.

७. देशव्यापी समाजावर जीवनदृष्टीचे संस्कार करणे, देशव्यापी समाजाचे संघटन करणे व देशव्यापी समाजाचा विकास करणे म्हणजेच राष्ट्रनिर्मिती. ‘राष्ट्रनिर्मितीसाठी संघटना’ म्हणताना संघटना, विकास, संस्कार हे एकाच प्रक्रियेचे तीन पैलू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही एकाबरोबर बाकीचे दोन पैलू येणारच. उदा. संघटना करताना संघटनेतील व्यक्तींवर वरील आकृती ३ मधील वर्तुळातील चार तत्त्वांचे संस्कारही करावे लागतील. आणि संघटना करताना विकासही करावा लागेल. या तिन्ही पैलूंचे परस्परावलंबित्व स्वीकारलेले असणे हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य आहे.

८. देशव्यापी समाजाच्या विकासामध्ये — भौतिक विकास, त्यासाठी आर्थिक विकास, त्यासाठी राजकीय/प्रशासकीय व्यवस्थांचा विकास, त्यासाठी सामाजिक संबंधांचा विकास, त्यासाठी शैक्षणिक-सांस्कृतिक विकास, त्यासाठी पुन्हा भौतिक विकास अशा चक्राला गती देण्याची योजना करावी लागेल. वेगवेगळे लोक चक्रावरच्या वेगवेगळ्या बिंदूंपाशी गती देतील. कुठूनही गती दिली तरी एवढ्याच बिंदूला नाही तर संपूर्ण चक्राला गती द्यायची आहे हे लक्षात ठेवून, गती देण्याची प्रक्रिया अखंडित चालू ठेवावी लागेल. ही प्रक्रिया अखंडित चालू ठेवण्यासाठी जी काही रचना करावी लागेल त्यामध्ये वेगवेगळ्या बिंदूंवर वेगवेगळ्या प्रमाणात भौतिक, आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक घटक असावे लागतील.

९. एकेका विशिष्ट बिंदूपाशी विकास चक्राला गती देणाऱ्या व्यक्तींच्या लहान-मोठ्या समूहांना ‘संघटना’ म्हणता येईल. त्या त्या बिंदूंपाशी गती देण्याचे काम अखंडित चालू राहावे यासाठी संघटनेने उभ्या केलेल्या रचनांना ‘संस्था’ म्हणता येईल. रक्ताच्या नात्याने जोडलेल्या आणि आयुष्याचा बऱ्यापैकी काळ एकत्र राहणाऱ्या गटाला ‘कुटुंब’ म्हणतात. या कुटुंबाने काही भौतिक, आर्थिक, प्रशासकीय, संबंधाधारित, सांस्कृतिक रचना उभी केलेली असते. ती त्या कुटुंबाची संस्था. कुटुंब ही संघटना व त्या कुटुंबाची संस्था ही संकल्पना इतकी चिवट व पायाभूत आहे की ‘वसुधैव कुटुंबकम्’ — म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच संघटना व त्या संघटनेची एकच संस्था अशा एकाच विश्वकुटुंबाची कल्पना भारतात केली गेली. रक्ताच्या नात्याच्या एकक कुटुंबापासून विश्वकुटुंपर्यंतच्या या सातत्यकावर (Continuum), हे टोकाचे दोन बिंदू सोडले तर मधल्या बिंदूंवरच्या समूहांना किंवा गटांना कुटुंब हे संबोधन सहसा वापरत नाहीत. लोकसमूह आणि त्याने उभी केलेली रचना यापैकी ज्याला महत्व अधिक त्यानुसार त्या बिंदूंना संघटना किंवा संस्था हे संबोधन वापरतात.

१०. खालील आकृती क्र. ४ मध्ये एकमेकांना जवळून ओळखणाऱ्या एकक कुटुंबाचा बिंदू डावीकडे दाखवला आहे. तर परस्परांना न पाहिलेल्या परंतु मनाने एकमेकांना आपले मानायची तयारी झालेल्यांच्या विश्वकुटुंबाचा बिंदू उजवीकडे दाखवला आहे. डावीकडे संघटना प्रत्यक्ष व संस्था किमान आहे. तर उजवीकडे संघटना मानसिक व संस्था प्रधान आहे. आकृतीच्या मधल्या फुगीर भागात एकेका छेद-वर्तुळावरही संस्था-संघटनेचे वेगवेगळे प्रमाण असलेले अनेक लोकसमूह असतील. समूहाच्या एकजीव असण्याला महत्त्व देणारे लोकसमूह हे संघटनाप्रधान आहेत. रचनेच्या कार्यक्षमतेला व सुबकतेला महत्त्व देणारे लोकसमूह संस्थाप्रधान आहेत. प्रबोधिनी एक संघटनाप्रधान लोकसमूह आहे.

११. मुद्दा क्र. ८ मध्ये संघटना, विकास, संस्कार या धर्मसंस्थापनेच्या (म्हणजेच विश्वकुटुंबनिर्मितीच्या) किंवा राष्ट्रनिर्मितीच्या (एका राष्ट्राचे कुटुंबनिर्मितीच्या) तीन पैलूंचे परस्परावलंबि प्रबोधिनीने स्वीकारलेले आहे, हे प्रबोधिनीचे एक वैशिष्ट्य मांडले आहे. मुद्दा क्र. १० मध्ये प्रबोधिनी हा समूहाच्या एकजीवतेला महत्त्व देणारा संघटनाप्रधान लोकसमूह आहे असे प्रबोधिनीचे दुसरे वैशिष्ट्य मांडले आहे. प्रबोधिनी हा संघटनाप्रधान लोकसमूह संघटनेचे विकास व संस्कारांवरील परस्परावलंबित्व मानतो यातून प्रबोधिनीचे तिसरे वैशिष्ट्य निर्माण होते. त्याचा ऊहापोह पुढे मुद्दा क्र. १८ पर्यंत केला आहे.

१२. अ) समाजातील व्यक्तींचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आत्मिक विकास व आ) समाजाचा भौतिक, आर्थिक, राजकीय/प्रशासकीय, व्यक्ती व समूहांच्या आंतरक्रियात्मक आणि शैक्षणिक-सांस्कृतिक विकास काही व्यक्तींच्या अलौकिक कर्तृत्वामुळे होतो तसाच तो सातत्याने काम करणाऱ्या संस्थात्मक रचनांमुळेही होतो. या संस्थात्मक रचनांना लागणारी ऊर्जा काही व्यक्तींनी पुरवलेली असते किंवा संघटनांनी पुरवलेली असते. विकासाचा तत्कालीन टप्पा सांभाळण्याचे किंवा राखण्याचे काम संस्थात्मक रचना करतात. तसेच त्या विकासाच्या नवीन टप्प्यावर घेऊन जाणाऱ्या असतात.

उदाहरणार्थ व्यक्तीचा शारीरिक विकास स्वतः च्या आहार, विहार, व्यायामाच्या सवयींमुळे होतो. समाजामध्ये त्यासाठी तालीम, व्यायामशाळा, ‘जिम’, ‘हेल्थ स्पा’ अशा रचना उभ्या राहतात. या प्रत्येक रचनेसाठी लागणारी इमारत व साहित्य वेगवेगळे आहे. आर्थिक गुंतवणूक वेगवेगळी आहे. त्या चालवण्याचा दैनंदिन खर्च वेगळा आहे. याच रचनांमध्ये आहारसल्ला, खुराकाची व्यवस्था, पौष्टिक/समतोल आहार विक्री केंद्र, वैद्यकीय तपासणीची सोय अशी भर पडली की त्यांचे प्रशासन कमी-अधिक गुंतागुंतीचे होते. या प्रत्येकाचे व्यवस्थापन एखादी व्यक्ती, भागीदार, खाजगी कंपनी किंवा अनेक शहरांमधून अशा व्यायामशाळा चालवणारी लिमिटेड कंपनीही करत असू शकेल. जोर-बैठका आणि मातीतील कुस्तीपासून पूर्ण स्वयंचलित यंत्राधारित व्यायाम प्रकारांपर्यंत विविध प्रकारचे व्यायाम, वस्ताद-पठ्ठा पद्धतीपासून एक वेळच्या सत्रातले सशुलक ‘मॉड्यूल’ शिकवण्यापर्यंत अनेक पद्धतींनी शिकवले जाऊ शकतील. व्यक्तिगत आणि सामूहिक व्यायाम, संगीताधारित व्यायाम आणि शनिवारची मारुतीची आरती, समंत्रक सूर्यनमस्कार आणि एरोबिक्स्, क्रीडा स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी व्यायाम आणि आजारावर उपचार म्हणून व्यायाम अशा अनेक अंगे आणि अलंकार यातून या रचना बनलेल्या असतील.

या अनेक प्रकारच्या व्यायामशाळा म्हणजे अनेक प्रकारच्या लोकांच्या अनेक गरजा भागवणारी स्थाने आणि संस्था आहेत. यातली एकच रचना बरोबर आणि ती व एवढीच संस्था हवी असे व्यायामक्षेत्रातले कोणी म्हणणार नाही. जास्तीत जास्त लोकांच्या शारीरिक विकासाच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण होणे म्हणजे व्यायाम-क्षेत्रातले संस्थात्मक जीवन समृद्ध होणे.

अ) अशा विविध व्यायाम-संस्थांमध्ये येणाऱ्यांची आर्थिक लूट होणार नाही, आ) अनावश्यक किंवा दीर्घ काळाने अपायकारक असे सल्ले वा प्रशिक्षण तिथे येणाऱ्यांना दिले जाणार नाही, इ) व्यायामाला येणाऱ्यांच्या संख्येचा वा शारीरिक बळ व कौशल्याचा वापर व्यायामशाळा चालक/मालक स्वतःच्या स्वार्थासाठी करणार नाहीत, ई) उलट त्याचा उपयोग समाजातील सज्जनशक्तीला बळ पुरवण्यासाठी व्हावा असा प्रयत्न करतील, असे होणे म्हणजे व्यायाम-क्षेत्रातले संस्था जीवन अधिक समृद्ध होणे.

संस्थात्मक जीवन अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी व्यायामशाळांचे एकटे-दुकटे चालक, व्यक्ती, मंडळ किंवा कंपन्या पुरणार नाहीत. त्यांना एकत्र येऊन उद्दिष्टे, मूल्ये, कार्यपद्धती यांचा एकत्र विचार करावा लागेल. एकत्र कृती-कार्यक्रम ठरवावा लागेल. असे या क्षेत्रातले चालक एकत्र येऊन कामाला लागणे म्हणजे व्यायाम-क्षेत्रातले संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना होणे.

१३. जसे व्यायामाचे एक क्षेत्र वरती तपशिलात पाहिले तशी समाजजीवनाची अनेक क्षेत्रे आहेत. प्रबोधिनीच्या घटनेतही बँका, विमा कंपन्या, शिपिंग कंपन्या, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, कारखाने, शेती संस्था, धार्मिक व सामाजिक संस्था अशा अनेक क्षेत्रांतील संस्थांचा उल्लेख आहे. या प्रत्येक क्षेत्रात त्या त्या संस्थांची भौतिक रचना, अर्थव्यवहार व उद्दिष्टांचे पुनरावलोकन या सर्वांच्या पद्धती ठरत गेलेल्या असतात. ही सर्व कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती या संस्थांमधून काम करत असतात. या व्यक्ती कार्यगट (ग्रुप), कार्यसंघ (टीम), उत्तरदायित्वाची उतरंड (हायरायरकी), ध्येयप्रेरित समूह (संघटना) अशा पद्धतींनी परस्परांशी जोडलेल्या असतात. यापैकी पहिले तीन प्रकार संस्थाप्रधान लोकसमूहाचे आहेत. तर शेवटचा प्रकार संघटनाप्रधान समूहाचा आहे (पाहा मुद्दा क्र. १०). संघटनाप्रधान समूहामध्ये ध्येय मुख्य असते. त्यासाठी परस्परसंबंध हार्दिकतेचे व कार्यपोषक असावे लागतात. अशा समूहाचे कार्य संस्थात्मक जीवन समृद्ध करणे (विकास), परस्परसंबंध दृढ आणि कार्यपोषक करणे (संस्कार) व संस्थात्मक काम आणि गटबांधणी हे दोन्ही ध्येयानुवर्ती करणे (संघटना) असे तिहेरी स्वरूपाचे असायला पाहिजे.

१४. प्रबोधिनीचे वर्णन आपण असेच करतो. आकृती क्र. ४ मध्ये नमुन्यादाखल काही छेद-वर्तुळे दाखवली आहेत. त्या पैकी मधल्या फुगीर भागातले एक-एक छेद-वर्तुळ व्यायाम, बँकिंग, शिपिंग, संशोधन इ. एक-एक क्षेत्राचे आहे. प्रत्येक वर्तुळावरचा एक-एक बिंदू म्हणजे एक-एक संस्था व तिच्यामध्ये असलेला लोकसमूह. लोकसमूह ध्येयप्रेरित असेल तर ती संस्था संघटनाप्रधान होत जाते. एका संस्थेपुरतीही संघटना असू शकेल. एका वर्तुळावरच्या अनेक बिंदूंना जोडणारीही संघटना असू शकेल. अनेक छेद-वर्तुळांवरचे एक वा अधिक बिंदू जोडणारी संघटना अशा प्रबोधिनीचे चित्र आपण पाहत आलो आहोत. व्यायामक्षेत्रातले संस्था जीवन समृद्ध करणारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी. गेल्या ११२ वर्षांत क्रमशः जगभर क्रीडाक्षेत्रातील उत्तमतेचा ध्यास निर्माण करून अनेकांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण करण्याचे काम ही कमिटी करत आली आहे. ‘ॲण्टीडोपिंग’ नियम करून, त्यांचा आग्रह धरून काही ध्येयनिष्ठा — त्या साठीची मूल्यनिष्ठा — ती निर्माण करत आहे.

संघटनेचे ध्येय व्यापक अथवा मर्यादित असेल, तिचे भौगोलिक कार्यक्षेत्र जागतिक अथवा स्थानिक असेल, तिचे स्वरूप ध्येयवाद प्रमुख मानणारे संघटनाप्रधान असेल किंवा अपेक्षित/पूर्वनिर्धारित कामगिरी सातत्याने करणे प्रमुख मानणारे संस्थाप्रधान असेल, तिच्यात व्यापक लोकसहभाग असेल किंवा एखाद्या क्षणी त्यात तीन जणच असतील. एकूण असे दिसते की आधुनिक समाजात संस्था आणि संघटना एकमेकांमध्ये पूर्ण गुंतून गेलेल्या आहेत. त्यांच्या उत्तम, सातत्यपूर्ण, विकसनशील कामगिरीसाठी त्यांच्या सदस्यांचे किमान प्रशिक्षण व अधिकात अधिक संस्कारही व्हावे लागतात.

१५. प्रबोधिनीत आपण ‘एक गाव ते खोरे’ अशी संकल्पनात्मक झेप घेतली. त्याप्रमाणे कामही करायचा प्रयत्न करत आहोत. ही कामे मुख्यतः भौतिक व आर्थिक क्षेत्रातली आहेत. राजकीय/प्रशासकीय कामे क्वचितच केली. सामाजिक चळवळी/आंदोलने प्रासंगिक केली. शैक्षणिक/सांस्कृतिक काम उशिराने सुरू झाले व क्षीणपणे चालू आहे. पण खोऱ्याचा सर्वंकष विकासाचा आराखडा जेव्हा मांडला तेव्हापासूनच खरे तर खोरे विकसन म्हणजे खोऱ्यातील संस्थात्मक जीवनाचाही विकास हे सूत्र आपण स्वीकारले आहे. भौतिक विकास करण्यासाठी व त्याची पातळी राखण्यासाठी बांधकाम, उभारणी, देखभाल करणाऱ्या संस्था लागतातच. तरीही खोरे विकसन म्हणजे खोऱ्यातील व्यक्तींचा विकास (हे संस्काराचे काम), खोऱ्यातील भौतिक विकास (हे रूढार्थाने व स्थूलार्थाने विकासाचे काम) व खोऱ्यातील विविध संस्थात्मक जीवनाचा विकास (हे संघटनेचे काम) असे तिहेरी काम करायला लागेल हे आपण ओळखले आहेच.

कुटुंबांचा, ग्रामपंचायतींचा विकासही संस्थात्मक जीवन समृद्ध करण्याचा भाग आहे, हे अनुक्रमे बचत गट व पंचायतराज प्रशिक्षण/पाणी समिती/आरोग्य समिती असे विषय हाताळताना लक्षात आले आहे. पाणलोटाच्या कामांचे गावाकडे हस्तांतरण, हातपंपाच्या देखभालीचे गावाकडे हस्तांतरण अशावेळी गावसंस्थांच्या विकासाची आवश्यकता जाणवली आहे.

शहरांमध्ये, शिक्षण, संशोधन, आरोग्य, उद्योग हे विषय हाताळताना तसेच समाज ऐक्य समितीचे काम करताना सामाजिक व शैक्षणिक-सांस्कृतिक क्षेत्रे आपण जास्त हाताळतो आहोत. परंतु समाज ऐक्य समितीच्या कामाच्या वेळी व निगडी, सोलापुरातील संस्था उभारणीच्या वेळी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा किमान संपर्क आपल्याला आवश्यक वाटला. साखर शाळांचा विस्तार होतानाही प्रशासनाचा सहभाग आवश्यक वाटला. कुष्ठरोग योजनेच्या अंतिम पर्वात कात्रज-धनकवडी भागातील झोपडपट्ट्यांमधून आरोग्याचे कामही त्या विभागाची आपली यंत्रणा करू शकत होती. त्यामुळे मनुष्यशक्ती, तज्ञता, आर्थिक बळ असेल तर शहरातही भौतिक, आर्थिक क्षेत्रातील काम आपण करणारच नाही असे नाही.

१६. ‘शिवगंगा खोरे विकास’ ते ‘शिवप्रदेश विकास’ ते ‘प्रदेशविकसन’ अशी व्यापक होत गेलेली नावे कै. आप्पाही वापरत गेले कारण देशातील एकेका प्रदेशाचे विकसन करतच देशाचा कायापालट — देशाचे रूप पालटणे — शक्य आहे. धर्मसंस्थापनेसाठी समाजसंस्थापना व राष्ट्रनिर्माण असेही पर्याय शब्द कै. आप्पा वापरू लागले.

अशी आपल्या उद्दिष्टांची साखळी मांडली पाहिजे.

१७. व्यक्तिमत्त्व विकसनामध्ये कर्तृत्व संपादनाची, पराक्रमाची ईर्षा निर्माण करणे येते. परंतु पराक्रमाचे परिणाम टिकऊ व्हायचे असतील तर त्याला काही संस्थात्मक ढाचा द्यावा लागतो. घटनेतील उद्दिष्टांच्या शेवटच्या परिच्छेदात ‘नेतृत्वविकास, शिक्षण प्रणालीची निर्मिती इ. उद्देशांच्या मुळाशी स्वदेशात १) विचारप्रबोधन व २) कार्यप्रबोधन व्हावे, ३) देशाचा कायापालट व्हावा, ४) येथे पुनरुज्जीवन होऊन ५) देशात व लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे.’ असे म्हटले आहे. यामध्ये

असे स्पष्टीकरण केले पाहिजे. यापैकी पहिले चार हेतू मिळून ‘राष्ट्रनिर्माण’ आहे. पाचवा हेतू नवचैतन्य निर्माण म्हणजे ‘देवमानवांचा समाज निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने समाज कार्यरत होणे’ म्हणजेच समाजसंस्थापना. राष्ट्रनिर्माण व समाजसंस्थापना मिळून ‘धर्मसंस्थापना’ हे ध्येय पूर्ण होते.

१८. विचार प्रबोधन व पुनरुज्जीवन हे संस्काराचे काम आहे. देशाचा कायापालट हे विकासाचे काम आहे. कार्यप्रबोधन म्हणजेच संस्थात्मक जीवन किंवा संस्थाजीवन समृद्ध करणे हे संघटनेचे काम आहे. सुरुवातीला ‘देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करण्यासाठी संघटना’ हे प्रबोधिनीचे व्यवच्छेदक — निराळेपण दाखवणारे — लक्षण आहे असे म्हटले होते. याचे कारण अर्थातच देशात विचार प्रबोधन व पुनरुज्जीवन करणारी व देशाचा कायापालट करणारी संघटना असेही प्रबोधिनीचे वर्णन आपण करू इच्छितो. ही सर्व कामे टिकाऊ होण्यासाठी संस्थात्मक जीवन समृद्ध करण्याची आपण गरज ओळखली. म्हणूनच ‘प्रत्येक क्षेत्रात आम्ही संघटना घडवू’, ‘शाळा, उद्योग, संशोधन संस्था, विकास प्रकल्प, रुग्णालय ही सर्व कार्यकर्ते घडणीची — संघटनेची साधने आहेत’ अशी विधान आपण केली आहेत.

संघटना हे मूळ आहे. समृद्ध संस्थात्मक जीवन हे फळ आहे. हे ओळखून संघटना की संस्था या वेळखाऊ चर्चेतून आपण बाहेर पडले पाहिजे. देशात समृद्ध संस्थात्मक जीवन तयार होणे ही आपले संघटनात्मक काम चांगले झाल्याची एक पावती आहे. इतर बहुतांश संघटना कायापालटाचे काम करणाऱ्या, विचार प्रबोधनाचे किंवा संस्काराचे काम करणाऱ्या आहेत. ती कामे वगळून संस्था जीवन समृद्ध करण्याचे काम करता येणार नाही. परंतु ते ही करायला हवे हे आपण लक्षात घेतले आहे हे प्रबोधिनीचे तिसरे वैशिष्ट्य आहे (पाहा मुद्दा क्र. ११). आजपर्यंत ते स्पष्टपणे, नेमक्या शब्दात प्रकटपणे मांडलेले नाही. तसे ते मांडले तर प्रबोधिनीच्या बाहेर व आतही प्रबोधिनीच्या कामाची नेमकी जाणीव होईल का हे आपण सर्वजण चर्चा करून ठरवू या.

१९. एखाद्या विषयाशी किंवा कामाशी बांधिलकी मानणारे तज्ञ, प्रशिक्षित, व्यवसायनिष्ठ अशा लोकांची देशाचा कायापालट करण्यासाठी आवश्यकता आहेच. ते जिथे एकत्र काम करतात अशा अनेक प्रकारच्या संस्था देशात उभ्या राहाव्यात अशीच आपली इच्छा आहे. अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना जिवंत व प्रेरणादायी असावी, त्यांनी राष्ट्रनिर्मिती व त्यासाठी संघटन हे ध्येय व उद्दिष्ट अंगीकारावे अशीही आपली इच्छा आहे. संस्था हे यंत्र असल्याने संवेदनाहीन होण्याकडेच त्यांची नैसर्गिक गती राहील. परंतु या यंत्रामध्ये प्राण भरण्याचे काम करणारी जी संघटना तीच संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना. संस्था ही काया. ध्येयनिष्ठ संघटना हा आत्मा. आणि आपण ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’ असे गाणारे. म्हणूनच हा विषय आपल्या चर्चेच्या कक्षेत यावा असे वाटते. प्रबोधिनीचे स्वतःचे संस्थात्मक रूपही समृद्ध असावे आणि देशातील संस्थात्मक जीवनही प्रबोधिनीमुळे समृद्ध व्हावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *