जीवनदृष्टी
जपानमध्ये एखाद्या उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तिथे जपानी पद्धतीच्या चहाचे दुकान आढळते. जर्मनी, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंडमध्ये डोंगराच्या निसर्गरम्य ठिकाणी कॉफीची किंवा वाईन आणि बिअरची दुकाने सापडतात. अमेरिकेतल्या डोंगरांवरच्या प्रेक्षणीय स्थळी उंच ठिकाणी किंवा कड्याच्या टोकाशी एक दुर्बिण बसवलेली असते. कुठल्या दिशेने पाहिल्यावर कोणती स्थळे दिसतील याचा नकाशाही तिथे लावलेला असतो. मात्र २५ सेंटचे नाणे टाकल्याशिवाय दुर्बिणीच्या भिंगावरचे झाकण उघडत नाही. भारतामधील उंच डोंगरावर, निसर्गरम्य स्थळी छोटेसे तरी शिवमंदिर सापडते. मग त्याशिवाय देवीचे, मारुतीचे किंवा ग्रामदैवतांचीही देवळे दिसतील. जपान आणि युरोपमध्ये जिभेच्या सुखासाठी आणि अमेरिकेत डोळ्यांच्या सुखासाठी व्यवस्था केलेली असते. भारतामध्ये मात्र इंद्रियांच्या सुखापेक्षा मनःशांतीसाठी योजना केलेली असते. हा चार देशांमधल्या आयुष्याकडे बघण्याच्या पद्धतीतलाही फरक आहे. सर्वच देशांमध्ये एखाद्या ठिकाणी जास्ती लोक आले की तिथे बाजार भरायला लागतो. परंतु भारतामध्ये कितीही बाजार भरला तरी मध्यभागी देऊळ लागतेच. आजसुद्धा भारतात पर्यटन करणाऱ्या भारतीयांची संख्या पाहिली, तर प्रेक्षणीय स्थळांना जाणाऱ्यांपेक्षा तीर्थयात्रा करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही जास्ती आहे. ही भारतीयांची आयुष्याकडे बघण्याची पद्धत आहे, तिलाच जीवनदृष्टी म्हणतात.
केवळ भारतामध्येच नद्यांमध्ये उभे राहून, नदीतले पाणी ओंजळीत घेऊन ते पाणी देवाला किंवा सूर्याला अर्घ्य म्हणून नदीतच सोडणारे लोक सापडतील. जे परमेश्वराने दिलेले आहे, त्याचा त्यालाच नैवेद्य दाखवून आपण त्यातला थोडा भाग प्रसाद म्हणून घ्यायचा व बाकीचा त्यालाच किंवा त्याच्या नावाने लोकांना द्यायचा, ही भारतीय जीवनदृष्टी आहे.
जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे
आपण बारकाईने निरीक्षण करत गेलो, तर सर्वसामान्य लोकांच्या साध्या-साध्या कृतीतून ही जीवनदृष्टी व्यक्त होत जाते. एखाद्या समाजाची ओळख त्याच्या जीवनदृष्टी वरूनच होते. जीवनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका फुलाचे उदाहरण घेऊन म्हटले आहे,
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती ।
कोणी त्यांची महती गणती केली असे ।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणीं ठेविले ।
कमलपुष्प ते अमर झाले मोक्षदायी पावन ।।
प्रसिद्ध हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदी यांनी सावरकरांच्या ही पुढे जाऊन देवाच्या चरणी बाहिले जाण्यापेक्षा मातृभूमीसाठी बलीदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडवले जाणे अधिक भाग्याचे असे असे एका कवितेत म्हटले आहे. कवी म्हणतो,
चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ ।
चाह नही प्रेमी माला में बिंध प्यारी को ललचाऊँ ।
चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि! डाला जाऊँ ।
चाह नहीं तेरी मूरतपर चढूँ भाग्य पर इठलाऊँ ।
मुझे तोड लेना वनमाली उस पथ पर देना तुम फेंक ।
मातृभूमि पर शीष चढ़ाने जिस पथ जावे वीर अनेक ।
दोन्ही कवितांमध्ये फुलांच्या रूपाने स्वतःच्या जीवनपुष्पाच्या समर्पणाचीच भावना व्यक्त होते. पहिल्या कवितेत, सुकून निर्माल्य व्हायचेच आहे, तर देवाला वाहिले जाऊन निर्माल्य होण्यात कृतार्थता मानली आहे. तर दुसऱ्या कवितेत फूल, आपल्याला झाडावरून तोडून मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडविले जाण्यासाठी त्यांच्या फाशीच्या तक्त्याकडे जायच्या वाटेवर टाकायला देवालाच सांगते आहे. इतरांसाठी जगण्यातच आनंद मानणे ही आमची आयुष्य जगायची पद्धत आहे. तिलाच जीवनपद्धती म्हणतात. प्रत्येक घरात कुटुंबासाठी जगण्यात आनंद मानणारी आई भारतीय जीवनपद्धती प्रमाणे जगण्याचे मूर्त उदाहरण असते.
संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती
जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती यांना मिळून आज संस्कृती असा शब्द वापरतात. पूर्वीच्या काळी भारतीय भाषांमध्ये संस्कृती हा शब्द वापरात नव्हता. त्याऐवजी धर्म हा शब्द आपण बापरायचो. समाजाची धारणा करणारा म्हणजे समाजाला एकसंध व प्रगतिशील ठेवणारा तो धर्म, अशी धर्माची व्याख्या आहे. निश्चित जीवनदृष्टी आणि त्यानुसार बनलेली जीवनपद्धती असेल तरच समाजाची धारणा होते. म्हणजे समाजातील सर्व व्यवस्था उत्तम चालतात आणि समाजाची प्रगती होत जाते. जेव्हा आपण हिंदू धर्म असा शब्द वापरतो, तेव्हा त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि व्यवहार्य अध्यात्म अशा दोन गोष्टी येतात. भारतीय संस्कृतीची दृष्टी अशी आहे, की निसर्गाच्या सर्व शक्तींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा.
संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय
बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदू समाजाने प्राचीन काळात विज्ञान संशोधनामध्ये मोठी आघाडी मारली होती. गणितातील दशमान पद्धती आणि शून्याची कल्पना, खगोलशास्त्रातील पृथ्वीला गती आहे, पण ती स्थिर भासते हा सिद्धांत, रसायनशास्त्र, वैद्यक आणि शल्यचिकित्सा या सगळ्यांमध्येच हिंदू समाजाने आघाडी घेतलेली होती. अगदी पेशवाईच्या काळापर्यंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हिंदू समाजाने सांभाळले. इंग्लंडमध्ये न पाहिलेली प्लॅस्टिक सर्जरी आणि लसीकरण इंग्रजांना भारतात पहायला मिळाले होते. विज्ञानात गती असूनही पारतंत्र्य आल्यावर तेराव्या शतकाच्या सुमारास हिंदुस्थानातल्या विज्ञानाचा विकास थांबला. हिंदू समाजाने संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये कथा, काव्य, नाट्य यात बरेच प्रयोग केले होते. संगीताचेही शास्त्र बनविले होते. त्याचबरोबर नीतीशास्त्र, शिल्पकला, योगविद्या, स्थापत्य यांतही प्रगती केलेली होती. व्याकरण आणि भाषाशास्त्र, उद्यानविद्या, हत्ती आणि घोड्यांचे आयुर्वेद ही सर्वच शास्त्रे विकसित झाली होती. हे सर्व निर्माण करू शकणारा समाज बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याची इच्छा असणाराच असतो.
काही शतकांच्या खंडानंतर हिंदू समाजाने या बाह्य विषयांकडे पुन्हा लक्ष वळविले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १९९५ साली ‘व्हिजन २०२०’ ही योजना तयार झाली. त्यामध्ये एकूण वीस प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये भारत जगातल्या पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये यावा, अशी विकासाची योजना मांडली होती. त्यात मांडलेली जवळ जवळ सर्व उद्दिष्टे २०२० पर्यंत पूर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. त्या योजनेमध्ये कुठेही भारत महासत्ता व्हावा किंवा superpower व्हावा, असे म्हटले नव्हते. वीस तंत्रज्ञानांत प्रगती झाल्याबर भारत महासत्ता होईल ही प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली हवा आहे.
बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय
हिंदू संस्कृतीचे असे वैशिष्ट्य आहे, की भारतीयांना कधीच महासत्ता व्हावेसे वाटले नाही. पूर्वीच्या काळीही नाही, आणि आजही नाही. भारतीय समाजाने स्वप्न पाहिले, ते विश्वगुरू होण्याचे. सामान्य मनुष्यापासून देवमाणूस कसे बनायचे हे सगळ्या जगाला शिकवावे, अशी भारतीयांची इच्छा होती. जगाला शिकवणे म्हटल्याने किंवा विश्वगुरू म्हटल्यानेही आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू शकते. तशी श्रेष्ठत्वाची भावनाही भारतीयांनी कधी दाखवली नाही.
भारतीयांचे म्हणणे असे आहे की, ‘बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे यातच सर्व काही नाही हे आम्हांला सर्वांच्या आधी कळले. त्यामुळे प्रत्येकाच्या आतमधील शक्तीचा स्रोत शोधायला सर्वांच्या आधी आम्ही सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या आतील हे शक्तिकेंद्र सापडल्यावर माणसाचा देवमाणूस होतो हे आमच्यातील काही जणांना कळले. ते इथले ऋषी, मुनी, आणि योगी व संत होते. काही जणांना जे कळले ते सगळ्या भारतीयांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विश्वगुरू बनणे म्हणजे आमच्या देशात सर्व समाजातून देवमाणसांचा संघ आम्ही कसा करतो आहोत, हे इतर देशांतल्या लोकांनी बघावे आणि स्वतःही तसेच बनण्याचा प्रयत्न करावा.’ ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही जशी म्हण आहे, तसे ‘पुढच्याची प्रगती पाहून मागचा शहाणा’ अशी ही विश्वगुरू बनण्याची कल्पना आहे.
निसर्गातील शक्तींवर विजय मिळविताना किंवा जगाला शिकवताना, सर्वांना प्रेमाने जिंकावे ही भारतीयांची दृष्टी राहिली आहे. कुठल्या वनस्पतीचा औषधी उपयोग कसा करता येईल, हे शोधून काढणे म्हणजे निसर्गावरती विजय मिळवणे. पण हा विजय प्रेमाने मिळवायचा म्हणजे एखाद्या वनस्पतीचा भाग औषध म्हणून वापरायचा असेल, तर त्या वनस्पतीची प्रार्थना करून तिची परवानगी घेऊन मग ती वनस्पती तोडावी, असे आपली संस्कृती सांगते. शुद्ध आयुर्वेदानुसार वैद्यकी करणारे अनेक वैद्य आजही ही पद्धत पाळतात. तसेच आदिवासीही याच पद्धतीने प्रार्थना करून मग वनस्पतींचा उपयोग करतात.
साधनपूजा आणि प्रतीकपूजा
आपले आयुष्य सुखी-समाधानी करायचे असेल, तर सृष्टीतली अनेक साधने नैसर्गिक स्थितीत किंवा त्यावर प्रक्रिया करून वापरावी लागतात. या सर्व साधनांची पूजा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. भूमिपूजन, वास्तुपूजन, शस्त्रपूजन, यंत्रपूजन, ग्रंथपूजन, वृक्षपूजन, गोपूजन या सगळ्या पद्धती या जीवनदृष्टीतूनच आलेल्या आहेत. पूर्वी चुलीची आणि उखळाची पूजा करायचे, तर आज दिवाळीच्या पाडव्याला वहीपूजनाबरोबर संगणकाचीही पूजा करतात. नवीन वाहनाचीच नाही, तर प्रक्षेपण करण्यापूर्वी अग्निबाणाचीही पूजा करतात, आणि चाचणी घेण्यापूर्वी क्षेपणास्त्रांचीही पूजा करतात.
निसर्गाच्या शक्तींवर प्रेमाने विजय आणि साधनांची पूजा ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. याबरोबर भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. साधनांच्या पूजेप्रमाणेच आम्ही प्रतीकांचीही पूजा करतो. देव कोणाला दिसलेला नाही. पण देवाचे प्रतीक म्हणून आम्हांला धातूची, दगडाची किंवा लाकडाची, कोणत्याही रंगाची आणि रूपाची मूर्ती चालते. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार प्रतीक निवडावे आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची पूजा करावी. कारण पूजा मूर्तीची नसते. मूर्ती ज्याचे प्रतीक त्या देवाची ती पूजा असते. तुकाराम महाराजांचा एक अभंग ही कल्पना स्पष्ट करतो.
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती ।।
शिवपूजा शिवासि पावे। माती मातीमाजि सामावे ।।१।।
केला पाषाणाचा विष्णू । परी पाषाण नव्हे विष्णू ।।
विष्णुपूजा विष्णुसि अर्पे। पाषाण राही पाषाणरूपे ।।२।।
केली काशाची जगदंबा। परी कासे नव्हे अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणे। कासे राहे कासेपणे ।।३।।
ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी ।।
ज्याची पूजा तेणेचि घेणे। आम्ही पाषाणरूप राहणे ।।४।।
तुकारामांचा हा अभंग मी पहिल्यांदा वाचला, तेव्हा मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्याने, मला त्या शास्त्रातले एक उदाहरण आठवले. बहुतेक शाळांमध्ये प्राणवायू बनविण्याचा प्रयोग निदान दाखवला तरी जातो. पोटॅशिअम क्लोरेट नावाचे एक पांढरे संयुग गरम केल्यावर त्यातून प्राणवायू बाहेर पडतो. पण त्याला कित्येक तास लागतात. त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे मँगेनीझ डायऑक्साईड मिसळल्यावर काही तासांच्या ऐवजी काही मिनिटांत सर्व प्राणवायू बाहेर पडतो. पण मँगेनीज डायऑक्साईड आहे तसेच राहते. मँगेनीझ डायऑक्साईडला उत्प्रेरक (catalyst) असे म्हणतात. त्याने रासायनिक अभिक्रियेची गती प्रचंड वाढते. परंतु तो आहे तसाच राहतो. तुकारामांनी या अभंगात मूर्ती उत्प्रेरकासारखी आहे, असे सांगितले आहे. मूर्तीच्या साहाय्याने आपली पूजा म्हणजेच पूजेतील आपला समर्पण भाव देवापर्यंत पोहोचतो. मूर्ती आहे तशीच राहते. मूर्तीशिवाय परमेश्वराची ओळख पटायला काही दशके लागतील. ते काम मूर्तीमुळे काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांत ही होते. हा भारतीयांनी वैज्ञानिक पद्धतीने घेतलेला आध्यात्मिक शोध आहे.
अशी पूजा करताना नुसता नमस्कार केला तरी चालेल. मूर्तीवर भांडंभर पाणी घातलं तरी चालेल. मूर्तीला पंचामृताचे स्नान घातलं तरी चालेल. एक तुळशीपत्र, बेलाचे त्रिदल किंवा दूर्वांची जुडी वाहिली तरी चालेल किंवा रंगीबेरंगी फुलांच्या पाच पाच पदरी माळा घातल्या तरी चालेल. एक सुपारी समोर ठेवली तरी चालेल किंवा अनेक प्रकारच्या फळांचे ढीग वाहिले, तरी चालेल. यांतले काहीच न करता मूर्तीसमोर बसून जप केला तरी बालेल, प्राणायाम केला तरी चालेल किंवा देवासाठी एक दिवस निराहार राहिले, तरी चालेल.
‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता ।’
हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच प्रतीक कोणतेही चालेल. आणि त्याची पूजा कोणतीही पूजा सामग्री वापरून किंवा न वापरूनही केलेली चालेल. यालाच पूर्वी हिंदू धर्म असे म्हणायचे.
व्यवहार्य, म्हणजे आयुष्य जगण्यात आणता येईल असे अध्यात्म
बाह्य सृष्टीला प्रेमाने जिंकणे, साधनपूजा, प्रतीकपूजा आणि आपल्याला पाहिजे ते प्रतीक आणि साधन निवडा असे स्वातंत्र्य, या सगळ्याला भारतीय जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती किंवा संस्कृती म्हटले, तर त्याशिवाय हिंदू धर्मात आणखी काय राहिले? हिंदू धर्म हे समूहवाचक नाम आहे. एक डझन म्हणजे बारा वस्तू, एक किलो म्हणजे हजार ग्रॅम, एक रीम म्हणजे ४४० कागद, एक एकर म्हणजे चाळीस गुंठे, तसे हिंदू धर्म म्हणजे हिंदुस्थानात निर्माण झालेले कमीत कमी आठ संप्रदाय. शिव, विष्णू, देवी, गणपती किंवा सूर्य यापैकी एकेका देवतेची पूजा करणारे पाच जुने वैदिक म्हणजे वेदांना मानणारे संप्रदाय हिंदुस्थानात आहेत. याशिवाय बौद्ध, जैन व शीख हे तीन स्वतःला अवैदिक म्हणवणारे, म्हणजे आम्ही वेद मानत नाही असे म्हणणारे तीन संप्रदाय आहेत. भारतात निर्माण झालेला कोणताही संप्रदाय किंवा पंथ हा हिंदू धर्माचाच भाग आहे. मूर्तिपूजा न मानणारे आर्यसमाजी किंवा स्वामीनारायणपंथी हे सुद्धा हिंदू धर्माचेच. या सगळ्या संप्रदायांमध्ये बरीच विविधता आहे. मग त्यांना हिंदू धर्माचा भाग का म्हणायचे ? त्यांचे आचार, सण, पूजापद्धती वेगवेगळ्या असल्या तरी ‘सर्व जगाचे नियंत्रण करणारी शक्ती एकच आहे. तीच शक्ती स्वतःच्या आणि प्रत्येकाच्या शरीर, मन, बुद्धीचे नियंत्रण करत असते आणि त्या शक्तीच्या अस्तित्वावर केवळ कोणीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा नसून, प्रत्येकाने त्याचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे, हे या सर्वांचे उद्दिष्ट आहे. सर्वांमधल्या शक्तीच्या स्रोताला भारतीय परंपरेमध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो. हा आत्माच शक्तीचा स्रोत आहे आणि त्या आत्म्याची शक्ती आपल्या जीवनातून प्रकट करायची आहे हा हिंदू धर्माचा गाभा आहे. या विचाराला व्यवहार्य अध्यात्म असे म्हणतात.