१. अनुभवातून शिकणे

डोळस प्रवास

गेली दोन वर्षे प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात दिवाळीपूर्वी फराळ-विक्रीचा उपक्रम होतो आहे. विक्री-उपक्रम म्हटल्यावर तो फायद्यात चालला पाहिजेच. फायदा मिळविताना पैशाची देवाण-घेवाण पारदर्शक असणे, हिशेब चोख ठेवणे, विक्रीच्या वस्तूंची उत्तमता सांगितल्याप्रमाणे असणे, विक्री-कौशल्य शिकणे या गोष्टी करायच्या असतातच. त्याबरोबरच फायद्याची रक्कम कशी वापरायची हेही शिकायचे असते.

प्रबोधकांनी आपल्या काही खर्चाच्या बाबतीत स्वावलंबी होणे हा विक्री उपक्रमाचा एक हेतू असतोच. व्यक्तिगत आर्थिक स्वावलंबनाबरोबर युवक-युवतींच्या प्रबोधन उपक्रमांचे आर्थिक स्वावलंबन असाही एक हेतू असतो. प्रबोधिनीच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार असा पण हेतू काही वर्षे विक्री-उपक्रमांच्या मागे होता. स्वतःच्या किंवा आपल्या विभागाच्या स्वावलंबनापेक्षा आपण स्व-कष्टार्जित गुरु-दक्षिणा प्रबोधिनीमध्ये देणे असाही हेतू अनेक वर्षे ठेवलेला आहे.

काही वर्षे फायद्याची रक्कम अंशतः किंवा पूर्णतः नैसर्गिक आपत्ती-ग्रस्तांना किंवा ग्रामविकसन प्रकल्पांना देणारे विक्री-उपक्रम प्रमुख मला माहीत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या फराळ-फटाके-सुकामेवा इत्यादी विक्रीमध्ये ग्राहक व विक्रेते दोघेही आनंदाने दिवाळी साजरी करू इच्छिणाऱ्यांपैकी असतात. जे दिवाळी साजरी करू शकत नाहीत त्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी फायद्यातील काही भाग खर्च करण्याचे सोलापूरच्या युवकांनी ठरविले.

गेल्या वर्षी प्रबोधिनीचे विद्यार्थी सोलापूरच्या ज्या होम मैदानावर खेळतात त्याच्या शेजारच्या झोपडपट्टीतील पंचवीस-तीस मुलांना प्रबोधिनीत बोलावून त्यांना नवीन कपडे व फराळ दिला होता. या वर्षी नाथजोगी समाजातील पंचवीस-तीस मुलांना नवे कपडे व फराळाचे पदार्थ दिले. विक्री करता करता फायद्याचा असा उपयोग करायचा सुचणे हा डोळस प्रवास आहे. वेगळा उपक्रम केल्याचा आनंद, पराक्रम, स्वावलंबन, विक्री-कौशल्य शिकणे हे हेतू उत्तमच आहेत. फायद्यातून कपडे व फराळ वाटप म्हणजे उत्तमाकडून अधिक उत्तम हेतूकडे प्रवास आहे.

प्रवासातले समाजदर्शन

सोलापूरला दर वर्षी जुलै महिन्यात समाजदर्शन उपक्रम होतो. कधी सोलापूर जिल्ह्यात गावांमधून, तर कधी सोलापूर शहरात शाळांमधून व वस्त्यांमधून विद्यार्थी गटागटाने जातात व कार्यक्रम सादर करतात. जाणाऱ्या बहुतेकांना ती आत्मविश्वास वाढविणारी अभिव्यक्तीची एक संधी असते. काही जणांना त्यातून समाजातील विविधतेचे दर्शन घडते. काही जणांना आपली स्थिती व बाहेरील स्थिती यातील विषमतेचे, विसंगतीचे किंवा दरीचे दर्शन घडते. त्यातले काही जण या विसंगतीबद्दल चिंतन करतात. ती विसंगती दूर करायचे संकल्प करतात. त्यासाठी एखादा उपाय शोधून काढतात. हे सर्व करणाऱ्यांपैकी एखादा विसंगतीचे मूळ दूर होईपर्यंत चिकाटीने नवी नवी उपाययोजना करत राहतो.

ज्यांना आपल्या परिस्थितीपेक्षा बाहेरची परिस्थिती चांगली वाटते, ते आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. नवे कौशल्य शिकणे, नवी सवय लावून घेणे, नवी कृती शिकणे, नवा कार्यक्रम हातात घेणे या सारखे प्रयत्न करण्याचे त्यांना सुचते. ज्यांना आपल्या परिस्थितीपेक्षा बाहेरची परिस्थिती अधिक बिकट वाटते, ते बाहेरची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. फराळ विक्रीच्या नफ्यातून ज्यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही त्यांना नवे कपडे व फराळाचे पदार्थ देणे हा अशाच प्रयत्नांचा भाग आहे.

वर्षानुवर्षे समाजदर्शन उपक्रमाची योजना करण्यासाठी जे ठिकठिकाणी हिंडले, ज्यांनी डोळसपणे परिस्थिती न्याहाळली त्यांना गरजू गट लक्षात आले व काहीतरी उपचारात्मक कृती त्यांना सुचली. सहाध्याय भेटी, प्रकल्प भेटी, मातृभूमी परिचय शिबिर, अभ्याससहल, अभ्यासदौरे अशा अनेक निमित्तांनी प्रबोधिनीचे विद्यार्थी आणि सदस्य स्थानिक व दूरवरचा प्रवास करत असतात. विविधतेचे दर्शन, दृष्टीचा आवाका वाढणे, सूक्ष्म निरीक्षण करणे, संवेदनशील मनाने विसंगतीचे ग्रहण करणे, त्यावर चिंतन करणे, कृती करणे, कृतीत सातत्य राखणे हे सर्व आपण प्रवासात पाहिलेल्याला प्रतिसाद देतो त्या प्रतिसादाचे चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे असे टप्पे आहेत.

स्थितिशील आणि प्रगतिशील प्रवास

एकाच जागी थांबून सगळ्या जगातील बदल ग्रहण करता येणे हा संवेदनशीलतेचा परमोच्च विकास आहे. अशी उच्च संवेदनशीलता ज्यांच्या जवळ नाही त्यांना आपली जागा सोडून प्रवास करावाच लागतो. म्हणून तर प्रबोधिनीत आधीच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे सहाध्याय भेटीपासून अभ्यासदौऱ्यापर्यंत अनेक उपक्रम आपण रूढ केले. अशा खूप भेटी दिल्या व दौरे केले आणि त्यांच्या आठवणी, टिपणे व छायाचित्रे जपून ठेवली तर न फिरणाऱ्यांपेक्षा आपण नक्कीच एक पाऊल पुढे गेलो. पण या प्रवासानंतर आपण स्वतः बदललो नाही किंवा बाहेरची परिस्थितीही बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर तो प्रवास हा स्थितिशील प्रवास झाला.

अनेक धार्मिक क्षेत्रांच्या तीर्थयात्रा करूनही धार्मिक वृत्ती वाढली नाही असे बरेच लोक असतात. ते तीर्थयात्रेची कृती तर करतात, प्रवास होतो, पण त्यांची धार्मिकता ‘जैसे थे’ राहते. म्हणजे ते आतून बदलत नाहीत. गाडगेबाबांनी अनेक तीर्थक्षेत्री जाऊन घाट, रस्ते, धर्मशाळा अशी बांधकामे केली. तसेच तेथील सार्वजनिक स्वच्छतेची कामे केली. बाहेरची परिस्थिती त्यांनी बदलली व त्यांची आतूनही संतत्वापर्यंत प्रगती झाली. हा प्रगतिशील प्रवास झाला.

अभ्यासदौऱ्याचे प्रस्ताव व संकल्प घेऊन अनेक जण माझ्याकडे नेहमीच येतात. धार्मिक तीर्थांच्या ऐवजी विकासतीर्थ, उद्योगतीर्थ, संशोधनतीर्थ, क्रांतितीर्थ, श्रमतीर्थ, पर्यावरणतीर्थ अशा तीर्थक्षेत्री त्यांना जायचे असते. प्रस्ताव उत्तमच असतात. पण कोणी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा प्रवासाचा संकल्प सांगायला आला की मला त्याला विचारावेसे वाटते की या दौऱ्यानंतर ‘आपली दृष्टी विस्तारली आहे का ? आपला संकल्प बळकट झाला आहे का ? आपली प्रेरणा सखोल झाली आहे का ? आपल्याला अधिक परिणामकारक कृती सुचली का ?’ या प्रश्नांपैकी एकाचे तरी होकारात्मक उत्तर देता आले पाहिजे. आधी हिंडले पाहिजे. हिंडता हिंडता आपण बदलले पाहिजे. परिस्थिती बदलता आली तरच आपण खरे बदललो. अभ्यासासाठी प्रवास केल्यानंतर आपल्यामध्ये बदल झाला तरच अभ्यास झाला, हे पटते का ?

सौर अग्रहायण १, शके १९३० दि. २२/११/२००८