छत्रपती शिवाजी महाराज दल (ज्ञान प्रबोधिनी, सहकार नगर)
छत्रपती शिवाजी महाराज दल हे ज्ञान प्रबोधिनीचे वस्ती भागात सुरू झालेले पहिले दल आहे. या दलाची सुरुवात १९७९ मध्ये झाली.
गेली ४८ वर्षे सहकार नगर परिसरातील विविध वस्त्यांमध्ये दलाचे कार्य सातत्याने सुरू आहे. तळजाई माता वस्ती, टांगेवाला कॉलनी, पद्मावती वस्ती, गवळीवाडा आणि अण्णाभाऊ साठे वस्ती या भागांतून दलात मुले येतात. दलाचा हा प्रवास सुरुवातीला तळजाईवर, त्यानंतर शिंदे शाळेचे मैदान, विद्याविकास शाळेचे मैदान आणि आता गेल्या काही वर्षांपासून अध्यापक कॉलनीच्या मैदानावर यशस्वीरीत्या सुरू आहे.
सध्या दलात ५ नियुक्त मार्गदर्शक कार्यरत असून, त्यातील ४ जण याच दलातून घडलेले मार्गदर्शक आहेत. दलाची सरासरी उपस्थिती सुमारे ४० मुलांची असते; ज्यामध्ये २० कुमार (इयत्ता ८ वी ते १० वी) आणि २० किशोर (इयत्ता ५ वी ते ७ वी) सहभागी होतात.
दलाचे प्रमुख उपक्रम:
१. २०२३ पासून रामनवमीच्या दिवशी दलावर सामूहिक जोर मारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात दलाचे सर्व प्रबोधक व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होतात. २०२६ मध्ये सर्वांनी मिळून तब्बल १५,००० जोर मारण्याचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
२. मुलांमध्ये साहसी वृत्ती आणि निसर्गप्रेम वाढीस लागावे म्हणून दरवर्षी पावसाळी व हिवाळी गड-मोहिमा आयोजित केल्या जातात. वयोगटानुसार गडांची निवड केली जाते; ज्यामध्ये किशोरांसाठी १ दिवसाची, तर कुमारांसाठी २ दिवसांची मोहीम असते.
३. ज्ञान प्रबोधिनीतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरदलीय क्रीडा स्पर्धेत दलाचा सक्रिय सहभाग असतो. २०२५ आणि २०२६ अशा सलग दोन वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज दलाने कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
४. महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा व सामाजिक जीवन जवळून अनुभवता यावे, यासाठी कुमारांना १ दिवस आषाढी/कार्तिकी वारीमध्ये सहभागी करून घेतले जाते.
५. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात मुलांचा ‘बरची नृत्य गट’ बसवला जातो. तसेच दिवाळीमध्ये स्वावलंबनाचे धडे मिळावेत यासाठी व्यवसाय/विक्री उपक्रम चालवला जातो.
६. मुलांची शारीरिक ताकद आणि क्षमता तपासण्यासाठी महिन्यातून एकदा ‘शारीरिक क्षमता चाचणी’ घेतली जाते. त्यातील कामगिरीच्या आधारे पुढील महिनाभरात मुलांच्या शारीरिक विकासावर विशेष मेहनत घेतली जाते.
७. किशोरांसाठी विद्यारंभ संस्कार आणि कुमारांसाठी विद्याव्रत संस्कार या संकल्पनांचा विचार करून दलाची वार्षिक रूपरेषा ठरवली जाते. हे संस्कार मुलांच्या दैनंदिन वर्तनात आणि विचारांत कसे उतरतील, यावर साप्ताहिक मार्गदर्शक बैठकीत सखोल नियोजन केले जाते.
८. कुमार बैठका व प्रबोधन: मुलांचे सामान्य ज्ञान व विचारप्रक्रिया प्रगल्भ करण्यासाठी नियमित कुमार बैठका घेतल्या जातात. यामध्ये चालू घडामोडी, परिस्थिती ज्ञान, इतिहास आणि सामाजिक विषयांवर खुली चर्चा केली जाते.





