जुलै २०१४ मधल्या समूहगुण विकसन प्रशिक्षण वर्गात ३०% (६८ पैकी २१) शालेय अध्यापक होते. त्यापैकी बहुसंख्य महिला होत्या. महिला अध्यापकांना घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून कार्यकर्ता भूमिकेतून काम करणे शक्य आहे का ?
कार्यकर्त्याच्या कामाचे स्वरूप “बोले तैसा चाले’ असे असावे लागते. त्याला संपर्कात येणाऱ्या अधिकात अधिक लोकांशी ध्येयासंबंधी ‘बोलावे’ लागते व नंतर ध्येय समोर ठेवून काम कसे करायचे हे ध्येयाच्या दिशेने चालून’ दाखवावे लागते. एखाद्या कार्यकर्त्याने औपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले तर त्याला “आधी केले मग सांगितले’ असे ही वागावे लागते.
१) आधी स्वतः पाठ्यपुस्तक वाचले मग शिकवले,
२) आधी स्वतः संदर्भ पुस्तके वापरली मग वापरायला सांगितली,
३) आधी स्वतः प्रात्यक्षिक केले मग दाखवले ब करायला सांगितले,
४) आधी प्रकल्प केला मग करायला सांगितला,
५) आधी स्वतः संशोधन केले मग इतरांना मार्गदर्शन केले,
६) आधी आपले ज्ञान बौद्धिक किंवा सामाजिक प्रश्न सोडवायला वापरले मग विद्यार्थ्यांना तसे करायला सांगितले,
७) आधी स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून ते राष्ट्रा्पण करायचा संकल्प केला मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले – हे सर्व जो करतो तो आचारवान म्हणजेच आचार्य बनतो.
प्रबोधिनीच्या शाळेत नव्याने आलेला शिक्षक १) ते ७) पायऱ्यांनी आचार्य बनत जाईल तसा तो प्रबोधिनीचे ‘कार्य’च करायला लागेल. प्रबोधिनीचे ध्येय स्वतःचे ध्येय बनवेपर्यंत तो आधी आचार्य म्हणून घडतो. ध्येय आपलेसे केल्यावर मग तो कार्यकर्ता बनतो. ध्येय आपलेसे केल्यामुळे जो आधीच कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो त्याला औपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात ‘कार्य’ करण्यासाठी आचार्य बनावेच लागते. तुम्ही शिक्षक म्हणून सुरुवात करा किंवा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करा. आचार्य बनल्याशिवाय औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रातही मनुष्यघडण करता येत नाही.
