अनुभव पचवणे म्हणजे काय ?
एखादा विलक्षण अनुभव आपण घेतो. कधी आनंदाचा, कधी आश्चर्याने थक्क होण्याचा, कधी भीतीचा, कधी गोंधळून जाण्याचा, कधी चिड आणणारा, कधी हसायला लावणारा, कधी मंत्रमुग्ध होण्याचा, कधी उत्साहाने ओसंडून जाण्याचा. त्या अनुभवाची आठवण आल्यावर मनामध्ये पुन्हा फक्त आधीची भावना निर्माण झाली तर आपण तो अनुभव पचवलेला नाही.
एखाद्या कामात आपल्याला अल्पसे यश मिळते किंवा अपयश वाट्याला येते. नंतर त्या अनुभवाला परिस्थिती कारणीभूत होती असे आपल्याला वाटत राहिले तर तो अनुभव आपण पचवू शकलो नाही.
एखाद्या कामात आपल्याला अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळते. आपले नियोजन, आपली दूरदृष्टी, आपले प्रसंगवधान, आपले कौशल्य, आपले प्रयत्न यांमुळेच ते यश मिळाले असे आपल्याला वाटत राहिले तर आपण ते यश पचवलेले नाही.
अन्न पचवणे म्हणजे त्याचे पोषणद्रव्यांमध्ये विघटन करणे, जे पोषक नसेल ते विसर्जित करणे, पोषण द्रव्ये रक्ताात शोषून घेणे, त्यापासून अस्थी, मज्जा, स्नायूंच्या पेशी घडवणे आणि जीवनयात्रा चालू ठेवणे. त्याचप्रमाणे अनुभव पचवणे म्हणजे त्या अनुभवातील विचार, भावना, कृती, हेतू, प्रेरणा इ. घटक वेगवेगळे करणे, त्यातले नको ते दूर सारणे आणि आपल्या ध्येयमार्गावर पुढे जाण्यासाठी उपयुक्त ते सर्व, आपल्याकडील विचार, भावना, कृती, हेतू आणि प्रेरणा यांच्या आधीच्या साठ्यामध्ये मिसळून टाकणे.
अनुभव पचल्यानंतर स्थळ, काळ, प्रसंग आणि त्यातील व्यक्ती बदलल्या तरी आधीच्या अनुभवाचा उपयोग नवीन परिस्थितीला शहाणपणाने सामोरे जाण्यासाठी होतो.
