अनौपचारिक शिक्षण प्रश्न क्र. ३४

शिक्षणाचा आध्यात्मिक पाया म्हणजे काय?

मानसशास्त्रात एका द्वंद्वाचा विचार मनुष्यघडणीच्या संदर्भात नेहमी होतो. व्यक्तीचा विकास उपजत गुणांमुळे (Nature) होतो की परिस्थितीमुळे (Nurture) हे ते द्वंद्व आहे. याचा निकाल लावणे अवघड जाते. त्यामुळे दोन्हीचा परिणाम होतो असे म्हणून समारोप करावा लागतो. Nature चे अनुकूल परिणाम वाढवणाऱ्या व प्रतिकूल परिणाम कमी करणाऱ्या Nurture ची योजना करण्याचा प्रयत्न शिक्षणाचा मानसशास्त्रीय विचार करणारे करतात.

मनुष्याचे उपजत गुण हे मानवी पेशींमधील वंशसूत्रांमुळे (Genes) ठरतात. त्यालाच आधुनिक शास्त्र Natureचा परिणाम म्हणते. आध्यात्मिक दृष्ट्या विचार करताना आत्म्याच्या किंवा मूळ पूर्णत्वाच्या प्रकटीकरणावर परिणाम घडवणारी वंशसूत्रे सुद्धा परिस्थितीचा (Nurture) भाग आहेत असे स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यांच्या दृष्टीने Nature व Nurture असे द्वंद्व नसून सुप्त Divinity/Perfection व प्रकट Environment असे द्वंद्व आहे. वंशसूत्रेसुद्धा ते Environment चा भाग मानतात. परिस्थिती बदलून व्यक्तीचा विकास करणे म्हणजे पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे. या प्रकटीकरणासाठी वंशसूत्रांमध्ये सुद्धा उपासनेने बदल घडवता येतो. म्हणून प्रशिक्षण, संस्कार व क्रमिक शिक्षण याबरोबर उपासना हा देखील मनुष्य घडणीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. अशा विचाराला व त्यानुसार आचाराचा संकल्प व योजना याला शिक्षणाचा आध्यात्मिक पाया म्हणतात.