अनौपचारिक शिक्षण प्रश्न क्र. २८

प्रबोधिनीमध्ये अभिव्यक्ती-कौशल्य म्हणून पाश्चात्त्य नृत्य-प्रकार शिकवले तर चालेल का? युवकांच्या कला दलामध्ये नृत्य-प्रशिक्षण दिले तर चालेल का?

खेळांच्या बाबतीत प्रबोधिनीची भूमिका ‘भारतीय खेळ आणि पाश्चात्त्य खेळ दोन्ही खेळता आले पाहिजेत’ अशी आहे. आग्रह असतो तो वैयक्तिक खेळांच्या आधी सांघिक खेळांना प्राधान्य देण्याचा. त्याच धर्तीवर पाश्चात्त्य नृत्य-प्रकार आणि भारतीय नृत्य-प्रकार हे दोन्ही शिकले पाहिजेत असे म्हणता येईल. निदान पाश्चात्त्य नृत्य प्रकारांवर बहिष्कार घालण्याचे काही कारण मला दिसत नाही.

अभिव्यक्ती-कौशल्यांचे प्रशिक्षण देताना एखाद्या कौशल्याच्या मदतीने ज्या विचारांची व भावनांची अभिव्यक्ती करायची, ते विचार व भावना काय आहेत याकडेही लक्ष दिले पाहिजे. अभिव्यक्ती-कौशल्य म्हणून पाश्चात्त्य नृत्य-प्रकार शिकवू इच्छिणाऱ्यांनी कोणते विचार व भावना व्यक्त करण्यासाठी पाश्चात्त्य नृत्य-प्रकारांचा उपयोग होऊ शकेल याचे प्रयोग आधी स्वतःवर केले पाहिजेत. केवळ शरीरांतर्गत स्नायूंच्या लवचिकतेची जाणीव होण्यासाठी व हात, पाय, कंबर, मान, बोटे यांच्या विविध स्थितींमधून निर्माण होणाऱ्या सुंदर रचनांचे भान येण्यासाठी पाश्चात्त्य नृत्य-प्रकार शिकवू नयेत.

आधी स्वतःच्या संस्कृतीचा परिचय आणि मग जगातील सर्व संस्कृतींचा परिचय व त्यांतून इष्ट गोष्टींचा स्वीकार असा क्रम प्रबोधिनीतील औपचारिक गटासाठी नियोजन करताना तरी असला पाहिजे. वैयक्तिकरीत्या काय क्रम असावा ते ठरवण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच.

पाश्चात्त्य खेळही आले पाहिजेत असे प्रबोधिनीत जेव्हा पहिल्यांदा म्हटले गेले, तेव्हा खेळांच्या माध्यमातून संघटन आणि कार्यकर्ते-घडण करण्याचा तीस-पस्तीस वर्षांचा अनुभव कै. आप्पांच्या पाठीमागे होता. युवकांच्या कलादलामध्ये नृत्य-प्रशिक्षणाचा प्रयोग करू इच्छिणाऱ्यांनी कला प्रशिक्षणाच्या किंवा कलेच्या माध्यमातून संघटन आणि कार्यकर्ते-घडण करण्याचा काही अनुभव आधी स्वतःच्या गाठीशी बांधला पाहिजे.