धर्मवीर संभाजी महाराज दल

धर्मवीर संभाजी महाराज दल

ज्ञान प्रबोधिनी, युवक विभाग – शुक्रवार पेठ

ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागांतर्गत शुक्रवार पेठेतील वस्तीभागात २००७ साली धर्मवीर संभाजी महाराज दलाची सुरुवात झाली. गेल्या १९ वर्षांपासून गुरुवार पेठ व शुक्रवार पेठ परिसरातील मुलांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाचे काम सातत्याने सुरू आहे.

शितळादेवी चौक, सणस वाडा, कस्तुरी चौक, आंग्रे वाडा आणि मंडई परिसरातील मुले दलात सहभागी होतात. शिवाजी मराठा शाळेतून सुरू झालेला दलाचा प्रवास आंग्रे शाळेतून पुढे जात सध्या नातूबाग येथे सुरू आहे. आज दलावर ५ मार्गदर्शक कार्यरत असून, दर रविवारी सरासरी २० मुलांचा सहभाग असतो. यामध्ये ८ कुमार (इयत्ता ८ वी ते १० वी) आणि १२ किशोर (इयत्ता ५ वी ते ८ वी) सहभागी होतात.

मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीचा विचार करून दलावर वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्यातील काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे :

१. दुर्गभ्रमण व साहसी सहली : इतिहासाची ओळख, निसर्गाशी जवळीक आणि साहसी वृत्ती निर्माण व्हावी यासाठी पावसाळी व हिवाळी दुर्गभ्रमण सहलींचे आयोजन केले जाते.

२. वारीचा अनुभव : महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख केवळ सांगण्यापुरती न राहता ती प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी मुले एक दिवस वारकऱ्यांसोबत चालत वारीत सहभागी होतात.

३. गणेशोत्सवातील सांस्कृतिक सहभाग : पेठांमधील गणेशोत्सवाला शिस्तबद्ध, संस्कारक्षम आणि समाजाला एकत्र आणणारे स्वरूप मिळावे, या उद्देशाने विविध गणेश मंडळांमध्ये बरची व लेझीम नृत्य सादर केले जाते. याद्वारे उत्सवातील सकारात्मकता, परंपरा आणि सामूहिक सहभाग अधोरेखित केला जातो.

४. अथर्वशीर्ष पठण : २०२६ च्या गणेशोत्सवात प्रथमच दलातील मुलांनी अथर्वशीर्ष पठण शिकून घरोघरी जाऊन त्याचे पठण सादर केले.

५. दिवाळी विक्री उपक्रम : मुलांना व्यवहारज्ञान, नियोजन, जबाबदारी आणि उद्योजकतेची प्राथमिक ओळख व्हावी, यासाठी दिवाळीच्या काळात विक्री उपक्रम आयोजित केला जातो.

६. साप्ताहिक मार्गदर्शक बैठका : किशोरांच्या विद्यारंभ व कुमारांच्या विद्याव्रत या संस्कारांच्या संकल्पनेतून मुलांच्या विकासासाठी वर्षभराचे नियोजन केले जाते. प्रत्येक मुलाची प्रगती, त्याच्या गरजा व व्यक्तिमत्त्वातील पैलू यांचा विचार करून मार्गदर्शक बैठकीत चर्चा केली जाते आणि त्यानुसार पुढील आठवड्याचे काम निश्चित केले जाते.

७. अभ्यासिका: कुमारांसाठी दर रविवारी अभ्यासिका घेतली जाते, खेळासोबतच अभ्यास, समय नियोजन, स्वयं अध्ययन ह्यावरही भर दिला जातो.

या विशेष उपक्रमांसोबतच दलाचे नियमित कामही सातत्याने असते. खेळ, पद्य, प्रसंगिके, संचलन अशा विविध माध्यमांतून मुलांमध्ये शारीरिक क्षमता, शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.