स्त्रियांचे सामाजिक स्थान

वेदकाळापासून वेदांतील सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया, ब्रह्माच्या स्वरूपासंबंधी चर्चा करणाऱ्या स्त्रिया, लढवय्या स्त्रिया, राजकारणी स्त्रिया होऊन गेल्या आहेत. स्त्री संतही अनेक होऊन गेल्या आहेत. स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये एकच ईश्वरी शक्ती आहे, हे ही सर्वांनी मान्य केले आहे. कुटुंबामध्ये स्त्रियांना व पुरुषांना परस्परपूरक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. परंतु व्यक्तिशः व कुटुंबापलीकडच्या सामाजिक जीवनात स्त्रिया व पुरुष समान क्षमतेचे आहेत हे तत्त्वतः आपण मान्य केलेले आहे. काही वर्षांपूर्वी एकाच वेळी राष्ट्रपती, लोकसभेच्या सभापती आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमख स्त्रियाच होत्या. कायद्याने ग्रामपंचायतीत स्त्रियांना ५०% आरक्षण मिळाले आहे. विधानसभेत आणि लोकसभेत ३३% आरक्षण एक ना एक दिवस येणारच आहे. पण भारतीय जीवनदृष्टी कायद्यापेक्षा धर्माला जास्ती महत्त्व देणारी आहे. वेदांची सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया झाल्या आहेत. पण नवीन स्मृती रचणाऱ्या किंवा नवीन घटनादुरुस्ती मांडणाऱ्या स्त्रिया जेव्हा पुढे येतील, तेव्हा हिंदू समाजाचा कायापालट पूर्ण होईल. समाजाचे व्यावहारिक जीवन पूर्वी स्मृतींनुसार चालायचे आणि आता घटनेनुसार चालते. चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था जाण्याइतकेच स्त्रिया स्मृतिकार किंवा घटनाकार होणे याची २१व्या शतकात गरज आहे. म्हणजे मनु, याज्ञवल्क्य, शंकराचार्यांसारख्या आचार्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकार स्त्रियांची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार समाजाचे व्यवहार चालले पाहिजेत. असा विचार आपल्याला करता येतो, कारण हिंदू धर्म आपला गाभा कायम ठेवून काळानुसार आपले स्वरूप बदलत असतो. असे काळानुसार बदलता येण्यामुळेच हिंदू धर्माचा गाभा जे अध्यात्म ते व्यवहार्य आहे असे आपण म्हणतो.

हिंदू समाज, भारतीय संस्कृती आणि व्यवहार्य अध्यात्म हे तिन्ही मिळून हिंदू राष्ट्र होते हे आपण पाहिले. चातुर्वर्ण्य आणि नंतर त्यातून निर्माण झालेली जातिव्यवस्था ही हिंदू समाजातील एक व्यवस्था आहे. भारतीय संस्कृती किंवा व्यवहार्य अध्यात्माचा टाळता न येण्यासारखा असा भाग तो नाही. ‘नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए’ असे एक गीत आहे ‘आत्मनो मोक्षार्थं जग‌हिताय च’ या ध्येयासाठी काम करणे हे हिंदू राष्ट्राचे नवीन पर्व आहे. त्यासाठी जन्मावर आधारित चातुर्वर्ण्यत किंवा जातींमध्ये विभागलेला समाज हा अडथळाच होईल. ‘आपण सर्वच ईश्वराचे समान अंश आहोत,’ असे म्हणणाऱ्या भारतीयांचा संघटित समाज हा नव्या पर्वाचा नवीन प्राण आहे.