सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना पूर्वीच्या पार्शियन लोकांनी हिंदू म्हणायला सुरुवात केली. जिथे हिंदू लोक राहतात, तो हिंदुस्थान म्हणजेच भारत, म्हणजेच इंडिया. हिंदू समाज राहतो तो हिंदुस्थान, हिंदू समाजाची संस्कृती ती हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृती. हिंदुस्थानात उत्पन्न झालेले सर्व संप्रदाय म्हणजे हिंदू धर्म आणि त्या सर्वांचे सार म्हणजेच व्यवहार्य अध्यात्म. हिंदुस्थानची भूमी, इथला समाज, या समाजाचा इतिहास आणि परंपरा, या समाजाची संस्कृती आणि या समाजाचा आदर्श या सर्वांना मिळून मी हिंदू राष्ट्र असा शब्द वापरतो.
संस्कृतमधे एखाद्या शब्दाला ‘त्व’ ही अक्षरे जोडली तर त्या शब्दाचे सार असा अर्थ होतो. उदा. सभासद आणि सभासदत्व, व्यक्ती आणि व्यक्तित्व, पशू आणि पशुत्व. ‘त्व’या अर्थाने मराठीमधे ‘पण’ किंवा ‘पणा’ ही अक्षरे आपण जोडतो. उदा. माणूस आणि माणूसपण, घर आणि घरपण, वडील आणि वडीलपण.
याचप्रमाणे हिंदू शब्दाला ‘त्व’ अक्षरे जोडून संस्कृतमध्ये हिंदुत्व हा शब्द तयार होतो. त्याचा मराठीतला अर्थ हिंदूपणा असा आहे. हिंदूंमधली जीवनवैशिष्ट्ये त्यांची इतरांपासून वेगळी ओळख निर्माण करतात. त्यालाच हिंदूपणा किंवा हिंदुत्व म्हणायचे.
आपणच शब्दांना अर्थ देतो
सौर चैत्र १ आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा एकाच दिवशी
आज राष्ट्रीय सौर पंचांगाच्या चैत्र महिन्याचा पहिला दिवस. बऱ्याच वर्षांनी शालिवाहन शकाच्या चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदा या वर्षी याच दिवशी आली आहे. शालिवाहन शकाच्या वर्षप्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदू नववर्षदिन असेही म्हणतात. एकाच दिवशी दोन्ही पंचांगांचे नववर्षदिन आल्याने ‘राष्ट्रीय’ म्हणजे काय व ‘हिंदू’ म्हणजे काय ? ‘राष्ट्रीय सौर पंचांग’ म्हणजे काय व ‘हिंदू पंचांग’ म्हणजे काय ? यात खरेच काही फरक आहे की वरवरचे वेगळेपण आहे ? असे प्रश्न, विचार करणाऱ्यांना पडू शकतात.
जे भारतातील ते भारतीय
हिंदू शब्दाचा मला कळणारा पहिला अर्थ काही उदाहरणांवरून स्पष्ट करतो. भारतातील वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायांच्या व्यक्तीचे वर्णन मराठीत करायचे झाले तर आपण असे सहज करू शकतो भारतीय शैव, भारतीय वैष्णव, भारतीय जैन, भारतीय शीख, भारतीय बौद्ध, भारतीय लिंगायत, भारतीय आर्यसमाजी, भारतीय शिया मुस्लीम, भारतीय सुत्री मुस्लीम, भारतीय कंयॉलिक ख्रिश्चन, भारतीय प्रोटेस्टंट ख्रिश्चन, भारतीय वेदान्ती, भारतीय शाक्तपथी, भारतीय दत्तोपासक, इ. आणखी अनेक नावे यात घेता येतील.
जे हिंदुस्थानातील ते हिंदुस्थानी
हीच यादी हिंदीतून वाचायची झाली तर हिंदुस्थानी शैव, हिंदुस्थानी वैष्णव, हिंदुस्थानी जैन, हिंदुस्थानी बौद्ध, हिंदुस्थानी लिंगायत, हिंदुस्थानी आर्यसमाजी, हिंदुस्थानी शिया मुस्लीम, हिंदुस्थानी सुन्नी मुस्लीम, हिन्दुस्थानी कंथॉलिक ख्रिश्चन, हिन्दुस्थानी प्रोटेस्टंट ख्रिश्चन, हिंदुस्थानी वेदान्ती, हिन्दुस्थानी शाक्तपंथी, हिन्दुस्थानी कबीरपंथी, हिन्दुस्थानी निरंकारी अशा पद्धतीने वाचता येईल. महाराष्ट्रात दत्तउपासना जास्त म्हणून मराठी यादीत ते नाव घेतले. उत्तर हिंदुस्थानात कबीरपथी, निरंकारी जास्त आढळतात म्हणून हिंदी यादीत ती नावे घेतली.
जे इंडियातील ते इंडियन
इंग्रजीमध्ये अशीच यादी करायची झाली तर सहजपणे तिचे रूपांतर पुढीलप्रमाणे होईल. Indian Shaiva, Indian Vaishnav, Indian Jain, Indian Sikh, Indian Buddhist, Indian Lingayat, Indian Arya Samajist, Indian Shia Muslim, Indian Sunni Muslim, Indian Catholic Christian, Indian Protestant Christian, Indian Vedantist, Indian Shaktı worshipper, Indian Parsee, Indian Jew, Indian Swaminarayan worshipper, etc. इंग्रजी यादीतही पारशी, ज्यू, स्वामीनारायणपंथी अशी वेगळी नावे घेतली आहेत.
जे आमच्या राष्ट्राचे ते राष्ट्रीय
आपल्या देशातील धार्मिक संप्रदायांचा पट विस्तीर्ण आहे. इंडियन आणि भारतीय हे घटनेनुसारच समानार्थी शब्द आहेत. मराठीत जेवढ्या सहजतेने ‘भारतीय’ हा शब्द वापरतात, तितक्याच सहजतेने हिंदीत ‘हिंदुस्थानी’ हा शब्द वापरला जातो. आता हिंदीत ‘हिंदुस्थानी’ इतकाच ‘भारतीय’ हा शब्द रूढ होतो आहे. मराठीत ‘हिंदुस्थानी’ शब्द पूर्वी जितका रूढ होता तितका सध्या तो रूढ नाही. वरील तीन भाषांमधल्या याद्या वाचताना हिंदुस्थानी, भारतीय, इंडियन हे शब्द त्यांची व्याख्या न करताही समानार्थी आहेत हे लक्षात येते. इंडियन आणि हिंदुस्थानी या शब्दांचे मूळ हिंदू या शब्दात आहे. त्यामुळे मला तर भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन हे शब्द हिंदू आणि राष्ट्रीय या अर्थाचेच वाटतात.
भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन, राष्ट्रीय म्हणजेच हिंदू.
त्यामुळे हिंदू शैव, हिंदू वैष्णव, हिंदू शीख, हिंदू जैन, हिंदू बौद्ध, हिंदू खिश्चन, हिंदू मुसलमान, हिंदू लिंगायत, हिंदू महानुभाव, हिंदू आर्यसमाजी, हिंदू शाक्तपंथी, हिंदू दत्तोपासक, हिंदू निरीश्वरवादी, हिंदू गणेशपूजक, हिंदू ज्यू, हिंदू पारशी, हिंदू कब्बीरपंथी, हिंदू निसर्गपूजक अशी यादी केली तर ती वरच्या याद्यांसारखीच आहे.
‘हिंदू’ शब्दाच्या याच अर्थानुसार हिंदू पंचांग म्हणजे हिन्दुस्थानात तयार झालेले व रूढ झालेले पंचांग तर राष्ट्रीय पंचांग म्हणजेही आमच्या राष्ट्रात, आम्ही आमच्या बुद्धीने विचार करून ठरवलेले पंचांग. दोन्हीत फरक आहे तो कालनिर्णयाच्या पद्धतीचा. दोन्ही पंचांगे तयार करणारे भारतीय म्हणजे हिंदू म्हणजे राष्ट्रीयच होते.
राष्ट्रातील विविधता हे समृद्धी व विकासाचे लक्षण
हिंदू पंचांग नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंचांगात महिने चंद्राच्या गतीवर पौर्णिमा, अमावस्या यावर अवलंबून असतात. राष्ट्रीय सौर पंचांगात महिने पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या गतीवर अवलंबून असतात. पहिली पद्धत आमचीच. दुसरीही आमचीच. सूर्य, चंद्रांच्या गतीची अधिक चांगली जाण आणि व्यावहारिक सोय यातून राष्ट्रीय सौर कालगणना सुरू झाली. तीही हिंदू म्हणजेच भारतीय कालगणना आहे. आधीच्या चंद्रावर अवलंबून असलेल्या कालगणनेपेक्षा शास्त्रीयदृष्ट्या अधिक विकसित आहे.
व्याख्येच्या गुंत्यात न शिरता केवळ उदाहरणांवरून हिंदू म्हणजेच राष्ट्रीय म्हणजेच भारतीय म्हणजेच इंडियन हे कळते. मग यापैकी वेगवेगळ्या शब्दांचा काही जणांना अभिमान तर काही जणांना विशिष्ट शब्दाचे वावडे असे का दिसते? चंद्राची पृथ्वीभोवतीची गती व पृथ्वीची सूर्याभोवतीची गती असे वेगवेगळे आधार घेतले की दोन पंचांगे वेगवेगळी होतात व तरीही ती हिंदू, राष्ट्रीय, भारतीयच असतात. तसेच हिंदू, भारतीय, हिंदुस्थानी या शब्दांचे आहे. त्या शब्दांमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे आधार, वेगवेगळे इतिहास बघतात. त्यामुळे अभिमान किंवा वावडे निर्माण करणारे वेगवेगळे अर्थ त्यांना दिसतात. पंचांगाचा जसा शास्त्रीय दृष्टिकोनातून, वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे विचार करता येतो तसाच विचार आपले राष्ट्रीयत्व व्यक्त करणाऱ्या या विविध शब्दांच्या बाबतीत करता येईल का?