हिंदूपणा कसा व्यक्त करू या

हिंदूपणा कसा व्यक्त करू या

आजच्या काळातील हिंदुत्व म्हणजे काय, असा विचार आपल्याला करावाच लागेल. १) सर्व व्यक्तीमधील व सर्व जगातील एकाच जाणीव असलेल्या समान शक्तीवरती विश्वास, २) समाज टिकण्यासाठी व संस्कृतीचे जतन करण्यासाठी कुटुंबसंस्थेच्या आवश्यकतेवर विश्वास, ३) पैसा हे साध्य नसून साधन आहे यावर विश्वास, आणि ४) आपण पुढाकार घेऊन जगातील इतर राष्ट्रांशी देवाण-घेवाण चालू ठेवली, तरच आपण ‘जगत् हिताय च’ काम करू शकू यावर विश्वास, या चार गोष्टींवर विश्वास असणे म्हणजे आपला हिंदूपणा किंवा आपल्यातील हिंदुत्व आहे. हा विश्वास आपल्या वागण्यातून व्यक्त व्हायचा असेल तर १) चातुर्वर्ण्य आणि जातींची उतरंड यांच्या चौकटीबाहेर पडलेले आणि सर्व जातींमधील सर्व स्त्रिया आणि सर्व पुरुषांचा व्यक्ती म्हणून आदर करणारे समाजजीवन, २) देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची अखंड जागती जाणीव असणारे समाज, शासन आणि सैन्य, ३) भारतीय संस्कृतीतील चांगले ते टिकवण्याची आणि प्रयोगशील राहून नवीन भर घालण्याची धडपड करणारे समाजातील नेते व कार्यकर्ते आणि ४) भौतिकशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांच्या प्रगतीचा समतोल राखणारे वैज्ञानिक, या चार गोष्टी एकत्रित व्हायला लागतील.

स्वत्व आणि सोय

नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व

‘देश नसलेला माणूस’ या नावाची एक कादंबरी आहे. त्यामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून त्याचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेण्यात बेतात. भारताचा किनारा दिसणार नाही एवढ्या अंतरावर कायम समुद्रातील जहाजावर ठेवण्याची शिक्षा त्याला होते. नागरिकत्व काडून घेतलेल्या या लष्करी अधिकाऱ्याच्या मनात देशाची भूमी सुद्धा दिसत नाही म्हणून होणाऱ्या तळमळीचे वर्णन या कादंबरीमध्ये आहे. नागरिकत्व काढून घेतले तरी राष्ट्रीयत्व शाबूत होते म्हणूनच त्याच्या मनात ही तळमळ होती.

भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना कोणीच भारतीय भारताचे नागरिक नव्हते. सर्वजण ब्रिटिश राजाची / राणीची प्रजा होते. नागरिकत्व नसले तरी भारतीयाचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश अंमलाखाली शाबूत होते. म्हणूनच तर स्वातंत्र्यलढा झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व भारतीय भारताचे नागरिक झाले.

‘प्रवासी भारतीय’ या नावाने देशोदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांची दोन समेलने गेल्या दोन वर्षात दिल्लीला झाली. अनेकानी ते सध्या स्थायिक आहेत त्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यांचे राष्ट्रीयत्व अजून शाबूत आहे या गृहीतावरच त्यांना संमेलनामध्ये बोलावले होते. यापूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले असले तरी त्याच गृहीतावर पुन्हा त्यांना भारताचे दुहेरी नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव त्या संमेलनांत चर्चेसाठी पुढे आला होता.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या जन्माने परदेशी आहेत. त्यांना पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे किंवा नाही याबाबत गेली सुमारे सहा-साडेसहा वर्षे राजकीय वादाचा धुरळा उडतो आहे. त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले आहे. त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका उपस्थित करून हा वाद चालला आहे. आपल्याला त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका घ्यायची नाही. नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व यात काय फरक आहे हे बघायचे आहे.

शब्द आणि भाव

कायदा आणि न्याय यांचे जसे नाते आहे तसे नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्वाचे नाते आहे. कायदा नवा करता येतो, बदलता येतो, रद्द करता येतो. न्यायाचा फक्त निवाडा करता येतो. आपल्या बुद्धीप्रमाणे न्याय्य काय व अन्याय्य काय हे ठरवता येते. वेगवेगळ्या ठिकाणच्या किंवा वेगवेगळ्या काळातल्या कायद्यांप्रमाणे एखादी न्याय्य गोष्टसुद्धा कायदेशीर किंवा बेकायदेशीर ठरू शकते.

बहुतेक देशांमध्ये तिथे जन्मलेल्या सर्व मुलांना त्या देशाचे नागरिकत्व आपोआप मिळते. त्यांच्या आई-वडिलांपैकी एक किंवा दोघे त्या देशाचे नागरिक नसले तरीही मुलांना जन्मतःच तिथे जन्मले म्हणून हे नागरिकत्व मिळते. स्थलांतर करणाऱ्यांना अर्ज करून व काही अटी पूर्ण करून, त्या त्या देशाचे नागरिकत्व मिळवता येते. तात्पर्य नागरिकत्व हे देता येते, परत करता येते, काढून घेता येते, मागता येते आणि एकाच वेळी दोन देशांचेही देण्या घेण्याचा विचार करता येतो.

राष्ट्रीयत्व देता-घेता येत नाही. त्याची मनातली जाणीव स्पष्ट, अस्पष्ट वा विपरीत होऊ शकते. ही जाणीव कमी किंवा विपरीत होण्यावर बाहेरच्या बळजबरीचा, धाक-दपटशाचा, प्रलोभनांचा प्रभाव पडू शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीयत्व हा आपल्या मनाचा गुण आहे. मन सशक्त झाले तर विपरीत वा अस्पष्ट झालेली राष्ट्रीयत्वाची जाणीव पुन्हा योग्य व स्पष्ट होऊ शकते.

नागरिकत्वाचे प्रशिक्षण

नागरिकत्वाला इंग्रजीमध्ये Citizenship असे म्हणतात. ते पासपोर्टवर लिहिलेले असते. मतदानाचा अधिकार त्यावर अवलंबून असतो. सक्तीची लष्करी सेवा त्या त्या देशाच्या नागरिकांपुरतीच असते. नागरिकत्व ठरवणे ही राज्यकारभाराची सोय आहे. मतदानासाठी वयाची अट कायद्याने कमी-जास्त करता येते. सेवा-निवृत्तीचे वय कायद्याने कमी-जास्त करता येते. सक्तीच्या शिक्षणाची किंवा विवाहाच्या किमान वयाची वयोमर्यादा कायद्याने वाढत गेलेली आहे. या सर्व बाबतीत जो कायदा असेल त्याप्रमाणे नागरिकाने वागणे अपेक्षित असते. या कायद्यांची माहिती देऊन त्याप्रमाणे वागण्याचे प्रशिक्षण देता येते. कायद्यांमधले बदल सध्याच्या काळात त्या त्या देशाच्या राज्यघटनेप्रमाणे होतात. मी कोणती राज्यघटना मानतो व त्या घटनेप्रमाणे केलेले कायदे मानतो की नाही याच्याशी नागरिकत्वाचा मुद्दा जोडलेला आहे.

राष्ट्रीयत्वाच्या नात्याची ओळख

राष्ट्रीयत्वाला इंग्रजीमध्ये National identity असे म्हणता येईल. राज्यघटना निर्माण करून ती स्वीकृत करणाऱ्या लोकसमूहाशी माझे नाते कोणत्या प्रकारचे आहे? याच्याशी राष्ट्रीयत्वाचा मुद्दा जोडलेला आहे. समान घटना आणि समान कायदे मानण्यामुळे नागरिक एकमेकांशी जोडलेले असतात. एकाच राष्ट्रीयत्वाचे लोक घटना आणि कायद्याशिवाय समान परंपरा, समान इतिहास, समान वारसा, समान सुख-दुःखे, समान आकांक्षा यामुळे एकमेकांशी जोडलेले असतात. जन्माने परदेशी पण भारतीय नागरिकत्व स्वीकारलेली व्यक्ती शासनातील उच्च पदावर जाऊ शकते की नाही हा प्रश्न त्यासंबंधीचे नियम अधिक स्पष्ट करून किंवा नवीन नियम करून सोडवता येईल.

जन्माने भारतीय किंवा परदेशी असणारा भारतीय नागरिक राष्ट्रीय वृत्तीचाही आहे किंवा नाही हे ती व्यक्ती कोणत्या परंपेरचा वारसा सांगते, कोणाच्या सुख-दुःखांशी समरस होते यावर ठरते. आधीच्या प्रकट चिंतनात वापरलेला दृष्टान्त वापरायचा झाला तर नागरिकत्व हा आकार आहे. तो आकार ज्या माध्यमाला देता येतो ते राष्ट्रीयत्व आहे.