२. होई अखंड प्रिय भूमि…

भारताचा विश्वविजय सैन्यबळावर, अर्थबळावर किंवा मुत्सद्देगिरीच्या बळावर करायचा नाही. तो चारित्र्याच्या बळावर करायचा आहे.

हे देव आस पुरवी

प्रबोधिनीच्या प्रार्थनेमध्ये सहापैकी पाच कडवी सर्वांचा सामूहिक संकल्प मांडणारी व त्याची आठवण करून देणारी आहेत. फक्त एका पाचव्या कडव्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. ‘आमचा देश अखंड, अजिंक्य व विश्वविजयी व्हावा’ ही आमची इच्छा पूर्ण कर अशी ती प्रार्थना आहे. प्रबोधिनीचे नित्य काम करणारे अनेक जण ‘आपला देश अजिंक्य व्हावा’ याची आठवण ठेवून असतात. सध्याच्या भाषेत ‘भारत विकसित देश व्हावा’ ‘भारत एक महासत्ता व्हावी’, असे ‘आपला देश अजिंक्य व्हावा’ या ध्येयाचे भाषांतर करता येईल.

अमेरिके सारखी महासत्ता असताना भारत महासत्ता झाला तरी विश्वविजयी कसा होईल असा प्रश्न मनात येतो. भारताचा विश्वविजय सैन्यबळावर, अर्थबळावर किंवा मुत्सद्देगिरीच्या बळावर करायचा नाही. तो चारित्र्याच्या बळावर करायचा आहे. आमचे राष्ट्रीय चारित्र्य अध्यात्माच्या पायावर घडले पाहिजे. त्या राष्ट्रीय चारित्र्याच्या बळावर, पहाटेच्या वेळी जितक्या अलगदपणे दवबिंदूंनी सर्व जमीन चिंब होते, तितक्या अलगदपणे आपण जग जिंकलेच पाहिजे असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. विश्वविजय करण्याचा हा संतांचा मार्ग सर्व प्रबोधिनीयांनी कधीतरी जाणून घेतला पाहिजे. विवेकानंदांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम म्हणजे अशा पद्धतीने भारताला विश्वविजयी करण्याचे काम.

असा विश्वविजय करायचा असला तरी त्यासाठी लष्करी, आर्थिक, मुत्सद्देगिरीच्या बाबतीत, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण-संशोधनातही आपला देश अजिंक्य झाला पाहिजे. हे तर विवेकानंदांनी ओळखले होतेच. तसे त्यांनी वारंवार सांगितलेही होते. विवेकानंदांच्या काळात भारताची फाळणी होण्याची शक्यताही कोणाला दिसली नव्हती. आजच्या पाकिस्तानातील लाहोर आणि आजच्या बांग्ला देशातील ढाका येथे स्वामीजींनी दिलेली व्याख्याने ‘भारतीय व्याख्याने’ याच संग्रहात आहेत. त्या व्याख्यानांमध्ये स्वामी विवेकानंदांनी तिथल्या भारतीयांना गीता-उपनिषदांतील अध्यात्माच्या आधारे जग जिंकण्याचे आवाहन केले आहे.

असा विश्वविजय करायचा असला तरी त्यासाठी लष्करी, आर्थिक, मुत्सद्देगिरीच्या बाबतीत, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण-संशोधनातही आपला देश अजिंक्य झाला पाहिजे.

होई अखंड प्रिय भूमि…

आमचा देश अखंड झाला पाहिजे हे ध्येय, प्रबोधिनीच्या प्रार्थनेत आले कारण समोर फाळणीचे वास्तव होते. भारताला विश्वविजयी आणि अजिंक्य होण्यासाठी फाळणी पुसली जाणे आवश्यक आहे, असे योगी अरविंदांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी आकाशवाणीवरच्या भाषणात म्हटले आहे.

अखंड भारत म्हटले की आपल्यासमोर काय काय येते ? नेपाळ, भूतान पूर्वीपासून स्वतंत्र राज्ये आहेत. ब्रिटिश अंमलाच्या काळात त्यांचे ब्रिटिशांशी तह होते. श्रीलंका, म्यानमारचा कारभार ब्रिटिशच चालवत होते. परंतु भारतापेक्षा वेगळी शासन यंत्रणा ब्रिटिशांनी तिथे उभी केली होती. तिथे भारताचा फक्त सांस्कृतिक प्रभाव होता. राजकीय प्रभाव ज्ञात इतिहासात तरी नव्हता. आजचा बांगलादेश मुघलांकडून थेट ब्रिटिशांकडे गेला. आजच्या पाकिस्तानातला बराचसा प्रदेश ब्रिटिशांनी आपल्या शिखांकडून आणि मुघलांच्या स्वतंत्र झालेल्या स्थानिक सुभेदारांकडून जिंकला होता. त्यामुळे आज अखंड हिंदुस्थान म्हणताना नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार हे आजचे स्वतंत्र देश भारतात विलीन व्हावेत अशी कोणाचीच अपेक्षा नसते. परंतु पाकिस्तान व बांगला देश आक्रमकांनी परस्पर वेगळे केले याचे शल्य राष्ट्राभिमानी लोकांमध्ये असते.

स्वत्त्वाची जाणीव मंद झाली की फाळणी अपरिवर्तनीय वाटू लागते. राष्ट्रीय स्वत्व जागे झाले तर अखंडत्व, अजिंक्यत्व, विश्वविजेतेपण हे प्रयत्नसाध्य वाटू लागते.

शिवकाळामध्ये तीनशे वर्षांच्या परकीय संस्कृतीच्या वर्चस्वानंतर महाराष्ट्रात स्वराज्य आले. काश्मिरमध्ये रणजितसिंहांच्या काळामध्ये पाचशे वर्षांनंतर परकीय संस्कृतीचे वर्चस्व जाऊन एतद्देशियांचे राज्य आले. स्वत्त्वाची जाणीव प्रखर झाली की तीन किंवा पाच शतकांचा अंधारही जातो हा इतिहास आहे. त्यामुळे, अवघ्या अठ्ठावन्न वर्षांची फाळणी आता अंतिम झाली असे मानायचे कारण नाही. स्वत्त्वाची जाणीव मंद झाली की फाळणी अपरिवर्तनीय वाटू लागते. राष्ट्रीय स्वत्व जागे झाले तर अखंडत्व, अजिंक्यत्व, विश्वविजेतेपण हे प्रयत्नसाध्य वाटू लागते. राष्ट्रीय स्त्वत्त्व जागे करण्याचे एक साधन म्हणजे या ध्येयाचे रोजच्या प्रार्थनेत स्मरण करणे.

परब्रह्मशक्ती स्फुरो हिन्दुत्वामध्ये

प्रबोधिनीच्या उपासनेतील हा शक्तिमंत्रही राष्ट्रीय स्वत्त्वाच्या जागृतीसाठी आहे. श्री अरविंदांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या भाषणात पाच स्वप्ने सांगितली आहेत. त्यातले पहिले स्वप्न अखंडतेसह स्वातंत्र्य असे आहे. स्वातंत्र्य जसे फक्त राजकीय पुरत नाही. तर ते आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकही असायला लागते. त्याप्रमाणेच अखंडता म्हणजे राजकीय विलीनीकरण हा आणि एवढाच अर्थ असायचे कारण नाही. श्री अरविंदांनी म्हटले आहे ‘शांतता आणि सुव्यवस्था यांच्या आवश्यकतेतून, सहकार्याच्या जाणिवेतून स्वाभाविकपणे हिंदुस्थान अखंड होईल अशी आशा करू या. ऐक्याची भावना मूलभूत विचारातून न येता व्यावहारिक सोयीतूनही निर्माण होऊ शकेल. ती कशीही होवो पण हिंदुस्थान अखंड झालाच पाहिजे.’ हिन्दुत्वामध्ये परब्रह्मशक्तीचे स्फुरण व्हावे या आवाहनामध्ये अखंडत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य येथील समाजामध्ये यावे असे अभिप्रेत आहेच. संघटना, पराक्रमाची कृती, स्वतःमधील ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा वाढल्याने हे सामर्थ्य समाजामध्ये येणार आहे.

हिन्दुत्वामध्ये परब्रह्मशक्तीचे स्फुरण व्हावे या आवाहनामध्ये अखंडत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य येथील समाजामध्ये यावे असे अभिप्रेत आहेच.

सौर श्रावण १, शके १९२७, २३/७/२००५