सजीवांनी निर्जीवांसारखे वागणे म्हणजे परिस्थितीशरणता. परिस्थिती बदलण्याचा, ती अनुकूल करून आपले गुणधर्म प्रकट करण्याचा ध्यास लागणे यामध्ये जिवंतपणा आहे.
परिस्थितीशरणता :
ज्या दिशेने उतार असेल त्या दिशेने पाणी वाहात जाते. मध्ये अडथळा उभा राहिला तर पाणी वाहायचे थांबते. पण अडथळा दूर होताच पाणी वाहायला लागते. अडथळा आल्यावर पाणी थांबले तरी वाहण्याचा गुणधर्म पाण्यात आहेच. अनुकूल परिथिती येताच पाणी आपल्या गुणधर्मानुसार वाहात जाते. अनुकूल परिस्थिती येताच आपल्या गुणधर्मानुसार वागणे हा सर्व निर्जीव वस्तूंचा विशेष आहे. परिस्थिती प्रतिकूल असेल तर निर्जीव वस्तूंचे गुण झाकलेले राहतात. निर्जीव वस्तूंना आपण निर्जीव म्हणतो याचे हेच कारण आहे. माणसासारखा सजीव प्राणी प्रतिकूल परिस्थितीत आपले गुण झाकून ठेवून स्वस्थ पडून राहिला तर त्यालाही आपण निर्जीवच म्हणू. सजीवांनी निर्जीवांसारखे वागणे म्हणजे परिस्थितीशरणता. परिस्थिती बदलण्याचा, ती अनुकूल करून आपले गुणधर्म प्रकट करण्याचा ध्यास लागणे यामध्ये जिवंतपणा आहे.
दास्यात पाहुनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती
वरील ओळींत परिस्थितीशरणता मान्य न करणे हा स्वामी विवेकानंदांचा गुण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण स्मरला पाहिजे.
परिस्थितीज्ञान :
एखादी प्रशाला प्रबोधिनीची प्रशाला आहे असे म्हणायचे असेल तर तिथे विद्यार्थ्यांना परिस्थितीज्ञान करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. या महिन्यात जो प्रबोधक प्रशिक्षण वर्ग झाला त्यामध्ये परिस्थितीज्ञानाची तीन सत्रे ठेवली होती. फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, तर सर्व प्रबोधक, सदस्य, कार्यकर्ते यांनाही परिस्थितीचे भान आणि ज्ञान हवे. परिस्थितीमध्ये आपल्याच पूर्वीच्या कृतीला इतरांकडून आलेले प्रतिसाद असतात. इतरांनी आपल्याला दिलेली साद असते आणि ‘इकडून तिकडे गेले वारे’, या प्रकारच्या आपल्या दृष्टीने अप्रस्तुत घटनाही असतात. या तिन्हीमधली निवड करता आली म्हणजे आपल्याला परिस्थितीज्ञान झाले; पण ज्ञानाचे सार्थक कृतीमध्ये असते. आपण परिस्थितीला प्रतिसाद काय देतो व इतरांना काय साद घालतो, यावरून आपल्याला परिस्थितीज्ञान काय व किती झाले ते कळते. भारतभ्रमण करून झाल्यावर स्वामी विवेकानंदांना झालेले परिस्थितीज्ञान पुढील ओळींवरून कळते.
शत आघातांनी कुंठित मूर्च्छित झाली
ती हिंदुचेतना फिरून तू चेतवली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती
ज्ञानाचे सार्थक कृतीमध्ये असते. आपण परिस्थितीला प्रतिसाद काय देतो व इतरांना काय साद घालतो, यावरून आपल्याला परिस्थितीज्ञान काय व किती झाले ते कळते.
रामराज्य आपणच निर्माण करायचे आहे हे कळणे म्हणजे खरे परिस्थिती ज्ञान. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे कळणे व तसे करायची स्वतःची तयारी होणे म्हणजे आपण परिस्थितीवर स्वार व्हायला तयार झालो.
प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेतही ध्यानाच्या वेळी करायच्या स्वगत चिंतनाच्या सूचनांमध्ये व्यक्तिगत प्रश्नांपासून सुरुवात करून देशप्रश्नांपर्यंत आपली जाणीव विस्तारत न्यावी असे म्हटले आहे. परिस्थितीज्ञान हे उपासनेचे अविभाज्य अंग आहे.
रूप पालटू देशाचे :
एका ग्रामीण भागातल्या शाळेत एका शिक्षकांनी दोन-तीन वर्षे आग्रहाने एक हस्तलिखित चालवले होते. नाव दिले होते ‘रामराज्याची चाहूल’. ते स्वतःच सदाचार आणि सत्प्रवृत्ती व्यक्त करणाऱ्या बातम्या नियतकालिकांतून शोधून काढायचे आणि मुलांकडून हस्तलिखितासाठी लिहून घ्यायचे. काही महिन्यांनंतर पाच-दहा मुलांना कोणत्या बातम्यांमधून ‘रामराज्याची चाहूल’ लागते ते कळू लागायचे. हेही परिस्थितीज्ञानच. पण रामराज्य आपणच निर्माण करायचे आहे हे कळणे म्हणजे खरे परिस्थिती ज्ञान. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे कळणे व तसे करायची स्वतःची तयारी होणे म्हणजे आपण परिस्थितीवर स्वार व्हायला तयार झालो. परिस्थितीवर स्वार होऊन परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना परिस्थिती ज्ञान आवश्यक असते. ‘रूप पालटू देशाचे’ म्हणणे म्हणजे परिस्थितीवर स्वार होण्याची ईर्ष्या मनात निर्माण होणे. स्वामी विवेकानंदांचे स्मरण त्यांच्या अशाच शब्दांनी होते –
स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
‘मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद’
जग जिंकायची ईर्ष्या दाटो चित्ती.
कार्यशरणतेतून परिस्थिती घडवणे :
जे आपण स्वतः सुरुवातीपासून पूर्णपणे तयार केलेले असते त्याचे आपल्याला आतून बाहेरून पूर्ण ज्ञान असते. जी परिस्थिती आपणच घडवली तिचे आपल्याला पूर्ण ज्ञान असेल. त्यामुळे आपले परिस्थितीज्ञान परिपूर्ण व्हायचे असेल तर आपल्यालाच परिस्थिती घडवायला लागेल. परिस्थिती अनेकांच्या प्रयत्नातून घडते. अनेकांच्या संघटित प्रयत्नांनाच कार्य म्हणतात. एकट्याचे असते ते कर्तृत्व. अनेकांचे असते ते कार्य. कार्य करताना मी स्वतः काही कर्तृत्व करतो आहे हे विसरून जायचे असते. त्यालाच कार्यशरणता म्हणतात. आम्ही परिस्थितीशरण न होता कार्यशरण झाले पाहिजे. कार्यशरण होणे हेच ज्ञान-कर्म-युत भक्तिव्रत आहे. म्हणूनच विवेकानंदांचे स्मरण करताना आपल्याला आठवते –
तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुल बलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ति हवी मज कार्यशरण पुरुषार्थी
कार्यशरण प्रबोधकांनी देशाचे रूप पालटण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे परिस्थिती ज्ञान.
कार्य करताना मी स्वतः काही कर्तृत्व करतो आहे हे विसरून जायचे असते. त्यालाच कार्यशरणता म्हणतात. आम्ही परिस्थितीशरण न होता कार्यशरण झाले पाहिजे.
सौर माघ १, शके १९२७, २१/१/२००६