४. उत्तमतेचा सोपान

उत्तमता ही एक वृत्ती आहे. वृत्ती ही सवयीच्या पुढची पायरी आहे. वृत्ती आणि सवय दोन्ही वागण्यातूनच कळतात.

उत्तमता म्हणजे काय?

उत्तमता म्हणजे स्वच्छता. उत्तमता म्हणजे सौंदर्यदृष्टी. उत्तमता म्हणजे भेसळ नसलेली शुद्धता. उत्तमता म्हणजे शब्द पाळणे. उत्तमता म्हणजे वेळ पाळणे. उत्तमता म्हणजे अचूकता. उत्तमता म्हणजे तत्परता. उत्तमता म्हणजे तपशीलवार नियोजन. उत्तमता म्हणजे प्रत्येक संभाव्य अडचणीवर आधीच शोधून ठेवलेले उत्तर. उत्तमता म्हणजे कमीत कमी वेळात काम करणे. उत्तमता म्हणजे कामगिरीतले सातत्य. उत्तमता म्हणजे प्रयोगशीलता. उत्तमता म्हणजे नवीन कल्पनांचे स्वागत. उत्तमता म्हणजे यंत्रणा ठप्प होण्यापूर्वीच देखभालीची व्यवस्था. उत्तमता म्हणजे सतत प्रशिक्षण. उत्तमता म्हणजे प्रत्येक कामाला पर्यायी व्यक्ती तयार ठेवणे.

उत्तमतेचे वरीलप्रमाणे किंवा याहून अधिक विस्ताराने वर्णन करू शकणारे आणि त्या प्रमाणे काम करणारे अनेक जण आहेत. या कशाची कल्पनाही नसणारे अनेक जण आहेत. उत्तमता ही एक वृत्ती आहे. वृत्ती ही सवयीच्या पुढची पायरी आहे. वृत्ती आणि सवय दोन्ही वागण्यातूनच कळतात. सवयीमध्ये ताठरपणा असतो. कोणत्याही परिस्थितीत निरपवाद एकाच पद्धतीने वागणे याला सवय म्हणतात. तिथे वागण्याला महत्त्व असते.

म्हणूनच काही सवयी काही वेळा अडचणीच्या ठरतात. वृत्तीमध्येही वागण्याला महत्त्व आहेच. एखाद्या पद्धतीने वागून काय परिणाम साधायचा आहे ? याकडेही वृत्तीचे लक्ष असते. तो परिणाम साधण्यासाठी वागण्यात बदल करण्याइतकी लवचिकता वृत्तीमध्ये असते.

वर जे उत्तमतेचे वर्णन केले आहे तशा सवयी लागणे हे सुद्धा प्रयत्नपूर्वकच होते. अशा सवयी आपण स्वतःला का लावून घेतो आहोत? याचा विचार करणाऱ्यांची वृत्ती तशी बनत जाते. त्यांना उत्तमतेच्या सवयी लागल्याचा जास्त लाभ होतो.

एखाद्या पद्धतीनेवागून काय परिणाम साधायचा आहे ? याकडेही वृत्तीचे लक्ष असते. तो परिणाम साधण्यासाठी वागण्यात बदल करण्याइतकी लवचिकता वृत्तीमध्ये असते.

करुणा म्हणजे काय ?

करुणा म्हणजे सामाजिक जाणीव. करुणा म्हणजे इतरांच्या अडचणीने अस्वस्थ होणे. करुणा म्हणजे आपल्या वाटचे इतरांसाठी सोडणे. करुणा म्हणजे संवेदनशीलता. करुणा म्हणजे इतरांसाठीची धडपड. करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाने स्वतः दुःखी होणे. करुणा म्हणजे इतरांच्या प्रश्नाने स्वतः कासावीस होणे. करुणा म्हणजे भवतालचे दारिद्रय, अज्ञान, दुर्बलता, असहायता पाहून कळवळा येणे. करुणा म्हणजे रांगेच्या शेवटी जाऊन थांबण्याची तयारी असणे. करुणा म्हणजे स्वतः उभे राहून इतरांना बसायला देणे. करुणा म्हणजे रुग्णाची सेवा. करुणा म्हणजे जे भीतीने बोलत नाहीत त्यांच्या मनातले ओळखणे. करुणा म्हणजे हातातले काम सोडून मदतीला धावणे. करुणा म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे. करुणा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे. करुणा म्हणजे ‘परहितों सुखों में’ ‘निज के हितसुखों को’ पाहता येणे.

आपण आणि बाहेरचे जग यांचे संबंध कसे असावेत हे उत्तमता ठरवत असते. आपण आणि सर्व जग यांचे संबंध आधीपासूनच आहेत याची आठवण करुणा करून देत असते.

करुणेचे याहून मनाला भिडणारे वर्णन करणारे व त्याप्रमाणे वागणारे अनेक जण भेटतील. करुणेचा स्पर्शही न झालेले अनेक जण दिसतात. उत्तमतेची सवय लावून घेता येते. करुणेची सवय लावून घेता येत नाही. करुणेची वृत्तीच बनावी लागते. उत्तमता बाणवण्यासाठी कृतीमागच्या हेतूचा विचार करावा लागतो. करुणा जागी होण्यासाठी हेतूचा विचार करणे पुरत नाही. करुणा अनुभवावीच लागते. आपण आणि बाहेरचे जग यांचे संबंध कसे असावेत हे उत्तमता ठरवत असते. आपण आणि सर्व जग यांचे संबंध आधीपासूनच आहेत याची आठवण करुणा करून देत असते.

श्रेष्ठ उत्तमता

उत्तमतेची वृत्ती करुणेच्या पायावर उभी राहिली की त्यातून श्रेष्ठ उत्तमता उभी राहते. समाजाच्या हितासाठी एखादा प्रकल्प उभा करणं ही उत्तमता आहे. त्या प्रकल्पाखाली ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांनी न मागता प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच नुकसान भरपाई देणे ही समंजस उत्तमता आहे. याची नोंद होत नाही. याच्या गोष्टी रचल्या जात नाहीत. पण राजवाडा बांधताना आपली जागा न सोडणाऱ्या म्हातारीची झोपडी तशीच ठेवून त्याच्या बाजूने बांधकाम करणाऱ्या राजाची गोष्ट मात्र आवर्जून सांगितली जाते. ती श्रेष्ठ उत्तमता आहे. याला लोक अव्यवहारी म्हणतात. ठाण्याला पांडुरंगशास्त्री आठवले यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाचे बांधकाम चालवले होते. तेव्हा पलीकडच्या डोंगरावरील वनवासींच्या वस्तीला जाण्या -येण्याचा मार्ग त्यांनी आपल्या जागेतून मोकळा सोडला. कायदा त्यांच्या बाजूने होता. पण ते अव्यवहारी वागले. तो श्रेष्ठ व्यवहार होता. त्याची गोष्ट लिहिली गेली. अशा वागण्यातून श्रेष्ठ उत्तमता दिसते.

स्वतःला फायदेशीर व्यवहार ही सर्वसाधारण रीत आहे. समंजस व्यवहार ही त्याहून दुर्मिळ चीज आहे. श्रेष्ठ व्यवहाराच्या गोष्टी शोधूनच काढाव्या लागतात…

श्रेष्ठ उत्तमतेच्या गोष्टी थोड्याच सांगता येतात. कारण तो आदर्श असतो. स्वतःला फायदेशीर व्यवहार ही सर्वसाधारण रीत आहे. समंजस व्यवहार ही त्याहून दुर्मिळ चीज आहे. श्रेष्ठ व्यवहाराच्या गोष्टी शोधूनच काढाव्या लागतात, किंवा रचाव्या लागतात. श्रेष्ठ व्यवहार म्हणजे श्रेष्ठ उत्तमता म्हणजेच करुणेवर आधारित उत्तमता. हा आदर्श खाली खेचायचा मोह होतो. श्रेष्ठ उत्तमतेची द्राक्षे आंबट आहेत असे म्हणावेसे वाटते. Performance, Excellence, Accreditation, Certification हे सध्याचे परवलीचे शब्द आहेत. या शब्दांच्या गजरात आपण प्रबोधक कधी ना कधी श्रेष्ठ उत्तमतेची द्राक्षे मिळतीलच म्हणून उड्या मारत राहू या. काही वर्षांपूर्वी प्रबोधिनीत प्रवेशासाठी क्षेत्र-चाचणी मध्ये अशा उड्या न कंटाळता मारता येणे ही एक अट होती.

सौर आषाढ १, शके १९२७, २२/६/२००५