दसरा पाडव्याला ध्वजारोहण कशासाठी ?

अखंड भारताच्या स्मरणासाठी आपण वर्षातून चार वेळा ध्वजारोहण करतो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला, तर दसरा आणि पाडव्याला भगव्या ध्वजाला वंदन करतो. आजचा भारत समर्थ बनवणे आणि भविष्यात खंडित भारताला पुन्हा अखंड करण्यासाठी स्वतःला समर्थ बनवणे, हा या ध्वजवंदनामागचा संकल्प आहे. 

“दाही दिशांत घुमुनी जयनाद जेव्हा, होई अखंड प्रियभूमि अजिंक्य तेव्हा” या प्रार्थनेच्या ओळींतून आपल्या विजययात्रेची प्रेरणा घेत आपण या संकल्पाचे स्मरण करतो.

“ध्वज हा स्वजनांना आशीर्वाद देणारा आणि शत्रूच्या छातीत धडकी भरवणारा असतो. ध्वजा ही समर्पणाची अधिकारी असते आणि एकत्वाला आवाहन करणारीही असते. आक्रमण करताना किंवा बचाव करताना ध्वजाच्याच बलिवेदीवर माणसे आपले बलिदान हसत हसत करतात. पिढ्यांमागून पिढ्या येतात आणि जातात. नवनवीन रचना येते आणि नाहीशी होते. पण जन, देश, धर्म यांचे अतूट ऐक्य दर्शवणारा जो ध्वज- ज्याच्यासाठी देशोदेशींचे लोक रक्त सांडतात- तो स्वत:च्या लक्षावधी पुजाऱ्यांच्या हृदयात सदैवपणे चिरकालाच्या सातत्याने आणि सहजपणे तेवत असतो !”
विवेकानंद – कन्या भगिनी निवेदिता (पान १६१)

भगवा ध्वज का ?

भगवा ध्वज हा आपल्या संस्कृतीने दिलेला राष्ट्रध्वज आहे, जो शिवरायांच्या सर्व मोहिमांमध्ये पुढे असायचा. वारकऱ्यांच्या खांद्यावरही हीच भगवी पताका किंवा ध्वज असतो.  हा भगवा ध्वज आपल्या हिंदू राष्ट्राचं, धर्माचं आणि संस्कृतीचं समाजाचं प्रतीक आहे. ‘त्याग, पराक्रम आणि सेवा’ हा ध्येयमंत्र ज्यावर अलिखितपणे कोरलेला आहे असा हा आपला भगवा ध्वज आहे. 

ध्वजगीत आणि त्याचा अर्थ 

ॐ नमोsस्तु ते ध्वजाय

सकलभुवनजनहिताय

विभवसहित विमलचरित

बोधकाय मंगलाय

ते सततम्॥

ॐ नमोsस्तु ते ध्वजाय

ॐ

  • सकलभुवनजनहिताय – सर्व जगाचे (पृथ्वी, स्वर्ग, पाताळ) हित व्हावे अशी बुद्धी या ध्वजाकडून आम्हाला मिळावी. 
  • विभवसहित –  आपले राष्ट्र हे ‘विभवसहित’ म्हणजे समृद्धी आणि वैभवाने नटलेले असले पाहिजे. त्यासाठी व्यापारात, संशोधनात, शिक्षण क्षेत्रात, शेतीत किंवा संशोधनात पराक्रम करायचा आहे.
  • विमलचरित – पण १४० कोटी लोकसंख्येचा विचार करता प्रत्येकापर्यंत समृद्धी पोहोचली पाहिजे. यासाठी ‘विमल चरित्र’ म्हणजे शुद्ध चरित्र हवे, जिथे कमावलेली संपत्ती स्वतःपुरती न ठेवता देशबांधवांसाठी वापरण्याची वृत्ती असते. 
  • बोधकाय मंगलाय – हा ध्वज आपल्याला बोध करणारा ‘प्रबोधक’ आणि सर्वांचे मंगल करणारा आहे. आपण सर्वांनी स्वतः जागृत होऊन इतरांनाही राष्ट्रसेवेसाठी जागृत केले पाहिजे, प्रबोधक बनले पाहिजे.