५ : प्रबोधिनीला भौतिक संपत्ती वाढवण्याची इच्छा नाही का ? भौतिक संपत्ती म्हणजे जमिनी-इमारती, वाहने, सुसज्ज कार्यशाळा व प्रयोगशाळा असे सर्वच मला म्हणायचे आहे.
उत्तर :- प्रबोधिनीचे काम वाढवण्यासाठी ‘कामातून काय साध्य करायचे ?’, ‘कामासाठी कोणती साधने वापरायची ?’ आणि ‘साधने वापरून साध्य गाठणारे कार्यसाधक कोण?’ या तीन्ही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रश्नातील भौतिक संपत्ती साध्य नसून साधन आहे असे आपण मानतो. कामाच्या सुरुवातीला ‘साध्य’ पूर्ण समजलेले ‘कार्यसाधक’ असतात. त्यांना साधने म्हणजे भौतिक संपत्ती मिळवावी व वाढवावी लागते. भौतिक संपत्ती जशी वाढत जाते तसे साध्य व साधक यांच्याकडचे लक्ष कमी होण्याची शक्यता असते. दोन भवितव्य लेखांच्या मदतीने आपण साध्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. नव्या दमाच्या साधकांची भर पडत राहिली तर ते साधने म्हणजे भौतिक संपत्ती उभी करू शकतील असा आपला विश्वास आहे. प्रबोधिनीची वेगवेगळी केंद्रे वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याला आहेत. त्यांची भौतिक संपत्तीची गरज वेगवेगळी आहे. नव्या दमाच्या साधकांची कार्यकर्त्यांची गरज मात्र सर्वठिकाणी नित्याची व सारख्या प्रमाणात आहे. जिथे सहविचारात सहभागी होऊ शकणाऱ्या द्वितीय व तृतीय प्रतिज्ञित कार्यकर्त्यांची फळी उभी राहील तिथे त्यांनी साधन म्हणून भौतिक संपत्ती कितीही उभी करावी. सर्व भौतिक संपत्ती केवळ सांभाळण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी नाही, तर साध्य गाठण्यासाठी वापरली मात्र गेली पाहिजे.
